चौफेर

0
116

असामान्यत्वाची प्रचीती देत जगलेला सामान्य माणूस…

जिवतंपणी स्वत:च्या पार्थिवाची कल्पना करू शकणार्‍या आणि त्यावरील अंत्यसंस्काराची अपेक्षित पद्धत स्पष्टपणे मांडणार्‍या व्यक्तिमत्त्वाच्या उंचीचा अंदाज कुणाला बांधता येईल? मृत्यूनंतर कुठेही आपला पुतळा न उभारण्याची त्यांची सूचनाही वेगळेपणाच्या त्याच धाटणीतली. उज्जैनच्या मातीचा गंध, रा. स्व. संघाच्या संस्कारांची अजोड जोड, जयप्रकाश नारायण यांच्या सान्निध्याचा प्रभाव, त्यांच्या चळवळीतील सहभागातून प्रगल्भ होत गेलेल्या सामाजिक जाणिवा आणि संघाच्या प्रचारकाचे संन्यस्त जीवन… या सर्वांच्या एकत्रित परिणामांतून घडत गेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल दवे!

खरं तर संघाचा एक स्वयंसेवक एवढी ओळख दिली, तरी त्यातून त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित व्हावे. हा माणूस आयुष्यभर संघ जगला. सभोवतालही संघाचा तोच विचार आपल्या आचरणातून रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं केला. सर्वदूर माणसं ऐहिक सुखाच्या मागे धावताना दिसत असताना, मंत्रिपदाचे बिरुद मागे लागले तरी अभिनिवेशाचा जरासाही लवलेश त्यांच्या वर्तनातून कुठे जाणवू नये, हे आगळेपण केवळ चार क्षणाचे, दिखाव्यापुरते नव्हतेच कधी. संपूर्ण जीवन याच पद्धतीने जगले ते. मंत्री म्हणून त्यांनी किती कामे केली, किती धाडसी निर्णय घेतलेत, लोकोपयोगी कामांना किती आणि कसे प्राधान्य दिले, प्रत्येक गोष्टीतून अधोरेखित होणारा निसर्गरक्षणाचा त्यांचा ध्यासही वर्णनातीत ठरावा असाच आहे. त्याची तोकडी वा विस्तृत चर्चाही यथावकाश होईल, पण त्याहीपेक्षा अनिल दवे यांच्या निधनानंतर चहुबाजूने व्यक्त झालेली हळहळ, एक सुहृद मित्र गमावल्याची भावना आणि कालपर्यंत केवळ मित्रपरिवार आणि संबंधितांच्या कोंदणात बंदिस्त राहिलेले त्यांच्या सरळ, साध्या निगर्वी स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा या निमित्ताने झालेला प्रयत्न… एखाद्याच्या असामान्यत्वाची प्रचीतीच या सार्‍या बाबी घडवू शकते…
तसं बघितलं तर मध्यप्रदेशच्या पलीकडे देशपातळीवर असा खूप नावलौकिक नव्हता त्यांचा. राजकीयदृष्ट्या राष्ट्रीय स्तरावरील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची गणना कधी नव्हती. नाव घेतलं की लागलीच प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर चित्र उभं राहील अशी प्रसिद्धीही त्यांना लाभली नव्हती. पण, तरीही काल त्यांच्या जाण्याने देशाच्या कानाकोपर्‍यातले लोक दु:खी झाले होते. काळाने झडप घालावी इतके काही वय झाले नव्हते त्यांचे. तरीही नियतीने खेळलेल्या डावाने सभोवतालची मंडळी भावनाविवश झाली होती. अविवाहित राहिलेल्या या माणसाची साधी जीवनशैली भावलेल्या प्रत्येकाचेच डोळे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पाणावले होते. कुणी विशेषत्वाने सांगितले नाही तर कदाचित कळणारही नाही, की हा माणूस या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य आहे! पदं प्राप्त होताच दारावर नावाच्या पाट्या लावण्यापासून तर मिळतील, न मिळतील त्या सार्‍या सुविधा त्या पदाच्या अनुषंगाने ओरबाडून घेण्याची अहमहमिका अजूनही माणसांच्या कळपाची ओळख ठरली असताना, त्या परंपरेला छेद देत वागणारी माणसं विरळाच. अनिल दवे यांचे व्यक्तिमत्त्व, सार्वजनिक जीवनातले त्यांचे वर्तन, जीवन जगण्याची त्यांनी अनुसरलेली शैली त्याच वेगळेपणाची साक्ष ठरली होती.
अवघ्या सहा दशकांचं आयुष्य जगलेली एखादी व्यक्ती मृत्यूच्या कितीतरी दिवसांपूर्वीच आपल्या अंतिम संस्कारांबाबतची कल्पना मांडून जाते. ते कसे व्हावे याबाबतच्या सूचना आपल्या सग्या-सोयर्‍यांसाठी लिहून ठेवते. एखाद्याच्या मृत्यूसंदर्भात असल्याने वाईट वाटून घ्यावे की उत्स्फूर्त दाद द्यावी, अशा संभ्रमात टाकणारी ती कल्पना असते. पवित्र नर्मदेच्या तीरावर आपल्या पार्थिवावर अग्निसंस्कार व्हावेत. शेवटचा हा विधी पार पाडाताना वैदिक कर्मांच्या पलीकडे कुठेही कर्मकांडांचे अवडंबर नको, हे निक्षून सांगताना, त्यांच्या मनाची जराही घालमेल झालेली नसते. जिवतंपणी स्वत:च्या पार्थिवाची कल्पना करू शकणार्‍या आणि त्यावरील अंत्यसंस्काराची अपेक्षित पद्धत स्पष्टपणे मांडणार्‍या व्यक्तिमत्त्वाच्या उंचीचा अंदाज कुणाला बांधता येईल? इथे जिवंतपणीच स्वत:चे पुतळे उभारण्याची, आपल्या नावाने एखादेतरी स्मारक निर्माण करून ठेवण्याची घाई झालेले लोक उदंड झाले असताना, मृत्यूनंतर कुठेही आपला पुतळा न उभारण्याची त्यांची सूचनाही वेगळेपणाच्या त्याच धाटणीतली. उज्जैनच्या मातीचा गंध, रा. स्व. संघाच्या संस्कारांची अजोड जोड, जयप्रकाश नारायण यांच्या सान्निध्याचा प्रभाव, त्यांच्या चळवळीतील सहभागातून प्रगल्भ होत गेलेल्या सामाजिक जाणिवा आणि संघाच्या प्रचारकाचे संन्यस्त जीवन… या सर्वांच्या एकत्रित परिणामांतून घडत गेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल दवे!
मध्यप्रदेशातील उज्जैनच्या पंचक्रोशीतील एका गावात पुष्पादेवी आणि माधव यांच्या घरातला जन्म. इंदोरच्या गुजराती कॉलेजमधून झालेले पदव्युत्तर शिक्षण. संघाच्या शाखेतून रुजलेली जीवन जगण्याची रीत. भेटतील ती माणसं आणि पुस्तकांच्या दुनियेत रमण्याची सवय. विद्यार्थिदशेपासूनच विविध सामाजिक उपक्रम आणि आंदोलनातल्या सहभागातून वैयक्तिक आणि सामाजिक विश्‍व अधिकच आशयघन आणि अनुभवसंपन्न होत गेले. आपल्या मृत्यूनंतर कुणाला कधी वाटलंच आपल्या स्मरणार्थ काही करावंसं, तर त्यानं दुसरंतिसरं काही करू नये. जमलंच तर एक झाड लावावं. त्याची निगा राखावी. जिवापाड संगोपन करून त्याचा विशाल वटवृक्ष करावा. आणि हो! पाण्याचे दुर्भिक्ष प्रकर्षाने जाणवू लागलेय् अलीकडे. त्यामुळे झालंच तर जलाशयांच्या संरक्षणासाठी काही करता आलं तर तेवढं करावं प्रत्येकानं… असं सांगणारे अनिल दवे यांच्याकडे विद्यमान सरकारमधील राज्यमंत्रिपदाची सूत्रं आली ती मुळातच त्यांच्या आवडीच्या, निर्सग आणि पर्यावरणरक्षणाशी संबंधित कार्याची. मग काय, या विभागाच्या कामाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न झाला नसता तरच नवल! झाडांच्या लागवडीपासून तर ऍस्बॅस्टॉस शीटचा वापर पूर्णपणे संपविण्यापर्यंतचे एक एक निर्णय त्यांनी घेतले. आपल्या देशातील प्रसारमाध्यमांचं लक्ष अशा सकारात्मक कार्याकडे जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्यानं, या कामाला हवी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही, हे वेगळ्यानं सांगायला नकोच! पण, त्यानं अनिल दवे नावाच्या माणसाचं काहीएक अडलं नाही. बिघडलं तर मुळीच नाही. आपल्या स्वभावानुसार तेवढ्याच दृढ निश्‍चयानं एक एक पाऊल पुढे टाकत ते आपलं काम करीत राहिले. त्यांच्या साधेपणाची महती आता त्यांच्या मृत्युपश्‍चात, ज्ञात करून घेण्यासाठी धडपडणार्‍यांच्या तुलनेत, त्यांच्या सान्निध्यात राहता आल्याने ते मोठेपण जवळून अनुभवण्याचे भाग्य लाभलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा गोतावळा मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघालेले अनिल दवे आजच्या परिभाषेतील राजकारणात कदाचित ‘अनफीट’ ठरविले गेले असतीलही काहींच्या लेखी. कारण सर्जनशीलतेला राजकारणात जराही वाव नसल्याचा समज करून घेत वावरणारे शेकडो लोक इथे आहेत. दुर्दैवाने, सध्या तेच लोक इतरांच्या यशापयशाचे मापदंड स्वत:च्या खुज्या, संकुचित पद्धतीने ठरवीत असतात. पण, समाजातील कित्येकांच्या वहीत अतिशय सामान्य, साध्याशा वाटणार्‍या या माणसातील असामान्यत्वाची नोंद केव्हाच झाली होती.
मोठ्या हुद्यावर असतानाही, डोक्यात हवा न शिरू देता, जनसामान्यांसारखे वागणे इथे प्रत्येकाला जमतेच असे नाही. मग ती किमया ज्याला लीलया साधली तो माणूस लहान कसा ठरवायचा? आपल्या लाघवी स्वभावातून, संपर्कात आलेली सारी माणसं ‘आपली’ करून सोडण्याचा अट्‌टहास जोपासतच जगला हा माणूस. अकाली निधनानंतर अनिल दवे यांच्याबाबत सर्वदूर व्यक्त झालेल्या आर्त स्वरातील संवेदना, त्यांच्या त्या मोठेपणाची साक्ष जगाला पटवून देणार्‍या होत्या… अनिल दवे यांच्याबाबतचा नितान्त आदर, दिवस सरले तरी विसरता न येणार्‍या त्यांच्या आठवणी आणि मुख्य म्हणजे, साधेपण नसानसांत भिनलेल्या एका व्यक्तिमत्त्वाने, आपल्या कार्यातून, सालस वागणुकीतून मागे ठेवलेली अमिट छाप शब्दातीत असल्याचेच जणू ती हळहळ सांगत होती…
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३