वेध

0
72

रजनीकांतला डोहाळे

दाक्षिणात्य मंडळींच्या नसानसांत राजकारण भरलेले आहे, असे म्हणतात. म्हणूनच कुठलाही राजकीय निर्णय असो वा धोरण, येथील आम जनतेची आणि राजकारण्यांचीही त्याबाबत विशिष्ट अशी मते असतात. काठावर उभे राहून राजकारणाचा अंदाज घेण्याचा दाक्षिणात्यांचा स्वभावच नाही. एक घाव दोन तुकडे करीत, एक तर अण्णाद्रमुक किंवा द्रमुक अशा सरळ दोन तटात येथील मतदारांची विभागणी होते. नाही म्हणायला कॉंग्रेस, भाजपा, एमडीएमके, डीएमडीके, डीके आदी पक्ष राजकीय क्षितिजावर आहेत, पण त्यांचे अस्तित्व नगण्यच. सध्या राज्यात पुन्हा एकदा राजकीय ज्वर आलेला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याने राजकारणात यायचे की नाही, याबाबतची खलबते करण्यासाठी त्याच्या चाहत्यांच्या खास दरबाराचे आयोजन केले होते. राज्यभरातील चाहते यात सहभागी झाले. या बैठकीत चर्चा काय झाली, याचा उलगडा झाला नसला, तरी रजनीकांत याने चाहत्यांना संबोधित करताना, जर मी राजकारणात आलो तर भ्रष्टाचारावर आळा घालेन आणि जो केवळ पैशाचा विचार करणार असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवेन, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे जयललितांचा मृत्यू झाल्याने अण्णाद्रमुकमध्ये नेतृत्वाबाबत मोठी पोकळी निर्माण झाली असताना आणि दुसरीकडे करुणानिधी यांचे वय झाल्याने द्रमुकमध्येदेखील सर्वसंमतीचा नेता शोधणे कठीण काम होऊन बसले आहे. या सार्‍या परिस्थितीत दाक्षिणात्यांना रजनीकांतच राजकारणातील त्यांचा तारणहार वाटू लागला आहे. राजकारणातील पोकळी भरण्याची जादू त्यांच्यात आहे, असे चाहत्यांचेदेखील मत आहे. आपल्या अभिनयसामर्थ्याच्या बळावर टॉलिवूड गाजवणार्‍या रजनीकांतच्या राजकारणप्रवेशावरील चर्चा ही काही पहिलीच नाही.
यापूर्वीही त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत अटकळ बांधली गेली होती. १९९६ च्या निवडणुकीत रजनीकांतने सार्वजनिक रीत्या जयललितांच्या पक्षाला मतदान करू नका, असे आवाहन केले होते. अण्णा द्रमुक सत्तेत आला तर देवदेखील तामिळनाडूचे रक्षण करू शकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्या वेळी अम्मांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर द्रमुक आणि टीएमसी यांच्या युतीला जबरदस्त विजय मिळाला होता.

स्पष्ट संकेत

रजनीकांतला राजकारणात बघण्याची तामिळी जनतेची स्वप्ने खरी ठरतात की काय? असे वाटायला लागणार्‍या घटनादेखील घडत आहेत. दोन वेळातर असे झाले की रजनीकांतच्या चाहत्यांनी त्यांच्यावर राजकारणातील प्रवेशाबाबत दबाव टाकला. पण, त्या वेळीही त्यांनी या मुद्यावर चर्चा टाळली. तामिळनाडूला वाचवा, अशी हाक त्यांचे समर्थक नेहमीच देतात आणि त्याबाबतचे फलकदेखील राज्यभरात प्रसिद्ध करतात. पण, तरीदेखील रजनीकांत कुणाला बधले नाहीत. आता नव्या समीकरणांमध्ये रजनीकांत काय निर्णय घेतात, याकडे तामिळी जनतेचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तो राजकारणात सिनेमासारखीच दमदार एण्ट्री मारेल आणि लक्षावधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय्. त्याला कारणही तसेच आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण करून रजनीकांत राजधानीत परतला आहे. या दरम्यान त्याला मिळालेले समर्थन अभूतपूर्व होते, असे वृत्त माध्यमांनीच दिले आहे. कुठल्याही निवडणुका नाहीत, कसल्याही चित्रपटाचे प्रमोशन नाही, पण रजनीकांतच्या या दौर्‍यात सुदूर खेड्यांमधूनही चाहत्यांची झुंबड उडाली. याच सभांमध्ये आजवर राजकारणाबाबत चुप्पी साधणार्‍या रजनीकांतची कळी खुलली आणि ‘थलैवा’, ‘द बॉस’ म्हणून सिनेसृष्टीत ओळखल्या जाणार्‍या या सुपरस्टारने राजकारणप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. ‘‘धीर धरा, आपल्या कामावर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा,’’ अशी साद त्याने शेकडो चाहत्यांना घातली. देशाच्या विद्यमान व्यवस्थेवर त्याने, ‘ती भ्रष्ट झालीय्’ या शब्दांत ताशेरे ओढले. आपण सगळ्यांनी मिळून ही व्यवस्था बदलायला हवी. ज्या लोकांनी मला यशाच्या शिखरावर नेले त्यांची सेवा करण्यात गैर काय आहे? असा सूचक प्रश्‍नही त्याने केला. गेल्या चार दिवसांपासून रजनीकांत चाहत्यांच्या गाठीभेटी घेत आहे. यादरम्यान त्याने चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्यासोबत फोटोदेखील काढले. प्रारंभी या दौर्‍यामध्ये आपण कुठलेही भाष्य करणार नाही, असे त्याने म्हटले होते. पण, नंतर त्याने गप्पांमधून, राजकारणप्रवेशाची सुप्त इच्छा बोलून दाखवली. चाहत्यांवर मोहिनी कशी घालायची, हे आताशी रजनीकांतला चांगलेच अवगत झाले आहे. त्यामुळे त्याला गर्दीची चिंता राहिलेली नाही. दर्दी मात्र त्याला शोधावे लागतील आणि तेदेखील स्वच्छ चारित्र्याचे. राजकारणातील प्रवेशाचे त्याचे पहिलेच पाऊल यशस्वी झाले आहे. मी सच्चा तामिळी आहे, असे स्पष्ट करून त्याने राज्यातील जनतेची मते जिंकून घेतली आहेत. गेली ४४ वर्षे तो राज्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहे. राजकारणाची त्याला चांगलीच जाण दिसते, हे त्याच्या एका विधानावरून स्पष्ट होते. विरोधक ही राजकारणाची मूलभूत गरज आहे. विरोधकांशिवाय राजकारणात कुणीही मोठं होऊ शकत नाही, असे त्याचे विधान सूचकता दर्शविणारे आहे.
चारुदत्त कहू
९९२२९४६७७४