नईम खान हुर्रियतमधून निलंबित

0
66

श्रीनगर, २० मे 
एका स्टिंग ऑपरेशनमुळे खरा चेहरा समोर आलेल्या हुर्रियत कॉन्फरन्समध्ये घमासान सुरू झाले आहे. काश्मीरला अशांत ठेवण्यासाठी पाकिस्तान आम्हाला पैसे पाठवित असतो, अशी कबुली देणारा हुर्रियत नेता नईम खानला आज शनिवारी या फुटीरतावादी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर, राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनेही काही हुर्रियतन नेत्यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले आहे.
तत्पूर्वी, आज सकाळी स्टिंग ऑपरेशनबाबत पत्रकारांशी बोलताना नईम खानने पुन्हा एकदा पाककडूनच आम्हाला पैसा मिळत असल्याचे मान्य केले. मी भारतीय माध्यमांप्रती नव्हे, तर हुर्रियत नेत्यांप्रती उत्तरदायी आहे, असेही तो म्हणाला. त्यानंतर पत्रकारांच्या काही प्रश्‍नांमुळे निरुत्तर होऊन त्याने पळ काढला.
हुर्रियतचा पर्दाफाश : भाजपा
या स्टिंग ऑपरेशनमुळे हुर्रियत नेत्यांचा खरा चेहरा जगापुढे आला आहे. सोबतच, काश्मिरात हिंसाचार माजविणारे हुर्रियत नेते आणि पाकमधील संबंधही उघडकीस झाले आहेत, असा आरोप प्रदेश भाजपाचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी केला. जम्मू-काश्मिरातील नागरिकांनी ही सत्यता लक्षात घ्यावी आणि त्यांच्याकडून दिशाभूल होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)