शाबास कॅप्टन अमरिंदर!

0
111

प्रासंगिक
••अमरिंदरसिंग म्हणतात- ‘‘जवानांच्या जिवाला वाचविण्यासाठी अशी कृती करणे, शांतता प्रक्रियेला नख लावण्यासारखे आहे, हा तर्क मी स्वीकारू शकत नाही आणि स्वीकारणारही नाही. उलट, अशा अतिरेकी कारवायांच्या समोर आम्ही असाच निर्विकार धीट पवित्रा घेतला पाहिजे. सर्वदूर सरकारचा हुकूम चालत असेल तरच शांतता शक्य आहे, असे माझे मत आहे.
••काश्मीर खोर्‍यात दगडफेक्यांपासून सुरक्षा जवानांना वाचविण्यासाठी मेजर नितीन गोगोई यांनी स्थानिक रहिवाशाला जीपच्या समोर बांधून, त्याचा ढालीसारखा उपयोग केला आणि जवानांचे प्राण वाचविले. या घटनेवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. मानवाधिकारवाल्यांनी अश्रू ढाळले. केंद्र सरकारनेही बचावात्मक पवित्रा घेतला. पण, मेजर गोगोई यांच्या या कृतीचे जोरदार समर्थन करणारा, एवढेच नव्हे, तर गोगोई यांना लष्कराचे विशिष्ट सेवापदक देण्याची शिफारस करणारा एक ‘शेर का बच्चा’ निघालाच! ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आहेत! गोगोई यांच्यासाठी सेवापदकाची मागणी करून अमरिंदरसिंग यांनी सेक्युलर मंडळींची टीका ओढवून घेतली आहे. सरतेशेवटी त्यांनी एक लेख लिहून या सर्व मंडळींची तोंडे बंद केली आहेत.
या लेखात अमरिंदरसिंग म्हणतात- ‘‘जवानांच्या जिवाला वाचविण्यासाठी अशी कृती करणे, शांतता प्रक्रियेला नख लावण्यासारखे आहे, हा तर्क मी स्वीकारू शकत नाही आणि स्वीकारणारही नाही. उलट, अशा अतिरेकी कारवायांच्या समोर आम्ही असाच निर्विकार धीट पवित्रा घेतला पाहिजे. सर्वदूर सरकारचा हुकूम चालत असेल तरच शांतता शक्य आहे, असे माझे मत आहे. याचाच स्वाभाविक अर्थ हा आहे की, देशाच्या, आमच्या शूर सैनिकांच्या व समाजाच्या भल्याच्या अटींवर, शांततेच्या वाटाघाटींमध्ये भारतीय लष्कराचा महत्त्वपूर्ण सहभाग असला पाहिजे. हे संवेदनशील काश्मीरला तसेच सीमाविवाद सोडवितानाही लागू असले पाहिजे.’’
गोगोई यांना लष्कराचे विशिष्ट सेवा पदक देण्याची शिफारस केली म्हणून टीका करणार्‍यांना अमरिंदर सिंग यांनी तडाखेबंद प्रत्युत्तर दिले आहे. गोगोई यांनी जवानांचे प्राण वाचविले, हे बाब कमी महत्त्वाची कशी मानता येईल, असा प्रश्‍न विचारून ते म्हणतात की, शहीद झाल्यावरच जवानाला पदक देणार काय? अमरिंदर सिंग हे लष्करात कॅप्टन होते, हे येथे उल्लेखनीय आहे. त्यामुळे लष्करी जवान कुठल्या परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात, याची त्यांनी पूर्ण कल्पना आहे. वातानुकूलित कक्षात बसून लष्करी डावपेचांवर चर्चा करणार्‍यांना ही चांगलीच चपराक आहे.
अमरिंदरसिंग यांचा हा लेख, राज्यकर्त्यांपासून ते स्वत:ला मानवाधिकारांचे ठेकेदार समजणार्‍यांच्या तसेच काश्मीर समस्येवर अनाकलनीय तोडगे सुचविणार्‍यांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा आहे! कुठल्याही परिस्थितीत, कितीही उत्तेजित करण्यात आले, तरीही सुरक्षा जवानांनी सभ्यपणाच्या मर्यादा सोडता कामा नये, हा तर्क अमरिंदर साफ फेटाळून लावतात. कुठे नम्र आणि सभ्य राहायचे किंवा कुठे आक्रमण आणि प्रतिकार करायचा, याचे स्थान आणि वेळ ठरली आहे. शहीद जवानाच्या मृतदेहाची विटंबना बघून किंवा तरुण लष्करी अधिकार्‍याचे लग्नसमारंभातून अपहरण करून निर्दयी हत्या करण्याच्या बातम्या वाचून, कोण प्रक्षुब्ध होणार नाही? असा खडा सवाल अमरिंदर यांनी केला आहे. त्यांच्या या मताचा सर्व भारतीयांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे..
हिंदुहित की बात करेगा…
अमरिंदर यांच्या या लेखावर लगेच प्रतिक्रिया येणे सुरू झाल्यात. मीडियाने तर, अमरिंदर यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा भाजपाकडून हिसकावून घेतला, असे मथळे देणे सुरू केले. राष्ट्रवाद असा कुणाकडून हिसकला जाऊ शकतो काय? ती का एखादी वस्तू आहे, हिसकण्यासाठी? मीडिया इतका थिल्लर झाला आहे काय? राष्ट्रवाद ही भाजपाचीच काय, कुणाही एकाची मक्तेदारी असू शकत नाही. बहुतेक भारतीय व्यक्ती राष्ट्रवादी आहेत. ती प्रकट करीत नाही, एवढेच. कॉंग्रेसमध्ये काय कमी राष्ट्रवादी आहेत? पण, शीर्ष नेतृत्वाच्या दबावामुळे ते बोलत नाहीत, एवढेच. अमरिंदरसिंग यांनी ही हिंमत दाखविली. ही घटना कॉंग्रेसची कड फेरणे आहे की काय!
उत्तरप्रदेशात भाजपाला मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण दणदणीत विजयानंतर कथित सेक्युलर विचारवंत व समाजमनावर प्रभाव टाकणार्‍यांच्या पोटात खड्‌डा पडला. मुस्लिमांचे फाजील लाड न पुरवता, त्यांच्या मतांसाठी लाळघोटेपणा न करताही निवडणुका पुरेशा बहुमताने जिंकता येतात, हे प्रथम नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आणि उत्तरप्रदेशने त्यावर शिक्कामोर्तब केले. राजकारणातील या नव्या व यशस्वी सूत्राचे पडसाद इतर राजकीय पक्षांमध्ये कसे काय पडतात, याची उत्सुकता होती. कॉंग्रेस पक्षात काय पडसाद उमटले, हे अमरिंदरसिंग यांच्या स्पष्टवक्तेपणातून दिसून आले आहे. आता प्रत्येक पक्ष या नव्या सूत्राचा कसा अवलंब करता येईल, याचा निश्‍चितच विचार करणार. उलट, तो सुरूही झाला आहे. सपाच्या बक्कल नवाब या मुस्लिम आमदाराने अयोध्येतील राममंदिरासाठी १५ कोटी रुपये देण्याची घोषणा करणे, कशाचे द्योतक आहे? राहुल गांधींचे कर्तृत्वहीन नेतृत्व काठावर ठेवूनही निवडणुका जिंकता येतात, हे अमरिंदर यांनी पंजाबमध्ये सिद्ध करून दाखविले आहे. याचीच पुनरावृत्ती इतर राज्यांमध्येही होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादाची टवाळकी न करता, त्या भावनेला उचित सन्मान दिला पाहिजे, असा एरवी सुप्त असलेला विचारप्रवाह, आता प्रस्फुटित होणे सुरू होईल, असे दिसते.
अमरिंदर यांनी व्यक्त केलेले हे मत, ही याची सुरवात आहे, असे वाटते. तसे झाले, तर भारताच्या राजकारणाची दिशा व दशाच बदलून जाईल! मग केजरीवाल किंवा ममताबाईंच्या राजकारणाचे काय होणार? ते तर राष्ट्रवादाला खुंटीवर टांगूनच राजकारण करण्यात पटाईत आहेत! पश्‍चिम बंगालमध्ये या वर्षी रामनवमीचे सार्वजनिक कार्यक्रम अभूतपूर्व असे झाले आहेत. हे बघून ममताबाईंचे धाबे दणाणले आहे, असे समजते. म्हणून त्यांनी, मुस्लिमांचे फाजील लाड अधिक त्वेषाने करणे सुरू केले आहे. केरळमध्येही तेच सुरू आहे. तेलंगणात तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्येच्या ६ टक्के असलेल्या मुसलमानांसाठी १२ टक्के आरक्षण लागू केले आहे. हिंदुहितासाठी सर्वच राजकीय पक्ष अहमहमिकीने पुढे येत असतील आणि प्रत्येक निर्णय राष्ट्रवादाच्या कसोटीवर घासून योग्य की अयोग्य ठरविणे सुरू होत असेल, तर श्रेयस्करच ठरणार आहे. भारतातील राजकीय मानसिकता वळण घेत आहे, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८