आई भवानी, आमच्या राजाला सांभाळ…!

0
61

रविवारची पत्रे

‘‘या अल्ला, माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला, त्याला बाहेर काढले पाहिजे…’’ म्हणत एक मावळा- इरफान शेख- अपघातग्रस्त हेलिकॉप्टरकडे धावत सुटला. दार उघडून मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले. हेलिकॉप्टरचा स्फोट होईल आणि त्यात आपली आहुती पडेल, ही शंकाही इरफानच्या मनाला शिवली नाही! मृत्यूच्या दारात सर्व मतभेद गळून पडतात- पडले पाहिजेत. यालाच तर ‘माणुसकी’ म्हणतात! आयुष्यभर कॉंग्रेसला विरोध करणारा मी, विलासराव गेले तेव्हा, आर. आर. आबा गेले तेव्हा, बाळासाहेब गेले तेव्हा, प्रमोदजी, गोपीनाथरावजी गेले तेव्हा धाय मोकलून रडलो होतो. अगदी अंतःकरणातून आलेल्या मानवतावादी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या त्या! आज हे प्रथमच सांगण्याचे कारण असे की, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारी दौर्‍यावर असताना दुर्दैवी अपघातातून सहीसलामत बाहेर पडले. भगवंताचे लाख लाख उपकार! मात्र, या घटनेवर प्रसारमाध्यमांमधून काही विकृत प्रतिक्रिया येत आहेत त्या बघून फार वाईट वाटते. ही एक प्रतिक्रिया बघा-
‘महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळता मिळता राहिला…’
केवढा हा विखार, केवढा हा तिरस्कार!
अरे, तुम्हाला फडणवीसांची देहयष्टी आवडत नसेल, त्यांची जात आवडत नसेल, त्यांचे वैदर्भीय असणे आवडत नसेल, त्यांचा पक्ष-परिवार आवडत नसेल, त्यांची धोरणं आवडत नसतील, त्यांना शेतीतले काही कळत नसेल, त्यांना शेतकर्‍यांविषयी तुमच्या इतकी कळकळ नसेल! समजू शकते. परंतु, जिवावर बेतलेल्या प्रसंगातून एक माणूस, त्याचे दैव बलवत्तर म्हणून वाचला, तर त्या घटनेवर इतक्या खालच्या पातळीवरून टिंगल करणारी विकृती आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात निपजावी, याची लाज वाटते. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत, उद्या त्यांना पायउतारही व्हावे लागेल. परंतु, अशा विकृतींना महाराष्ट्रात थारा मिळता कामा नये. यांचे कुणी गॉडफादर असतील, बोलविते धनी असतील तर ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ केले पाहिजे. आई भवानी, आमच्या राजाला सांभाळ…!
सोमनाथ देविदास देशमाने
९९२३५४३४८०

आभासी दुनिया
आपण सकाळी उठतो. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, ट्विटर असे अनेक ऍप्स पाहतो. खुश कसे राहावे, सकारात्मक विचार कसा करावा, स्वस्थ, निरोगी कसे राहावे, काय खावे, किती खावे, पैसे कसे वाचवावे, एक ना दोन, ही यादी कितीतरी लांबविता येईल. या सार्‍या संदेशांच्या भडिमाराने आपल्या दिवसाची सुरुवात होते.
आपण सतत छान, सुंदर, हसतमुख दिसले पाहिजे, असे आपल्या मनावर बिंबविले जाते. आपल्याही नकळत आपण इतरांशी तुलना करू लागतो. आयुष्यातील प्रत्येक घडामोडीला दुसर्‍यांच्या तुलनेत पाहायला लागतो. अरे, हिला फर्स्ट क्लास मिळाला, तो डॉक्टर झाला, तिने संगीतात प्रावीण्य मिळविले, अमकी सुट्या घालवायला परदेशी गेलीय, तमकी किती सुंदर शेलाच्या बांध्याची आहे. यामुळे रोजच्या रोज स्वत:कडून अनेक अवास्तव अपेक्षा वाढविल्या जातात व तणावही वाढतो. रोज एखादा चमत्कार घडायला आपले आयुष्य म्हणजे रोजच्या दूरदर्शन मालिकांचा एपिसोड थोडाच आहे! नाही का?
तुलना करणे मानवी स्वभावाचा एक भागच आहे. मात्र पूर्वीच्या काळी हे सारे कालांतराने कमी होई व जो तो आपापल्या वस्तुस्थितीचा स्वीकार करीत. पण, सोशल मीडियाच्या आत्यंतिक वापराने ही ज्वाला सतत पेटलेली असते.
या ज्ञानगंगेतील माहिती सतत वाचून आपल्या मेंदूतही एक इनबॉक्स तयार होतो. त्यामुळे खूप मोठे चमत्कार घडणार आहेत अशा अपेक्षा निर्माण होतात. आज, आता, ताबडतोबच्या जमान्यात कोणत्याही समस्येवर आपल्याला तत्क्षणी उत्तम तोडगा हवा असतो तोसुद्धा १०० टक्के यशस्वी होणारा!
अशी तुलना करताना आपण स्वत:मधील फक्त वैगुण्य पाहू लागतो व इतरांच्या उत्तमोत्तम गुणांशी आपले वैगुण्य तोलू लागतो. स्वत:ला सतत नापास करायला लागतो. त्यामुळे आजच्या तरुणाईला बरेचदा नैराश्य येते.
सोशल मीडियामध्ये दिसणारे अंतिम चित्र खूप आकर्षक, सर्वंकष व सुंदर असते. पण, हे सारेच एकतर्फी! त्या विशिष्ट स्थानावर पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने किती कठोर परिश्रम केले, संघर्ष केले याबाबत आपण पार अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ‘मी का नाही’ हा विचार आपल्याला त्रास देतो.
य सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे हे निर्विवाद सत्य! मात्र याच्या अतिरेकी वापराने आपल्या सहज सोप्या आयुष्याला पार आभासी बनवून टाकले आहे. एकमेकांना सहज भेटणे, कुणाकडेही कामाशिवाय जाणे हे जवळजवळ संपले आहे. या आभासी बुडबुड्याला यथार्थाची टाचणी टोचली की हा फुटतो आणि एक पोकळी निर्माण करतो आणि हा बेगडीपणा आपल्याला संपूर्णपणे व्यापून टाकतो.
कधीतरी मनाच्या जंगलात मनसोक्त हिंडावे, स्वत:शी संवाद साधावा, मित्रांना समक्ष भेटावे, आप्तस्वकीयांकडे विनाकारण जावे, खळखळून हसावे, मैफिलींचा अड्डा जमवावा, एकमेकांची सुख-दु:खे वाटून घ्यावी, जमेल तशी मदत करावी, घरातील मंडळींवर प्रेम करावे आणि खरेखुरे जगावे! पटतंय् ना?
रश्मी वाघमारे
९९७०१७५२८०

‘नेपथ्य सम्राट’ अदृश्य झाला
संजय काशीकर तुम्ही चटका लावून गेलात. अभय फोनवर बोलत होता, ‘‘आजी, तुम्हाला कळलं का?’’ ‘‘काय?’’ ‘‘संजय दादा गेलेे.’’ ‘‘काय? संजय दादा गेले?’’ मला पुढं काय बोलावं सुचेना. ‘‘अरे, मी इथं आहे पुण्याला मुलीकडे. मी अन्त्यदर्शनालाही येऊ शकणार नाही.’’
मन सुन्न झालं! ऍक्सिडेंट झाला, ऑपरेशन झालं. पण यश आलं नाही. नियतीनं आपला क्रूर डाव साधला. यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाच अचानक झेप घालून क्षणात उचलून नेले. केवढं दुर्दैव!!! इतका उमदा माणूस. उत्साहानं सळसळणारा. केव्हाही, कधीही फोन करा, हा माणूस कुठे ना कुठे तरी बिझी असणारच. नाटकं बसवून देणं, दिग्दर्शन, संगीतयोजना, प्रकाशयोजना आणि नेपथ्य हे तर त्यांचं खास वैशिष्ट्य. नागपुरात सध्याच्या घडीला ‘नंबर वन’वर असलेले नेपथ्यकार म्हणूून प्रसिद्ध असलेले. निर्मितीची, दिग्दर्शनाची, नेपथ्याची अनेक बक्षिसे मिळवलेली, पण अहंकाराचा, गर्वाचा वारा यत्किंचितही लागलेला नाही. कुणालाही मदत करायला, हसतमुखानं सदैव तत्पर. खरोखरच असा माणूस लाखात एकच!
माझे पहिले नाटक ‘मला जगायचं आहे’ अठरा वर्षांपूर्वी, त्यांना संगीत, प्रकाश व नेपथ्य यासाठी स्वाधीन केले. तेव्हापासून त्यांचे अन् माझे सूर पक्के जुळले. गेली दहा वर्षे मी सतत राज्यनाट्य स्पर्धेत माझी नाटके सादर केली. त्यांची नेपथ्याची जबाबदारी संजय यांनी अतिशय आपलेपणाने सांभाळली. कधीही कटकट नाही, चिडचिड नाही. ना श्रमानं, ना पैशानं. पैशासाठी हपापलेलं ते व्यक्तिमत्त्व नव्हतंच. तर निव्वळ ‘नाटक’ हेच ध्येय असलेलं, यासाठीच वाहून घेतलेलं, नाटकासाठी जगणारं ‘नाटकवेडं’ व्यक्तिमत्त्व होतं.
गेल्या वर्षी माझ्या नातीच्या लग्नासाठी मी पुण्यात राहणार होते. पण राज्यनाट्य स्पर्धेत नाटक तर मला करायचंच होतं. नवीन संहिता लिहून तयार होती. संजयना ती वाचायला दिली. त्यांना ती आवडली व कुठलीही कुरकुर न करता, ‘‘तुम्ही बिनधास्त रहा, मी तुमचं नाटक बसवून सादर करतो’’ ही हमी दिली व म्हटल्याप्रमाणे नाटक उत्कृष्ट सादर केले. मी माझेच नाटक बघायला नव्हते. माझा पूर्ण विश्‍वास त्यांच्यावर होता. त्यांनी तो सार्थ केला. मी त्यांची शतश: आभारी आहे. पण आभार तरी कसे मानू? आपलेपणा, जिव्हाळा त्यांच्यात व माझ्यात जो निर्माण झाला होता, त्या निरपेक्ष प्रेमाचा तो अनादर होईल. त्यांच्या ऋणातच राहणे श्रेयस्कर आहे.
माझी व त्यांची शेवटची भेट २ एप्रिलला झाली. टिळकनगर महिला मंडळात मी तुलसीदासांच्या चरित्रावर एक छोटे नाटक बसवले होते. त्यासाठी झोपडी, पिंपळाचा पार असे सुंदर नेपथ्य संजयनी करून दिले. आम्ही मंडळातर्फे त्यांचा कार्यक्रमानंतर कलाकारांसोबत सत्कारही केला. आज माझ्या मनास तेवढेच समाधान वाटले आहे. पण दु:खं याचे आहे की पुन्हा ‘हे’ होणे नाही. माझ्यासारख्याच इतर अनेकांनाही ही उणीव नेहमीच भासत राहील.
असा हा ‘नेपथ्यसम्राट’ रंगभूमीवर अदृश्यपणे वावरणारा नेहमीकरिताच अदृश्य झाला. रंगभूमी उदास झाली, पण रंगमंच मात्र त्यांना कधीही विसरणार नाही, हे नक्की! त्यांची पत्नी मुग्धा व मुलगी अवनी या एकट्या नाहीत. रंगभूमी व रंगमंच सतत त्यांच्या पाठीशी आहे. हा आघात सहन करण्याचे बळ त्यांना प्राप्त होवो! संजयच्या मृतात्म्यास सद्गती मिळो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना! व या ‘नेपथ्यसम्राटास’ सलाम!
सुनंदा सुरेश साठे
नागपूर

अशा या हिंमतबाज भगिनी
अमरावतीच्या सर्वपरिचित समाजसेवी व लेखिका श्रीमती संजीवनी भोगावकर यांनी मरणोपरान्त देहदानाचा संकल्प केल्याची बातमी दैनिक हिंदुस्थानमध्ये वाचनात आली. मी त्यांना लगेच फोन केला. त्यांचे अभिनंदन केले. त्यांना काही प्रश्‍नही केले. लोकांना नेत्रदान आता नवे राहिले नाही; परंतु देहदानासाठी अजूनही कुणी तयार होत नाही. हजारात एखादा माणूस ही हिंमत दाखवितो. त्यालाही स्वत:ची तयारी असली तरी कुटुंबातील व्यक्तींची परवानगी सहसा मिळत नाही. पुरुषाच्या बाबतीत हे कधी शक्यही आहे; परंतु एका स्त्रीने हा अत्यंत कठीण संकल्प करावा ही अत्यंत धाडसाची बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे संजीवनी ताईंना यासाठी त्यांचे पतीसह मुलंबाळं, लेकीसुना, सर्वांनीच परवानगी दिली. ताईससुद्धा जमेल ती सेवा आनंदानं व अत्यंत साधेपणानं पार पाडतात. एवढे करूनही त्यांना कुठलाही गर्व, अभिमान नाही. तरीही आपली जीवनयात्रा संपल्यावरसुद्धा आपला देह कुणाच्या तरी कामी यावा अशा उदात्त विचारातून घेतलेला निर्णय अनेकांना प्रेरणा देईल यात शंका नाही. संजीवनी ताई आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझे त्रिवार वंदन.
अमरावतीच्या सुप्रसिद्ध टोंगसे ऍण्ड पाटील डेव्हलपर्सच्या संचालिका कुमारी सीमा पाटील यांच्या ८४ वर्षीय मातोश्रीचे पंधरा दिवसांपूर्वी दु:खद निधन झाले. सीमाताईंचे वडील उद्धवराव पाटील अमरावती जिल्हा परिषदेचे फार वर्षांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या पश्‍चात त्यांना तीन मुली या सर्व उच्चशिक्षित आहेत. एक मुलगाही आहे परंतु तो वेगळ्या गावी आहे. त्यामुळे धाकट्या सीमाने (ही इंजिनीअर आहे) स्वत: लग्न न करता शेवटपर्यंत आईचे पालनपोषण केले. अन्त्यविधीला मुुलगा आला नाही. त्यामुळे या तीन बहिणींनी आईच्या शवाला खांदा दिला. सीमानं आकटं धरून भडाग्नी दिला. कोणताही अन्त्यविधी पुरुषाच्या हाताने होत असतो, पण सीमाताई आणि त्यांच्या भगिनींनी ही पारंपरिक व्यवस्था दूर सारून एक नवा पायंडा पाडला व आदर्श निर्माण केला. साधारणत: तीन-चार वर्षांपूर्वी माझे सुपरिचित मोर्शीचे शिवाजी कन्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुुळे गुरुजींच्या तीन मुलींनीसुद्धा आईचा अन्त्यविधी असाच पार पाडला होता. या गोष्टीला आजच्या विज्ञानयुगातही समाज विरोध करतो. तरीही समाजाची पर्वा न करता या कुटुंबीयांनी धाडस दाखविले. खरंतर स्त्री-पुरुष दोन्ही देवाचीच निर्मिती. मग त्यात भेदभाव कसा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत सांगतात-
‘काय देवे देवता भिन्न केल्या| ऋषिपत्न्या नव्हत्या सांभाळील्या
काय महिलात साध्वी नाही झाल्या| पहा पुराणी मागच्या’
‘काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद?
काय नाही केला ब्रह्मवाद
नाना विद्याकला-भेद| यात प्रवीण कितीतरी’
‘माझे म्हणणे श्रोतयाते| जे जे सुख असेल पुरुषांते
महिलांसीही असावे अभिन्नपणे ते| स्वातंत्र्य सुखसाधन’
कु. सीमाताई, त्यांचे कुटुंब व आप्तस्वकीय तसेच त्यांना सतत प्रोत्साहन व प्रेरणा देणारे टोंगसे सर या सर्वांना शत्‌शत् प्रणाम.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६