गोंदिया स्थानक स्वच्छतेत पिछाडीवर!

0
142

• देशात ८४ व्या स्थानी • राज्यातही माघारलेले
गोंदिया, १९ मे
संपूर्ण भारतात गोंदिया रेल्वे स्थानक अ वर्गाच्या ३३२ रेल्वे स्थानकांतून ८४ व्या क्रमांकावर आले आहे. येथील कर्मचार्‍यांनी स्वच्छेतेसंदर्भात गोंदिया रेल्वे स्थानकाचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध केले. स्वच्छता कर्मचारी कमी असतानाही देशातून ८४ व्या स्थानावर हे रेल्वे स्थानक आले आहे. महाराष्ट्रात मात्र स्वच्छतेच्या बाबतीत माघारलेला असून विदर्भातील बडनेरा, चंद्रपूर, बल्लारशाह, अमरावती या रेल्वे स्थानकाच्या तुलनेत खूपच पिछाडीवर फेकल्या गेले आहे.
गेल्या वर्षीपासून रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत देशभरातील रेल्वेस्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्या वतीने परीक्षण करण्यात येते. या वर्षीही देशातील रेल्वेस्थानकांचे दोन श्रेणींमध्ये परीक्षण करण्यात आले. सदर निवड नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. महत्त्वाचे म्हणजे अ वर्ग रेल्वे स्थानकामध्ये गोंदियाची निवड झालेली आहे. ६३ विभागातील सुमारे ३३२ स्थानकांपैकी गोंदियाला ८४ व्या स्थानी येण्याचा बहुमान मिळाला आहे. गोंदियाच्या रेल्वे स्थानक स्वच्छेतेची मुख्य जबाबदारी ही मुख्य वाणिज्य अधिकारी, स्टेशन मॅनेजर चौधरी यांच्या अधिपत्याखाली होती. कुठलेही आधुनिक उपकरण नसताना आणि फक्त ३४ कामगारांच्या सहकार्याने त्यांनी संपूर्ण स्थानकाचे रूप बदलले आणि एक उत्तम स्वच्छ स्थानक संपूर्ण भारतात दिले. रेल्वे सल्लागार समितीने देखील त्यांना वेळोवेळी मदत करून त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला. तसेच स्वच्छेतेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा विभागीय आणि क्षेत्रीय सल्लागार समितीने केला. या रेल्वेस्थानकाला एक हजार गुणांपैकी ७०२.५ एवढे गुण मिळाले आहे. भविष्यात स्वच्छतेच्या बाबतीत आणखी सुधारणा करण्यात आल्या तर, पिछाडीवर असलेले गोंदिया स्टेशन विदर्भातील दर्जेदार रेल्वे स्टेशन बनू शकते.
सफाईची धुरा ३४ कर्मचार्‍यांवर
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्टेशन महत्त्वाचे स्टेशन असून मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील प्रवासी येथील रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. तेव्हा रेल्वेस्थानकाशेजारील खुल्या परिसरात स्वच्छतागृह, मुख्य प्रवेशद्वाराशेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता तसेच रेल्वेस्थानकावर खुल्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय, रेल्वेरूळ आणि पादचारी इत्यादींची व्यवस्था करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. मात्र येथे स्वच्छता करण्याची धुरा फक्त ३४ कर्मचार्‍यांवर आहे.
कमी कर्मचारी असताना पाहिजे त्या प्रमाणात सोईसुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. तरीही हे रेल्वे स्टेशन ८४ व्या क्रमांकावर देशातून आले आहे. (तभा वृत्तसेवा)