आनंदयात्रा

0
87

आनंद आमार गोत्र…

‘‘अरे, जरा आनंदी राहात जा. सदा काय दुर्मुखलेला अन् चिडचिडा असतो!’’ शेजारच्या काकू त्यांच्या तीस वर्षांच्या मुलाला म्हणत होत्या. त्यांचा संवाद माझ्या कानावर पडला अन् मला हसू आलं, पण लगेच मनात प्रश्‍न निर्माण झाला, असं दुसर्‍याने आनंदी राहा म्हटलं की आनंदी राहता येईल का? विचारांचं चक्र सुरू झालं…
आनंदी असणं किंवा नसणं हे स्वत:वरच तर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आनंदाला स्वत:च कारणीभूत असते. पण हे न कळल्यामुळे प्रत्येक जण कस्तुरीमृगाप्रमाणे आनंदाच्या शोधात ऊर फुटेस्तोवर भटकत असतो. आनंदी असणं आणि आनंदी वाटत जगणं ही जीवन जगण्याची एक शैली आहे. आनंदी असणं हा स्वभाव आहे. ती एक वृत्ती आहे. प्रयत्न केले तर ही वृत्ती नक्कीच विकसित करता येते. या आनंदाच्या अनेक परी अन् अनेक तर्‍हा आहेत. शोधायचंच म्हटलं तर खूप छोट्या छोट्या प्रसंगात, लहान लहान घटनांत आनंद सापडतो, पण तो सापडणं शोधणार्‍यावरच तर अवलंबून आहे!
आनंद क्षणिक असतो तसाच चिरस्थायीही असतो. आनंद सात्त्विक असतो तसाच विकृतही असतो. दुसर्‍याच्या आनंदाने आनंदी होणं, हा सात्त्विक आनंद आहे. आपली संस्कृती दुसर्‍याच्या आनंदाने आनंदी व्हायला शिकवते; पण मनात द्वेषाची, मत्सराची भावना असेल तर, आनंद कसा मिळणार? वळवाच्या सरीत चिंब चिंब भिजण्याने मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण तो कोणत्याही अहंभावाशी निगडित नसल्यामुळे तो आनंद अत्यंत निखळ, निर्मळ असतो. त्यात एक धुंदी असते.
साधा फुलांच्या वार्‍यावर स्वार होऊन आलेला सुगंधदेखील क्षणभरच का होईना मन आनंदित करून जातो आणि तो आनंद सगळ्या चित्तवृत्ती झंकारित करून टाकतो. ध्येयप्राप्तीच्या आनंदाची वेगळीच तर्‍हा आहे. त्याला मोठा डौल आहे, त्यात ताठाही आहे, पण हा आनंद आयुष्यभराची पुंजी आहे, हे मात्र खरं!
कर्तव्यपूर्तीच्या आनंदाचा निराळाच बाज आहे. त्यात समाधान आहे आणि सुटकेचीही भावना आहे. मनासारखी निर्मिती झाली की होणारा आनंद शब्दातीत आहे. हा निर्मितीचा आनंद मनाचं मोरपिस करून टाकतो. लहानग्या बाळाने पहिलं पाऊल टाकलं की त्याला आणि त्याच्या आईला होणारा आनंद अनुभवण्याचीच गोष्ट आहे. एखाद्याचं दु:ख जाणून, त्याची गरज ओळखून त्याला उत्स्फूर्तपणे केलेली मदत आयुष्यभर अक्षय आनंदाची सोबत करते. आनंद ही एकमेव अशी गोष्ट आहे की, जी वाटल्याने वाढतच जाते. घटत नाही. अत्तरासारखा आहे आनंद. दुसर्‍याला देतानाही तुम्ही कधीच रिकामे होत नाही, त्याचा सुगंध तुम्हाला लगटूनच राहतो.
‘आनंद’ आणि ‘सुुख’ हे शब्द समानार्थी वाटत असले, तरी ते तसे नाहीत. त्यांच्या अर्थात फरक आहे. इंग्रजीत आनंदासाठी करििूपशीी असा शब्द आहे, तर सुखासाठी झश्रशर्रीीीश असा शब्द आहे. सुख हे बाह्य गोष्टींपासून मिळतं त्यामुळे ते विकत घेता येतं, पण असं बाह्य गोष्टींपासून मिळणारं सुख माणसाला आनंद देईलच याची काही खात्री नाही. म्हणजेच आनंद आपण विकत घेऊ शकत नाही. तो आपल्या अंतरी असतो, असावा लागतो.
’करििूपशीी ळी ुहशप ुहरीं र्ूेी ींहळपज्ञ, ुहरीं र्ूेी ीरू रपव ुहरीं र्ूेी वे रीश ळप हरीोपू.’’
जिथे विचार, भाषा आणि कृती यामध्ये एकवाक्यता असते तिथे आनंद असतो, असं गांधीजी म्हणायचे. आपल्या आसपास काही लोकं असेही असतात की, ज्यांना कुठेच आनंद गवसत नाही. आपल्या हृदयात, आपल्या जीवनात आनंदाचं झाड आपणच रुजवायचं असतं, हे यांना ठाऊकच नसतं. ते नेहमीच खिन्न, अतृप्त, निराश असतात. त्यांना आनंदाची बाधा कधी होत नाही. जगातल्या उणिवा तेवढ्या त्यांना ठळकपणे जाणवतात. ते दुसर्‍यांचं न्यून शोधण्यात धन्यता मानतात. त्यांना आनंदयात्री बनवणं फारच अवघड असतं. कारण त्यांना आनंदी ठेवणं ही दुसर्‍यांची जबाबदारी आहे, असंच कायम त्यांना वाटत असतं. आनंदाचं झाड आपल्या जीवनात रुजवणं आणि फुलवणं, सभोवतालच्या सगळ्यांना त्याची शीतलता देणं, हे आपल्याच तर हातात आहे! तेव्हा मनातल्या उदास, खिन्न, हताश आणि हिरमुसल्या सावल्यांना दूर दूर पळवून लावायचं आणि तुकारामांप्रमाणे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग| आनंदची अंग आनंदाचे’ असं म्हणत जगाला सामोरं जायचं!
‘उत्सव आमार जाती| आनंद आमार गोत्र’ असं आनंदयात्री रवींद्रनाथ म्हणतात. आपणही आनंदाला आपलं गोत्र बनवलं तर?… तर आपणही या जीवनाच्या प्रवासात रवींद्रनाथांसारखे आनंदयात्री म्हणून सहभागी होऊ आणि आपल्यासोबत येणार्‍यांच्या मनात आनंदाचं कारंजं नाचवू!! प्रयत्न करायला काय हरकत आहे?
माझ्या प्रश्‍नाचं माझ्यापुरतं उत्तर मला मिळालं.
डॉ. अरुंधती वैद्य
९४२०३९७५५९