तानाजी वनवे कॉंग्रेसचे नवे गटनेता

0
58

– बहुमताच्या आधारे विभागीय आयुक्तांनी केली निवड
– स्वीकृत सदस्यांचा निर्णय गुलदस्त्यात
– संजय महाकाळकर यांची गच्छंती
नागपूर, १९ मे
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर आज अखेर पडदा पडला. नागपूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसचे नवे गटनेता म्हणून विभागीय आयुक्तांनी तानाजी वनवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ही निवड बहुमताच्या आधारे करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्तांनी मनपाकडे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे संजय महाकाळकर यांची विरोधी पक्ष नेतेपदावरून गच्छंती झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या कोट्यातील एक स्वीकृत सदस्याचा निर्णय मात्र सध्या गुलदस्त्यात आहे.
नागपूर महानगरपालिकेमध्ये ४ मार्च २०१७ रोजी कॉंग्रेसचे गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांच्या नावाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली होती. प्रदेश कॉंग्रेसच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे संजय महाकाळकर यांचे नाव पाठविण्यात आले होते व त्यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. दरम्यान, स्वीकृत सदस्यत्वासाठी माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते आणि शहर कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष विकास ठाकरे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी दंड थोपटले आणि या नावाला विरोध करताना गटनेताच बदलण्याची युक्ती कॉंग्रेसमधील एका गटाने केली. हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानुसार सलग दोन दिवस विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन तानाजी वनवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. सोबत समर्थक नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्रही देण्यात आले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सर्व बाजूंचा विचार करून तसेच समर्थक नगरसेवकांची ओळखपरेड करून आज निगम सचिवांना तानाजी वनवे यांची गटनेतेपद नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. हे पत्र आपल्याला प्राप्त झाले असल्याचे मनपाचे निगम सचिव हरीश दुबे यांनी मान्य केले.
आगामी सर्वसाधारण सभेत तानाजी वनवे यांचे नाव कॉंग्रेसचा गटनेता म्हणून प्रशासनातर्फे जाहीर करण्यात येईल आणि या संदर्भातील औपचारिकता पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी दिली.
नागपूर मनपाच्या सभागृहात कॉंग्रेसचे एकूण २९ सदस्य असून त्यापैकी १६ सदस्यांनी तानाजी वनवे यांच्या नावाला समर्थन दिले आहे. या बहुमताचाच आदर करीत विभागीय आयुक्तांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या कोट्यातील स्वीकृत सदस्याच्या एका जागेसाठी विकास ठाकरे आणि किशोर जिचकार या दोघांनी नामांकन सादर केले असल्यामुळे तानाजी वनवे यांच्या नियुक्तीच्या पार्श्‍वभूमीवर कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता लागलेली आहे.
स्वीकृत सदस्याची निवड ही निवडीची नव्हे तर नियुक्तीची प्रक्रिया आहे. त्यामुळे आमच्याकडे प्राप्त झालेल्या सहा अर्जांमधून पाच जणांची निवड करून त्यांची नावे एक बंद लिफाफ्यात महासभेसाठी देऊ, असे सांगून आयुक्त मुदगल म्हणाले की, सध्या या प्राप्त नामांकन पत्रांची छाननी सुरू आहे. त्याच्यासोबत योग्य व सर्व कागदपत्रे जोडली गेली आहे की नाही, तसेच या निवडीसाठी गटनेत्याचे पत्र लागते की नाही या बाबी तपासून घेतल्या जातील. नियुक्ती करण्यात येणार्‍या स्वीकृत सदस्यांची नावे सर्वसाधारण सभेतच जाहीर केली जातील.
महाकाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विषय समित्यांमध्ये ज्या नगरसेवकांची नियुक्ती केली ती तशीच कायम राहणार असल्याचे आयुक्त मुदगल यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
या स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत आज तर्कवितर्क लावण्यात येत होते. तानाजी वनवे यांची नियुक्ती आज करण्यात आली आणि स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया काल पूर्ण करण्यात आली. उमेदवारीसाठी गट नेत्याची शिफारस असणे गरजेचे असते, असे काहींनी म्हणणे आहे, तर त्याची गरज नसल्याचे काहींचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर काहींच्या मते विकास ठाकरे यांची वर्णी लागू शकते, तर १६ तारखेला सभा होऊन तानाजी वनवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्यामुळे विकास ठाकरे यांचा, तसेच किशोर जिचकार यांच्या अर्जासोबत गटनेत्याचा अर्ज नसल्यामुळे दोन्ही अर्ज रद्द करून कॉंग्रेस सदस्याच्या निवडीची प्रक्रिया पुन्हा नव्याने केली जाऊ शकते.