साप्ताहिक राशिभविष्य

0
485

रविवार, ४ ते १० जून २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, ५ जून- निर्जला एकादशी, भद्रा (समाप्त ९.४०), जागतिक पर्यावरण दिन; मंगळवार, ६ जून- भौमप्रदोष, त्रिदिनात्मक सावित्री व्रतारंभ; बुधवार, ७ जून- शिवराज्याभिषेक शक ३४४ प्रारंभ; गुरुवार, ८ जून- वटपौर्णिमा उपवास (पौर्णिमा प्रारंभ १६.१४), भद्रा (१४.१६ ते २९.२६), रवी मृग नक्षत्र प्रवेश (सकाळी ६.०४), वाहन मेंढा; शुक्रवार, ९ जून- कबीरजयंती, पौर्णिमा समाप्त १८.३७; शनिवार, १० जून- कर्नाटकी बेंदूर, गुरू मार्गी, मंगळाचा पश्‍चिमास्त, श्री विष्णुदास महाराज पुण्यतिथी- तेल्हारा (अकोला), जागतिक दृष्टिदान दिन..
संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा-५, ६, ८, १० जून, बारसे- ६ जून, जावळे- ५, १० जून, गृहप्रवेश- ५, ६, १० जून

मेष- प्रकृतीला जपावयास हवे
राशिस्वामी मंगळ तृतीयातून भाग्यस्थानाला पाहात असतानाच त्याच्यावर वक्री शनीची दृष्टी आली आहे. हा प्रतियोग फारसा चांगला नाही. वाहने सांभाळून चालवायला हवीत. लहान-मोठ्या अपघातांपासून सावध राहावयास हवे. विजेची व आगीची उपकरणे सांभाळून वापरावीत. प्रकृतीला जपावयास हवे. बाकी जीवनातील रोजची कामे सुखासुखी पार पडतच राहणार. त्यात कसलाही मोठा अडथळा वा अडचणी संभवत नाहीत. व्यवसायात असणार्‍यांना अपेक्षेनुसार यश मिळावे. नोकरीत असलेल्यांची समाधानकारक प्रगती होत राहील. अधिकारीवर्ग आपल्या काम करण्याच्या शैलीवर, आपल्या कामातील प्रगतीवर खूष राहील. या आठवड्यात काही नवीन लोकांशी ओळखी होतील. त्याचप्रमाणे काही जुन्या संबंधांना नव्याने उजाळा मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी, परिचित व्यक्ती वगैरेंची अचानक भेट होऊन जुन्या स्मृती दृढ होतील. शुभ दिनांक-५,६,७,१०.
वृषभ- संधीचे सोने करावे
या आठवड्याच्या प्रारंभी राशिस्वामी शुक्र व्यय स्थानात असून राशिस्थानी रवी व बुधाने बैठक जमविली आहे. तथापि, गुरूची राशीवर शुभदृष्टी असल्याने जीवनातील काही चांगल्या व महत्त्वाच्या संधी आपल्याला लाभू शकतात. त्यांचे सोने करण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावयास हवेत. कारण भाग्यही उजळण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतातच. क्रीडाक्षेत्रात असलेल्यांना मैदानात आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविता येईल. काहींना व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. त्यात अपेक्षित कार्यसिद्धी होईल. कुटुंबात मंगल वा धार्मिक कार्य ठरेल. तरुण-तरुणींचे विवाहादी कार्य जुळणे, होणे यामुळे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासह सहल-पर्यटनाला निघण्याचा विचार असेल तर तोदेखील या काळात पूर्ण करता येईल. विदेशात जाण्याचे प्रयत्नदेखील सफल होऊ शकतात. शुभ दिनांक-४,७,९,१०.
मिथुन- खर्चाला वाटा हजार
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध रवीसोबत व्ययस्थानात आहे व त्याच्यावर गुरूची दृष्टी असल्याने तो खर्चादिकास उतावीळ आहे. त्यामुळे या आठवड्यात आपल्याला खिसा सांभाळण्याची, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची अतिशय गरज आहे. आलेला पैसा वेगवेगळ्या वाटा शोधून आपणांस खर्च करावयास लावणार आहे. ‘खर्चाला वाटा हजार’ असे आपण म्हणतो. तसे आपल्या बाबतीत घडणार आहे. मात्र, समाधानाची बाब अशी की, हा खर्च अनावश्यक किंवा अनाठायी अशा स्वरूपाचा राहणार नाही, तर तो काही विशेष स्वरूपाचे कारण घेऊन आपल्या समोर ठाकणार आहे. परिवारातील मंगलकार्य, एखादी मोठी खरेदी, शिक्षणावरील खर्च, मोठी आर्थिक जबाबदारी उचलणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये हा खर्च होऊ शकतो. किंबहुना अशाप्रकारचे काही विशेष निमित्त समोर येऊ शकतात. शुभ दिनांक-५,६,८,१०.
कर्क- कष्टाचे चीज होणार
या आठवड्याच्या आरंभी आपला राशिस्वामी चंद्र गुरूसोबत पराक्रमात आहे. त्याचे षष्ठस्थानापर्यंत होणारे भ्रमण आपणांस उपयुक्त ठरावे. हा आठवडा आपला तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीचा, जोडीदाराचा भाग्योदय करणारा ठरू शकतो. आपण आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज व्हावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालांमधून अपेक्षित यश मिळू शकते. त्यांच्या उच्च शिक्षणासाठीचे मार्ग प्रशस्त होतील. काही युवकांना नोकरी मिळण्याच्या दृष्टीनेदेखील चांगले योग येऊ शकतील. दुसरीकडे नोकरी-व्यवसायात असणार्‍यांना वैयक्तिक स्वरूपाचे यश मिळवता येईल. उद्दिष्टपूर्तीमुळे अधिकारीवर्ग खूष राहील. आपली प्रतिष्ठा वाढेल. सहकार्‍यांकडून कौतुक, प्रशंसा होईल. या सार्‍याचा परिणाम म्हणजे काहींना पगारवाढ, पदोन्नती यांसारखे लाभ मिळू शकतात.
शुभ दिनांक-४,८,९,१०.
सिंह- अतिशय व्यग्रता, यश
या आठवड्यात आपला राशिस्वामी रवी धनेश बुधासोबत दशमस्थानात बलवान झालेला आहे. सोबतच त्याच्यावर गुरूची शुभदृष्टी आहे. हा योग आपणांस व्यावसायिक आणि कौटुंबिक कामात भरपूर यश देणारा आहे. तथापि, हा आठवडा अतिशय व्यग्रतेचा राहू शकतो. नोकरी-व्यवसायात कामाची भाऊगर्दी राहील. काहींना तर या निमित्ताने प्रवास किंवा दौर्‍यावर जावे लागू शकते. कुटुंबातही काही कार्यक्रमांचे आयोजन, पाहुण्यांची अचानक पडणारी फेरी यामुळे तिथेही आपली उपस्थिती, सहभाग आवश्यक राहील. त्यामुळे कोणाकडे लक्ष द्यावे, याचा गोंधळ उडेल. या सार्‍यात आपली आर्थिक बाजू सबल राहणार आहे. मात्र, पाहुणे मंडळी, मंगलकार्ये यांत आपणांस खर्चाचा मोठा वाटा उचलावा लागू शकतो. त्यामुळे हा खर्च डोईजड होणार नाही, अंदाजपत्रक बिघडणार नाही, याचे भान ठेवावयास हवे. शुभ दिनांक-४,७,९,१०.
कन्या- योगांचा दीर्घकाळ प्रभाव
आपला राशिस्वामी बुध भाग्यस्थानात रवीसोबत असून त्याच्यावर आपल्या राशीतून गुरूची शुभदृष्टी आहे. या योगामुळे आपल्याला आता व्यावसायिकदृष्ट्या पाहता अतिशय उत्तम संधी लाभू शकणार आहेत. या योगाचा आपल्या जीवनावरील प्रभाव दीर्घकाळ टिकून राहणारा असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपण हात घालाल तिथे यश मिळू शकेल. दैनंदिन कामात कसलाही उणेपणा येणार वा जाणवणार नाही. आपल्या तसेच जोडीदाराच्या भाग्योदयामुळे या काळात आनंदाचे वातावरण राहील. अनेकांचे बरेच दिवसापासून सुरू असलेले नोकरी मिळवण्याचे प्रयत्न आता पूर्णत्वास जाऊ शकतील, किमान त्या दिशेने काही सकारात्मक हालचाल होताना दिसेल. विशेषतः युवकांना मोठा दिलासा मिळू शकेल. व्यवसायात असणार्‍यांना या काळात मोठी गुंतवणूक करता येईल. शुभ दिनांक- ४,५,६,७.
तूळ- खर्चासाठी तारेवरची कसरत
आपला राशिस्वामी शुक्र सध्या सप्तमात आलेला आहे. याशिवाय अन्य ग्रहयोग पाहता हौस, मनोरंजन, मोठे कार्यक्रम यावर आपला मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला आवक आणि जावक असा पैशाचा मेळ जमवताना तारेवरची कसरत करावी लागू शकते. विशेषतः महिलांना गृहखर्चाची सांगड घालताना आवडी-निवडीवर बंधने घालावी लागू शकतात. प्रसंगी खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा लागू शकतो. सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना आपले कसब व क्षमता दाखवून पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. तिचे वेळीच सोने करावे. प्रलंबित कामे, अडलेला पैसा या काळात मार्गी लागू शकेल. सामाजिक-धार्मिक कार्यात पुढाकार राहील. कुटुंबातही अशा कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते. व्यवसायात असणार्‍यांना काही वेगवान घडामोडी घडत असल्याचा अनुभव येईल. शुभ दिनांक- ५,६,७,८.
वृश्‍चिक- प्रतिकूल बदल संभव
आपला राशिस्वामी मंगळ अष्टमात असून त्याच्यावर शनीची दृष्टी येत आहे. हा योग आपणांस प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात काही आर्थिक व प्रकृतीविषयक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या दैनंदिन जीवनमानात काही प्रतिकूल बदल घडून त्याचे वाईट अनुभव येऊ शकतात. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीनेदेखील हा काळ काहीसा त्रासदायकच ठरणार आहे. व्यवसायविस्तार, व्यवसायात बदल किंवा गुंतवणूक करावीशी वाटत असल्यास तूर्त थांबावयास हवे. नोकरीत काही अनपेक्षित व तडकाफडकी होणारे बदल आपले मन खट्टू करणारे असू शकतील. काहींना मनाविरुद्ध स्थानांतरण, नवी जबाबदारी मिळणे संभवते. प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवावीत. अपघात टाळावयास हवेत. आगीची व विजेची उपकरणे सांभाळून वापरा. शुभ दिनांक- ४,८,९,१०.
धनु- योजलेल्या कामात यश
या आठवड्याच्या आरंभी आपला राशिस्वामी गुरू चंद्राच्या बरोबरीने दशमस्थानात एक उत्तम योग बनवीत आहे, तर राशिस्थानी लाभेश शनी विराजमान आहे. हा योग आपणांस मनात योजलेल्या कामात यश देणारा ठरू शकतो. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या कामात सहज मोठे यश मिळवू शकाल. विशेषतः तरुणवर्गाला या गुरूचा नोकरी-व्यवसायाच्या योगांच्या दृष्टीने अतिशय चांगला लाभ होऊ शकतो. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहविषयक हालचालींनादेखील गती प्राप्त होईल. काही युवकांना नोकरीसाठी गावाबाहेर जाण्याची तयारी ठेवावी लागू शकते. दरम्यान शनी व मंगळाचा प्रतियोग काहींना प्रकृतीच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतो. वाहने सांभाळून चालवावीत. आगीच्या व विजेच्या वस्तू सांभाळून वापराव्या. जोडीदाराशी मतभेद, वादविवाद टाळावयास हवा. शुभ दिनांक- ५,६,७,१०.
मकर- कुटुंबासाठी मोठा आर्थिक भार
आपला राशीस्वामी शनि व्ययस्थानात असला तरी त्याची धनस्थानावरील दृष्टी आणि राशीवरील गुरुची शुभ दृष्टी पाहता या आठवड्यात आपणास बरीच अनुकूलता प्राप्त होताना दिसते. त्यामुळे आपण ठरवलेली कामें सफल होतील. आपल्या योजनांमध्ये उल्लेखनीय यश नोंदवू शकाल.दरम्यान, काहींना मात्र कुटुंबातील सदस्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी झटावे लागू शकते. यासाठी मोठा आर्थिक भार देखील सहन करावा लागू शकतो. आपल्या नोकरी-व्यावसायात कष्टांचे चीज होऊन समाधान लाभेल. दरम्यान, व्यय व षष्ठ या आजारपणांच्या स्थानातून होणारा शनि-मंगळाचा प्रतियोग काही व्यक्तींना प्रकृतीच्या दृष्टीने फारसा चांगला ठरेल असे वाटत नाही. याकाळात वाहने सांभाळून चालवली पाहिजेत. छोटे-मोठे अपघात, पडणे-घसरणे टाळावयास हवे. कुटुंबातही ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ दिनांक- ५,६,७,१०.
कुंभ- मेहनतीची तयारी हवी
आपला राशीस्वामी शनि वक्री होऊन लाभ स्थानात आहे व सध्या त्याचा मंगळासोबत प्रतियोग झालेला आहे. असात गुरु देखील अनुकूल नाही. त्यामुळे आपल्या कामात विलंब, संधी निसटणे असे अनुभव कदाचित येत असावेत. अशाा परिस्थितीत आपणांस प्रचंड आत्मविश्‍वास व भरपूर मेहनतीची तयारी ठेवावी लागणार आहे. विश्‍वासाने व प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांना यश मिळणारच. व्यवसायातील कामकाज, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील. काही नवे व महत्त्वाचे निर्णय आपणास घ्यावे लागतील. मात्र व्यवसायात कोणतेही नवे धाडस करावयाचा मोह सध्या आवरला पाहिजे. विशेषतः कोणत्याही प्रकारची मोठी आर्थिक गुंतवणूक करणे सध्या टाळायलाच हवे. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी मंडलींचा सल्ला घेणे हितकारक ठरेल. आपल्या वाट्याला आलेले काम जास्तीतजास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शुभ दिनांक- ५,६,७,८
मीन- उत्तम आर्थिक आवक
राशिस्वामी गुरू सप्तमातून आपल्या राशीला पूर्ण बळ देत आहे, तर आतापर्यंत राशिस्थानी असलेला शुक्र धनस्थानात गेलेला आहे. हे ग्रहमान उत्तम असल्यामुळे सध्या पैशाची आवक सुरळीत आणि उत्तम राहणार आहे. मात्र, जावक किती असावी, हे आपल्यालाच ठरवायचे आहे. कारण आपले राहणीमान खर्चीक होत चालले आहे. अनावश्यक खर्चास कात्री लावता आली पाहिजे. येणारा वाढीव पैसा उद्योग-व्यवसायात गुंतवून त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातही आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. तरुणांना उत्तम नोकरी लाभण्यामुळे तसेच विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येण्याची शक्यता असल्याने आनंदात अधिकच भर पडेल. एखादी मोठी खरेदीही संभव आहे. दरम्यान शनी-मंगळ प्रतियोगामुळे प्रकृती सांभाळावयास हवी. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. शुभ दिनांक- ४,८,९,१०.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६