उन्हवेडी झाडे

0
126

तळपत्या उन्हात रसरशीत टवटवी कशी टिकवता येत असेल झाडांना? हिरव्यागर्द पानांनी, विविध रंगाच्या फुलांनी लदबदून आलेली झाडं उन्हानं थकलेल्या मनाला गारवा तर देतातच, पण मानवाला मनातली कलुषितं दूर करायला तर सांगत नसावीत ती? फाल्गुन, चैत्र अन् वैशाख या उष्णकालीन त्रैमासाच्या ओटीत आपली नानाविध रंगगंधांच्या फुलांची रसरशीत फळांची ओंजळ उधळीत वसंत येते. स्थिरावतो. नांदतो सुखेनैव. मानवमात्राच्या उन्मादक वृत्तींना आव्हान देत त्यांना सृजनासाठी चेतवणारे पर्व म्हणजे वसंत. सार्‍या पक्षी-प्राण्यांमध्ये प्रेमाचे गहिवर दाटून येण्याची तजवीज म्हणून की काय तो नटतो अन् सजीवसृष्टीत चैतन्याची कारंजी उडू लागते.
सकाळीच दुपार ऊन तापू लागतं. दिवस मोेठे होतात. घराबाहेर पडावंसं वाटू नये इतका दाह. अशा उष्णपर्वात काही झाडं मात्र नखशिखान्त फुलून आली आहेत. उन्हापासून जीव लपवावासा वाटणार्‍या दिवसात झाडं नव्या नव्हाळीन सजू आली आहेत. शिरीष, बहावा, तामण, करंज, गुलमोहोर, गुलतुरा, सोनमोहोर, कडुनिंब, अशोक, सप्तपर्णी, अगदी दारचा चाफा, बदामसुद्धा. सूर्याचे प्रखर तेज शोषून हिरवी छाया देणार्‍या या झाडांमध्ये कुठून येत असेल एवढी ओल? तळपत्या उन्हात रसरशीत टवटवी कशी टिकवता येत असेल झाडांना? हिरव्यागर्द पानांनी, विविध रंगाच्या फुलांनी लदबदून आलेली झाडं उन्हानं थकलेल्या मनाला गारवा तर देतातच, पण मानवाला मनातली कलुषितं दूर करायला तर सांगत नसावीत ती?
फाल्गुन, चैत्र अन् वैशाख या उष्णकालीन त्रैमासाच्या ओटीत आपली नानाविध रंगगंधांच्या फुलांची रसरशीत फळांची ओंजळ उधळीत वसंत येते. स्थिरावतो. नांदतो सुखेनैव. मानवमात्राच्या उन्मादक वृत्तींना आव्हान देत त्यांना सृजनासाठी चेतवणारे पर्व म्हणजे वसंत. सार्‍या पक्षी-प्राण्यांमध्ये प्रेमाचे गहिवर दाटून येण्याची तजवीज म्हणून की काय तो नटतो अन् सजीवसृष्टीत चैतन्याची कारंजी उडू लागते.
फाल्गुनात रानभर रस्तोरस्ती केशरी-लाल पताका फडकवणारे पळसपांगारे उर्वरित बहर सांभाळण्यात अजूनही गढून गेलेले असले, तरी काटेसावरीची लाल मखमली पर्णमाया आता लुप्त झाली आहे. निष्पर्ण दिसू लागलेली काटेसावर आपले क्षणकाळचे वैभव उधळून कृतार्थ झाली असली, तरी वसंतसाठी तिचं इतकं उत्कटून येणं आपल्याही जिवाला खचीतच चटका लावून जातं.
तिनेक आठवड्यांपूर्वी निवडणूक कार्यातल्या सहभाग प्रशिक्षणासाठी उमरेडला जाणं झालं. नव्या कामाच्या ओझ्यानं तणाव आलेल्या मनाला प्रफुल्लित करण्याचं काम नागपूर-उमरेड मार्गावरील पळसपांगार्‍यांनी फारच निष्ठेनं केलं. रस्त्याच्या दुतर्फा फुलून आलेल्या या लाल-केशरी पुष्पअंगार्‍याने डोळ्यांचं पारणं फेडलं. चक्रीघाटाजवळील काय तो अप्रतिम नजराणा! छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपलं अस्तित्व पणाला लावताना कुणीच जराही कसूर ठेवली नाही.
वसंताचं वैभव असलेलं केशरबन चैत्रापासून कोमेजायला लागतं. हीच झाडं वैशाखातल्या तप्त उन्हापुढे नतमस्तक होऊन बहराचे अवशेष आठवत नव्या पालवीचं स्वागत करण्यात लगेचच गुंतून जातात.
चैत्रात वसंत ऐन मध्यात येतो. झाडांवर नवी कोवळी लाल तुकतुकीत पालवी रुणझुणू लागते. शिशिराने ओरबाडून नेलेल्या पानांच्या जखमा विस्मरून नवचैतन्याच्या स्वागताला झाडं उत्सुक असतात. कोवळी पालवी धरू लागल्यापासून हिरव्यागर्द पानात परिवर्तित होतानाचे झाडांचे विभ्रम न्याहाळणे निसर्गप्रेमींसाठी खरे तर अलौकिक सोहळाच असतो.
चौकातल्या रोजच्या थांब्यावरचा भलामोठा पिंपळवृक्ष माझ्या प्रवास क्षणांचा साक्षीदार. त्याच्याही रडण्याकुढण्याच्या, हसण्याफुलण्याच्या अवस्थांमध्ये मी असते सोबत. चैत्राची सुरुवात झाली नि लालसर-तांबूस कोवळ्या, लुसलुशीत पालवीनं त्याला चौफेर वेढून घेतलं. पहाटउन्हाची किरणं पडली की, रेमशी चमकदार पानं सळसळताना अधिकच सुंदर दिसू लागायची. या पानांची रचनाच फार वेगळी. टोकाशी निमुळत्या पानातून मुलायम हिरवा तंतू लोंबतोय जणू. म्हणून की, मन सैरभैर व्हावं. आतल्या कप्प्यात दडलेल्या हळव्या आठवांचं स्मरण होऊन थरथरू लागतं, आतल्या आत आपल्याही स्वप्नांचं हळवं पिंपळपान!
कोकीळकंठातून, झुळझुळ वाहणार्‍या, कधी वावटळ झालेल्या वार्‍याच्या नादलयीतून वसंत चैत्राच्या हृदयात घर करून बसतो नि आपणही वसंताच्या उत्साहात आपल्या संवेदनशील वृत्तीनं हवं तसं गुरफटत जातो. महात्म्यांच्या जयंतिसोहळ्याच्या निमित्ताने जनसमूहांच्या उत्साहाला प्रचंड उधाण येतं. आपल्यात खोलवर रुजलेल्या संस्कृतीला जपण्याचा माणूससापेक्ष प्रयत्न केला जातो.
वसंतात वाटा भुरळ घालतात, दमवतात, व्याकुळ करतात अन् फसवतातही. त्यांनी तसं ठरवलं शीण हलका करण्याचं की, मग कुठल्याही वाटेनं गेलं तरी हरेक वाट रंगगंधाने मोहरून आलेली, घनगर्द पालवीने गहिवरून आलेली असते. सावली देण्याचं अखंड व्रत नि रस्ताभर पुरेल इतकं लावण्य म्हणूनच की काय तामण अन् बहावा भेटतात ते शहरातच.
उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच कळाहीन तामण वसंतात एकदम कात टाकते. चैत्रापासून ती नजरेत भरू लागते. जांभळ्या, गुलाबी रंगाच्या सुंदर झुपक्यांनी नटून येत ती बघणार्‍यांचं चित्त आकर्षित करते. हिरवी पोपटीसर लांबुडकी पानंसुद्धा नजरेला टवटवी देतात. जसजशी उन्हं चढू लागतात तसतसा तिचा चेहरा अधिक उजळू लागतो. शिरीषाचंही तसंच! शिशिरात अगदी अजागळ आणि बेसूर दिसतं त्याचं रूपडं. एकेका फांदीची पानं गळल्यावर काड्यांचाही झाडाखाली नुसता सडा पडलेला दिसतो. नवे वस्त्र परिधान करावे तशी नाजूक कोवळी लव फाल्गुनपासून त्याच्या अंगाखांद्यावर झुलू लागते. वाढत्या तापमानाला तोंड देताना जीव हैराण व्हावा. उकाड्यानं जिवाची लाहीलाही होतेय् नि शिरीषाच्या कंच हिरव्या फांद्यांवर नाजूक गुलाबी केसराची चिमुकली कळ्या-फुलं मोठ्या दिमाखानं डोलू लागतात. परीक्षा संपली. मुलांना सुटी लागल्याने सुन्या सुन्या वाटणार्‍या महाविद्यालयाच्या प्रांगणातला हा सखासोबती मनाला दिलासा देत राहतो.
चैत्र संपून वैशाख आला. वसंतवैभवाला पूर्णत्व देणारा हा महिना. चैत्रातले अबोल गुलमोहर लाल-पिपळ्या, केशरी-लाल गुच्छांनी फांदोफांदी सजून आले. लांबच लांब गुच्छाच्या टोकांवर उमललेली विविध रंगच्छटांची फुलं अन् मागील अर्ध्या गुच्छात घट्ट मिटलेल्या गोल गोल हिरव्याकंच कळ्या गुलमोहराचा हा बाज हिरव्यागर्द कातर पानांच्या पार्श्‍वभूमीवर असा काही खुलून दिसतो की, बघत राहावंसं वाटतं त्याच्याकडे. उन्हाने झालेली जिवाची काहिली क्षणभर निवावी. वस्तीत, गावात, शहरात, रानावनात कुठेही भेटतो गुलमोहोर. पण, बहाव्याचं तसं नाही. इतर झाडांच्या तुलनेत ती कमीच दिसतात. पिवळ्या फुलांचे प्रचंड घोसच्या घोस झाडभर लटकताहेत. अंडाकृती कळ्या, पिवळ्याजर्द रंगाची मखमली काया असलेली निर्गंध फुले असं वैभव अंगभर गोंदवून डौलात मिरवणार्‍या बहाव्याचा हेवा वाटावा इतर झाडांना, इतकं अप्रतिम देखणेपण दोन हातांच्या मिठीत मावणार नाहीत इतके मोठाले घोस खाली लोंबताना पाहिले की, राजाच्या दिवाणखाण्यात सजलेल्या झुंबराचा रुबाबही त्याच्यापुढे फिका पडावा!
सर्वात प्रथम वसंताचं स्वागत करणारी कडुनिंबाची झाडं कधीचीच तारकापुंजांनी लदबदून आली आहेत. उन्हाचा दाह शोषून पांथस्थाला दाट हिरवीगार छाया देण्यासाठी कुठेही बहुसंख्येने आपला पदर पांघरून ती सेवेत सज्ज असतात सदैव. सारा आसमंत सुगंधित करणार्‍या तारकापुष्पांमधून आता निंबोळ्या डोकावू लागल्या आहेत. निर्माल्य होऊन मातीत मिसळताना ही नाजूक चांदणफुलं इमान राखून असतात मातीशी.
करंजाची पोपटी-हिरवट पानांनी दाटून आलेली झाडं ऐन वैशाखात झगमगू लागतात. एरवी कुणाचं फारसं लक्षही जाणार नाही त्यांच्याकडे इतकं सामान्य रूप नाजूकसर पुष्पगुच्छांनी सजून गेल्याने आता दुरूनच लक्ष वेधून घेताहेत. करंजीच्या आकाराच्या निळसर जांभळ्या कळीतून उमललेले फूल वेगळेच सुंदर दिसते.
फाल्गुनापासून बहरायला सुरुवात झालेली ही उन्हवेडी झाडं. यातील बरीचशी ज्येष्ठाच्या अखेरपर्यंत अशीच बहरत राहणार. कळ्या-फुलांचं वैभव उधळत राहणार. काही वैशाखउन्हे ओसरली की मिटून घेणार स्वत:ला. गुलमोहर मात्र मृगसरींशी दंगामस्ती करत बहरत राहतो पावसाळ्यातही बरेच दिवस. वसंत फाल्गुनात अवतरतो. चैत्रात रुळतो. जितकं देता येईल तितकं वैभव वैशाखात उधळून उर्वरित ज्येष्ठाच्या ओटीत टाकून परतायच्या तयारीला लागतो.
वाढतं तापमान, जिवाची तल्खी करणार्‍या उष्ण झळा, कासावीस करणारी तहान, तरी निहित कार्यासाठी पडावंच लागतं घराबाहेर. सारी दुपार अंगावर झेलताना
‘सुरज की गरमीसे पिघले हुए तनको
मिल जाये तरूवरकी छाया…’
अशा मनामनाच्या व्याकुळ अवस्थेत वसंतात बहरून आलेली झाडं केवळ सावलीच देत नाहीत, तर रंगगंधाचा अप्रतिम नजराणा देऊन याचकाला कृतार्थ करीत असतात.
उन्हापासून बचावाची हरेकाची धडपड चाललेली. सूर्य डोळे वटारून बघतो आहे. नि:श्‍वास रोखून सृष्टी स्तब्ध झालेली. अशा दिवसांत मानवमात्रांना संजीवन देण्यासाठीच असावं वसंताचं अवतरण…
– प्रा. मीनल येवले/ ९४२२८०९९२२