इमाम बरकतीला डच्चू!

0
120

मंथन
गेल्या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकारने, मंत्री व तथाकथित महत्त्वाच्या व्यक्तींना मिळणारी लालबत्तीच्या गाड्यांची सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केंद्रातीलच नव्हे, तर देशाच्या कुठल्याही राज्यातील मंत्री, आता लालबत्ती वापरून मिरवू शकणार नाहीत. एकदा सरकारने निर्णय घेतला, मग तो कायदा असतो आणि त्याचे सार्वत्रिक पालन करण्याला पर्याय उरत नाही. महत्त्वाच्या व्यक्तींना मोक्याच्या वेळी व जागी काही सवलत असावी, म्हणून ही सुविधा होती. पण, त्यातच अनेकांना मोठी प्रतिष्ठा वाटू लागली आणि या सुविधेचा गैरवापर सुरू झाला. किंबहुना अशा सुविधेचा वापर रुबाब मारण्यासाठी होताना, सामान्य लोकांचे हाल होऊ लागले. कुठल्याही मोक्याच्या रस्त्यावर लालदिव्याची गाडी आली, मग बाकीची वाहतूक खोळंबलेली ठेवून लालदिव्याला मार्ग देण्याचा अट्‌टहास सुरू झाला. जितक्या अशा गाड्या व व्यक्तींची संख्या वाढत गेली, तितकी सामान्य लोकांची गैरसोय वाढतच गेली. अनेक जागी तर मरणासन्न असलेल्या रुग्णांनाही रोखून बड्या व्यक्तींच्या लालबत्तीला रस्ता मोकळा करून दिला जाऊ लागला. त्यात अनेकांचे हकनाक मृत्यूही होऊ लागले. त्याचा गदारोळ झाल्यानेच मोदी सरकारने ही सुविधाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, ज्यांना अशी दिखाऊ साधने आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी हवीच असतात, त्यांना हव्यास सोडता येत नाही. त्यांच्यापाशी कुठलेही मोठेपण नसते आणि अशाच दिखाऊ साधनांच्या आधारावर आपले मोठेपण दाखवावे लागते. त्यांनी लालबत्ती कशी सोडावी? त्यांना जणू आपल्या हातून कुठे राज्यच हिसकावून घेतले गेल्याचे दु:ख झाले, तर नवल नाही. अशा लोकांमध्ये बंगालचे एक माथेफिरू इमाम बरकती यांचा समावेश होता. त्यांना लालबत्तीचा मोह सोडता आला नाही आणि परिणामी त्यांना आपल्या तथाकथित धार्मिक पदालाही मुकावे लागले आहे. त्याची मीमांसा म्हणूनच आवश्यक आहे.
एका धर्ममार्तंडाला राज्य सरकारने अशा लालबत्तीची सुविधा कशाला बहाल केली होती, हा मुळातच वादाचा विषय आहे. माकडाच्या हाती कोलीत म्हणतात, तशी मग या लोकांची अवस्था होऊन जाते. मुस्लिम मतांच्या लाचारीने आपल्या देशातील सेक्युलर पक्षांनी अनेक मुस्लिम धर्ममार्तंडांना मुजोर करून ठेवलेले आहे. त्यापैकीच हे इमाम बरकती एक आहेत. बंगालच्या मुस्लिमांची मते त्यांच्या इशार्‍यावरच मिळू शकतात, अशी एक समजूत असल्याने त्यांचे सतत राजकीय लाड झालेले आहेत. म्हणून तर त्यांना अशा सुविधा मिळू शकल्या आणि त्यांची मस्ती वाढतच गेली. आपणच बंगालमध्ये राज्य करतो आणि ममता बॅनर्जींच्या आश्रयाने आपण कुठलीही मनमानी करू शकतो, अशा समजुतीने या इमामाला पागल करून टाकले होते. म्हणूनच लालबत्ती निकालात निघाल्यावरही त्यांनी आपल्या गाडीवरचा तो लालदिवा काढण्यास साफ नकार दिला होता. पण, त्या विषयी विचारल्यानंतर त्यांनी देशाच्या संविधानाला व कायद्यालाही आव्हान देण्यापर्यंत मजल मारली! त्याचेही कारण आहे. मतांचे लाचार लोक आपल्याला रोखू शकत नसल्याची त्याला खात्री होती. झालेही तसेच! कारण हा माणूस काहीही बरळला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याला कुठे रोखले नाही की टोकले नाही. त्याने पंतप्रधानाला शिव्याशाप देण्यापासून पाकिस्तानलाही मदत करण्यापर्यंत मुक्ताफळे उधळली. त्याच्या या मूर्खपणाची भयानकता तरीही ममतांच्या डोक्यात शिरली नाही. पण, ममतासारखे पुरोगामी जितके बथ्थड डोक्याचे झालेत, तितके सामान्य मुस्लिम बेअक्कल झालेले नाहीत. त्यांना व्यवहार कळतो. म्हणूनच इमाम बरकतीची बडबड मुस्लिमांच्याच मुळावर येत असल्याचे मुस्लिमांना आधी भान आले आणि त्यांनी या बरकतीला इमाम पदावरून हाकलून लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून तरी ममताला शुद्ध येईल काय?
ममता किंवा तत्सम पुरोगाम्यांच्या अतिरेकी लांगूलचालनाने मुस्लिम समाज बहुसंख्य समाजापासून तुटत चालला आहे. त्याचे परिणाम कुठल्याही गंभीर प्रसंगी मुस्लिम समाजालाच भोगावे लागतात. उत्तरप्रदेशच्या ताज्या निवडणुकीत मुस्लिमांना वाळीत टाकल्यासारखे निकाल आले आहेत. त्यात मुस्लिम मतांची किंमत शून्य झाली आहे. त्याला अर्थातच मुस्लिम वा हिंदू अतिरेकी भूमिकेपेक्षाही मुस्लिम धर्मांधांचे लांगूलचालन हे खरे कारण आहे. अशा लांगूलचालनाने आजवर मुस्लिमांचे कुठलेही कल्याण झालेले नाही. पण, मुस्लिम समाज मात्र हिंदू व बहुसंख्यकांना पारखा होत गेला आहे. बहुसंख्य लोक मुस्लिमांकडे कायमच संशयाने बघू लागले आहेत. याची जाणीव या धर्ममार्तंडांना किंवा त्यांचे चोचले पुरविणार्‍या पुरोगामी राजकारण्यांना होत नसली, तरी प्रत्यक्ष समाजात वावरणार्‍यांना होत असते. म्हणूनच त्यांना येऊ घातलेले धोके लौकर कळत असतात. उत्तरप्रदेशात त्याची साक्ष मिळालेली आहे. म्हणूनच अन्यत्रच्या मुस्लिम सामाजिक नेतृत्वाला जाग येताना दिसत आहे. तसे नसते तर या मोकाट झालेल्या इमामाला मुस्लिम विश्‍वस्तांनीच मशिदीतून हाकलून लावण्याचे टोकाचे पाऊल उचलले नसते. लालदिव्याच्या गाडीचे निमित्त करून इमाम बरकतीने जी मुक्ताफळे उधळली, त्याची खरी दखल बंगालच्या ममता सरकारने घ्यायला हवी होती. त्याच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. पण झाले उलटेच! ज्या मशिदीचा इमाम म्हणून हा इसम अरेरावी करीत होता, त्याच मशिदीच्या विश्‍वस्त मंडळाने त्याला अधिकारपदावरून हाकलून लावले आहे. तडकाफडकी एकमुखी निर्णय घेऊन, या विश्‍वस्तांनी त्याला इमाम पदावरून हटवले आहे. थोडक्यात, लालबत्तीची नशा आता इमामपद गेल्यावर उतरली असेल. पण, विश्‍वस्तांनी इतका कठोर निर्णय कशामुळे घेतला, तेही तपासून बघितले पाहिजे.
इमाम बरकती वा त्याच्यासारखे धर्ममार्तंड म्हणजेच मुस्लिम समाजाचे नेतृत्व, अशी एक सेक्युलर समजूत गेल्या काही दशकांत करून देण्यात आली. त्यामुळे मुस्लिम समाजात कुठलेही सामाजिक वा राजकीय नेतृत्व उदयास येऊ शकले नाही. उलट, अधिकाधिक हा समाज धर्मांधांच्या गुलामीत गुरफटत गेला. परिणामी, सेक्युलर म्हणून नाटक करणार्‍यांना मुस्लिम समाजाची गठ्‌ठा मते मिळवणे सोपे होत गेले आणि अधिकाधिक धार्मिक गुरू हे मुस्लिमांचे राजकीय नेतृत्व करायला पुढे येत गेले. अशा मुस्लिम समाजातील तलाकपीडित महिलांना कोणीही मुस्लिम नेता नेतृत्व वा न्याय द्यायला पुढे आला नाही. आता त्या महिलांना व त्यांच्या नातलगांना न्यायासाठी भाजपाकडे धावावे लागत आहे. त्याच तलाकपीडेमुळे अधिकाधिक मुस्लिम महिलांची मते उत्तरप्रदेशात भाजपाला मिळाली. बंगालमध्ये तशीच एक मूकक्रांती सध्या चालू आहे. तलाकपीडित महिलांना संघटित करून भाजपामध्ये सहभागी करून घेण्याची मोहीम सध्या जोरात चालली आहे. शहरापासून खेड्यापर्यंत अशा तलाकपीडित महिला शोधून, त्यांना भाजपाच्या महिला मंचामध्ये आणायची मोहीम बरकतीला दिसू शकली नाही, तरी लोकांमध्ये वावरणार्‍या विश्‍वस्तांना दिसली आहे. त्यात मुस्लिम महिलांच्या रूपाने बंगाली मुस्लिमांमध्ये वाढणारे भाजपाचे प्रभावक्षेत्र, या विश्‍वस्तांना अस्वस्थ करून गेले असल्यास नवल नाही. त्याला भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा बरकतीसारखे इमाम व त्यांचे चोचले पुरविणार्‍या ममताच कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने, त्या विश्‍वस्तांनी बरकतीला हटवलेला आहे. आज बंगालमध्ये जे घडते आहे, त्याची पुनरावृत्ती नजीकच्या काळात देशव्यापी होत जाणार आहे. त्याला रोखण्यासाठी का होईना, मुस्लिमांमध्ये सामाजिक राजकीय नेतृत्व उभे राहाण्याला हातभार लागला तरी खूप होईल. भाजपाचा विस्तार हा स्वतंत्र विषय असून, मुस्लिम समाजाला धर्ममार्तंडांच्या शृंखलामधून मुक्त करण्याला त्यांचे प्राधान्य आहे.
– भाऊ तोरसेकर