शतश्‍लोकी

0
87

श्रीगुरूंची कृपा व्हावी

जीवन्मुक्तिर्मुमुक्षो: प्रथममथ ततो मुक्तिरात्यन्तिकी च|
तेऽभ्यासज्ञानयोगाद् गुरुचरण कृपापाङ्‌गङ्‌गेन लब्धान्‌| अभ्यासोऽपि द्विधा स्यात् अधिकरणवशाद्दैहिको मानसश्‍च|
शारीरस्त्वासनाद्यो ह्युपरतिरपरो ज्ञानयोग: पुरोक्त:॥
श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या अभ्यास तथा ज्ञानयोगाने मुमुक्षूला आरंभी जीवन्मुक्ती आणि अंतिमत: विदेहमुक्ती प्राप्त होते. हा अभ्यासही शरीर तथा मानसिक असा दोन प्रकारचा असतो. पैकी आसनादिक शारीरिक तर उपरती हा दुसरा (मानसिक अभ्यास होय) ज्ञानयोग (विषय त्याग) पूर्वी वर्णिला आहे.
अध्यात्मक्षेत्रातील व्यक्तीची जीवनचर्या कशी असते तेच पू. आचार्यश्री येथे सांगत आहेत. शरीरात प्राण आहेत तोवर जीवन मुक्ती आणि शरीर सोडले की विदेहमुक्ती, ही त्या योग्याची अवस्था असते, असे ते आरंभी कथन करीत आहेत.
शास्त्राने संचित, प्रारब्ध आणि क्रीयमाण अशी तीन प्रकारची कर्मे वर्णिली आहेत. पूर्वी केलेली कर्मे ज्यांची फळे अद्याप मिळण्यासही आरंभ झालेला नाही त्यास संचित म्हणतात. उदा. नोकरी हे फळ असेल तर त्यासाठी शालेय जीवनातील अगदी पहिलीपासूनचा अभ्यासही कारण आहेच. मात्र, असा अभ्यास करीत दहाव्या वर्गापर्यंत आला तरी काही नोकरी लागणार नाही आहे. अत: ही कर्मे संचित आहेत. त्याचा कधी ना कधी लाभ मिळेल.
एखाद्यास सध्या नोकरी लागली आहे. त्याच्या पूर्व कर्माची फळे त्याला मिळणे सुरू झाले आहे. हे प्रारब्ध कर्म आणि आता सध्या तो जे करीत आहे ते क्रियमाण कर्म. यापैकी ज्ञानाग्नीने संचिताचा विलय होतो. क्रीयमाण कर्माचा लेप नष्ट होतो. मात्र, प्रारब्ध कर्माचा विनाश संभव नाही. ते भोगावेच लागते. जसा धनुष्यातून सुटलेला बाण थांबवणे संभव नाही तद्वत प्रारब्धाची रचना असते. हे सांगण्याचे कारण की, साधकाला ज्ञान झाल्यावरही त्याचे प्रारब्ध त्याला भोगावेच लागते. जोवर हा प्रारब्ध भोग आहे तोवर त्याचा देहही टिकतो. मात्र, अशा अवस्थेत त्याला जो मुक्तीचा आस्वाद लाभतो त्याला शास्त्र जीवन्मुक्ती असे म्हणते. साधकाला आरंभी अशी जीवन्मुक्ती लाभते आणि प्रारब्धाचाही क्षय झाल्यावर, देहपतन घटल्यावर तो साधक विदेहमुक्तीचा अधिकारी ठरतो. या मार्गक्रमणावर उपकारक ठरणार्‍या दोन बाबी आचार्यश्री सांगत आहेत. एक म्हणजे अभ्यास आणि दुसरी म्हणजे ज्ञानयोग. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही बाबींचे प्राप्तिस्थान रूपात पू. आचार्यश्रींनी श्रीगुरुचरणाचे वर्णन केले आहे. श्रीगुरूंच्या चरण सेवेने, त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच या दोन्ही बाबी प्राप्त होतात.
पू. आचार्यश्रींनी अभ्यासाचेही दोन प्रकारे वर्णन केले. एक शरीराद्वारे केली जाणारी आसनादिक साधना, तर दुसरी मनाद्वारे साधावयाची उपरती. साधनेसाठी शरीर सुदृढ हवे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌|’ सांगणारी आपली संस्कृती. या शरीराला साधनेसाठी सुयोग्य राखण्यासाठी ज्या ज्या रीती आपल्या पूर्वजांनी विकसित केल्या त्यापैकी महत्त्वपूर्ण विषय म्हणजे अष्टांगयोग. यम नियमांना अंगीकृत करीत आसन आणि प्राणायामाच्या द्वारे शरीर स्वस्थ ठेवता येते. या स्वरूपाची साधना ही शरीराद्वारे केली जाते. अत: या प्रकारास शारीरिक अभ्यास म्हटले.
दुसरी अभ्यासपद्धती म्हणजे मानसिक साधना. त्यासाठी आचार्यश्री उपरती शब्द सांगतात. वेदान्तशास्त्रातील ही परिभाषा मोठी सुंदर आहे. सर्ववेदान्तसिद्धान्तसारसंग्रह नामक आपल्या ग्रंथात उपरतीची व्याख्या देताना आचार्यश्री म्हणतात-
‘उपरतिशब्दार्थो ह्युपरमणं पूर्वदृष्टवृत्तिभ्य:|’
अर्थात पूर्वी अनुभवलेल्या विषयाच्या आनंदास देणार्‍या वृत्तींबाबत मनाला परावृत्त करणे. त्याबाबत आवड नष्ट करणे म्हणजे उपरती. माणूस आपल्या जीवनात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इ.द्वारे सदैव सुखानुभूती घेतो. त्या अनुभूतींना पुन:पुन्हा घेण्याची मनीषा असते. मात्र, अनेकदा या अनुभूतींना प्राप्त करूनही समाधान झालेच नाही, याचा तरी विचार करावा की नाही? असा विचार करून आता पुरे झाले म्हणत त्याची रती अर्थात आवड कमी होत जाणे याला म्हणतात उपरती. तर पूर्वी वर्णिलेला ज्ञानयोग अर्थात वैराग्यपूर्वक विषय त्याग. अभ्यास आणि ज्ञानयोग या दोन मार्गांनी जीवन्मुक्ती आणि विदेहमुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो.
या दोन्ही बाबी अभ्यास आणि ज्ञानयोग या दोन्हीच्या प्राप्तीसाठी श्रीगुरुचरण सेवा हाच मार्ग आहे. असे सांगत आचार्यश्री समस्त साधकांना सांगत आहेत की, जीवनाचे अंतिम उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर मार्ग एकच- ‘श्रीगुरूंची कृपा व्हावी!’
प्रा. स्वानंद गजानन पुंड