मनपा शाळांसोबतच विद्यार्थिसंख्याही रोडावली

0
37

– तीन सहायक शिक्षक निलंबित
नागपूर, १९ मे
शाळेत जाणार्‍यांचा टक्का वाढावा यासाठी शासकीय स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केले जातात. गेल्या काही वर्षांत शिक्षकांवरही विद्यार्थी वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेच्या शहरातील शाळांसोबतच विद्यार्थ्यांची संख्याही चांगलीच रोडावली आहे. याशिवाय विविध कारणांवरून तीन सहायक शिक्षकांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आल्याची बाब माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत उघड झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत या संदर्भात २०१२ ते २०१६ या कालावधीत मनपा शाळा, विद्यार्थिसंख्या तसेच कार्यरत व कारवाई केलेल्या शिक्षकांसंबंधीची माहिती विचारली होती.
२०१२ मध्ये नागपुरात मनपाच्या मराठी माध्यमाच्या ८० शाळा होत्या. याशिवाय हिंदीच्या ६७ तर उर्दू माध्यमाच्या ३५ शाळा होत्या. २०१३ मध्ये या संख्येत थोडीफार घट झाली. या वर्षात मराठीच्या ७४, हिंदीच्या ६६ तर उर्दूच्या ३२ शाळा राहिल्या. २०१४ मध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या पाचने कमी झाली. यावर्षी मराठीच्या ६९ शाळा राहिल्या. हिंदी माध्यमाच्या शाळा तेवढ्या कायम राहिल्या तर उर्दू माध्यमाची केवळ एकच शाळा कमी झाली. २०१५ मध्ये मराठीच्या ६६, हिंदीच्या ६४ तर उर्दूच्या २८ शाळा राहिल्या. २०१६ मध्ये मनपाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले. मराठी माध्यमाच्या ५३ शाळाच राहिल्या, तर हिंदीच्या ५८ आणि उर्दूच्या शाळांची संख्या २५ वर आली.
शाळांच्या संख्या कमी होण्यासोबतच प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची संख्याही या पाच वर्षांच्या काळात कमी झाली. यात अपवाद फक्त २०१२ चा राहिला. यावर्षी मनपा शाळांमध्ये २३ हजार ५२९ विद्यार्थी होते. २०१३ मध्ये यात ११ हजार विद्यार्थ्यांची भर पडली. यावर्षी मनपा शाळांमध्ये ३४ हजार १६० विद्यार्थ्यांची नोंद होती. २०१४ मध्ये ही संख्या कमी होऊन ३२ हजार ४१० पर्यंत घसरली. २०१५ मध्ये ही संख्या आणखी कमी झाली. यावर्षी २८ हजार १८२ विद्यर्थी मनपा शाळांमध्ये होते तर २०१६ मध्ये आणखी तीन हजार विद्यार्थी घटले. यावर्षी २३ हजार ५९१ विद्यार्थी मनपा शाळांमध्ये शिक्षण घेत होते.
तीन सहायक शिक्षक निलंबित
या पाच वर्षांच्या काळात विविध कारणांखाली तीन सहायक शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या सहायक शिक्षणाधिकारी व जनमाहिती अधिकार्‍यांनी दिली. २०१२ या वर्षात प्राथमिक विभागात १०६३ व माध्यमिक विभागात ३५८ शिक्षक-शिक्षिका कार्यरत होते. २०१३ मध्ये ही संख्या १०२८ व ३५३ एवढी घटली. २०१४ मध्ये प्राथमिक विभागात १०४७ तर माध्यमिक विभागात ३५० शिक्षक-शिक्षिका होते. २०१५ मध्ये प्राथमिक-९४८, माध्यमिक-३४३ तर २०१६ मध्ये प्राथमिक विभागात १००५ तर माध्यमिक विभागात ३३३ शिक्षक-शिक्षिका कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.