जोकोविच, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

0
85

रोम, १९ मे
मातीच्या कोर्टवरील स्टार टेनिसपटू राफेल नदाल व दुसरा सीडेड नोवाक जोकोविचने सरळ सेटमध्ये विजय नोंदवून रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. मात्र स्टॅन वावरिंकाला स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता बघावा लागला.
गतवर्षी अंतिम लढतीत ब्रिटनच्या ऍण्डी मरेकडून पराभूत होणार्‍या जोकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बॅतिस्ता आगुटवर ६-४, ६-४ अशी मात केली. आता उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोशी झुंज द्यावी लागणर आहे. डेल पोत्रोने सातवा सीडेड केई निशिकोरीला ७-६, ६-३ अशी मात दिली.
फ्रेन्च ओपनपूर्वी सूर गवसलेल्या राफेल नदालने क्ले कोर्टवर आपले वर्चस्व कायम राखले. त्याने अमेरिकेच्या १३ व्या सीडेड जॅक सोकवर ६-३, ६-४ असा विजय नोंदविला. नदालचा पुढील सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमशी होणार आहे. थिएमने अमेरिकेच्या सॅम क्वेरीला ३-६, ६-३, ७-६ अशी मात दिली. जर उपांत्यपूर्व फेरीत नदाल व जोकोविच जिंकले, तर हे दोघेही उपांत्यफेरीत एकमेकांसमोर उभे ठाकतील. विजेतेपदाचा दावेदार राहिलेल्या स्टॅन वावरिंकाला अमेरिकेच्या जान इसनरकडून ७-६, ६-४ असे पराभवाचे तोंड बघावे लागले. कॅनडाच्या मिलोस राओनिच, क्रोएशियाच्या आठवा सीडेड मारिन सिलिच व अमेरिकेच्या इसनरनेसुद्धा अंतिम आठमध्ये स्थान मिळविलेले आहे. (वृत्तसंस्था)
बोपन्ना-पाब्लो उपांत्यपूर्व फेरीत
रोम : रोहन बोपन्ना व त्याचा जोडीदार पाब्लो कुव्हासने फेलिसियानो लोपेज व मार्क लोपेज या सातव्या सीडेड जोडीला पराभूत करून रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोपन्ना-पाब्लोने दुसर्‍या फेरीत स्पेनच्या जोडीला ४-६, ७-६, १०-८ असे पराभूत केले. एक तास ३९ मिनिटे रंगलेल्या या लढतीत बोपन्ना-पाब्लोला ब्रेक पॉइन्ट मिळण्याची तीन संधी मिळाली, परंतु ते फायदा उचलू शकले नाही. पुढील फेरीत बोपन्ना-पाब्लोला चौथी सीडेड जोडी पीयरे ह्यूज रॉबर्ट-निकोलस माहूटशी झुंजावे लागणार आहे. महिला गटात सानिया मिर्झा-सारोस्लाव्हा श्‍वेदोव्हा या तिसर्‍या सीडड जोडीला उपांत्यपूर्व सामन्यात सारा इराणी व मार्टिना ट्रेव्हिसानशी होणार आहे.