दोन ट्रकची भीषण धडक

0
243

दोन्ही वाहने जळून खाक • चालकाचा भाजल्याने मृत्यू
मुल्ला ( गोंदिया), १९ मे 
मिनीट्रक व ट्रकची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने मिनीट्रकला आग लागून दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यात मिनीट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला तर दुसर्‍या ट्रकमधील चालक व क्लिनर असे दोघे जखमी झाले असून दोघांनी अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना आज, १९ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर देवरी तालुक्यातील मासूलकसा घाटात घडली.
असोसिएट रोड कॅरीअर इंदोर येथील एमपी ०९ जीएफ -७२०३ या क्रमांकाच्या मिनी ट्रक (११०९)चा चालक विद्युत रोहित्र व त्यात लागणारे ऑईल राष्ट्रीय महामार्ग ६ वरून नागपूरकडून रायपूरकडे घेऊन जात असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास देवरी जवळील मासूलकसा घाटात येताच रायपूरकडून नागपूरकडे जाणार्‍या ट्रकशी आपसात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की धडक होताच मिनीट्रकला आग लागली. आग लागलेल्या मिनीट्रकमध्ये रोहित्र व ऑईल असल्याने क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले. त्यामुळे दोन्ही ट्रक आगीच्या स्वाधीन झाले. त्यातच मिनीट्रकच्या चालकाचा पाय स्टेअरिंगमध्ये अडकल्याने त्यास निघता आले नाही. त्यामुळे त्याचा जागेवरच जळून मृत्यू झाला. तर दुसर्‍या ट्रकमधील चालक व क्लिनर जखमी झाले. अपघाताची भीषणता पाहता त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
विशेष म्हणजे या ठिकाणी घाट असल्यामुळे या भागातून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले नाही. तर घाट परिसरातील छोटा रोड असून रस्ता दुभाजक देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात नेहमी अपघात घडत असतात. मात्र आज सकाळची घटना भयावहच होती. अपघातानंतर मार्गाच्या दोन्हीबाजूची वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती त्यामुळे दोन्ही बाजूला ट्रक व इतर वाहनांच्या सुमारे सहा ते सात किमीपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळापासून तालुका मुख्यालय ५ किमीच्या अंतरावर असून तेथील नगर पंचायतीचे कार्यालय राष्ट्रीय महामार्गाला लागूनच आहे. मात्र नगर पंचायतीकडे अग्निशामक वाहन नसल्याने दोन्ही ट्रकला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अशात गोंदिया येथील अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले.
या अपघातात मिनीट्रक चालक पूर्णत: जळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. दरम्यान महामार्ग पोलिस व देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली होती. बातमी लिहेपर्यंत दुसर्‍या ट्रकमधील चालक व क्लिनरचे नाव कळू शकले नाही. देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. (तभा वृत्तसेवा)