चौफेर

0
130

नेहरूपर्व संपले…?

विदेशात झालेले शिक्षण, त्याच संस्कृती आणि संस्कारांचा पगडा, तरीही भारतात मिळालेली लोकप्रियता याच्या भरवशावर नेहरूंना जगभरात आपली वैयक्तिक छाप निर्माण करण्यात अधिक स्वारस्य होते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कॉंग्रेस पक्षाचा पैसा नेहरूंच्या आदेशावरून कृष्ण मेनन यांना देण्याच्या मुद्यावरून मौलाना आझादांना वरिष्ठांचे बोल खावे लागल्याची बाब त्यांच्याच एका पुस्तकातून स्पष्ट होते. नेहरूंच्या वैयक्तिक जीवनाबाबतच्या कित्येक बाबी नंतरच्या काळात सरदार पटेल आणि त्यांच्यातील पत्रव्यवहारातून खुल्या झाल्या.

खरंच नेहरूपर्व संपले? गेल्या काही दिवसांत प्रकर्षानं विचारला जाऊ लागलेला एक अनपेक्षित प्रश्‍न. एक काळ होता, नेहरू नावाची जादू होती सर्वदूर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. या देशात जे काही घडेल ते केवळ नेहरू घडवतील, असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात काहींना यश लाभले होते. हळूहळू अनेक बाबींचा उलगडा होत गेला, काही गुपितं उघड झाली, काही प्रकरणांत तर चक्क पितळ उघडे पडले आणि आज, स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर ते ‘पर्व’ कधी खरोखरीच अस्तित्वात तरी होते का, असा प्रश्‍न पडावा, अशी अवस्था निर्माण झाली आहे. पंतप्रधान होण्यासाठी उतावीळ झालेल्या या नेत्याने फाळणीच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यासाठी केलेल्या घिसाडघाईचे आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतरही पटेलांना राजी करण्यासाठी माऊंटबॅटन यांना कराव्या लागलेल्या कसरतीचे किस्से बाहेर आल्यानंतर, तर त्या कथित पर्वाची उतरंड अगदीच स्वाभाविक होती…
मोतीलाल, जवाहर, इंदिरा, राजीव, सोनिया आणि आता नजीकच्या भविष्यात राहुल… स्थापनेनंतरच्या बहुतांश काळात कॉंग्रेसची सूत्रे ज्या नेहरू-गांधी घराण्यात बंदिस्त राहिली, त्या पक्षाची वाताहत आज सर्वांच्या नजरेसमोर आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीव्यवस्थेत एखादा राजकीय पक्ष किंवा देशाच्या सत्तेतील एखाद्या घराण्याचे असे वर्चस्व योग्य की अयोग्य, हे ठरवण्याची वेळ खरं तर केव्हाच येऊन गेली. पण, जी-हुजुरी करण्यातच आयुष्य घालवणार्‍या कॉंग्रेस पक्षातील विद्यमान पिढीतील कुणाला याबाबत चिंतन करण्याची गरज वाटेल, याची सुतराम शक्यता कुठे दिसत नाही. मोतीलाल नेहरूंनी त्यांचा प्रभाव वापरला नसता, तर इतर एकाहून एक सरस, बड्या, कर्तबगार नेत्यांना बाजूला सारून जवाहरलाल या देशाचे पंतप्रधान झाले असते? कदाचित, ‘नाही’ असेच या प्रश्‍नाचे उत्तर राहिले असते. पण… तो प्रभाव उपयोगी ठरला अन्… मग चमत्कार असा काही घडत गेला की, सर्वदूर नेहरूच होते. इंग्लंडच काय, अमेरिका आणि रशियालाही भारताच्या पंतप्रधानपदी हीच व्यक्ती असावी, असे वाटू लागले होते. काही दिवसांनी नेहरूंना सरकारसोबतच कॉंग्रेस पक्षही आपल्याच ताब्यात असावा, असे वाटू लागले. तीच परिपाठी पुढेही कायम राहिली आणि मग कॉंग्रेसचे पक्षाध्यक्षपद अपवादानेच नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेर गेले.
विदेशात झालेले शिक्षण, त्याच संस्कृती आणि संस्कारांचा पगडा, तरीही भारतात मिळालेली लोकप्रियता, याच्या भरवशावर नेहरूंना जगभरात आपली वैयक्तिक छाप निर्माण करण्यात अधिक स्वारस्य होते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कॉंग्रेस पक्षाचा पैसा नेहरूंच्या आदेशावरून कृष्ण मेनन यांना देण्याच्या मुद्यावरून मौलाना आझादांना वरिष्ठांचे बोल खावे लागल्याची बाब त्यांच्याच एका पुस्तकातून स्पष्ट होते. नेहरूंच्या वैयक्तिक जीवनाबाबतच्या कित्येक बाबी नंतरच्या काळात सरदार पटेल आणि त्यांच्यातील पत्रव्यवहारातून खुल्या झाल्या. पंडितजींचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या पुस्तकांमधून तर आणखी ‘वेगळेच’ चरित्र अधोरेखित झाले अन् ‘नेहरूपर्वा’ची लक्तरे वेशीवर टांगली जायला वेळ लागला नाही…!
गांधींचा अनुनय ही नेहरूंची प्राधान्यक्रमावरची पसंती कधीच नव्हती. ती तर नाइलाजाने वाट्याला आलेली एक अपरिहार्यता होती. बहुधा म्हणूनच पंतप्रधानपद हाती येताच गांधींबाबतची त्यांची भूमिका कमालीच्या वेगाने बदलत गेली आणि त्यांच्यासंदर्भातले वागणेही… गांधींच्या आग्रहाखातर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मंत्री तर केले, पण त्यांना निवडणुकीच्या राजकारणात स्थान देण्याची, निवडून आणून त्यांना बळ देण्याची गरज नेहरूंना वाटली नाही. बाबासाहेबांचा हिंदू सिव्हिल कोडचा आग्रह असो, की मग गांधींच्या कल्पनेतला ग्रामविकास, दोहोंना नेहरूंनी केराची टोपली दाखवली. सर्वधर्मसमभावाची टीमकी वाजवतानाही इथले मुस्लिम दुखावले जाणार नाहीत, याची काळजी ते सतत घेत राहिले. अयोध्या, काशी आणि मथुरेतील विदेशी आक्रमणाची प्रतीकं पुसून काढत, सोमनाथच्या धर्तीवर तिथे जीर्णोद्धार करण्याचा निर्णय, अन्यथा थंडबस्त्यात कसा पडला असता? पंतप्रधान होऊन काहीच दिवस झाले असताना रा. स्व. संघ आणि अकाली दलाला चिरडून टाकण्याची मुजोर भाषा त्यांच्या तोंडी कशी आली असती? नंतरच्या काळातही गांधीहत्येचे निमित्त शोधून संघावर बंदी लादण्याचा डाव त्यांनी रचलाच! हिंदू महासभेची सत्तेत सोबत अन् संघावर मात्र बंदी, असा अफलातून राजकीय डाव खेळताना आपल्या संपूर्ण कारकीर्दीत विरोधकांना संपविण्याची आणि स्वत:चा एकछत्री अंमल निर्माण करण्याची त्यांची भूमिका राहिलेली दिसून येते. संपूर्ण देशभरात सत्याग्रह करत निघालेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींचा काश्मिरातील तुरुंगात झालेला संशयास्पद मृत्यू हा देश अद्याप विसरलेला नाही.
देशापेक्षाही स्वत:ची उंची निर्माण करण्यातच मग्न राहिलेल्या नेहरूंना, रशियाच्या इतक्या नादी लागाल तर एक दिवस चीन आपल्यावर हावी होईल, हा सहकार्‍यांचा इशारा गांभीर्याने मनावर घ्यावासा वाटला नाही. गृहमंत्री असूनही सरदार पटेलांना काश्मिरात कारवाई करण्यास रोखणार्‍या, युरोपियन देशात प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून गोव्याच्या स्वातंत्र्याला होणारा विलंब विनासायास मान्य करणार्‍या, मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनाच काय, तत्कालीन राष्ट्रपतींनाही सरदार पटेलांच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित राहण्यास सुचवणार्‍या, अमेरिका, रशियासारख्या बड्या देशांनी देऊ केलेला सुरक्षा परिषदेतील अधिकार भारतीय संसदेला विश्‍वासात न घेता वैयक्तिक पातळीवर नाकारणार्‍या, अलिप्ततावादी चळवळीचा देखावा निर्माण करत रशियाच्या दावणीला हा देश बांधणार्‍या नेहरूंची प्रतिमा कुणी कितीही प्रयत्न केला तरी फार काळ टिकवून ठेवणे नाही म्हणायला जिकिरीचेच होते. माहितीच्या या युगात अधिकाधिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत गेल्या आणि कालपर्यंत प्रयत्नपूर्वक निर्माण केलेला, जोपासलेला बुरूज आपसूकच ढासळत गेला…
शासकीय योजनांना नावं देऊन नेहरू-गांधी घराण्यातील सदस्यांचे अस्तित्व, त्यांच्यापश्‍चातही कायम राखण्याच्या अट्‌टहासातून जिल्ह्याजिल्ह्यांतली सरकारी युवा केंद्रं नेहरूंची झाली अन् निराधार योजना संजय गांधींची. क्रीडा पुरस्कारही, काडीचा संबंध नसलेल्या राजीव गांधींच्या नावाने खपवले गेले. सत्ता हातून गेल्यावर, विशेषत: राजकीय विरोधकांच्या हाती सूत्रे आल्यानंतर हे चित्र बदलणे क्रमप्राप्तच होते. नेमके तेच आता घडताहे. नेहरूंना ज्याच्या भविष्याचा वेध कधी घेताच आला नाही तो रशिया एव्हाना पुरता कोसळला आहे. शेजारचा चीन आपल्यावर हावी होत असल्याचे आपण बघतो आहोच. स्वत:च्या गळ्यातली दोरी रशियाच्या खुंटीला बांधून घेत अलिप्ततावादी चळवळीची नौटंकी करण्यापेक्षा, संपूर्ण जगाच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे असल्याची बाब एव्हाना पुरेशी स्पष्ट झाली आहे. अशा स्थितीत नेहरूंनी देशाच्या माथी मारलेल्या त्या चळवळीचे गोडवे गावे कुणी आता?
आधीच नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. अशात, नेहरूंचा करीष्माही लयाला चालला असल्याची भीती अगदीच अनाठायी नाही. गेल्या आठवड्यात पंडितजींची पुण्यतिथी होती. सरकारी पातळीवरील औपचारिकतेचा अपवाद वगळला, तर खुद्द कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही हिरिरीने त्यांचे स्मरण केल्याचे फारसे कुठे दिसले नाही. पर्वाची तर बातच सोडा, पण नेहरू नावाची जादूही एव्हाना संपत आली असल्याचे स्पष्ट करायला अजून कुठला पुरावा हवा…?
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३