साप्ताहिक राशिभविष्य

0
498

रविवार, २८ ते ३ जून २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, २९ मे- भद्रा (समाप्त ११.०५), विनायकचतुर्थी (नागपूर भागात), उमा अवतार, उमापूजन; बुधवार, ३१ मे- उद्धव महाराज मुंगळेकर पुण्यतिथी- बिलोली (नांदेड), शुक्र मेषेत (८.५६); गुरुवार, १ जून- भद्रा- ६.२० ते १८.१२, संत कोलबा स्वामी पुण्यतिथी- धापेवाडा, झांशी राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी; शुक्रवार, २ जून- दुर्गाष्टमी, शुक्लादेवी पूजन व्रत, योगिराज गोविंद महाराज जन्मदिन- अमरावती; शनिवार, ३ जून- महेश नवमी, बुध वृषभेत (१९.५०).
मुहूर्त ः साखरपुडा- ३१ मे, ३ जून; बारसे- ३१ मे, ३ जून; जावळे- २९ मे; गृहप्रवेश- ३० मे, ३ जून.
मेष- नवा मार्ग सापडेल
या आठवड्याच्या प्रारंभी आपला राशिस्वामी मंगळ चंद्रासोबत लक्ष्मीयोग बनवीत आहे, यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरी-व्यवसायात आपली प्रगती होऊन आर्थिक घडी बसणार आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवावर्गास नोकरी लागण्याच्या दिशेने काही उपयुक्त हालचाल होताना दिसेल. काही चांगल्या संधी लाभतील. नोकरी-व्यवसायाच्या संबंधाने काहींना प्रवास करावा लागू शकतो, मात्र त्यातून काम बनताना दिसेल. बरेच दिवस रेंगाळलेले काम पूर्णत्वास जाऊ शकेल. काहींना व्यवसायात उत्कर्षासाठी एखादा नवा मार्ग सापडेल व त्याचा यशस्वीपणे अवलंब करता येईल. दरम्यान, या आठवड्यात शुक्र राश्यांतर करून आपल्या राशीत येणार आहे. हेदेखील कुटुंबात सुखाचे, आनंदाचे वारे वाहते ठेवण्यास उपयुक्त ठरू शकेल. शुभ दिनांक- २८, २९, १, २.
वृषभ- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र राश्यांतर करून व्ययस्थानात येणार आहे. हे खर्चवृद्धीचे लक्षण आहे. मात्र, सोबतच आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ व चंद्राने आपल्या धनस्थानात लक्ष्मीयोग बनविलेला असल्याने तो या वाढत्या खर्चाची पुरेशी तजवीज अगोदर करून ठेवेल, असे म्हणता येऊ शकेल. ही आर्थिक तरतूद व गुरूची आपल्या राशीवर असलेली शुभ दृष्टी पाहता हा आठवडा आपणास आनंद, मनोरंजन, खरेदी, प्रवास यांनी युक्त राहून सुखवर्धक ठरू शकणार आहे. राशीत असलेला रवी काहींना नोकरी-व्यवसायात अधिकारयोग देणारा किंवा श्रेष्ठत्व प्रदान करणारा ठरू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडावा. बोलण्याने, वागण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आपल्याभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण होऊन जनसंपर्क वाढेल. काहींना एखादा सन्मान, पुरस्कारदेखील लाभू शकेल.
शुभ दिनांक- २८, २९, ३०, ३१
मिथुन- मोठी उभारी घेण्याची प्रेरणा
या आठवड्यात राशिस्वामी बुध लाभस्थानात असून चंद्र आपल्या राशीत मंगळाच्या सहवासात लक्ष्मीयोग बनवीत आहे. सुखस्थानातून गुरूची कर्मस्थानावर येणारी दृष्टी आपली व्यावसायिक प्रगती दर्शवीत आहे. शिवाय या आठवड्यात शुक्रही आपल्या लाभस्थानात येणार असल्याने चहुकडून मनाला समाधान व आनंददायक वार्ता मिळण्याचे योग दिसत आहेत. काहींना व्यवसायात आकस्मिक धनलाभ होऊन मोठी उभारी घेण्याची प्रेरणा मिळू शकेल. मात्र नवे करार, सौदे करताना पुरेशी खात्री करून घ्यावी. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असाल, तर अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. या काळात नोकरी-व्यवसायातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. स्थावर, जमीन-जुमल्याच्या व्यवहारात प्रगती होईल. काही वादविवादाची प्रकरणे संपुष्टात येतील. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. शुभ दिनांक- २८, २९, ३१, ३.
कर्क- भोवतालचे लोक ओळखा
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानात मंगळासोबत लक्ष्मीयोग बनवीत आहे. मंगळ दशमेश असल्याने तो या योगाच्या प्रभावाने या आठवड्यात व्यवसाय- नोकरीत काही महत्त्वपूर्ण व सकारात्मक घडामोडी घडवू शकेल असे वाटते. याच दरम्यान शुक्रदेखील भाग्यातून दशमात येणार आहे. काही जणांना महिला कर्मचारी किंवा सहकार्‍याकडून विशेष सहकार्य मिळून प्रगतीची वाट चोखाळता येईल. सरकारी कामात यश मिळेल. प्रलंबित राहिलेली कामे या आठवड्यात मार्गी लावू शकाल. दरम्यान, आपल्या बोलण्या-वागण्यात काहीसा रूक्षपणा या आठवड्यात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या व्यवहाराने किंवा बोलण्याने कोणी दुखावले जाणार किंवा कुणी नाराज तर होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. आपले मित्रमंडळ व भोवतालचे लोक कोण आहेत याचाही आदमास घ्या. शुभ दिनांक- २९, ३०, ३१, १.
सिंह- स्वप्नांना दिशा लाभेल
या आठवड्यात आपला राशिस्वामी रवी दशमस्थानात विरजमान असून लाभस्थानात चंद्र व मंगळाचा सुरेख लक्ष्मीयोग झाला आहे. याच आठवड्यात शुक्र अष्टमातून भाग्यस्थानात येणार आहे. हे बदल निश्‍चितपणे भाग्यवर्धक व लाभकारक ठरणार आहेत. मनात स्वप्नवत जोपासलेली कामे साकारावीत यासाठी प्रयत्न करण्यासाठी काहींना हा काळ उपयुक्त ठरू शकेल. योग्य मार्गदर्शन व दिशा लाभल्याने ही कामे अल्पावधीत पूर्णत्वास जाऊ शकतील, याची खात्री बाळगावयास हवी. तसे पाहता या राशीच्या लोकांना आत्मनिर्भरतेचे बरेच अप्रूप असते, मात्र राशीत असलेला राहू आपणांस काही वेळा संभ्रमात टाकून कुणाचीतरी मदत घेण्यास बाध्य करू शकतो. व्यवसायात मोठे करार घडू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या, अपेक्षादेखील पूर्ण करता येऊ शकतील. त्यामुळे आनंद, सहकार्य व समाधान राहील. शुभ दिनांक- २८, ३१, १,२
कन्या- संघर्षाची तयारी हवी
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध अष्टमस्थानात असून, शुक्रदेखील लवकरच त्याच्यासोबत येणार आहे. ही ग्रहस्थिती पाहता, आपणांस मन:स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपले मनोबल चांगले राहिल्यासच दशमस्थानात होणार्‍या चंद्र-मंगळाच्या लक्ष्मीयोगाचा लाभ आपणास मिळू शकेल. विशेष परिवर्तन व उलथापालथीनंतर हा योग आपणास काही चांगल्या आर्थिक संधी प्रदान करू शकेल, असे दिसते. मुळात या आठवड्यात आपणास सहजासहजी काही लाभ मिळेल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे संघर्ष, मेहनत, प्रतीक्षा यांची मानसिक तयारी ठेवावीच लागणार आहे. राशीत असलेला गुरू आपणास मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल. खर्च काहीसा वाढू शकतो. काहींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वाहने सांभाळून चालवा. कुटुंबात व कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांसमवेत सामंजस्य राखा. शुभ दिनांक- २९, ३०, २, ३.
तुला- जीवनात परिवर्तनासह स्थैर्य
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र राश्यांतर करून सप्तमस्थानात शुभसूचक बनून येणार आहे; तर आठवड्याच्या सुरुवातीलाच भाग्यस्थानात मंगळासोबत चंद्राने लक्ष्मीयोग साधला आहे. ही शुभ ग्रहस्थिती आपल्यामध्ये या आठवड्यात अपूर्व उत्साह व जोश निर्माण करू शकेल, असे दिसते. विशेषतः शिक्षण संपवून नोकरीच्या प्रतीक्षेत असणार्‍या युवावर्गास या आठवड्यात काही उपयुक्त संधी प्राप्त होऊ शकतील, तर नोकरीत स्थिरावलेल्या आणि जोडीदाराच्या शोधात असणार्‍यांना मनासारखा किंवा मनपसंतीचा जोडीदार लाभू शकेल असा हा काळ आहे. थोडक्यात काय, तर जीवनाला एका परिवर्तनासह स्थैर्य देऊ पाहणारा हा आठवडा व त्यानंतरचा पुढील काही काळ राहू शकतो. या संधीचा लाभ घेऊन काही निश्‍चित पावले उचलून आपल्या जीवनाला अपेक्षित आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुभ दिनांक- ३०, ३१, १, २.
वृश्‍चिक- अकल्पित घडामोडी संभव
या आठवड्यात आपला राशिस्वामी मंगळ चंद्रासोबत लक्ष्मीयोगात आहे. अष्टमातून होणारा हा लक्ष्मीयोग काही अचानक, अकल्पित घडामोडीनंतर आपणांस विशेष आर्थिक लाभ घडवू शकतो. जुनी येणी, वारसाची प्रकरणे, विम्याचा पैसा या काळात मिळू शकेल. शेअरबाजार, सट्टा, लॉटरी अशा अनिश्‍चिततेच्या मार्गातूनही काही लाभ साधू शकाल. साधारणतः सुरुवातीस सारेच गोंधळलेल्या व विखुरलेल्या स्थितीत असल्याचे वाटत असले, तरी शेवटी काही ना काही यश पदरी पडतेय, असा अनुभव वारंवार येऊ शकतो. त्यामुळे प्रयत्नांची कास सोडू नये. याशिवाय याच आठवड्यात राश्यांतर करून कर्मस्थानात येणारा शुक्र आपणांस महिलावर्गाकडून काही लाभ व विशेष सहकार्य मिळवून देणारा ठरावा. दरम्यान काहींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वाहने सांभाळून चालवावीत. खाण्यापिण्यावर नियंत्रणही हवे.
शुभ दिनांक- २८, ३०, १, ३.
धनू- जोमाने कामास लागा
आपला राशिस्वामी गुरू आणि राशीत असलेला शनी हे दोघेही वक्री असतानाच आपल्या सप्तमस्थानात चंद्र-मंगळाने सुरेख लक्ष्मीयोग साधला आहे. त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर जोमाने उठून कामास लागलेच पाहिजे. व्यवसायात असणार्‍यांना ही संधी विशेष लाभदायक ठरू शकते. आठवड्याच्या मध्यात मात्र विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांनी परस्पर गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली तर यासम दुसरी संधी नाही. दरम्यान, राश्यांतरानंतर पंचमस्थानात येणारा शुक्र आपल्यातील कलाकाराला बळ देणार आहे. आपल्या कलागुणांना वाव मिळू शकेल. त्याचे कौतुक होईल. सोबतच काहींना लॉटरी, शेअरबाजारातील गुंतवणूक वगैरेतून काही लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंद व सहकार्याचे वातावरण राहील. काहींना मात्र उष्णतेचा त्रास संभवतो. त्यामुळे जपायला हवे. शुभ दिनांक- २८, ३१, १, २.
मकर- मेहनत व अडचणींतून वाट
आपला राशिस्वामी शनी आणि भाग्यातून राशीवर शुभदृष्टी ठेवणारा गुरू हे दोघेही वक्री असतानाच आपल्या षष्ठ या कर्मस्थानात चंद्र-मंगळाचा लक्ष्मीकारक योग आठवड्याच्या सुरुवातीला झालेला आहे. याशिवाय योगकारक शुक्रदेखील राश्यांतर करून दशमस्थानाला बघणार आहे. विशेषतः आपल्या कर्माला उजाळा देत व्यवसाय, नोकरी या क्षेत्रात प्रगती घडवून आणण्यास उपयुक्त असा हा काळ ठरू शकतो. त्यासाठी भरपूर मेहनत आणि काही अडचणींचा सामना अतिशय धैर्याने करावा लागेल. ते बळ आपल्याला गुरूकडून मिळत राहील. आवश्यक तेथे ज्येष्ठांचा व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या व आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करीत चला, असेच हे ग्रहयोग सांगताहेत. काही नवी खरेदी, पाहुण्यांचे आगमन आदी घटनांनी कुटुंबातील वातावरण हलके होण्यास मदतच मिळेल.
शुभ दिनांक- २८, २९, ३०, ३१.
कुंभ- सावध पवित्रा हवा
आपला राशिस्वामी शनी वक्री असतानाच आपल्या पंचमस्थानी झालेला चंद्र-मंगळाचा लक्ष्मीकारक योग या आठवड्यात विशेष महत्त्व राखणार असे दिसते. हा लक्ष्मीयोग स्वतः शनीच्या दृष्टीने पुलकित झाला आहे. त्यामुळे चित्रपट, नाट्य, संगीत आदी कलारंजन तसेच शेअर बाजार, सट्टा, लॉटरी अशा निश्‍चिततेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांना या आठवड्यात काही विशेष लाभ पदरी पाडू घेता येऊ शकेल असे दिसते. अष्टमातला वक्री गुरू झटपट लाभासाठी काही वाकडी वाट धरण्याचा मोह घालू शकतो, मात्र त्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण हे मोहाचे वातावरण बरेचदा मृगजळासारखे फसवे असते. त्यामुळे गुंतवणूक करताना पुरेशी काळजी घ्यायला हवी. सावध पवित्रा केव्हाही योग्यच. योगकारक शुक्राच्या राश्यंतरानंतर कार्यक्षेत्रात काही अनुकूल बदल संभवतात. कुटुंबात मंगल कार्यक्रम ठरू शकतात. शुभ दिनांक- २८, २९, १, २.
मीन-अधिकारीवर्गाकडून प्रशंसा
गेले काही आठवडे आपल्या राशीत मुक्काम ठोकून उच्च बनून चंगळ करणारा शुक्र या आठवड्यात राश्यांतर करणार आहे. मात्र, त्याचे धनस्थानात होणारे प्रयाण आणि आपल्या राशीवर कायम असलेली राशिस्वामी गुरूची दृष्टी पाहता याबदलामुळे सध्याच्या परिस्थितीत लगेच काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही. उलट, या आठवड्याच्या सुरुवातीस सुखस्थानात चंद्र-मंगळाने साधलेला लक्ष्मीयोग आपल्याला व्यावसायिक लाभासाठी विशेष उपयुक्त ठरू शकतो. व्यवसायात काही बदल, विस्ताराच्या योजना राबविण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरावा. नोकरीत असणार्‍यांनाही उद्दिष्टपूर्ती केल्यामुळे अधिकारीवर्गाकडून प्रशंसा, कौतुक होताना दिसेल, कुटुंबात आनंदाचे व सहकार्याचे वातावरण राहील. युवावर्गाकडून चांगल्या बातम्या मिळाव्यात. कुटुंबात विवाहादी मंगलमय कार्यक्रम ठरू शकतात. शुभ दिनांक- २८, ३०, ३१, ३.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६