नीच प्रवृत्तीचे हीणकस प्रदर्शन!

0
299

चौफेर

अरे, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कशाला कुणाच्या मृत्यूची कामना करेल? परिस्थितीची प्रतिकूलता हाताबाहेर गेलीच कधी, तर कुणालाही दूषणे न देता स्वत:चे आयुष्य संपविण्याचा मार्ग स्वीकारला इथल्या बळीराजाने. वेदना मांडल्या, लाठ्या खाल्ल्या, रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, जेलमध्ये गेला, बँकांपुढे हात पसरले… पण, म्हणून कडाकडा बोटं मोडत कुणाला शिव्याशाप देण्याचा मार्ग नाही स्वीकारला त्यानं कधी. त्यामुळे या अपघाताचे अपश्रेय शेतकर्‍यांच्या तळतळाटाला देण्याची धडपड कुणाच्यातरी सडक्या मेंदूतून साकारलेल्या घाणेरड्या राजकीय षडयंत्राचाच परिपाक म्हटला पाहिजे.

••हो! त्यांचे असले वागणे हे नीच प्रवृत्तीचे हीणकस प्रदर्शनच आहे! एखादी व्यक्ती साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर आनंद व्यक्त करायचे सोडून, चेहरे सुतकी करून बसलेल्यांबाबत अजून काय बोलायचे? कुठल्या दर्जाहीन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताहेत हे लोक? शत्रूचा मृत्यू ही युद्धाची अपरिहार्यता असते. पण, त्याच्याही केवळ पराभवाची कल्पना करतो आम्ही. माणूस गेला की त्याच्याशी असलेले शत्रूत्वही त्याच्यासमवेत संपविण्याचे औदार्य दाखविण्याची परंपरा आहे या मातीची. त्यातही वैर राजकारणातले, विचारांचे असेल, तर मग त्याच्या दर्जाबाबत अधिकच जागरूक राहिले पाहिजे. पण, इथे तर कशालाच कशाचा पायपोस नाही. ज्यांच्या बचावण्याबाबत विकृत विचारांचे विखार पसरविण्याचा प्रयत्न चाललाय्, ती व्यक्ती या राज्याची मुख्यमंत्री आहे, याचेतरी भान राखले जावे की नाही? विरोध विचारांचा असावा अन् त्यालाही विशिष्ट दर्जा असावा. एखाद्याच्या मृत्यूची कल्पना मांडणारा हा कुठला धर्म अन् ही कुठली संस्कृती? अपघातात एखादी व्यक्ती सुखरूप बचावली म्हणून दु:ख व्यक्त करण्याची ही कुठली झाली तर्‍हा?
परवा निलंग्याहून मुंबईकडे निघालेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातून, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासमवेत असलेले त्यांचे सहकारी सुखरूप बाहेर आले. अपघाताची नुसती बातमी ऐकली तरी काळीज धस्स झालं अनेकांचं. मुख्यमंत्र्यांसह सारे सहीसलामत आहेत म्हटल्यावर सुटकेचा नि:श्‍वास टाकला सगळ्यांनी. मुख्यमंत्री काही प्रत्येकाचेच सगे-सोयरे नाहीत. किंवा इथल्या सर्वांचीच काही भारतीय जनता पक्षाशी वैचारिक जवळीक आहे, असेही नाही. पण, तरीही माणुसकीच्या नात्यातून या अपघाताबद्दल बहुतांशी व्यक्त झाली ती हळहळच! अन् मुख्यमंत्र्यांना जराही इजा झालेली नसल्याची वार्ता कानी पडल्यावर व्यक्त झाला तो आनंदच! पण, काही नतद्रष्टांना मात्र या दोन्ही बाबतीत नेमके उलट वागावेसे वाटले आहे. या अपघाताच्या निमित्ताने सोशल मीडियातून त्यांनी मांडलेला उच्छाद, त्यांचा तो थयथयाट… सारेच दुर्दैवी अन् क्लेशदायक आहे.
तीन वर्षे झालीत महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होऊन. ‘मोदी इफेक्ट’ होताच, पण या राज्यातील जनतेने पूर्वीच्या सरकारचा नाकर्तेपणा लक्षात घेऊन घडवून आणलेलाही तो बदल होता. एरवी लोकशाहीचा कायम, जोरदार पुरस्कार करणार्‍या तमाम जनांना, लोकशाहीव्यवस्थेतूनच घडून आलेला हा सत्ताबदल अजूनही पचवता येत नाहीय् बहुदा. म्हणूनच त्यांच्या मनातला जळफळाट असा अस्थानी व्यक्त होत राहतो कायम. निमित्त गवसले रे गवसले की, पुरोगामित्वाचे गोडवे गात नंगा नाच सुरू होतो त्यांचा. काय घडायला हवे होते हो निलंग्यातल्या परवाच्या त्या अपघातात? काय घडले असते म्हणजे आनंद झाला असता या हरामखोरांना? म्हणे, शेतकर्‍यांच्या तळतळाटामुळे घडला हा अपघात. आपण काय बोलतोय्, कुठे बोलतोय्, कशाबद्दल बोलतोय्, याचे तारतम्य राखण्याचीही गरज वाटत नाही इथे कुणालाच? अहो, शेतकर्‍यांच्या तळतळाटातून तर कॉंग्रेसचे सरकार हद्दपार झाले. पुन्हा सत्तेवर येण्याची अंधुकशीही शक्यता दिसू नये इतपत दूर फेकले गेलेत ते. विद्यमान सरकारही आपल्यासाठी काहीच चांगले करीत नसल्याच्या निष्कर्षाप्रत आला बळीराजा, तर हेही सरकार बाहेर खेचले जाईल सत्तेतून. असेलच नाकर्तेपणा, तर लोक देतील ना त्याची शिक्षा सरकारला आणि राहिला प्रश्‍न आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकर्‍यांच्या तळतळाटाचा, तर तो नेमका कुणाला भोवला, हे तर सारा देश बघतो आणि अनुभवतो आहे. बळीराजाचे शाप ज्याला लागले त्या कालपर्यंतच्या सत्तेच्या तमाम शिलेदारांना आज सत्तेच्या दालनात कुठेही स्थान मिळालेले नाही. या अपघातात सापडलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्‍यांपैकी कुणाच्याही अंगावर साधा ओरखडाही उमटलेला नाही. हा चमत्कार, लोकांनी भरभरून दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादानेच घडू शकतो. याहीउपर कुणाला त्यात तळतळाटाचा जावईशोध लावायचाच असेल, तर तो त्यांनाच लखलाभ!
अरे, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कशाला कुणाच्या मृत्यूची कामना करेल? परिस्थितीची प्रतिकूलता हाताबाहेर गेलीच कधी, तर कुणालाही दूषणे न देता स्वत:चे आयुष्य संपविण्याचा मार्ग स्वीकारला इथल्या बळीराजाने. वेदना मांडल्या, लाठ्या खाल्ल्या, रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, जेलमध्ये गेला, बँकांपुढे हात पसरले… पण, म्हणून कडाकडा बोटं मोडत कुणाला शिव्याशाप देण्याचा मार्ग नाही स्वीकारला त्यानं कधी. त्यामुळे या अपघाताचे अपश्रेय शेतकर्‍यांच्या तळतळाटाला देण्याची धडपड कुणाच्यातरी सडक्या मेंदूतून साकारलेल्या घाणेरड्या राजकीय षडयंत्राचाच परिपाक म्हटला पाहिजे. अन्यथा, काळाचा पराभव करत, मृत्यूच्या सापळ्यातून कुणाचे सुखरूप बाहेर पडणे, एखाद्याच्या पचनी न पडण्याचे कारणच काय? सार्वजनिक जीवनात वावरताना अशा प्रसंगात वागण्या-बोलण्याचे तारतम्यही ज्यांना राखता येत नाही, त्यांच्या वैचारिक दर्जाचे कौतुक काय वर्णावे! एरवी सतत माणुसकीच्या गप्पा हाणणार्‍यांनी पातळी सोडून केलेल्या दर्जाहीन राजकारणाची ही खरंतर परिसीमा आहे. ‘‘अरे! वाचले का?’’ अशी प्रतिक्रिया एखाद्या अतिशहाण्या माणसाला या अपघातानंतर सोशल मीडियावरून जाहीर रीत्या व्यक्त करावीशी वाटणे आणि प्रत्यक्षात त्याने तसे करणे, हे माणूस म्हणून कसे वागू नये याचे ‘उत्तम’ उदाहरण आहे. असल्या दीड शहाण्यांच्या माकडचेष्टेला टाळ्या वाजवत प्रतिसाद देणार्‍या बघ्यांची गर्दीही तेवढीच दुर्दैवी म्हटली पाहिजे. एखादी व्यक्ती, संघटन वा विचाराला विरोध करण्याच्या नादात आपण कशाचे समर्थन करायला निघालोय्, हे तरी तपासून घेतले पाहिजे ना? गांधीहत्येनंतर तुम्ही कसे वागला होतात, असा सवाल आता काही लोक उपस्थित करताहेत. त्या वेळी कुणीतरी आनंद व्यक्त केला होता असा आरोप करत, त्यांना पुन्हा एकदा दूषणे देण्याची संधी साधली जातेय् यानिमित्ताने. तसे करत, मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणातील आपल्या वागण्याचे अश्‍लाघ्य समर्थन करण्याचा प्रयत्नही काही निलाजरे लोक करताहेत. महात्मा गांधीच काय, कुणाच्याच हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यावेळच्या काही लोकांच्या वागण्याची उदाहरणे दिली म्हणून आताचे यांचे वागणे योग्य थोडीच ठरविता येणार आहे? अरे, ज्यांच्याशी रक्ताचे सोडा, भाषा, प्रांत, देश याही दृष्टीने कुठलाच संबंध नव्हता, अशा शेकडो लोकांच्या जिव्हारी लागलेली २६/११ ची अमेरिकेतील घटनाही मनं हेलावून गेली आमची. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या त्या दोन इमारती क्षणात जमीनदोस्त होताना बघून काळीजं पिळवटून निघाली होती सर्वांची.
इथे तर आमच्यातला एक माणूस, आमच्या राज्याचा नेता एका दुर्दैवी प्रसंगातून बचावला आहे… तर त्याबाबत दु:ख व्यक्त करू शकतात काही लोक? काय बिघडवलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं? शेतकर्‍यांच्या आडून, माणुसकीच्या सार्‍या मर्यादा खुंटीवर टांगून चाललेलं हे असलं बेताल वागणं, केवळ अमानवीयच नाही, तर विकृत आहे. समर्थन गांधी हत्येचे असो, वा मग परवाच्या प्रसंगातील या विकृतीचे, दोन्हीची पातळी नीच दर्जाची अन् स्वत:ला पुरोगामी म्हणून घेणार्‍या महाराष्ट्रासाठी केवळ आणि केवळ अशोभनीय अशीच आहे…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३