अवैध देणग्या बंद होण्याच्या भीतीनेच नोटबंदीला विरोध

0
91

कपिल मिश्रांचा केजरीवालांवर ‘हवाला’ बॉम्ब
नवी दिल्ली, १९ मे 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हवाला रॅकेटच्या माध्यमातूनच कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळत असतात. अस्तित्वातही नसलेल्या कंपन्यांकडून त्यांना मिळालेले प्रत्येकी ५० लाख रुपयांचे चार धनादेश हवाला व्यापाराचाच एक भाग आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घोषित केला आणि आपल्या अवैध देणग्या बंद होण्याच्या भीतीने केजरीवालांनी नोटबंदीच्या विरोधात मोहीम उघडली, असा आरोप आम आदमी पार्टीचे निलंबित नेते आणि बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी आज शुक्रवारी केला.
व्हॅट न भरल्याबद्दल ज्या कंपन्यांना नोटीस जारी झाल्या, अशा कंपन्या केजरीवालांना देणग्या कशा देऊ शकतात आणि केजरीवाल त्या कसे स्वीकारू शकतात, यावर आश्‍चर्य व्यक्त करताना कपिल मिश्रा यांनी यातील काही कंपन्यांचे लेटरपॅड पत्रपरिषदेत सादर केले. या कंपन्या केवळ कागदोपत्रीच आहेत. प्रत्यक्षात त्यांचे कुठलेही अस्तित्व नाही.
पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर केजरीवालांनी त्यास इतका विरोध का केला, याविरोधात त्यांनी देशभरात दौरा का केला, असा सवाल करताना, त्यांच्या ज्या खास लोकांकडे काळा पैसा होता, त्यांच्यावर आयकर खात्याच्या धाडी पडत होत्या. केजरीवालांचे हवाला मार्ग बंद झाले होते, असा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल आणि आपमधील इतर सदस्यांनी मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा शेअर केलेला व्हिडीओ बोगस असल्याचा दावा मिश्रा यांनी केला. हेमप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीला वाचविण्यासाठी केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीने मुकेश कुमारला पुढे केले. पक्षाला देणगी देणार्‍या कंपन्यांचे लेटरहेड त्यांनी घरातच तयार केले. सनव्हिजन कंपनीच्या लेटरहेडवरील सही मुकेश कुमारची नव्हतीच, असा दावाही त्यांनी केला.
केजरीवाल यांनी त्यांच्या पार्टीला दोन कोटी रुपये कुठून मिळाले, याची माहिती आयकर विभागाला द्यावी. हा निधी महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी आला होता. ज्या मुकेश कुमारने पक्षाला निधी दिला, असा दावा केला जात आहे, त्यावेळी तो कंपनीत नव्हता. केजरीवाल यांनी मुकेश कुमारच्या दाव्याची प्राथमिक चौकशी केली नाही. बरे झाले, हा व्हिडीओ केजरीवाल यांनी स्वत:च शेअर केला, असा चिमटाही त्यांनी काढला.
माझी हत्या होऊ शकते
दरम्यान, केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर मी आरोप करीत असल्यामुळे कदाचित माझी हत्याही होऊ शकते. कारण, केजरीवाल हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांच्या मार्गात येणार्‍या कोणालाही ते संपवू शकतात, अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली.
मिश्रांविरुद्ध मानहानीचा खटला
दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री यांनी सत्येंद्र जैन यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी कपिल मिश्रा आणि आमदार मंजिदरसिंग सिरसा यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)