खोकला गेला, मफलरही गेले अन् ढोंग उघडे पडले!

0
127

कटाक्ष
••जे केजरीवाल दुसर्‍यांविरोधात बोलायचे ते केजरीवाल, स्वत:वर झालेल्या आरोपांचे उत्तर द्यायलाही तयार नाहीत. सत्तेत येऊन त्यांना दोन-अडीच वर्षे होत आहेत. मग या अल्पावधीत असे काय घडले की, केजरीवाल मीडियासमोर यायलाच घाबरत आहेत? जर त्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही, तर ते उत्तरं द्यायला का घाबरत आहेत? टीकाकारांना उत्तरं द्यायला त्यांना प्रवक्त्यांची फौज का पुढे करावी लागत आहे?
••‘अरविंद केजरीवाल’- दिल्लीचे मुख्यमंत्री! नाव तसे सगळ्यांनाच परिचित आहे. कारण, केंद्रात डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना या केजरीवालांनी अण्णा हजारे यांच्यासोबत आणि त्यांच्या मार्गदर्शनात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले होते. त्या वेळी ‘अनशन’ म्हणजे उपोषण करण्याची जणू फॅशनच आली होती. कानाला मफलर बांधलेले अन् सतत खोकलणारे केजरीवाल देशाने पाहिले होते. त्यांना जसा नैसर्गिक खोकला होता, तसा कृत्रिमही होता. ते सतत सत्ताधार्‍यांविरुद्ध आणि अन्य विरोधकांविरुद्ध खोकलत राहायचे. त्यांचा हा खोकला आता बंद झाला असला, तरी त्यावेळच्या खोकल्याने त्यांना आता अडचणीत आणले आहे. आपण एकटेच तेवढे चांगले आणि इतर सगळे भ्रष्ट, अप्रामाणिक, असा समज त्यांनी करून घेतल्याने, त्यांनी कोणावरही कसेही आरोप केले. त्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या नितीन गडकरी यांनी सगळ्यात आधी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला. नंतर गडकरी यांच्या घरी जाऊन केजरीवाल यांनी माफी मागितली, हा भाग वेगळा. पण, सध्या त्यांच्या तोंडचे पाणी पळविले ते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी. जेटली यांनी आधी एक खटला दाखल केलाच होता, त्या खटल्याच्या सुनावणीत केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी केजरीवालांच्या वतीने जेटलींना कपटी म्हटले अन् जेटलींनी पुन्हा दहा कोटी रुपयांचा दावा ठोकला. आता केजरीवालांचा नैसर्गिक खोकला जसा बंद झाला, तसा कृत्रिमही बंद झाला आहे. ज्या मफलरने त्यांना वेगळी ओळख दिली होती, ते मफलरही आता दिसत नाही.
नंतरच्या काळात ‘बडबडे केजरीवाल’ अशी नवी ओळख त्यांना मिळाली होती. देशात सगळ्यात मीडियाफ्रेण्डली कोण? तर केजरीवाल! अशीही त्यांची ओळख होती. पण, आता तर ते मीडियासमोर यायलाही घाबरतात. त्यांच्याच पक्षाचे आमदार कपिल मिश्रा यांनी त्यांच्यावर एकामागोमाग एक अनेक आरोप करून त्यांना घायाळ केल्याने, केजरीवाल पिंजर्‍यात बंद असल्यासारखे दिसत आहेत. एरवी काहीही झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर बेछूट आरोप करणारे केजरीवाल आता मीडियासमोर यायला कचरत आहेत. आता त्यांची बाजू मांडण्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मैदानात उतरतात. प्रवक्त्यांच्या सुरक्षा कवचात राहणारे अरविंद केजरीवाल हवालदिल झाले आहेत. इतरांवर बिनधास्त आरोप करून देशभर प्रसिद्धी मिळविणारे अरविंद केजरीवाल आता स्वत:ची बाजू मांडण्यासाठीही मीडियासमोर यायला तयार नाहीत! त्यांची अशी अवस्था का झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्यावर आरोप झाले की, प्रवक्त्यांना पुढे करण्याची परंपरा तशी कॉंग्रेसची आहे. कॉंग्रेसच्या हायकमांडवर जेव्हा जेव्हा आरोप झालेत, तेव्हा तेव्हा त्यांचे प्रवक्तेच खुलाशासाठी आणि प्रत्युत्तरासाठी पुढे आलेत. स्वत: नेत्यांनी कधीच आरोपांना उत्तरे दिली नाहीत. तीच संस्कृती आता आम आदमी पार्टीने स्वीकारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साहाय्याने अरविंद केजरीवाल मोठे झाले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल आणण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलनं केली. पण, त्याचा सारा फायदा हा अरविंद केजरीवाल यांनी घेतला. अण्णांची इच्छा नसताना त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला. अण्णांची इच्छा नसताना केजरीवाल निवडणुकीच्या रिंगणात उतरले. जे केजरीवाल सातत्याने इतरांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवायचे, त्याच केजरीवालांवर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. जे केजरीवाल दुसर्‍यांविरोधात बोलायचे ते केजरीवाल, स्वत:वर झालेल्या आरोपांचे उत्तर द्यायलाही तयार नाहीत. सत्तेत येऊन त्यांना दोन-अडीच वर्षे होत आहेत. मग या अल्पावधीत असे काय घडले की, केजरीवाल मीडियासमोर यायलाच घाबरत आहेत. जर त्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही, तर ते उत्तरं द्यायला का घाबरत आहेत? टीकाकारांना उत्तरं द्यायला त्यांना प्रवक्त्यांची फौज का पुढे करावी लागत आहे? अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या खटल्यात राम जेठमलानी हे केजरीवाल यांची बाजू मांडत आहेत. त्यासाठी त्यांनी चार कोटी रुपये फी आकारली आहे. ही फी ते दिल्ली सरकारच्या तिजारीतून देणार होते. त्याविरुद्ध ओरड होताच फी देण्याची प्रक्रिया थांबली. हजारो करदात्यांनी दिलेल्या पैशांचा अपव्यय करूनही केजरीवाल सहीसलामत सुटतील याची शक्यता आता कमीच दिसते आहे. कारण, स्वत: कायदेतज्ज्ञ असलेल्या अरुण जेटली यांनी केजरीवाल यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्‌ट आवळला आहे. आपण काहीही आरोप केले तरी जनता त्यावर विश्‍वास ठेवते, हा गैरसमज केजरीवाल यांनी आता दूर केला पाहिजे. राजकारणात नाटकबाजी फार काळ चालत नाही. जनतेला मूर्ख बनविण्याचे दिवसही आता मागे सरले आहेत. पोकळ मुद्यांवर केलेले राजकारण फार दिवस टिकत नाही, हेही केजरीवाल यांनी लक्षात घेतले पाहिजे. आपले राजकीय ढोंग आता उघडे पडले आहे, हे त्यांना कळायला हवे. अन्यथा, जनता सर्वोच्च आहे अन् योग्य निर्णय करण्यासही ती सक्षम आहे.
लोकांना तमाशा जरूर आवडतो. केजरीवाल यांनी केलेला तमाशाही लोकांना आवडला आणि म्हणूनच दिल्लीच्या मतदारांनी त्यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडूनही दिले. पण, तमाशा करणारी मंडळी पुन:पुन्हा लोकप्रिय होऊ शकत नाही, एका ठिकाणी तमाशा केल्यावर ती मंडळी दुसर्‍यांदा त्या ठिकाणी परत येत नाही, हेही वास्तव आहे. सत्ता मिळाल्यानंतर खरेतर केजरीवालांनी तमाशा बंद करायला पाहिजे होता. पण, मुळात तीच प्रवृत्ती असल्याने त्यांचा तमाशा सुरूच राहिला. तो जसा त्यांच्या पक्षातील आमदारांनाही पसंत पडला नाही, तसाच तो जनतेलाही पसंत पडला नाही. दिल्लीत तीन महापालिकांसाठी झालेल्या मतदानात जनतेने या तमासगिरांना त्यांची जागा दाखवून दिली. तीनही ठिकाणी मतदारांनी भाजपाला मोठा कौल दिला.
भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून सत्तेत आलेले केजरीवाल हे स्वत:च कसे भ्रष्ट आहेत, हे त्यांच्याच सहकार्‍यांनी जनतेपुढे आणल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले केजरीवाल अल्पावधीतच खाईत फेकले गेले आहेत. केजरीवालांच्या पार्टीचे नाव जरी आम आदमी पार्टी असले, तरी त्यांच्या पक्षाचे जे चरित्र आम्ही पाहिले आहे, त्यावरून तरी ती खास आदमी पार्टी वाटते आहे. प्रामाणिकपणाचा जो बुरखा केजरीवालांनी ओढला होता, तो टराटरा फाटायला लागला आहे. त्यामागचा खरा चेहरा आता समोर येत आहे. ज्या गतीने केजरीवाल यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला, त्याच गतीने त्यांचा अस्तही होणार, हे आता सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीच्या जनतेने सत्ता सोपविल्यानंतरही अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवरच टीका करत राहिले. जनतेने कौल दिला आहे, तो सार्थ ठरवावा, जनतेचा विश्‍वास सत्कारणी लावावा, त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्या, दिल्लीच्या समस्या सोडवाव्यात, केंद्रशासित प्रदेश असल्याने केंद्र सरकारसोबत संघर्षाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेत कारभार केला असता, तर कदाचित आज केजरीवालांची प्रतिष्ठा आणखी वाढली असती. पण, जे आडातच नाही ते पोहर्‍यात येणार कसे? खोकला आणि मफलर गेले असले, तरी ढोंगी वृत्ती गेली नाही, हेच खरे! केजरीवालांनी आता कितीही ढोंग केले तरी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, हे महापालिकांच्या निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे…
– गजानन निमदेव