कामाने झपाटलेली तीन वर्षे!

0
133

दिल्ली दिनांक
••पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले जात असतानाच, त्यांच्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत जाणून घेण्याची एक उत्सुकता सर्वांना होती. यात सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा पहिला क्रमांक आहे, दुसरा क्रमांक ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांचा आहे. यावरून निघणारा एक निष्कर्ष म्हणजे, आपल्या कामावर तुमचे प्रेम असेल, तर तुम्ही त्यात स्वत:ला झोकून देता आणि त्याचे सुपरिणाम आपोआप समोर येतात…
The woods are lovely,
dark and deep.
But i have promises to keep, And miles to go before i sleep, And miles to go before i sleep…
अमेरिकन कवी रॉबर्ट फॉस्टच्या या ओळी, देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलावर लिहून ठेवण्यात आल्या होत्या. देशाच्या कामासाठी आपल्याला प्रेरणा मिळत राहावी, अशी उदात्त भूमिका यामागे असावी. मात्र, अशी सुभाषिते केवळ दाखविण्यासाठी नसतात, तर प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी असतात. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा ताळेबंद जनतेसमोर मांडला जाईल. काहींना तो मान्य होईल, काहींना तो मान्य होणार नाही. एक बाब मात्र मान्य केली जाते, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रॉबर्ट फॉस्टच्या या ओळी प्रत्यक्षात साकारणार्‍यांपैकी आहेत. तीन वर्षांपूर्वी जनतेने मोदी यांना प्रचंड जनादेश दिला. त्या जनादेशाचे स्मरण मोदी यांना आहे. जनतेने आपल्याला देशाला भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी, विकासासाठी जनादेश दिला, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. या जाणिवेतून त्यांचा प्रत्येक दिवस सुरू होतो व मावळतो. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता आपल्याला करावयाची आहे, याचे स्मरण करीतच ते झोपी जात असावेत.
कॉंग्रेसचीही पावती!
व्यक्तीची ओळख जशी त्याच्याभोवती असणार्‍या मित्रांवरून होते, तशीच त्याला असणार्‍या शत्रूंवरूनही होते. राजकारणात शत्रू हा शब्द वापरला जात नाही, त्याला राजकीय प्रतिस्पर्धी असे नाव दिले जाते. मोदी सरकार तीन वर्षांचा ताळेबंद मांडीत असताना, कॉंग्रेसने शुक्रवारपासून देशभरात सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडणे सुरू केले आहे. विरोधी पक्षाचा हा अधिकार आहे आणि ते त्यांचे कामही आहे. कॉंग्रेसने चार मुद्यांवर आपली सरकारविरोधी भूमिका मांडण्याचे ठरविले आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे भ्रष्टाचार! देशात अद्यापही भ्रष्टाचार सुरू आहे, असा कॉंग्रेसचा दावा आहे. मात्र, हा दावा करताना राज्याराज्यांतील भ्रष्टाचाराचा दाखला दिला जात आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप कॉंगेे्रसकडून केला जात आहे. पण, तीन वर्षे तर मोदी सरकारला पूर्ण होत आहेत. मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे काय? कॉंग्रेसचा एक नेता म्हणाला, नाही! आमचा तसा आरोपही नाही. कॉंग्रेसने मोदी सरकारबद्दल ही प्रतिक्रिया द्यावी, ही या सरकारची खरी उपलब्धी आहे. मोदी सरकार भ्रष्टाचारी नाही, असे सरकार म्हणणार व भाजपाही म्हणणार. मात्र, त्याला विश्‍वसनीयता लाभते ती कॉंगेे्रस नेत्याच्या या स्वीकारोक्तीमुळे!
दुसरा आरोप
कॉंग्रेसचा दुसरा आरोप आहे तो रोजगारनिर्मिती व ढासळत्या अर्थव्यवस्थेचा. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था सांभाळण्यात त्यांना यश आले आहे. अर्थव्यवस्थेत काही आमूलाग्र बदल करणे त्यांनी सुरू केले आहे. देशात आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळापत्रकात बदल घडवून आणला. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे ‘एक देश एक कर’ ही संकल्पना राबविण्यासाठी ‘जीएसटी गूडस् सर्व्हिस टॅक्स’ लागू करण्यात येत आहे. कर सुधारणांच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. रोजगारनिर्मितीच्या बाबतीत सरकारला उपाययोजना करावी लागेल, हे मात्र खरे! युवावर्गासाठी रोजगार हा एक महत्त्वाचा व ज्वलंत प्रश्‍न आहे. बेरोजगारी ही एक जागतिक समस्या आहे. मोदी सरकारला ही समस्या तातडीने हाताळावी लागेल.
दुसरा आरोप
देशाला पूर्णकालीन सरंक्षणमंत्री नाही, असा कॉंग्रेसचा दुसरा आरोप आहे. पाकिस्तान सीमेवर गंभीर घटना घडत असताना देशाला पूर्णकालीन सरंक्षणमंत्री नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसकडून केले जाणार आहे. कॉंग्रेसच्या या आरोपात फार तथ्य नाही. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मनोहर पर्रीकर यांच्या रूपात देशाला एक स्वच्छ संरक्षणमंत्री मिळाला होता. मात्र, गोव्यातील राजकीय स्थिती पाहता त्यांना गोव्यात परतावे लागले. त्यानंतर अरुण जेटली यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संरक्षणमंत्री कुणीही असला, तरी शेवटी या खात्याचे महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानच घेत असतात. मोदी यांचे पाकिस्तान स्थितीवर पूर्ण लक्ष आहे. प्रत्यक्ष घटनाक्रम लष्करप्रमुख हाताळीत असतात. देशाला जनरल बिपिन रावत यांच्या स्वरूपात एक अतिशय धाडसी सेनापती मिळाला आहे. जनरल रावत यांचे वैशिष्ट्य म्हणजे वडिलांकडून मिळालेली भगवद्गीता हे त्यांचे प्रेेरणास्थान आहे. आणि भगवद्गीता प्रेरणास्थान असणारी व्यक्ती कशी असते, हे सांगण्याची गरज नाही. जनरल रावत यांच्या कार्यशैलीची चुणूक त्यांच्या एका लहानशा निर्णयाने मिळाली. काश्मीरमध्ये मेजर नितीन गोगोई या अधिकार्‍याने आपल्या जीपच्या बोनेटवर एका काश्मिरी युवकाला बांधले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले. मेजर गोगोई यांच्या विरोधात चौकशीचा आदेश देण्यात आला. या सार्‍या पाशर्वभूमीवर जनरल रावत यांनी मेजर गोगोई यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला. शेवटी सीमेवर काय करावयाचे, याचा निर्णय स्थानिक अधिकारी घेत असतात. जनरल रावत हे पाकिस्तानला पुरून उरणार्‍यांपैकी आहेत. मेजर गोगोई यांना पुरस्कृत करून त्यांनी आपली दिशा दाखवून दिली आहे. कारगिल युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजावणारे वायुदलप्रमुख धानुआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकार्‍यांना पत्र पाठवून कोणत्याही कामगिरीसाठी सर्वांनी सज्ज राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. अशा स्थितीत देशाला पूर्णकालीन संरक्षणमंत्री आहे की नाही, या बाबी फार तांत्रिक ठरतात. लष्कर, वायुदल, नौदल या तिन्ही दलांचे प्रमुख कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असताना आणि पंतप्रधानांचे सार्‍या स्थितीवर पूर्ण लक्ष असताना वेगळा संरक्षणमंत्री असणे वा नसणे, याचा परिणाम होण्याची शक्यता नसते.
मोदींचे मंत्री
मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त करून एका वृत्तवाहिनीने मंत्र्यांच्या कामकाजाची चाचणी घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले जात असतानाच, त्यांच्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत जाणून घेण्याची एक उत्सुकता सर्वांना होती. यात सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा पहिला क्रमांक आहे, दुसरा क्रमांक ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांचा आहे. यावरून निघणारा एक निष्कर्ष म्हणजे, आपल्या कामावर तुमचे प्रेम असेल तर तुम्ही त्यात स्वत:ला झोकून देता आणि त्याचे सुपरिणाम आपोआप समोर येतात. त्यासाठी कोणतेही मीडिया मॅनेजमेंट करण्याची गरज नसते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी पहिल्या पाच कार्यक्षम मंत्र्यांमध्ये स्थान मिळविणे, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. दुसरीकडे गंगा शुद्धीकरण, पर्यटन, कौशल्य विकास या मंत्र्यांच्या कामाबद्दल समोर आलेली माहिती मात्र निराशाजनक आहे. त्यातही गंगा शुद्धीकरण व पर्यटन ही दोन्ही मंत्रालये फार महत्त्वाची मानली जातात. कौशल्य विकास मंत्रालय रोजगारनिर्मितीशी संबंधित मानले जाते. त्यातही फार प्रगती झाली नसल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान व त्यांचे सहकारी देशाच्या विकासाच्या ध्यासाने झपाटले असल्याचे चित्र सध्या दिसून येते. पंतप्रधान स्वत: यात पुढाकार घेत आहेतच आणि त्यांना बळ देत आहेत त्यांचे कार्यक्षम मंत्री!
– रवींद्र दाणी