साप्ताहिक राशिभविष्य

0
521

रविवार, २१ ते २७ मे २०१७
सप्ताह विशेष
• सोमवार, २२ मे- अपरा एकादशी, नारद जयंती (वीणादान), सौर (भारतीय) ज्येष्ठ मासारंभ; मंगळवार, २३ मे- भौमप्रदोष, पू. जनार्दन स्वामी पुण्यतिथी- काटोल, नागपूर; बुधवार, २४ मे- मासिक शिवरात्री, भद्रा (८.४५ ते १८.५५), चतुर्दशी क्षयतिथी (८.४५ ते २९.०५), अमावास्या (प्रारंभ २९.०५); गुरुवार, २५ मे- दर्श/भावुका अमावास्या (समाप्त २५.१२), शनैश्‍चर जयंती, रवि रोहिणी नक्षत्रात (८.१३); शुक्रवार,२६ मे- ज्येष्ठ मास व शुक्ल पक्षारंभ, दशाहरारंभ, धनिष्ठा नवकसमाप्ती (२१.०३), करिदिन, मंगळ मिथुनेत (२५.३०), श्री जगन्नाथबाबा पुण्यतिथी- भांदेवाडा, वणी (यवतमाळ).
मुहूर्त ः साखरपुडा- २१,२२,२७ मे; बारसे- २२, २७ मे ; जावळे- २२ मे; गृहप्रवेश- २२,२३,२७ मे.
मेष- आर्थिक दर्जा उन्नत राहणार
या आठवड्यात आपला राशीस्वामी मंगळ रविसोबत धनस्थानात असून चंद्र त्याच्याशी लाभ योग करीत आहे आणि चंद्रासोबत धनेश शुक्र आहे. या योगामुळे आपला आर्थिक दर्जा उन्नत राहणार आहे. या योगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रवि, मंगळ आणि शुक्र गुरुच्या दृष्टीमुळे आनंदित असून ते सर्व चांगले योग आपल्या झोळीत टाकण्यास उत्सुक आहेत. शुक्र-चंद्र युति आपणास छंद, हौस, मनोरंजन, आवड यावर बराच खर्च करावयास लावू शकते. त्यामुळे या आठवड्यात अनेक लोक प्रवास, सहली, पर्यटन, मंगलकार्यात उपस्थिती आदी कार्यक्रमात अतिशय व्यग्र राहू शकतात. आपला प्रवास सुखकर राहील. कार्यक्रमांमध्ये महत्त्व वाढेल. मोठेपण मिळू शकेल. कु टुंबातही सौहार्द्राचे वातावरण राहील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. राहुमुळे संततीच्या संदर्भात मात्र जरा काळजी घ्यावी लागेल असे दिसते. शुभ दिनांक- २१,२२,२३,२४
वृषभ- अनेक दिशांनी आनंदाचा वर्षाव
या आठवड्यात आपला राशीस्वामी शुक्र लाभस्थानामध्ये चंद्रासोबत असून मंगळ आणि रविने आपल्या राशीत बैठक जमविली आहे. गुरुची आपल्या राशीवर आणि राशीस्वामीवर शुभ दृष्टी आहे. याचा परिणाम म्हणजे हा आठवडा आपणांस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा, सौख्यवर्धक ठरू शकणार आहे. अनेक दिशांनी आनंदाचा वर्षाव होऊ सकतो. मुलांकडून काही आनंददायक बातम्या कळतील. परीक्षांमधील त्यांचे यश, नोकरी लागणे, त्यात प्रगती, मुलांचे शुभकार्य ठरणे, संततीयोग अशा कितीतरी आघाड्यांवरून आपणांस सुखवार्ता कळू शकतात. विवाहादी कार्यामुळे काही मंडळींना प्रवासास निघावे लागू शकते, तर काही पर्यटनाच्या योजना आखीत असावेत. पर्यटनाची स्थळे, तीर्थयात्रेच्या ठिकाणांना जाणार असाल तर अवश्य निघा. हे ग्रहमान भ्रमंतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. शुभ दिनांक- २१,२२,२५,२६.
मिथुन- व्यवसायात प्रगतीकारक घटनाक्रम
या आठवड्यात आपला राशीस्वामी बुध लाभस्थानात असून चंद्र दशमात शुक्राच्या योगात आहे. त्याच्यावर गुरुची शुभदृष्टी असल्यामुळे हा आठवडा आपणास व्यावसायिक दृष्ट्या उत्तम जाण्याची चिन्हे आहेत. नोकरी व व्यवसाय अशा कोणत्याही कार्यक्षेत्रात आपण असाल तरी त्यात काही उत्तम व प्रगतीकारक घटनाक्रम या आठवड्यात अनुभवास येऊ शकतात. नोकरदार वर्गाला अचानक बदली, एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणे, अधिकारी बदलणे वगैरे धक्के बसू शकतात. व्यवसायात असल्यास नवे करार, व्यवसाय विस्तार यातून मोठा लाभ घडू शकतो. रवि व मंगळ हे दोन उष्ण ग्रह आपल्या व्ययस्थानात आहेत. ते प्रकृतीविषयक काही तक्रारी निर्माण करू शकतात. मात्र त्यांची आपल्या विरोधकांवर करडी नजर राहणार असल्याने त्या आघाडीवर आपणास निश्‍चिंत राहण्यास हरकत नसावी. शुभ दिनांक- २१,२२,२४,२७.
कर्क- भाग्यवर्धक संधी चालून येतील
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला उच्चीच्या शुक्रासोबत भाग्यस्थानात विराजमान आहे. त्याच्यावर गुरुची शुभ दृष्टी आहे. ही ग्रहस्थिती पाहता हा आठवडा आपणास भाग्यवर्धक ठरू शकतो. अनेक महत्त्वाच्या संधी आपणास या आठवड्याच्या विशेषतः पूर्वार्धात चालून येऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात या काळात काही लाभदायी बदल घडू शकतात. युवकांना नोकरी, व्यवसायाच्या संधी येऊ शकतात. त्या निमित्ताने प्रवास देखील घडू शकतो. विदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना त्या दिशेने वेगवान हालचाली करता येऊ शकतील. विवाहेच्छू मुला-मुलींना योग्य साथीदार निवडता येऊ शकेल. कुटुंबात काही मंगल कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकेल. या सार्‍यात कर्क राशीच्या व्यक्तींचा हा आठवडा अतिशय आनंद व समाधानाने युक्त असा व्यतीत होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुभ दिनांक- २१,२२,२५,२६.
सिंह- मनावर नियंत्रण ठेवावयास हवे
या आठवड्यात आपला राशीस्वामी रवि दशमस्थानात मंगळासोबत विरजमान आहे, तर चंद्र अष्टमात उच्चीच्या शुक्रासोबत आहे. त्याचे यावेळचे भ्रमण आपणास काहीसे क्लेषकारक राहील असे वाटते.
रवि दशम स्थानातून नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी निर्माण करीत आहे. त्याला योगकारक मंगळाची मिळणारी साथ साजेशीच असणार असली तरी त्यात मन खट्टू करणारे काही प्रसंग निर्माण होऊ शकतात. राशीस्थानी बसलेला राहू आणि अष्टमातील चंद्र ही कामगिरी बजावण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने प्रकृतीच्या कुरबुरीमुळे आपणास हातच्या काही संधी गमवाव्या लागू शकतात. कार्यक्षेत्रात आपले वागणे काहीसे विचित्र ठरून त्यामुळेही अंतिम नुकसान आपलेच होण्याची शक्यता राहील. त्यामुळे राग, संताप, उग्रपणा यांवर नियंत्रण ठेवावे. व्यसने, बाहेरचे खाणेपिणे टाळावे. शुभ दिनांक- २३,२४,२५,२७.
कन्या- कुटुंबात मन अधिक रमावे
या आठवड्यात आपला राशीस्वामी बुध अष्टम स्थानात असून चंद्र सप्तमात शुक्राच्या शुभ योगात आहे. राशीत असलेल्या गुरुची चंद्र-शुक्रावर व भाग्यावर शुभदृष्टी असल्यामुळे हा आठवडा बव्हंशी उत्साहवर्धक जाण्याची चिन्हे आहेत. भाग्यस्थानात असलेले रवि-मंगळ काही आकस्मिक उत्तम योग निर्माण करून सुखद धक्का देऊ शकतात. कुटुंबात आपले मन अधिक रमावे यासाठी अनेक कारणे या आठवड्यात आपल्याला लाभू शकतात. मित्रमंडळ, नातेवाईकांचा सहवास लाभेल. प्रवासाच्या योजना राहू शकतील. मंगल कार्यामुळे घरात उत्साहपूर्ण गडबड-गोंधळाचे वातावरण राहू शकते. मात्र याकाळात आपणांस नोकरी-व्यवसायात जरा सावध रहावे लागेल. दशमावरील शनिची दृष्टी तशी सूचना देत आहे. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही आर्थिक पेच देखील निर्माण होऊ शकतात. शुभ दिनांक- २१,२२,२६,२७.
तुला- ग्रहस्थितीचा आरोग्यावर परिणाम
या आठवड्यात आपला राशीस्वामी शुक्र सहाव्या स्थानामध्ये चंद्रासोबत असून मंगळ आणि रविने आपल्या अष्टम स्थानात बैठक जमविली आहे. या चारही ग्रहांची उपस्थिती फारशी चांगली नसली तरी गुरुची या ग्रहांवर येणारी शुभ दृष्टी पाहता या विपरीत स्थितीतून फारसे काही वाईट घडणार नाही, अशी आशा ठेवता येईल. या ग्रहस्थितीचा परिणाम प्रामुख्याने आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. जुनी दुखणी असल्यास ती या काळात काहीशी बळावू शकतात. विशेषतः उष्णतेशी संबंधित त्रास राहू शकतात. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयी, व्यसने यावर नियंत्रण ठेवावयास हवे. वेळीच औषधोपचार करून प्रकृती उत्तम ठेवावयास हवी. हा त्रास वगळला तर कुटुंबातील काही मंगलकार्ये, उत्सवात आपणास उत्साहाने सहभागी होता येईल. काही युवा मुला-मुलींना विवाहादी उत्तम संधी लाभतील. शुभ दिनांक- २२,२३,२४,२५.
वृश्‍चिक- क्रियाशीलतेचा आलेख उंचावणार
या आठवड्यात आपला राशीस्वामी मंगळ रविसोबत सप्तम स्थानात असून पंचमातील चंद्र व उच्च शुक्र त्याच्याशी लाभ योग करीत आहे. या योगामुळे आपला आनंद, उत्साह आणि क्रियाशीलतेचा आलेख वाढता राहणार आहे. या योगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कला, साहित्य क्षेत्रात असणार्‍या मंडळींना सरकार, समाज वा आप्तजनांकडून कौतुकाची थाप मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कलागुणांना वाव मिळेल. काही कलावंतांना सन्मान-पुरस्कार मिळू शकतील. लाभस्थानातील गुरु या राशीच्या युवा मुला-मुलींना नोकरी-व्यवसायाच्या अनुषंगाने चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ शकेल. तर विवाहेच्छू युवावर्गाला उत्तम योग येऊ शकतात. त्याचप्रमाणे नवपरिणितांना संततीसाठीही योग संभवतात. यामुळे कुटुंबात आनंद-उत्साहाचे वातावरण राहील. काही मोठी खरेदी होण्याची देखील संभावना आहे. शुभ दिनांक- २१,२२,२५,२६.
धनू- आळसावलेपणा, वेळकाढू स्थिती
राशीत असलेला वक्री शनि आणि त्याची आपल्या राशीस्वामी गुरुवर येणारी दृष्टी पाहता आपली कामें सध्या काहीशी रेंगाळलेली असू शकतात. या आठवड्यात देखील ही स्थिती कायम आहे. यातच पंचमात असलेला बुध व भाग्यातील राहू काहीशी दिग्मूढतेची स्थिती निर्माण करू शकतात. यामुळे आपल्या व्यवहारात देखील काही प्रमाणात आळसावलेपणा, वेळकाढू स्थिती निर्माण होऊ शकते. आहे तसेच चालू राहू द्यायचे असा आपला दृष्टिकोण दिसतो. षष्ठातले रवि-मंगळ आपल्या नोकरी-व्यवसायातील स्पर्धकांना गप्प बसविणार असल्याने त्याबाबतही आपणास चिंता असणार नाही. तर सुखस्थानातील चंद्र-शुक्र कुटुंबाच्या सहवासात, मित्रमंडळींच्या घोळक्यात राहण्याचा आनंद देऊ शकतात. कुटुंबात काही मंगलकार्ये ठरतील. आपल्याला त्यात पुढाकार घेता येईल. थोडक्यात सहज जाणारा हा आठवडा असू शकेल.
शुभ दिनांक- २२,२४,२५,२७.
मकर- अनपेक्षित करारातून व्यवसाय-विस्तार
या आठवड्यात देखील आपला राशीस्वामी शनि व्ययात आहे आणि राशीवर गुरूची भाग्यातून शुभदृष्टी येत आहे. पराक्रमात योगकारक शुक्र आणि सप्तमेश चंद्र असून यांच्यावरही गुरुची दृष्टी आहे. शुक्र-चंद्राची ही स्थिती या आठवड्यात आपणांस काही उत्तम व्यावसायिक संधी देणारी ठरू शकेल. दशमेश शुक्र भाग्याला पाहात असल्याने काही अनपेक्षितरीत्या चांगले करार घडून आपल्याला व्यवसायाचा विस्तार करता येऊ शकेल. नोकरीत असणार्‍यांना चांगल्या घडामोडी वा बदलांमुळे समाधान मिळावे.पंचमात असलेले रवि-मंगळ राजकीय व कला क्षेत्रात असणार्‍या मंडळींना काही वेगळे करून दाखविण्याची संधी देतील. कुटुंबात उत्साहचे व आनंदाचे वातावरण राहील. युवा मुला-मुलींना व्यवसाय, विवाहादीसाठी अपेक्षित योग लाभण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक- २१,२३,२५,२७.
कुंभ- कार्याचे चीज झाल्याचे समाधान
या आठवड्यात देखील आपला राशीस्वामी शनि लाभस्थानात आहे. तर धनस्थानात योगकारक शुक्र आणि चंद्र असून यांच्यावर गुरुची दृष्टी आहे. शुक्र-चंद्राची ही स्थिती आर्थिकदृष्ट्या उत्तम ठरणार आहे. चतुर्थस्थानातून मंगळ आणि रविची दशम या कर्मस्थानावर दृष्टी येत आहे. त्यामुळे विशेषतः आपल्या कार्यक्षेत्रातून आपणास आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. या ग्रहस्थितीचा दृश्य लाभ प्रामुख्याने व्यापार-व्यवसायातील व्यक्तींना मिळू शकेल. नोकरदार वर्गाला या योगाचा लाभ प्रत्यक्ष आर्थिकदृष्ट्या होण्याची शक्यता कमी असली तरी आपल्या कार्याचे चीज होऊन त्यातून समाधान निश्‍चितपणे मिळेल. अष्टमातील गुरु प्रकृतीसाठी फारसा चांगला नाही. त्यामुळे आरोग्य सांभाळले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या सार्‍या प्रयत्नांना, कार्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याचीही काळजी घ्यावी. शुभ दिनांक- २२,२४,२६,२७.
मीन- अपेक्षित बातम्यांनी आनंद द्विगुणित
या आठवड्यातील सर्वात नशीबवान वा यशस्वी रास म्हणून आपल्या राशीचा उल्लेख करता येईल. उच्चीचा शुक्र व चंद्र आपल्या राशीत असून त्यांच्यावर सप्तमातून राशीस्वामी गुरुची शुभदृष्टी आहे, तर पराक्रमात रवि-मंगळासारखे शक्ती व उत्साह देणारे ग्रह राशीस्वामीच्याच दृष्टीने आनंदित आहेत. हा योग आपणांस क्रियाशील बनवणारा असून आपण अपेक्षित यश पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची उत्तम जोड देऊ शकाल. चंद्र-शुक्र आपले मन उत्साही व आनंदी ठेवण्यास पुरेसे समर्थ आहेत. व्यवसायात असणार्‍यांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकेल. गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, नोकरीत बदल यासाठी हा काल उपयुक्त ठरू शकेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही अपेक्षित बातम्या कानी पडून आपला आनंद द्विगुणित होऊ शकेल. या सार्‍यात षष्ठातील राहू मात्र प्रकृतीकडे लक्ष देण्यास सुचवीत आहे. शुभ दिनांक- २१,२२,२३,२६.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६