समस्या

0
83

इथे ओशाळली स्वच्छता

नगरसेवकातील ‘सेवा’ या उदात्त, पवित्र संकल्पनेची जागा आता ‘मेवा’ या स्वार्थी आत्मकेंद्रित संकल्पनेने घेतली आहे. त्यामुळे समाजसेवेपेक्षा स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल यालाच नगरसेवकांची प्राथमिकता प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामतः जनता व नगरसेवक यातील अभिप्रेत संवेदनशीलता, जवळीक, संपर्क, समन्वय दिवसेंदिवस कमी झालेला दिसत आहे.

संत गाडगे महाराजांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने स्वच्छतेच्या संस्काराचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत या महत्त्वाकांक्षी अभियानात देशात १३८ आणि राज्यात बाराव्या स्थानावर घसरगुंडी व्हावी ही अत्यंत खेदाची व नामुष्कीची बाब आहे. याचाच अर्थ स्वच्छतेच्या सर्वमान्य कसोटीवर, निकषावर संत्रानगरी विफल ठरली आहे असा होतो. अवघ्या चार-पाच वर्षांपूर्वी देशातील ५२ प्रमुख शहरांना मागे टाकून ‘स्वच्छ शहर-सुंदर शहर’ हा बहुमान प्राप्त करून ही संत्रानगरी देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकाला आली होती. विदेशी पाहुणे व इतर राज्यातील महानगरपालिका यंत्रणा नागपूरची ही यशोगाथा प्रत्यक्ष अवलोकनासाठी, अनुभविण्यासाठी, त्यामागील गमक जाणून घेण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी कौतुकाने, कुतूहलाने भेटी देत होते. या सन्मानाने नागपूरकर सुखावले होते.
तत्कालीन महानगरपालिकेचे महापौर प्रा. अनिल सोले यांना स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी विदेशातून पाचारण होत होते. सार्वजनिक परिवहन, आरोग्य सुविधा, हिरवे शहर आणि लोकाभिमुख जनकल्याण सोयी-सुविधांचे आगर म्हणून सर्वत्र गौरविण्यात आलेल्या नागपूर शहराची अशी दुरवस्था व्हावी ही निश्‍चितच चिंतेची, चिंतनाची बाब झाली आहे.
शहराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना पाणी, प्रकाश, रस्ते, साफसफाई, स्वच्छता, स्वास्थ्य, सोयी-सुविधा पुरविण्याची नैतिक जबाबदारी महानगरपालिका या स्थानिक स्वायत्त संस्थेची आहे. शहराचा विकास हा समाजकारणाचा संवेदनशील विषय आहे. त्यात राजकारणाला यत्किंचितही थारा नाही. विकासाच्या दिशा व परिसीमा या प्रत्येक महानगरपालिकेच्या भौतिक रचना, जनतेच्या सामाजिक गरजा, समस्या आणि आर्थिक उपलब्धतेवर विसंबून आहेत. विकासाची प्राधान्यतादेखील महानगरपालिकापरत्वे भिन्न भिन्न असू शकते. शहराचा विकास हा महापालिका यंत्रणेच्या क्षमतेवर, नगरसेवकाच्या जागरूकतेवर आणि जनताजनार्दनाच्या सक्रिय सहयोगावर प्राधान्यकरून आधारित आहे.
मनपा व जनताजनार्दनातील लोककल्याणाच्या योजना कार्यान्वित करून विकास साधणारा नगरसेवक हा प्रमुख दुवा आहे. अत्यंत महत्त्वाची कडी आहे. या तिन्हीच्या समन्वयावर, जागरूकतेवर, क्षमतेवर विकासाची प्रगती अवलंबून आहे. शहराचा नावलौकिक आधारित आहे. त्यामुळे मनपात जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक हे सामाजिक समरसता, सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वाला चिकटून असणारे, समाजात सामाजिक कार्य केलेले, समाजसेवेची गोडी असलेले निरपेक्ष, प्रतिभावंत, शक्तिशाली, कर्तृत्ववान, उत्तम जनाधार असणारे असावे. त्यांच्यात अंतर्बाह्य सेवाभाव ओतप्रोत सामावलेला असावा.
आज परिस्थिती अगदी विपरीत झाली आहे. नगरसेवक या उपाधीत अभिप्रेत असलेला सेवाभाव नगरसेवकात नाममात्र शिल्लक राहिलेला आहे. नगरसेवकातील ‘सेवा’ या उदात्त, पवित्र संकल्पनेची जागा आता ‘मेवा’ या स्वार्थी आत्मकेंद्रित संकल्पनेने घेतली आहे. त्यामुळे समाजसेवेपेक्षा स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल यालाच नगरसेवकांची प्राथमिकता प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामतः जनता व नगरसेवक यातील अभिप्रेत संवेदनशीलता, जवळीक, संपर्क, समन्वय दिवसेंदिवस कमी झालेला दिसत आहे.
जनतेच्या तक्रारीचे निवारण करणे इतकेच कर्तव्य नगरसेवकाच्या लेखी आता उरले आहे. स्वतः नगरसेवक नागरिकांशी संपर्क साधून जनतेच्या दैनंदिन सोयी-सुविधा, अडीअडचणी, स्वच्छता व सुंदरता या संबंधात खरोखर किती जागरूक आहे, हा अभ्यासाचा प्रश्‍न आहे. समाजकारण असो की धर्मकारण प्रत्येक क्षेत्रात अर्थाअर्थी संबंध नसताना राजकारणाचा केवळ शिरकाव नव्हे, तर सुळसुळाट झाला आहे. गल्ली ते दिल्ली आणि पंचायत ते पार्लमेंट जिकडे बघावे तिकडे राजकारणच दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रात राजकीय वर्चस्व असावे, असा प्रत्येक राजकीय पक्षाचा अट्टहास आहे. आजचा नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी नसून तो राजकीय पक्षाशी बांधिलकी असलेला राजकीय हित जोपासणारा कार्यकर्ता आहे. त्याची बांधिलकी जनतेपेक्षा पक्षाशी जास्त असते. परिणामतः अशा नगरसेवकाचे सामाजिक दायित्वाकडे कळत नकळत दुर्लक्ष होतं. त्याची परिणती प्रभागाच्या मूलभूत दैनंदिन स्वच्छता, साफसफाई, सोयी-सुविधा दुर्लक्षित राहण्यात, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण करण्यात होते. स्वच्छता व जनतेचे स्वास्थ्य एकमेकांशी निगडित आहे. अस्वच्छतेमुळे त्याचा विपरीत परिणाम साहजिकच जनस्वास्थ्यावर होतो. पालिकेसारख्या सामाजिक लोकाभिमुख स्वायत्त संस्थेत राजकीय पक्षाचा हस्तक्षेप असावा किंवा असू नये हा वादग्रस्त मत मतांतराचा प्रश्‍न होऊ शकेल.
पण राजकारणाचा सहभाग समाजकारणात कितपत योग्य आहे याचा विचार जागरूक मतदाराने करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याला निवडून देण्यापेक्षा समाजसेवी, विश्‍वासार्हता, निरपेक्ष, पक्षाप्रती नव्हे तर समाजाप्रती, जनतेप्रती संवेदनशीलता जोपासणार्‍या स्वच्छ प्रतिमेच्या प्रतिनिधींना प्राधान्य देणे जनकल्याणाच्या व शहराच्या विकासाच्या दृष्टीने हितावह होईल. सामाजिक क्षेत्रातील राजकीय पक्षाची अनाठायी लुडबूड ही आजच्या अधोगतीला प्रामुख्याने कारणीभूत आहे, असे विधान केल्यास ते अवास्तव ठरू नये.
आज नगरसेवक निवडून आला की तो स्वतःच्या सत्कार-समारंभात, सामाजिक उद्घाटनातच व्यग्र असलेला दिसतो. ज्या धार्मिक क्षेत्राचा किंवा अध्यात्माचा यत्किंचितही लवलेश नसलेला नगरसेवक धार्मिक समारंभाचे उद्घाटन करतो तेव्हा जनताजनार्दनाच्या अगतिक मनोवृत्तीची कीव करावीशी वाटते. स्वाभाविकच सर्वसामान्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, वरचढ आहोत, प्रतिष्ठित आहोत असा न्यूनगंड या नगरसेवकात निर्माण होतो. जनता वेडेपणाने नगरसेवकाच्या मागे धावत असते आणि नगरसेवक जनतेपासून दूर दूर जात असतो. प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेच्या सोयी-सुविधा, स्वच्छता व दैनंदिन समस्यांची जाणीव करून त्याचे निवारण करण्याच्या नैतिक विहित कर्तव्यापासून, दायित्वापासून तो भरकटला जातो. त्याची सामाजिक कर्तव्याप्रतीची उदासीनता प्रभागाची व पर्यायाने शहराची दुर्दशा होण्यास कारणीभूत ठरते.
गेल्या चार-पाच वर्षांतील या अधोगतीला आर्थिक टंचाई कारणीभूत असेल असे वाटत नाही. जनतेकडून स्वच्छता कर वसूल करण्यात येतो. तो खर्चही होतो. पण स्वच्छता सुविधावर नाही तर नाल्या, डांबरीकरण ज्यात सेवाभाव कमी व मेवाभाव जास्त अशा गतविधीवर. नगरसेवकालादेखील या भौतिक विकासाच्या कार्यक्रमात जास्त रस असतो. त्यामुळे स्वच्छता व सुंदरता यासारखे जिव्हाळ्याचे व शहराच्या वैभवात भर टाकणारे उपक्रम उपेक्षित राहतात. सर्वत्र अस्वच्छता व कचर्‍याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य, सोयी-सुविधांचा अभाव जनतेच्या नशिबी आले आहे. सुंदरतेऐवजी शहराची कुरूपता वाढत आहे.
शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी साफसफाईचे दायित्व असलेलेच जर हातसफाई करू लागले तर स्वच्छतेऐवजी भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीचा दर्पच आसमंताला भारून टाकेल. तीच अवस्था आज नागपूरची झाली आहे. स्वच्छता ही शेवटी सर्व संबंधितांच्या मनात रुजायला हवी. अन्यथा आपले घर स्वच्छ करायचे अन् कचरा रस्त्यावर ढकलून द्यायचा ही तर आज आपल्या सार्वजनिक समाज समरसतेची ओळख आहे. जोपावेतो मनपा, प्रशासकीय यंत्रणा, नगरसेवक आणि जनताजनार्दनाचा सकारात्मक क्रियाशील प्रामाणिक समन्वय साधल्या जात नाही तोपावेतो स्वच्छ सुंदर नागपूर हे हरवलेले वैभव प्रस्थापित करणे अशक्य आहे. संत्रानगरी ही स्वप्नसुंदरीच राहील.
दिगंबर शं. पांडे
९४०३३४३२३९