वेदनांचा आक्रोश

0
91

एकदा ब्रह्मदेवाकडे स्वप्न व सत्य यांच्यापैकी श्रेष्ठ कोण म्हणून लवाद मागण्यास गेले. ब्रह्मदेवाने एक साधी अट घातली की, प्रत्येकाचे पाय भूमीवर टेकले पाहिजे व हात स्वर्गात पोहोचले पाहिजे. सत्याचे पाय टेकले, पण हात पोहोचेनात तर स्वप्नाचे हात पोहोचले तर पाय जमिनीवर टेकेनात.
जागतिक स्तरावर महिलादिन केल्याने स्त्रियांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. एकतर स्वत: तिने ठरविले तरच. तिचे सबलीकरण खर्‍या अर्थाने व्हायला पाहिजे व यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त स्त्रियांवर होणारे अत्याचार हे स्त्रियांकडूनच होतात. लिहायला पण लाज वाटते की, सुशिक्षित म्हणवणार्‍या स्त्रियासुद्धा स्वत:चे वैचारिक जोपासू शकत नाही. ही भारत देशाची खंत म्हटली पाहिजे. ‘स्त्री’ स्त्रीवर अत्याचार करते ही खेदाची गोष्ट आहे. ही ‘स्त्री’ कुणाची माता, भगिनी, आत्या, काकू, मामी अशा कितीतरी नात्यांनी महान ठरते, पण ती आपली बुद्धी मात्र नाते सांभाळताना गहाण ठेवते. मी तर म्हणेन की, एक वेळ एखादा पुरुषसुद्धा एखाद्या स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, पण ‘स्त्री’ मात्र स्त्रीला समजून घेत नाही, असा माझ्या पाहण्यातील अनुभव आहे. समाज त्रास देतो, असे करतो… समाज म्हणजे कोण आपणच ना! मानसिकताच इतकी कुजलेली आहे. ज्या मनातच विचारधारा तुटलेल्या, भंगलेल्या, जंगलेल्या आहेत त्या मनाला कीड लागणारच. या स्त्रिया समाज, कुटुंब यासाठी काही करू शकत नाही. समाजातील काही स्त्रियांचा एक भाग असाही आहे, फक्त प्रत्येक गोष्टीला अपवाद असल्याने काहीच स्त्रिया सुजाण, वैचारिक, नीतिमत्ता, पतिव्रता, सत्य आलोचनांचा विचार करणार्‍या, जातीपाती मानणार्‍या, समजून घेणार्‍या अपवादात्मकच दिसतील. उदाहरण बघा- सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय, अपवाद आहे पण अत्याचारी जास्त. आज मानसिकतेचाही अत्याचार होतो. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी खरेतर नारीशक्तीला मानले आहे. एक स्त्री सुधारली तर एक कुटुंब सुधारू शकते ही मानसिकता फोल बनवून टाकलेली आहे. स्त्रीनेच स्त्रीचे विद्रुपीकरण केले आहे. अगदी दूरदर्शनच्यासुद्धा मालिका बघताना स्त्रियांच्या भूमिकांचं अवलोकन जर केले ना तरी आपल्या लक्षात येईल की, स्त्रिया स्त्रियांचे शोषण कसे करतात.
मातृत्वासाठी आतुरलेल्या स्त्रिया, आई होण्याचे सौख्य त्यांनाही हवंच असतं ना! पण दिवस राहिले तर लवकरच राहिले बाई, नाही राहिले तर वांझ आहे असे बिरुद कोण देतात, स्त्रियाच ना! मातृत्वातच स्त्रीच्या जीवनाची पूर्तता असते व निसर्गाने प्रत्येक स्त्रीचं मन हे आईचे घडविले आहे, पण त्यामध्ये एकही स्त्री स्त्रीला बोलल्यावाचून राहात नाही. परित्यक्ता म्हणून असणार्‍या स्त्रिया निंदेचे आघात सहन करतात. पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. टोमणे मारणे हेही काम स्त्रियाच करतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा त्यामुळे घराला वारसदार हवाच हा अट्‌टाहास आजही आहे. कन्याभ्रूणहत्येला पेव फुटलेले आहे. त्यातून काय काय सहन करावे लागते. परिस्थिती बदलली का माणसे बदलतात. आपले परके सीमा स्पष्ट होतात. त्यात स्त्रियाही असतातच ना! त्या पण बदलतात.
नदी थोर की समुद्र? नदी स्वत:ला समुद्रात मिसळून टाकते ना! समुद्र तिला पोटात घेतो. सर्वांची सुख-दु:खं सामावतो, आर्तता दाखवतो.
खरे, कशी असावी स्त्री स्त्रीला साहाय्यभूत…
प्रत्येकाचे जीवन विशिष्ट गुणधर्माचे आहे. एकमेकांच्या जीवन विकासासाठी साहाय्य करावे. वेलीने वृक्षाला मिठी मारली तर वेलीला झाडाचा मोहर येणार नाही. वेलीला वेलीचीच फुले येणार आणि त्यातच गोडी, पण असे होत नाही. वाभाडे व निंदा या दोनच गोष्टी सार्थ ठरवितात. खरे लज्जास्पदच. मातृत्वाचं वरदान लाभलेली दुसर्‍या स्त्रीच्या मातृत्वाचा हसा उडविते. पुरुष स्त्रीची निंदा कमी करतो, पण स्त्री स्त्रीची निंदा करते. पोटात पचतच नाही म्हणे. काही काळात याचे मर्म असेलही, पण आज मात्र वर्मच जाणवते. माझ्या शिक्षणाचा या तर्‍हेने उपयोग होत असेल तर का सुज्ञ म्हणावे. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीचा अत्याचार थांबवला असेल तरच ती सुज्ञ. नुसते नावे ठेवून स्त्री सबला ठरत नाही. कधी अत्याचारी विरुद पुरुषाला लागतं, पण स्त्री असूनही तीच स्त्रीवर अत्याचार करते. कपडे बदलल्याने चांगुलपणा सिद्ध होत नाही. तो डोक्यात, मनात, स्वभावात अन् मग वागण्यात असावा लागतो. काही स्त्रिया महत्त्वाच्या अन् समजून घेणार्‍या, पण काही घातकच. काही वाईट कामातही स्त्रीचा सहभाग व तिचा वापर होतो. स्त्रीच्या माध्यमातून हे होते व ती ते करते. समाजाच्या जडणघडणीत मातृत्वशक्ती लाभलेली, घर सांभाळणारी स्त्री असे कार्य करत असेल. ज्ञान विस्तृत करण्याची गरज आहे. स्त्रीने स्त्रीचे शोषण थांबवले पाहिजे नव्हे, मानसिकता बदलण्याची गरज आहे. विचारांची देवाणघेवाण करा. समजून घ्या. खोट्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका. बोलण्यात तळमळ, कळकळ असावी. खरे तर म्हणतात ना, जाळावाचून कड नाही व मायेवाचून रड नाही. विचाराची उंची आचाराच्या उंचीवर अवलंबून असते. ज्यांनी कर्तृत्व गाजवले अशा स्त्रियांच्या साहित्याचा अभ्यास केला तर आपणही कुठे जाऊन पोहोचू शकतो. कोणाच्या वेदना कमी करता येईल तर प्रयत्न करा. समाजरचनेत गरजू स्त्रियांना काही मदत करावीशी वाटत असेल तर कोणाची वेदना मात्र वाढवू नका. सद्गुण हा सुवर्णमध्य साधण्यात असतो, असे ऍरिस्टॉटल म्हणतो. विवेक व विचार यात समतोल साधावा. वागण्यातही समतोल साधला तर मानसिक स्वास्थ्य ठीक राहते.
एकदा ब्रह्मदेवाकडे स्वप्न व सत्य यांच्यापैकी श्रेष्ठ कोण म्हणून लवाद मागण्यास गेले. ब्रह्मदेवाने एक साधी अट घातली की, प्रत्येकाचे पाय भूमीवर टेकले पाहिजे व हात स्वर्गात पोहोचले पाहिजे. सत्याचे पाय टेकले, पण हात पोहोचेनात तर स्वप्नाचे हात पोहोचले तर पाय जमिनीवर टेकेनात. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही एकमेकांना पूरक व पोषक आहात. भांडू नका. इंद्रिय, मन, बुद्धी व आत्मा या सर्वांचे महत्त्व ओळखून जीवनात जागा देणे व आपापल्या जागेवर ठेवणे म्हणजे प्रत्येकाचे दु:ख समजले जाईल व वेदनेचा आक्रोश कमी होईल.

समाजाच्या जडणघडणीत स्त्री ही अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती, परंतु तिचे महत्त्व फार कमी केले जाते. म्हणतात तर सगळे ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र देवता: रमन्ते’| ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशा केवळ लिहिल्याने, म्हटल्याने स्त्रियांचे महत्त्व वाढणार आहे का?
– डॉ. कल्पना पांडे
९८२२९५२१७७