जनतेचा विश्‍वास हीच मोदी सरकारची उपलब्धी!

0
83

दिल्लीचे वार्तापत्र
••संपूर्ण विरोधक एकत्र आल्यावरही भाजपाचा विजयरथ रोखण्याची ताकद आज त्यांच्यात नाही. कारण मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास बसला आहे, नव्हे, तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डॉ. फारुख अब्दुल्लासारखे नेते विरोधकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगत आहेत.
••२६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांचा कालावधी हा कोणत्याही सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नसला तरी कमीही नाही. या तीन वर्षांतील मोदी सरकारच्या कामगिरीचे नेमके वर्णन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी अतिशय मार्मिकपणे केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना केली आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांच्या नेतृत्वातीलच सरकार सत्तेत येणार असल्यामुळे, तुम्ही विनाकारण आपली ताकद या निवडणुकीत लावू नका, अशी सूचना केली. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी देशातील कोट्यवधी जनतेच्या मनातील भावनाच एक प्रकारे व्यक्त केल्या आहेत.
डॉ. फारुख अब्दुल्ला यांची प्रतिमा भाजपासमर्थक नेते अशी नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेला महत्त्व आहे. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर देशातील जनता पूर्णपणे समाधानी असल्याचा निर्वाळाचा त्यांनी एक प्रकारे दिला आहे. तीन वर्षांच्या कामगिरीवर देशातील विविध वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी जे सर्वेक्षण केले, त्यातूनही याची खात्री पटली आहे. मोदी सरकारच्या कामगिरीवर देशातील ७१ टक्के जनता समाधानी असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तीन वर्षांच्या कालावधीत देशात विविध क्षेत्रात सरकारचे अस्तित्व जाणवायला लागले आहे. विकासकामांना वेग आला आहे. सरकार काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे परिणाम आणि फायदे लोकांपर्यंत पोहोचले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत आपल्या मंत्रालयांनी केलेल्या कामाचा आढावा, आतापर्यंत जवळपास आठ ते दहा केंद्रीय मंत्र्यांनी पत्रपरिषदांच्या माध्यमातून सादर केला आहे. भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी, मानव संसाधन, रेल्वे, ऊर्जा तसेच पेट्रोलियम या मंत्रालयाच्या कामांनी जनमानसावर आपली छाप पाडली आहे. लोकांना, मंत्रालयांनी तीन वर्षांत केलेल्या कामाचे फायदे दिसायला लागले आहेत. हीच स्थिती आणखी अनेक मंत्रालयांची आहे.
नोकरशाहीवर मोदी सरकारची भक्कम पकड आहे. मोदी यांचा धाक आणि दरारा नोकरशाहीत आहे. राजकारण थांबवून नोकरशाही फक्त काम आणि काम करते आहे. संपुआ सरकारच्या काळात नोकरशाही जनतेच्या हिताची कामे सोडून बाकी सार्‍या गोष्टी करत होती. गटबाजी वाढली होती, प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जात होते, एकदुसर्‍याचे पाय ओढले जात होते. मंत्र्यांना डावलून वाटेल तसे निर्णय घेतले जात होते, मुक्तपणे भ्रष्टाचार केला जात होता.
दोन सत्ताकेंद्रांमुळे आपल्याला विचारणारे कुणी नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे या व्यवस्थेचा गैरफायदा घेतला जात होता.
आता यातले काहीच करायचे नोकरशाहीची हिंमत नाही. टाळाटाळ पूर्णपणे थांबली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय जलदगतीने घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सरकार काम करते म्हणजे काय करते, असे अनेकांना वाटत असते. मोदी सरकारकडे पाहून सरकार काम कसे करते, याचा अनुभव देशवासीयांना येत आहे. हे चित्र बदलण्याचे श्रेय नि:संशय पंतप्रधान मोदी यांना द्यावे लागेल.
पंतप्रधानपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी, मी रात्रंदिवस काम करणार, तुम्हालाही असेच काम करावे लागणार. अशी अटच आपल्या सर्व मंत्र्यांना घातली होती. पंतप्रधान कार्यालयात वा ७ लोककल्याण मार्ग (जुने ७ रेसकोर्स) या आपल्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी रात्री दीड-दोन वाजेपर्यंत काम करत असतात, त्यांना भेटायला शिष्टमंडळ येत असतात, त्यांच्या बैठकी चालू असतात. हे चित्र या आधी पंतप्रधान कार्यालयाने कधीच पाहिले नाही! विशेष म्हणजे सकाळी दहाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी जेवढे ताजेतवाने असतात, तेवढेच रात्री दोनच्या बैठकीतही असतात! एवढी ऊर्जा आणि उत्साह मोदी कसे आणतात, याचेच सवार्र्ंना आश्‍चर्य वाटते. चार-साडेचार तासांच्या झोपेनंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता मोदी पुन्हा कामाला तयार असतात. एखादा माणूस कामाला वाघ आहे, असे आपण म्हणतो, त्याचे शब्दश: प्रत्यंतर पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा झपाटा पाहून येतो. मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकूनच एखाद्दुसरा अपवाद वगळता, सर्वच मंत्र्यांनी जनतेच्या कामात रात्रंदिवस स्वत:ला झोकून दिले. हे मंत्री घरदार, बायको, मुलं आणि तहानभूक विसरून कामाला भिडले. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘अच्छे दिन’चा अनुभव आता लोकांना येऊ लागला आहे.
मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे एकाही मंत्र्यावर या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नाही. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी यांनी म्हटले होते, त्याची प्रचीती आता लोकांना येत आहे. तुम्ही कधीही कोणत्याही मंत्र्याला भेटायला त्यांच्या मंत्रालयात वा निवासस्थानी जा, ते तुम्हाला बैठकीत व्यग्र दिसतील. अनेक मंत्री तर घरीही फाइल्स घेऊन जातात आणि रात्ररात्र जागून त्यावर काम करतात. आपल्या खात्याची परिपूर्ण माहिती नाही, असा मंत्री शोधूनही सापडणार नाही! खात्याचा पूर्ण अभ्यास असल्यामुळे आता सचिव आणि अधिकारी मंत्र्यांना फसवू शकत नाही, त्यांची दिशाभूल करू शकत नाही. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यापासून मंत्र्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे प्रशासन हे मंत्री चालवतात, सचिव नाही, याची पदोपदी खात्री पटते.
आपला कोणताही चुकीचा निर्णय आपल्याला घरी बसवेल, याची नोकरशाहीला खात्री पटली आहे. त्यामुळे ती सुतासारखी सरळ झाली आहे. यामुळे सरकारचे अस्तित्व जाणवते. सरकार काम करत आहे, याची खात्री पटते. याचे श्रेय पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. दिल्लीच्या राजकारणाचा आणि नोकरशाहीचा अनुभव मोदी यांना नव्हता. पण, नोकरशाहीला कसे हाताळायचे, याचा अनुभव त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना घेतला होता, त्याचा फायदा त्यांना पंतप्रधान झाल्यावर झाला. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर होते, पण त्यांना पंतप्रधानपदाचे अधिकार काहीच नव्हते, त्या काळात १० जनपथ हे समांतर सत्ताकेंद्र झाले होते. त्यामुळे नोकरशाहीही त्यांना जुमानत नव्हती. नोकरशाही आपल्या मंत्र्याचे पाणी जोखत असते, त्यावर मंत्र्याला आपल्या तालावर नाचावयाचे की आपण त्याच्या तालावर नाचायचे, हे ठरवत असते. मोदी आणि त्यांचे मंत्री आपल्या तालावर नाचणार नाहीत, याची खात्री पटल्यावर नोकरशाहीने शरणागती पत्करत, त्यांच्या तालावर नाचायचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकारचा भर ‘मिनिमम गव्हर्मेण्ट मॅक्झिमम गव्हर्नस’ यावर आहे. त्यामुळेच सुशासन आले आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. संपूर्ण विरोधक एकत्र आल्यावरही भाजपाचा विजयरथ रोखण्याची ताकद आज त्यांच्यात नाही. कारण मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास बसला आहे, नव्हे, तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डॉ. फारुख अब्दुल्लासारखे नेते विरोधकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगत आहेत. मोदी जे काही करतील, ते देशहिताचे असेल, ते चुकीचे काहीच करणार नाहीत, याची जनतेची खात्री पटली आहे. हीच मोदी सरकारची जमेची बाजू आणि तीन वर्षांची उपलब्धी आहे!
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७