विरोधी पक्षाचे महाआघाडी पर्व

0
80

प्रासंगिक
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जसजशी अधिकाधिक जवळ येऊ लागली आहे, तसतशी विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढू लागली आहे. भाजपाप्रणीत गटाचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून विरोधी गटांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अर्थातच त्यात काहीही गैर नाही. एकेकटा विरोधी पक्ष पुरेसा ठरणार नाही. ही वस्तुस्थितिपूर्ण जाणीव विरोधी पक्षांना असल्यामुळे, आवळ्या-भोपळ्यांची मोट बांधण्याचा प्रयोग ‘महागठबंधन’ नावाखाली सुरू करण्याच्या दृष्टीने विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी, सदिच्छा(?) भेटीच्या नावाखाली सुरू आहेत. या प्र्रयोगानं बाळसं धरलं तर २०१९ च्या निवडणुकांच्या प्रसंगी महागठबंधन हे महासत्तागठ्‌ठबंधन ठरू शकेल, अशी अटकळ बांधून त्या दृष्टीने चहलपहल सुरू झालेली आहे.
या घडामोडीवरून मला, काहीशी तशाच प्रकारची महाभारतातील कौरव-पांडवांसंबंधीची घटना आठवते. पांडवांनी बारा वर्षे वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगल्यानंतर धर्मराजाने दुर्योधनाजवळ, त्याने बळकावलेल्या आपल्या वाट्याच्या राज्याची मागणी केली. पण, अहंमन्य दुर्योधनाने ती फेटाळली. धर्मराजाने सामोपचाराने पाच गावे मागितली. दुर्योधनाने, पाच गावेच काय? पण, ‘सुईच्या अग्रावर मावेल’ एवढी जमीनही देण्यास नकार दिला. तरीही युद्ध टळावे म्हणून पांडवांनी कृष्णशिष्टाईचा प्रयोगही करून पाहिला. या कशाचाच उपयोग झाला नाही, तेव्हा मात्र युद्ध अटळ झाले. देशोदेशीच्या राजांना उभय पक्षांकडून पाचारण करण्यात येऊ लागले. दुर्योधन एवढा निलाजरा होता की, कृष्णालादेखील तो आपल्या बाजूने लढण्याकरिता पाचारण करण्यास स्वत: कृष्णाकडे भेटीला गेला! कृष्ण म्हणाला, मी एकटा किंवा माझे सैन्य या दोहोंपैकी तुला काय हवे आहे? मी नि:शस्त्र असेन. नि:शस्त्र कृष्णापेक्षा त्याचे सैन्यच बरे, असा विचार करून दुर्योधनाने कृष्णाच्या सैन्याची निवड केली. नकुल-सहदेवाचे मामा ‘शल्य’ यांनादेखील कपटनीती उपयोगात आणून दुर्योधनाने आपल्या बाजूला वळवले. अशा प्रकारे दुर्योधनाने अकरा अक्षौहिणी सैन्याचे महागठबंधन तयार केले. भीष्म, द्रोण तनाने जरी दुर्योधनाच्या बाजूने लढणार होते, तरी मनाने ते पांडवांच्या बाजूनेच होते. त्यामुळे दुर्योधनाचे महागठबंधन हे एकजिनसी, एकजीव, अखंड, अभेद्य, टिकाऊ स्वरूपाचे ठरू शकले नाही.
तात्कालिक स्वार्थाकरिता आणि सत्कार्याला अपशकुन करण्याकरिता तयार झालेल्या महागठबंधनाचं कौरव-पांडव युद्धात जे झालं, तेच आता नवीन तयार होऊ घातलेल्या विरोधी पक्षांच्या मतलबी, कावेबाज, संधिसाधू, दुराग्रही, हट्‌टाग्रही, स्वार्थी, कपटी, धूर्त महागठबंधनाबाबत होणार आहे. हे सांगण्याकरिता काही ज्योतिषाची गरज नाही. कारण या महाआघाडीजवळ क्वालिटी नाही, की क्वांटिटी नाही. केवळ विरोधाकरिता विरोध! लोकसभा आणि नंतर झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये या विरोधकांना महाआघाडी बनविता आली नाही. कारण, तेव्हा अनेक राज्यातील नेते एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळे मोदी लाटेत हे सर्वच नेते धडाधड पडले, मोडले. आताही तीच स्थिती आहे. अजूनही काही नेते एकमेकांचे तोंड देखील पाहू इच्छित नाही. अशा स्थितीत समजा एखादा उमेदवार ठरलाही, तरी तो सर्वांना मान्य होईल, याची शाश्‍वती कोण देणार? ‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत| अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्‌॥ असं भगवद्गीतेत जे सांगितलं ते खरंच आहे. या श्‍लोकातील ‘धर्म’ म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन अशा अर्थाने घ्यावयाचा शब्द नाही; तर धर्म म्हणजे विकासधर्म, राष्ट्रधर्म. अस्मिताधर्म, सत्कर्मधर्म, सर्वाभ्युदयधर्म, दुरितांचे तिमिर दूर करणारा धर्म. ‘जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे आपुले’ असे सांगणारा धर्म. अशा धर्माच्या मार्गाने वाटचाल करण्याकरिता ज्या गठबंधनाने खंबीर पाऊल उचललेलं आहे, तेच गठबंधन अंतिम विजयाप्रत जाईल, हे निश्‍चित!
‘यत्र योगेश्‍वर: कृष्णो| यत्र पार्थो धनुर्धर:| तत्र श्रीर्विजयो
भूतिध्रृवा नीतिर्मतिर्मम’ हे त्या महागठबंधनाने लक्षात ठेवावे, एवढेच त्यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
– भालचंद्र शं. देशपांडे
०७१२-२२४४८१९