ये चिराग बुझ रहे है…

0
65

रविवारची पत्रे
सध्या भारत-पाक सीमेवरचा तणाव पराकोटीला पोहोचला असून, उभय देशांचे आपसातील संबंध कमालीचे बिघडले आहे. सीमेवर सतत कुरापती करून, काश्मिरातील फुटीरवाद्यांना छुपी मदत करून, जमेल तेव्हा काश्मीरात दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानने भारताविरुद्ध एकप्रकारचे छुपे युद्ध पुकारले आहे. अर्थातच याकरिता त्यांनी विविध अतिरेकी संघटनांना हाताशी धरले असून, हाफिज सईद हा समस्त आतंकवादी जमातीचा मास्टरमाईंड आहे. पाकचे हे नापाक रूप जगापासून लपून राहिले नाही. नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या दबावाखाली पाक गृहमंत्रालयाने त्यांच्या न्यायालयात हाफिज सईद हा जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत असल्याची कबुली दिली.
खरे तर भारत-पाक हे सख्खे शेजारी, पण धर्मवेड्या पाकने कधीही शेजारधर्म निभावला नाही. भारताची बरोबरी तर सोडाच, पण उठसूठ युद्धखोरीच्या वागण्याने आणि दहशतवादी पोसण्याने पाक हा स्वत: बारुदीच्या ढिगार्‍यावर उभा झाला आहे. पाक ‘इंटरनॅशनल टेररिस्ट’ निर्यात करणारा देश म्हणून त्याची जगभरात नाचक्की झाली आहे. एवढ्या सर्व उचापती करताना पाकने आपल्या जनतेला काय दिले? आजही या देशाच्या बाल, युवा, तरुणवर्गाचे भविष्य जिहादच्या नावाखाली बरबाद झाले. स्वतः निर्माण केलेला आतंकवादाचा भस्मासुर कधीही पाकला भस्मसात करू शकतो. बलुच प्रांतात प्रचंड असंतोष खदखदत आहे. हिंदू, ख्रिश्‍चन असो की इतर अल्पसंख्याक यांची दुरवस्था झाली असून, अत्यंत दहशत आणि हलाखीच्या परिस्थितीत आपले दिवस काढत आहे. एवढे असूनही काश्मिरात ढवळाढवळ केल्याशिवाय पाकला चैन पडत नाही. काश्मिरातील फुटीरवाद्यांना, दहशतवाद्यांना हाताशी धरून तिथे कायम अशांतता आणि अराजकतेची स्थिती निर्माण केली जाते. याकरिता प्रचंड प्रमाणात शस्त्रे आणि निधी पुरवला जातो.
पाकिस्तानात तालिबान्यांनी स्त्रीशिक्षणाचे काय धिंडवडे उडवले आहे, हे मलाला युसुफजाईच्या प्रकरणावरून सहज लक्षात येते. दहशतवाद्यांनी कित्येक शाळा जाळल्या, तरीही आज तिथे विद्यार्थी शाळेत जातात, पोलिस किंवा सैन्यभरतीला होणारी अमाप गर्दी कशाचे द्योतक आहे? यूपीएससी टॉप करणारा काश्मिरी विद्यार्थी असो की देशासाठी लढणारा लेफ्टनंट उमर फय्याज असो ही सर्व या भयाण परिस्थितीतही जमेची बाजू आहे.
म्हणून हाफिजच्या ‘जमात उल दवा’चा इलाज भारतालाच करावा लागेल. पाकचा निर्णय हा देखावा आहे. आयएसआयचे अनौरस अपत्य हाफिज सईद आणि त्याचे बगलबच्चे जोवर नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत काश्मिरींना उज्ज्वल भविष्य नाही. सैन्याला आणखी अधिकार देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल तरच कुठे हे शापित नंदनवन परत एकदा मोकळा श्‍वास घेऊ शकेल.
अनिल पावशेकर
नागपूर

कट प्रॅक्टिसचा कट लगेच भरती हो!
सुमारे एका दशकापूर्वीची घटना आहे. माझी विवाहित मुलगी अकोल्याला असते. दिवाळीच्या दरम्यान तिच्या पोटात अचानक दुखायला लागले म्हणून ती नेहमीच्या महिला फॅमिली डॉक्टरकडे गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितले. त्याच दवाखान्यात अवघ्या दोन मिनिटात सोनोग्राफी करण्यात आली. (की उरकण्यात आली?) सोनोग्राफीच्या अहवालानंतर डॉक्टरांनी माझ्या मुलीला शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असून, लगेच भरती व्हायला सांगितले. लॅप्रोस्कोपी सर्जरी अथवा परंपरागत पद्धतीने शस्त्रक्रिया करता येईल आणि त्यासाठी दहा हजार रुपये खर्च येईल, असेही सांगितले. सासरच्यांना विचारावे लागेल, असे सांगून ती घरी परतली.
डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकून ती पुरती खचली होती म्हणून तिने मला फोनवरून घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. मी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक होतो आणि माझे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स असून, ते विविध रोगांचे तज्ज्ञ आहेत. तिला मी माहेरी म्हणजे डोणगावला यायला सांगितले. दरम्यान, मी बुलडाण्याला सर्जन असलेल्या माझ्या माजी विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेतला. त्याने मला आश्‍वस्त करून मेहकर येथे सोनोग्राफिस्ट असणार्‍या माझ्या माजी विद्यार्थ्याकडून सोनोग्राफी करायला सांगितले. म्हणून मी तिला ऐन भाऊबीजेच्या दिवशी मेहकरला घेऊन गेलो. डॉक्टरने तिची काळजीपूर्वक सोनोग्राफी केली आणि काहीही गंभीर नसून चिंता करण्यासारखे काही नाही, असे सांगितले. महिलांना सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा त्रास होतो, असे निदर्शनास आणून दिले. त्यांनीच तिला अवघ्या सत्तावन रुपयांची औषधी दिली. नंतर तिला बरे वाटले व आम्ही कुटुंबीय काळजीतून बाहेर आलो.
मी नशीबवान आहे की, माझे अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रातील उच्चशिक्षाविभूषित असून ते गायनॅक, आयस्पेशालिस्ट, जनरल सर्जन, आर्थोपेडिक्स, आँकोसर्जन, सोनोग्राफिस्ट व रेडिओलॉजिस्ट, चिल्ड्रेन स्पेशालिस्ट, एम.डी. इ. आहेत. आजही त्यांच्या मनात माझ्याबद्दल नितांत आदर आहे आणि त्या आदरयुक्त भावनेतूनच ते मला प्रसंगी निरपेक्षपणे सल्ला देत असतात. म्हणूनच माझी मुलगी अनावश्यक शस्त्रक्रियेतून, अवास्तव खर्चातून आणि प्रचंड मानसिक तणावातून बाहेर पडू शकली. ही दशकापूर्वीची घटना. आता अधिक प्रगत वैद्यकीय क्षेत्रात जे माझ्यासारखे भाग्यवंत नाहीत त्यांचे काय होत असेल, हे सुज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही.
जी. ल. दिनोरे
डोणगाव, बुलडाणा

तरुण भारतचे नवीन, सुंदर व आकर्षक रूप आवडले
आमचे संपूर्ण कुटुंब आजोबांच्या काळापासून तरुण भारताचे नियमित वाचक आहे. लहानपणापासून मी एकमेव तरुण भारतचा वाचक असल्याबद्दल मला नेहमी सार्थ अभिमान वाटतो. तरुण भारतच्या वाचनातून मी वाढलो, घडलो व सुसंस्कारित झालो. मला वाचनाची आवड निर्माण झाली ती तरुण भारतमुळेच. तरुण भारतमध्ये आजपर्यंत अनेक वेळा बदल झालेत. पण या वेळी तरुण भारतमध्ये झालेला बदल हा मनाला भावणारा व अतिशय रंजक वाटला व त्याबद्दल आश्‍चर्य व कुतूहलदेखील वाटले. आकांक्षा, आसमंत व पुरवण्या कायम ठेवून कृषी जगत, अर्थार्थ, यथार्थ, मोक्षार्थ, त. भा. कट्टामध्ये असलेले विविध विषयांवर माहिती असलेले लेख, आरोग्य, भविष्य हे सर्व वाचल्याशिवाय तरुण भारत खाली ठेवण्याची इच्छा होत नाही. त्यात चार पृष्ठे वाढविल्यामुळे वाचनात भर पडेल व वाचनाची गोडी वाढेल हे मात्र नक्की.
सकाळच्या प्रहरी तरुण भारत हाती पडल्यावर मनस्वी आनंद होतो. तो पाहताना, वाचताना पुन्हा पुन्हा वाचावेत व जतन करून ठेवावेत असे काही अग्रलेख, लेख, उतारे असतात. त्यामुळे वाचनाबरोबरच प्रबोधन व ज्ञानसंवर्धन होते. आजच्या वैज्ञानिक व परिवर्तनशील युगातसुद्धा तरुण भारत वृत्तपत्राचे वेगळेपण व वैशिष्ट्य अजूनही टिकून आहे व पुढे टिकून राहील असा विश्‍वास वाटतो.
तरुण भारतला नवीन, सुंदर व आकर्षक रूप दिल्याबद्दल तरुण भारत टीमचे मन:पूर्वक, हृदयपूर्वक अभिनंदन!
योगेश जोशी
९९७०४५१७५७

सुजाण साक्षर
लहानपणी ग, म, भ, न या अक्षर ओळखीपासून आपल्या अभ्यासाला सुरुवात होते. नंतर ही अक्षरे एकापुढे एक लिहून किंवा त्यांना आकार, ईकार, उकार, अनुस्वार वगैरे लावून आपण शब्द तयार करतो. काही दिवसांनी काही शब्द एकापुढे एक लिहून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करतो. आपले पूर्ण नावसुद्धा लिहायला लागतो. अशा तर्‍हेने आपल्याला लिहिता- वाचता येते. तरीसुद्धा आपल्याला कोणी साक्षर म्हणत नाही, पण आपली ओळख पटवण्यासाठी आपण आपल्या नावापुढे विशिष्ट अशी वळणदार सही करतो तेव्हा आपले नाव साक्षरांच्या यादीत नोंदवले जाते.
पण काही मुलांना शाळेत जाणे जमत नाही. त्यामुळे त्यांना लिहिता-वाचता येत नाही. मग मोठेपणी त्यांना प्रौढ साक्षरतेच्या वर्गात आपल्या नावाची ओळख म्हणून सही करायला शिकवतात. तेव्हाच त्यांचे नाव साक्षरांच्या यादीत घातले जाते. पण असे सह्याजीराव खरंच साक्षर असतात का? कारण कोणत्याही लिखित किंवा छापील कागदावर त्यांची सही घेऊन त्यांना फसवल्याच्या कितीतरी घटना घडतात.
आपल्या देशात अशा सह्याजीराव साक्षरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, असे मला वाटते. म्हणूनच आपल्याकडे ‘अच्छे दिन’ येण्यास वेळ लागत आहे. म्हणजे पहा- ‘येथे थुंकू नये’ अशी पाटी वाचता येत नसल्यामुळे हे साक्षर त्याच पाटीवर थुंकतात किंवा ती पाटी पानाच्या पिचकारीने रंगवतात किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी म्हणून कचरा टाकण्यासाठी पेटी ठेवून ‘येथे कचरा टाकावा’ अशी पाटी लावलेली असूनसुद्धा वाचता येत नसल्यामुळे पेटी सोडून इतरत्र कोठेही कचरा टाकतात आणि स्वच्छता अभियानाला काळिमा फासतात. तसेच ‘रांग लावून ओळीत यावे’ ही पाटी ठळक अक्षरात दिसत असूनही अडाणीपणामुळे प्रवेशद्वार उघडले की आत जाण्यासाठी धक्काबुक्की केल्यामुळे कित्येकजण जखमी होतात.
काही साक्षर असे असतात की, त्यांना जोडाक्षरे वाचता येत नसल्यामुळे भ्रष्टाचार, सहिष्णुता असे अवघड शब्द वाचणे कठीण जाते त्यामुळे या शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी ते दुर्लक्ष करतात.
याशिवाय समाजात काही ‘सुशिक्षित सह्याजीराव साक्षर’ पण असतात. आपल्या स्वीय सहायकाने सांगितलेल्या ठिकाणी, फुली मारलेल्या ठिकाणी मजकूर न वाचताच सही करतात आणि घोटाळ्यात अडकून पडतात.
आपल्या समाजात पदवीधर सुशिक्षित साक्षरही बरेच आढळतात. हे विद्वान दिवसभरात फार थोडे लिहितात, पण भरपूर वाचन करतात. पण हे वाचन वरवरचे असते त्यामुळे त्याच्यातील नेमकेपणा लक्षात घेत नाहीत. बर्‍याच वेळा एखाद्या विधानाचा विपर्यास करून वेगळाच अर्थ लावतात आणि वादविवादात आपले मत नोंदवतात आणि वितंडवाद घालतात. त्यामुळे त्यांची शब्दबुद्धी निष्फळ वादात खर्च होते आणि निष्कर्ष काहीच निघत नाही आणि कोणतीच प्रगती होत नाही.
म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल’ या सूत्रातील गर्भितार्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे लिहिणारा, वाचणारा आणि वागणाराच सुजाण साक्षर असतो.
डॉ. प्रभा बल्लाळ
रामनगर, नागपूर

भारतातील विरोधी पक्ष
सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष व त्याच्या नेत्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असते. वर्तमान-आधुनिक राज्यशास्त्रात विरोधी पक्ष या ऐवजी ‘सत्ताकांक्षी पक्ष’ असा शब्दप्रयोग उपयोगात आणतात. सत्ताधार्‍यांच्या सत्तेच्या अतिरेकी वापरावर, अदूरदर्शी धोरणावर व संविधानविरोधी भूमिकेवर विरोधी पक्षाचाच अंकुश राहात आला आहे. अपवादात्मक कालखंड सोडल्यास, स्वातंत्र्यप्राप्तीपासून ६० वर्षे या देशावर कॉंग्रेसचीच सत्ता राहिली. पण, सदस्यसंख्या कमी असतांनाही विरोधी पक्ष सत्तेवर वचक ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असे.
असे म्हणतात की, बॅ. नाथ पैचे भाषण ऐकण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आवर्जून उपस्थित राहात असत. संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे, सांसदीय आयुधांचा अतिशय विवेकपूर्ण वापर व जनतेमध्ये भाषणांच्या द्वारा जागृती करणे यात भारतातील ६० वर्षांपूर्वीचा विरोधी पक्ष व त्यांचे नेते अग्रेसर होते. अटलबिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी, मधू दंडवते इ. नावे आजही आदराने घेतली जातात.
२०१४ साली सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मात्र संसदेत विरोधी पक्ष म्हणून कुणाचे अस्तित्वच जाणवत नाही. अगदी संसदेतसुद्धा स्वत:च्या अभ्यासाने व राजकीय प्रगल्भतेने प्रभाव पाडणारा एकही नेता दिसत नाही. प्राचीन व प्रचंड वारसा असलेल्या कॉंग्रेसजवळ नेता नाही. ज्या राहुल गांधीला ते नेता मानतात, त्या नेतृत्वाजवळ अभ्यास, अनुभव, परिश्रम व जनमानस समजण्याची क्षमता नाही. केवळ संसद बंद पाडण्याचाच धडा त्यांना मिळालेला दिसतो. बाकी समाजवादी, जे. डी., जे. डी. यु. इत्यादी पक्षांची स्थिती केविलवाणी आहे.
अण्णा हजारेंचा शिडी म्हणून वापर करून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (जे उच्चविद्याविभूषित आहेत), ते ही विरोधी पक्षाची व नेतृत्वाची उणीव दूर करू शकतील, असे वाटत होते. पण, गेली २ वर्ष संविधानिक संस्था व्यवस्था तोडण्यात व नकारात्मक भूमिका स्वीकारत पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेण्यात या तरुण नेत्याचा काळ गेला. त्यांचे असलेले, गळालेले व वेगळे झालेले सर्व साथीदार याची ग्वाही देतात.
मूळ म्हणजे विरोधी पक्ष म्हणून जे कुणी आहेत ते सर्व अजूनही भांबावलेच आहेत. मोदींना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून ही सर्व मंडळी लकवा मारल्यागत झाली आहे. मोदी व त्यांचा पक्ष सत्तेत येणारच नाही, हे यांचे २०१४ पूर्वीचे गृहीतक! अगदी मणिशंकर अय्यर- ‘‘मैं उसका नाम अपने पवित्र जबानसे नही लुंगा,’’ असे म्हणून गेलेत. संसदेत नोटाबंदीसह अनेक महत्त्वपूर्ण विषय आलेत, पण त्यावर यांचे भाषण नाही. अगदी ‘सर्जिकल स्ट्राईक’सारख्या राष्ट्रीय विषयावरसुद्धा संसदेत केजरीवालचे खासदार, गुलाम नबी आझाद, सरकारवर तर सोडाच, पण सैन्यावर शंका घेतात.
मोदी शासन विकास व सबका साथ या रस्त्याने वेगाने मार्गक्रमण करीत आहे. ते करताना या देशाची प्राचीन काळापासूनची सर्व वैशिष्ट्ये उदा. योग, संस्कृत, प्राचीन कला इ. यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देत आहे. जगात भारताची खरी ओळख, नवीन भाषेत नवीन तंत्रज्ञानासह पण भारतीयत्व जपत मोदी काम करत आहेत. विरोधी पक्षांनी आतातरी स्पष्ट, स्वच्छ, राष्ट्रीय भूमिका घ्यावी.
जयंत बरडे
नागपूर

अंबुजा प्रकल्पग्रस्तांना १७ वर्षांपासून नोकरी का नाही?
अंबुजा सिमेंट कंपनी स्थापन होऊन जवळपास १७ वर्षे होऊनही प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे वारस यांना अद्याप स्थायी स्वरूपाची नोकरी व कंपनीकडून नोकरीबाबत कोणतेही पत्र मिळालेले नाही. शेकडो मराठी माणसांची जमीन जाऊन, मराठी माणूस बेरोजगार होऊन दारोदार भटकत आहे. असे का?
उद्योगधंद्यात ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा नियम असूनसुद्धा, कंपनीचे बेमुर्वतखोर अधिकारी व मालक नियमांना पायदळी तुडवीत परप्रांतीयांना कामावर घेतात. असे का? आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्यासोबत कंपनी अधिकार्‍यांची बैठक होऊन आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांना कंपनीत समावून घेण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. असे का? राज्यातील उद्योगांमध्ये प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना रोजगार न देणार्‍या कारखानदारावर कारवाई करू, असे आश्‍वासन उद्योगमंत्री विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासात देतात. परंतु, कारवाई मात्र होत नाही. असे का? अशांनी मराठी माणसाचा लोकशाहीवरील विश्‍वास उडाल्यास त्याला हे निष्क्रिय राजकारणीच जबाबदार असतील! उद्योगमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार उद्योजकाकडून शासनाच्या धोरणाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणार्‍या उद्योगाविरुद्ध कोणती कारवाई करावी, असा कायद्यात उल्लेखच नाही.
म्हणून कारखानदार व त्यांच्या अधिकार्‍यांवर जरब बसेल व त्यांना शिक्षा होईल, असा प्रभावी कायदा लवकरात लवकर बनवून भूमिपुत्रांवर होणारा अन्याय दूर करावा.
गेल्या पाच वर्षांपासून कंपनीकडे नोकरीकरिता सतत तगादा लावूनही कंपनीने अद्याप नोकरी न दिल्यामुळे जो मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झाले, त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी व भूमिपुत्र व मराठी माणसाचे आजपर्यंतचे खच्चीकरण करून त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले त्याकरिता कंपनीमालक, अधिकारी, युनियनने समस्त मराठी माणसाची व भूमिपुत्रांची जाहीरपणे माफी मागून, क्षमायाचना करावी.
प्रवीण मं. मटाले
८३९०४९४७९७