जेव्हा शिक्षकालाच ‘गुणा’साठी भांडावे लागते…

0
53

– हेतुपुरस्सर गुण कमी दिल्याचा आरोप
-आदर्श शिक्षक पुरस्काराचा सावळा गोंधळ
करुणा भांडारकर
भाग -१
नागपूर, १९ मे
‘शिक्षक’ शब्द उच्चारला तरी एक आदरभाव मनात येतो. कारण आपल्या संस्कृतीत शिक्षक गरूस्थानी आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, सावित्रीबाई फुले, डॉ. राजेंद्र प्रसाद, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर असे देशाला लाभलेले व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतात. आज असे शिक्षक मिळणे कठीणच आहे. याही परिस्थितीत काही शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करताना दिसतात. पण त्यांची पारख शिक्षण क्षेत्रातील अधिकार्‍यांनाच नसल्याचे कळते. विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्यास शिक्षकाकडे धाव घेतल्याचे आपण बघतो. पण ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’च्या सदोष प्रक्रियेमुळे एका शिक्षकाला हक्काच्या गुणासाठी शिक्षण कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या. त्यात प्रयत्नामुळे गुणाची वाढ देऊन न्याय तर देण्यात आला, पण उशीर झाल्याने याचा निकालावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबतची रविस्तर माहिती अशी, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतात. पूर्वी राज्य पुरस्कारासाठी विभागीय स्तरावर प्रक्रिया राबविण्यात येते. नागपूर विभागात ७ मे रोजी ही प्रक्रिया झाली. त्यानंतर निकाल १५ मे रोजी जाहीर करण्यात आले. यात एका शिक्षकाने त्यांना कमी गुण देण्यात आल्याचा आक्षेप घेतला. गुणवाढीसाठी रीतसर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. यात त्यांचे तब्बल ५१ गुण वाढले. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी स्वत: ही बाब मान्य केल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे. ज्या उपक्रमासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले. या उपक्रमासाठी त्यांना प्रश्‍नावलीत चक्क शून्य गुण देण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
या प्रक्रियेतून नागपूर विभागातून तीन शिक्षकांची निवड झाली आहे. त्यांची नावे मुलाखतीसाठी पुण्याला पाठविण्यात आलीत. दरम्यान पुण्यात १५ मे पासून पुढील प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अमरावती विभागातून निवड झालेल्या शिक्षकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. तर १६ मे रोजी नागपूर, लातूर विभागाच्या शिक्षकांच्या मुलाखती झाल्या. नागपूर जिल्ह्यातून निवड झालेल्या शिक्षकांना अनुक्रमे १६०, १५३, १३३ गुण मिळले आहेत. या अन्यायग्रस्त शिक्षकाला पूर्वी १०५ गुण देण्यात आले होते. पण वाढीव गुणानुसार त्यांचे १५६ गुण होतात. त्यामुळे जिल्ह्यातून दुसर्‍या क्रमांकावर ते आहेत. मुलाखती सुरूच असल्यामुळे विशेष प्रकरण म्हणून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करता येऊ शकतो. पण अजून तरी कुणीही अधिकारी त्यांच्या मदतीस सरसावला नाही. त्यामुळे एका कार्यालयातून दुसरीकडे ते चकरा मारत आहेत. नुकतेच शिक्षण उपसंचालकांनी प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. पण यावर लवकरच पावले उचलण्याची आवश्यकता आहे. नाही तर प्रक्रिया आटोपल्यास शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.
शिक्षकांचे उपक्रम
नागपूर मनपातून आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी त्यांची शाळा प्रथम आहे. प्रगत शाळा म्हणून शालेय शिक्षण प्रधान सचिव यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी मोरेश्‍वर वरघणे यांच्या विविध उपक्रमांचीर तोंडभरून स्तुती केली. त्यांच्या या परिश्रमामुळेच शाळेला शाळासिद्धीत ‘अ’ दर्जा मिळाला. तसेच ‘दप्तराचे ओझे कमी’ करणारी नागपूर जिल्हयातील त्यांची शाळा प्रथम आहे. ‘ज्ञानरचनावाद’ व ‘कौशल्यावर’ आधारित या उपक्रमामुळे वर्षभर शाळेला शिक्षक व विद्यार्थी भेटी देतात. मुख्य म्हणजे आदर्श शिक्षकाच्या प्रश्‍नावलीत या सर्वांवर गुण आहेत. पण त्यांना यात शून्य गुण देण्यात आले.
गुण कमी कसे?
२०१५-१६ च्या यादीत नागपूर जिल्ह्यातून मला द्वितीय क्रमांकाचे गुण प्राप्त झाले होते. २०१६-१७ मध्ये प्रक्रियेत मागविण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तराची मूळ प्रत प्रत्यक्ष मुलाखतीवेळी दाखविली. मरी मला गुण कमी कसे? मला हेतुपुरस्सर कमी गुण देण्यात आले आहे. हा अन्याय असून यावर सकारात्मक पडताळणी करून मला योग्य न्याय द्यावा आणि मुलाखतीकरिता राज्यस्तरावर पाठविले जावे.
-मोरेश्‍वर वरघणे
शिक्षक, पन्नालाल देवडिया शाळा, मनपा