वीजनिर्मिती संच टप्प्याटप्प्याने बदलणार ः बावनकुळे

0
192

अकोला, १९ मे
२५ वर्षांपेक्षा जास्त वयोमान झालेले राज्यभरातील २१० मेगावॅट क्षमतेचे वीज संच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असल्याने आगामी काळात भुसावळ, नाशिक, पारस, उमरेड या भागात नवीन वीज प्रकल्प सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारस येथे सांगितले.
कमीत कमी कोळशात महत्तम वीज उत्पादन, संयंत्र वीज वापरात बचत, झिरो डॅमरेज, पाणी बचत व पुनर्वापर, परिसरात साफसफाई व एकूणच नियोजनपूर्वक कामे केल्याने पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम असल्याचे गौरवोद्गार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारस वीज केंद्राच्या भेटीदरम्यान प्रतिपादन केले.
राज्याचे ऊर्जा नवीन, नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, १८ रोजी महानिर्मितीच्या पारस औष्णिक वीज केंद्राचा दौरा केला व कोळसा हाताळणी विभाग, राख हाताळणी विभाग, शून्य पाण्याचा निचरा(झिरो डिस्चार्ज), पी.सी.आर. आदी विभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्यासमवेत थेट संवाद साधला.
याप्रसंगी आमदार बळीराम शिरस्कार, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंते राजेंद्र बावस्कर,अनंत देवतारे, अधीक्षक अभियंते कन्हैयालाल माटे, रूपेंद्र गोरे, श्रीराम बोडे, सुधाकर पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कांबळे, उप विभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार बाळापूर, भाजपा अकोला जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कोळासा, पारस, सातरगाव, मनारखेड येथील विविध समस्यांबाबत मंत्र्यांना अवगत करण्यात आले. तालुक्यातील मांडोली, शेळद, बटवाडी इत्यादी गावांतील लोकप्रतिनिधी, विविध संस्था, नागरिक, तसेच पारस
वीज केंद्रातील कर्मचारी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, तसेच पारस वीज केंद्र संयुक्त कृती समिती व
कामगार संघटनांनी आपली निवेदने दिली. (तभा वृत्तसेवा)
पारस मेगावॅट नवीन वीज प्रकल्प
६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी मूलभूत बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यात जमीन, पाणी, शेगाव, अकोला शहर, खामगाव येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उत्पादनासाठी वापर, कोळसा लिंकेज, वीज उत्पादन खर्च, वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता मेरिट ऑर्डरमध्ये संच बसेल किंवा नाही, आगामी काळातील विजेची मागणी व पुरवठा यांचा तुलनात्मक अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.