प्रेरणा

0
84

आपत्तीत आशेचा किरण- टीडीआरएफ!

दैनंदिन जीवनात मनुष्याला अनेक बाबींची पूर्वतयारी- नियोजन करावे लागते. यालाच आपण व्यवस्थापन असे म्हणतो. आजवर आपण सर्वांनी खाजगी बाबी किंवा व्यावसायिक बाबींचे नियोजन, याबाबतचे व्यवस्थापन अनुभवले असालच. परंतु, गेल्या ७ ते ८ वर्षांपासून होणार्‍या मानवी व नैसर्गिक आपत्तींमुळे ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा शब्द मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, आकाशवाणीवरून ऐकायला व पाहायला मिळतात.
मुख्यत: आपत्तीचे दोन प्रकार एक मानवनिर्मित आपत्ती, दुसरा नैसर्गिक आपत्ती. यामध्येही सांगायचे म्हणजे आपत्ती कुठलीही असो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजावर व त्यातील प्रमुख घटकांवर परिणाम होताना दिसून येतो. देशाच्या भूतकाळात वळून बघितल्यास, ३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आलेला महाप्रलयंकारी भूकंप असो वा २६ डिसेंबर २०१४ मध्ये माळीणसारख्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावावर आलेले संकट किंवा जम्मू-काश्मीर येथील पूरपरिस्थिती आणि या प्रकारेे असंख्य घटना, ज्यामुळे आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.
भारत सरकारमार्फत या सर्व बाबींचे नियोजन असते वेळी एक बाब प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे आपत्ती निवारणाबद्दल देशात असलेली जनजागृती, आपत्ती आल्यावर काय करावे यापेक्षा, काय करू नये या सर्व बाबींचे असलेले देशातील नागरिकांमधील अज्ञान. या सर्व बाबींचे अध्ययन करत यवतमाळ येथील हरिश्‍चंद्र राठोड यांनी सेवा, साहस, सुरक्षा हे ब्रीद आणि जय भारत यांचा जयघोष करत जगावेगळे काहीतरी कार्य करायचे, तसेच ‘देश हमे देता हैं सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखे’ या भावनेतून देशभक्तीने ओतप्रोत टीडीआरएफ (टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)ची स्थापना ९ मे २००५ रोजी केली. गेल्या १२ वर्षांपासून ही संघटना फक्त देशसेवेने प्रेरित होत आपत्ती व्यवस्थापनामधील एक आशेचा किरण ठरत आहे.
देशाच्या इतिहासामध्ये २६ डिसेंबर २००४ हा दिवस कोणी विसरणार नाही. कधीही न अनुभवलेली आपत्ती म्हणजे ‘त्सुनामी’चा सामना देशाला करावा लागला होता. या आपत्तीमुळे झालेली आर्थिक, नैसर्गिक व मानवनिर्मित साधनसंपत्तीची हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. या सगळ्या घटनांचा राठोड यांच्या मनावर आघात झाला. आपण या सर्व आपत्तीवर मात करण्यासाठी काहीतरी करायचे, ही जिद्द मनात ठेवत त्यांनी टीडीआरएफची स्थापना केली.
२००५ पासून समाजामध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे व येणार्‍या कोणत्याही आपत्तीवर मात करण्याचे कार्य त्यांनी व त्यांच्या टीमने चालू केले. सुरुवातीला काही स्वयंसेवकाबरोबर चालू केलेल्या कामामध्ये आज टीडीआरएफ (टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)सोबत मोठ्या प्रमाणात युवक-युवती आहेत, ज्याचा व्याप संपूर्ण देशभर दिसून येतो.
टीडीआरएफद्वारा वेगवेगळ्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये शाळा, महाविद्यालय, संघटन, संस्था, अधिकारी, कर्मचारी, गावे, शहरामध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. जून २०१३ मध्ये अचानक उत्तराखंड येथे आलेली आपत्ती तसेच तेथील नद्यांनी घेतलेले रौद्ररूप यामुळे झालेली जीवित व वित्तहानी आणि सरकारद्वारा असफल ठरत असलेले प्रयत्न, या सर्वांमध्ये आपले काही दायित्व आहे, या विचाराने टीडीआरएफच्या चमूने उत्तराखंडमधील आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात खारीचा वाटा उचलला.
उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये पोहचून नागरिकांचे प्राण वाचविले, बेघर नागरिकांना खाद्य सामुग्री, औषधी व जीवनाश्यक वस्तूंचे वाटपही केले. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा, हा विचार ठेवत टीडीआरएफने ही मोहीम यशस्वी पार पाडली.
गेल्या काही वर्षांमध्ये बोअरवेलमध्ये पडून लहान मुलांनी जीव गमावले आहेत. ज्या वेळी ३१ जानेवारी २०१५ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निंगनूर गावात ५० फूट खोल बोअरवेलमध्ये २ वर्षीय लहान मुलगा सूरज आखरे पडला. त्या वेळी सर्वांनी त्याची जिवंत राहण्याची अपेक्षा सोडली होती. अशा वेळी टीडीआरएफ जवानांनी कोणत्याही प्रकारे अत्याधुनिक सुविधांचा वापर न करता तसेच आपल्या जिवाची पर्वा न करता १४ तासांच्या अथक परिश्रमाने अनेक धोके पत्करत त्या मुलास सुखरूप बाहेर काढले. या प्रकारे अनेक आपत्तींमध्ये टीडीआरएफ सदैव आशेचा किरण ठरताना दिसून आले.
आज ‘टीडीआरएफ’चे कार्य संपूर्ण देशामध्ये ‘सेवा, साहस, सुरक्षा’ हे ब्रीद घेऊन दीनदुबळ्या व मानवतेच्या रक्षणार्थ आणि सेवेसाठी चालू आहे व राहील. देशामध्ये येणार्‍या आपत्तीमध्ये व्यवस्थापन व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य टीडीआरएफ निरंतर चालू ठेवील. अशा प्रकारे देशसेवेने ओतप्रोत व देशाला परमवैभवाकडे मार्गस्थ करण्यासाठी खारीचा वाटा उलचणार्‍या टीडीआरएफ या संघटनेचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.
रवी रमेश दांडगे
९७६५९९५३९७