स्त्री स्वतंत्र झाली का?

0
109

आजही रोज स्त्रीवर अन्याय झालेला आपण वर्तमानपत्रातून वाचतो. कधी-कधी स्त्रियांचा शारीरिक, मानसिक छळ केला जातो. आज समाज प्रगत झाला असतानाही हुंड्यासाठी मुलीचा छळ केला जातो व जीवही जातो. समाजातील ही परिस्थिती निदान आतातरी बदलली पाहिजे. त्याशिवाय आपली प्रगतीकडे वाटचाल अशक्य आहे.
आपल्या देशात अनेक थोर पुरुष होऊन गेलेत. त्यांनी स्त्री जातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली. परंतु आजसुद्धा विचार केला तर स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झाली का? असे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण अनेकदा म्हणतो की ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ तसेच ‘एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती शिकली पण एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिक्षित होते या सर्व बाबीचा मागोवा घेतला तर असे दिसून येते की, स्त्री ही काही प्रमाणात स्वतंत्र झालेली दिसते. परंतु पूर्णपणे स्त्री स्वतंत्र झाली नाही. कारण ऐतिहासीक काळापासून तर आजपर्यंत पुरुषाचेच वर्चस्व स्त्रीवर असल्याचे जाणवते. त्याला कारणसुद्धा तेवढेच आहे. आई-वडील मुलगी जन्माला आली की देणेकरी जन्माला आली, असे म्हणून स्त्री जातीची अवहेलना केली जाते.
स्त्री एक मानव आहे, तिला भावना आहे, या सर्व गोष्टीवर आताही काही ठिकाणी पाणी फेरले गेले आहे. आज सर्वांच्या तोंडून एकच उद्गार निघतात की, स्त्री ही पुरुषाच्या खंाद्याला खांदा लावून काम करू शकते. स्त्रीला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे, परंतु प्रत्यक्ष असे निदर्शनास येते की याचे उत्तर होय किंवा नाही, कारण आज एकीकडे पाहिले तर स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली दिसून येत आहे. डॉक्टर, प्राध्यापिका, पायलट, राष्ट्रपतीपर्यंत स्त्रीने मजल मारली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर मुलापेक्षा मुलींचा पहिला क्रमांक असतो. परंतु दुसर्‍या दुसरीकडे पाहिले तर स्त्रीवर अन्याय झालेला रोज आपण वर्तमानपत्रातून बघतो. कधी-कधी स्त्रियांचा शारिरीक, मानसिक छळ केला जातो. हुंड्यासाठी मुलीचा छळ केला जातो व जीवही जातो. तरीही ती आईबाबंाना सांगते की मी सुखी आहे. याला काय म्हणावे, यावर विचार करणे ही काळाची गरज आहे. आज गर्भातील मुलगी जन्म घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांना जन्म घेऊ देण्यासाठी विनंती करते. परंतु तेथे सुद्धा तिला मारले जाते. लहान वयात मुलीचे रक्षण, संगोपण आई-वडील करतात. लग्नानंतर पती रक्षण करतो व म्हातारपणात मुलगा आश्रय देतो. म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य नाही का? जोपर्यंत समाज स्त्रीवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात लढायला तयार होत नाही, तोपर्यंत स्त्रीवर अन्याय, अत्याचार होतच राहील. आज पुरुषांसोबत काम करताना स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन संशयात्मक दिसून येतो. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्रियांना पुढे आणण्यात मोलाचे योगदान आहे व त्यांच्यामुळे स्त्री प्रगतीपथाकडे वळत आहे. परंतु तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आजसुद्धा विचार केला जात नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. स्त्रीला घरचे व बाहेरचे काम सांभाळावे लागते. पण सहानुभूतीचा दृष्टिकोन निर्माण होताना दिसत नाही. काळानुसार समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आज गरज आहे व हे जेव्हा कृतीत उतरेल, तेव्हाच स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणता येईल.
– दिलीप मा. केने/९४२३४१०४७९