सैनिक आणि मानवाधिकार

0
74

रविवारचीपत्रे
ज्या वयात सर्वसामान्य मुले जीवन कसं जगावं हे शिकत असतात त्या वयात सैन्यात दाखल झालेली १७-१८ वर्षाची कोवळी मुले मरणाला निडरपणे सामोरं कसं जायचं हे आत्मसात करत असतात. ज्या वयात मुले अमेरिकेला जायची स्वप्न बघत असतात त्या वयात या सैनिकांची देशासाठी सर्वोच्च बलिदान (सुप्रीम सॅक्रिफाईस) करण्याची मानसिक तयारी झाली असते. ज्या वयात मुले एसी/टीव्ही/वातानुकूलित प्रवास याशिवाय जगू शकत नाही त्या वयात हे जवान देशाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत विपरीत व कठीण परिस्थितीत दीर्घकाळ राहतात. ज्या वयात सर्वसामान्य मुले लठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी अर्ज करत असतात त्या वेळी हे सैनिक शत्रूशी लढायला सरसावलेले असतात. युद्ध करताना शत्रू देशातील सामान्य नागरिक व संस्था यांची कमीतकमी हानी झाली पाहिजे हे त्यांना शिकवले जाते. एसी रूममध्ये बसून अशा वीर सैनिकांना मानवाधिकार शिकविणार्‍यांना लाज वाटली पाहिजे. काश्मीरमध्ये सैनिकी अधिकार्‍याने प्रसंगावधान राखून, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊन अनेक लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायचे की त्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी असा ओरडा करायचा? जीपला बांधलेला माणूस जर फुटीरवाद्यांचा समर्थक नसता तर दगडफेक थांबली नसती. आपल्या सैनिकांनी फुटीरवाद्यांचे दगड व पेट्रोलबॉम्ब भ्याडासारखे झेलायचे का? मानवाधिकाराचे तथाकथित पुरस्कर्ते सैनिकांच्या बाजूने का उभे राहत नाही? त्यांच्या हे कसे लक्षात येत नाही की, अनधिकृत व अपूर्ण माहितीच्या आधारावर केलेल्या आरडाओरडीमुळे व फुटीरवाद्यांच्या समर्थनामुळे शत्रू देशालाच फायदा होतो. की त्यांना हेच हवे आहे.
सुजाता दाते
नागपूर

विकासपुरुषाची षष्ट्यब्दीपूर्ती
काही व्यक्ती असामान्य म्हणून जन्माला येतात व आपल्या कर्तृत्वाने असामान्य म्हणूनच जगतात. संघ संस्कारात व भाजपाच्या फळीत घडलेलं असंच एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. विद्यार्थिदशेत महाविद्यालयीन निवडणुकीतून गडकरींनी राजकारणाचे धडे घेतले व पुढे अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाने विविध राजकीय शिखरे गाठली. विधानपरिषदेत पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून उत्तम कार्य केले, याशिवाय भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री व अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणात प्रवेश होऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम सदैव स्मरणात राहील. युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून राज्याच्या रस्ते बांधकामात त्यांनी ऐतिहासिक कामे केली. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या या कामास कदापि विसरू शकणार नाही. बांधकाममंत्री म्हणून त्यांच्या कामाची नोंद जागतिक स्तरावरही घेतली गेली.
मागच्या दारातून निवडून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून विरोधक गडकरींची टिंगल करत. विरोधकांच्या याच टीकेस प्रत्युत्तर देत मागील लोकसभा निवडणुकीत सुमारे पावणेतीन लाखाहून जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवीत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गडकरी अतिशय स्पष्टवक्ते आहेत. मुखात एक व मनात दुसरे असे त्यांच्या बाबतीत कधीच आढळून येत नाही. लोकप्रतिनिधी कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे गडकरी. नागपूर शहरात गेल्यास तेथील विकासकामे पाहून त्यांच्या कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो; परंतु आज गडकरी केवळ नागपूरचेच नाही तर सार्‍या देशाचे आहेत. त्यांच्या विकासकामांचा धडाका सारे देशवासीय अनुभवत आहेत. कर्तृत्वाची अनंत क्षितिजं उधळणार्‍या या विकासपुरुषास अनंत शुभेच्छा…
अखिल सुरेशराव देशपांडे
अकोला

प्रगणना किती सयुक्तिक?
नुकतीच बौद्ध पौर्णिमेला महाराष्ट्रातील समस्त अभयारण्यात वन्यप्राण्यांची प्रगणना पार पडली. प्रत्येक वर्षी या प्रगणनेला काही ना काही गालबोट लागतच असते. दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यात एक मचाण कोसळून त्यावर बसलेले प्रगणक खाली पडून जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच या वर्षी त्याहूनही भयावह घटना घडली. एक वनमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना मन सुन्न करणारी आणि समस्त वनाधिकार्‍यांना विचार करायला लावणारी अशीच होती.
या प्रगणनेत केवळ हौसे, नवसे, गवसेच जात असतात, ज्यांना वन्यप्राण्यांबद्दल काहीही माहिती नसते आणि वेळप्रसंगी वन्यप्राण्यांपासून स्वत:चा बचाव कसा करावा याचीही काही माहिती नसते. त्यांच्यासाठी ही प्रगणना म्हणजे निव्वळ एक पिकनिक असते आणि केवळ हौसेमौजेखातर ते येत असतात, काही लोकांचं असंही म्हणणं होतं की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या संस्थेने दहा वर्षांपूर्वीच या प्रगणनेवर बंदी आणली असताना वनविभागातर्फे ही प्रगणना आयोजित करण्याचं औचित्य काय? निव्वळ पैसा कमावण्याच्या धंदेवाईक उद्देशानेच वनविभाग ही प्रगणना आयोजित करते म्हणून एनटीसीचा आदेश ग्राह्य धरून ही प्रगणना त्वरित बंद केली पाहिजे. कधीकाळी एखाद्या प्रगणकाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे काय? याबद्दल वनविभागाला मला काही सूचना कराव्याशा वाटतात १) ऑनलाईन बुकिंग ताबडतोब बंद करावी आणि प्रगणनेसाठी पूर्वीसारखीच प्रक्रिया अमलात आणावी. २) प्रगणनेसाठी मुलाखत घ्यावी आणि ज्यांना वन्यप्राण्यांची माहिती आहे अशा लोकांनाच प्रवेश द्यावा. ३) प्रगणनेमध्ये सत्तर किलोपेक्षा जास्त वजन असणार्‍यांना प्रवेश देऊ नये. जेणेकरून मचाण कोसळण्यासारख्या घटना घडू नये. ४) मचाणीवर बसणार्‍यांना रात्रीचं जेवण देऊ नये. रात्री जेवण केल्याने सकाळी बाहेरकडे जायची वेळ येते. ताडोबामध्ये वनमजुराचा जीव असाच गेला. सकाळी तो बाहेरकडे गेला असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला, म्हणून प्रगणकांना केवळ बिस्किट वगैरे खायचीच परवानगी द्यावी. ५) प्रगणकांना मचाणीच्या खाली न उतरण्याची सक्त ताकीद द्यावी. मला वाटतं इत्यादी सूचनांचं पालन केल्यास होणारे अपघात टाळता येतील आणि प्रगणना आणखी जास्त संयुक्तिक होईल. अन्यथा ही प्रगणना निव्वळ एक फार्स ठरण्याचीच शक्यता जास्त राहील.
संजीव हरिदास हेडााऊ
९३७०१६९५८२

मुद्रांक शुल्कवाढ अन्यायकारक
आपल्या राज्यात महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी, मुद्रांक शुल्काचा वाढीव भुर्दंड सामान्य जनतेवर लादल्यामुळे राज्य सरकारने महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ निर्माण केलेली पाहायला मिळते. ही मुद्रांक शुल्क वाढ करताना सामान्य जनतेला परवडणार नाही याचा विचार सरकारने करायला पाहिजे. ज्या कुटुंबीयांना मालमत्ता बक्षीसपत्राने देण्यासाठी यापूर्वी अवघ्या पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारत होते, आता मात्र अशा बक्षीसपत्राच्या दस्त नोंदणीवर मालमत्तेच्या बाजारभावानुसार तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी या आधी शहरी भागात ४ टक्के, तर ग्रामीण भागात ३ टक्के मुद्रांक शुल्क होते. आता त्या दरात १ टक्क्याची वाढ करून ते ५ आणि ४ टक्के करण्यात आली आहे. हे मुद्रांक शुल्क सरकारने ठरवलेल्या मालमत्तेच्या दरानुसार भरावे लागणार असल्यामुळे महानगरपालिका आणि प्राधिकरणाच्या क्षेत्राच्या ग्रामीण क्षेत्रातही वार्षिक मूल्य दराच्या नमूद केलेल्या बाजार मूल्यानुसारच सरसकट पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार ही बाब सामान्य जनतेच्या हिताने अयोग्यच वाटते.
पंतप्रधान योजनेतून सहा लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या बेघरांना दोन लाख रुपयांचे अनुदान, तर सदनिकेसाठी ६ टक्के व्याजाने कर्ज मिळणार असे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात सदनिकेच्या बाजारभावाने असलेल्या किमतीवर आता पाच टक्के मुद्रांक शुल्क तसेच गरिबांना सदनिका विकत घेताना ५० ते ७५ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार असल्यामुळे ही बाब मुद्रांक शुल्कामध्ये वाढ करताना सरकारने विचारात घ्यायला पाहिजे होती. सरकारने राज्यात महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्धार केला असला तरी या निर्णयाचा फेरविचार करून जास्तीचा आर्थिक भुर्दंड सामान्य जनतेवर पडणार नाही याची खबरदारी सरकारने घेणे गरजेचे आहे असे वाटते.
प्रा. मधुकर चुटे
९४२०५६६४०४

बेळगावी महाराष्ट्र ब्राह्मण
समाजाचे स्नेहसंमेलन
महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीने २६, २७, २८ मे रोजी कर्नाटक येथील बेळगावी जिल्ह्यातील तालुका अथणी येथे भव्य स्नेहपर्व संमेलन आयोजित केले गेले होते. या संमेलनात कुलकर्णी, देशपांडे, करजगीकर, जोशी परिवाराच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, सातारा, सांगली, गुलबर्ग, बागलकोट, धारवाड, विजापूर, बंगलोर, बेलाटी येथील ब्राह्मण परिवार/कुटुंब मोठ्या संख्येने हजर होते. त्यामध्ये प्रमुख अतिथी रामण्णा (अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन सहसंयोजक), अरविंद देशपांडे (कर्नाटक उत्तर प्रांत सह. संघचालक), शिरीष अवदानी (रिटायर्ड प्रोफेसर आणि समाजसेवक, वर्धमान विद्यालय ज्युनिअर कॉलेज इंदापूर, पुणे) यांचे संयुक्त हिंदू ब्राह्मण, एकत्रित कुटुंब पद्धतीबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन झाले. या अतिथींनी आजच्या युगासाठी सुंदर संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. एकत्र कुटुंब पद्धती जपणे किती आवश्यक व किती फायद्याचे आहे. तसेच साठ वर्षांनंतर वृद्ध लोकांनी खचून न जाता या समाजासाठी, देशासाठी आपण काहीतरी कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले पाहिजे व आपले उर्वरित आयुष्य सार्थकी लावले पाहिजे, हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच तरुण पिढीसाठी आपण एकत्र कुटुंबामध्ये न राहता काय गमावतो आहे याविषयी सुंदर भाषण दिले. तरुणवर्गाने पुढच्यासाठी स्वत: कसे एक आदर्श व्यक्ती, आदर्श परिवार बनवून दुसर्‍यांसाठी आदर्श बनावे अशा अनेक सुंदर पैलूंनी वातावरणात बदल घडवून आणला. जोशी-कुळकर्णी यांच्या प्रमुख घटकांच्या नात्याने या कार्यक्रमात नागपूरमधून श्रीकांत कुलकर्णी व अंबिका कुलकर्णी सहकुटुंब उपस्थित होते.
अच्युत कुलकर्णी, अथणी व अतुल जोशी, सांगली यांच्या पुढाकाराने व यांच्या बांधव कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला.
अंबिका कुलकर्णी
नागपूर

मुलगी वाचवा, भविष्य घडवा
‘मुलगी! नको, काय होणार आहे मुलीला जन्म घालून? दुसर्‍या घरची लेक ती. आम्हाला मुलगाच हवा,’ अशी मुलीविषयी असलेली अनास्था आपल्याला अनेक लोकांकडून ऐकायला मिळते. पण, हे योग्य आहे का?
मुळीच नाही. कारण मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही त्या दिव्याची पणती असते. मुलगी ही दोन घरांना जोडणारी एक दुवा असते. पण, आजचे हे चित्र किती विदारक स्वरूपाचे आहे याची कल्पनासुद्धा केली तरी अंगाला शहारा येतो.
हरयाणात मुलगी जन्माला आली पर तिची निर्घृृणपणे हत्या केली जाते. यापेक्षा मोठे पाप कोणते? अहो, आपण ज्याला धर्म म्हणतो, पंथ म्हणतो ते माणसाच्या माणुसकीमुळेच अस्तित्वात आहेत. पण या माणसांनी आपली माणुसकी विसरून असा निर्दयीपणा केला, तर कुठला हा धर्म? आणि कुठला हा पंथ?
‘‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:|
यत्रैतास्तू न पूज्यन्ते सर्वास्तत्राकला: क्रिया:॥
खरंच ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान असतो, त्या ठिकाणी देवता वास करते. तर ज्या ठिकाणी स्त्रियांना तुच्छ मानले जाते, तेथे सगळी कार्ये फलहीन होतात.
म्हणून मुलींना त्यांचा मान मिळायलाच पाहिजे आणि तो आपणच द्यायला हवा. आज आपण मुलींची संख्या वाढविली पाहिजे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही योजना सुरू केलेली आहे. असे अनेक कार्यकर्ते आहेत की, ज्यांनी मुलींची संख्या वाढविण्याकरिता योजना आखलेल्या आहेत. त्याकरिता आपणही हातभार लावला पाहिजे.
आज हे जण मुलींमुळेच अस्तित्वात आहे. मुलगीच उद्याच्या जगाचे भविष्य असणार आहे. उद्याचे भविष्य घडविण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. फक्त आपण तिला जन्माला घालून या जगात उडण्याची संधी दिली पाहिजे. मग ती या संधीचे सोने केल्यावाचून राहणार नाही. तसंही म्हणतातच-
‘एक स्त्रीने ठरवलं, तर अख्खं जग ती सांभाळू शकते.’
मुलींची संख्या आज जर संपुष्टात आली, तर उद्याचे विदारक स्वरूपाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येऊन आपल्याला रडवत राहील. त्यावर एकच उपाय म्हणजे आपण या कळीला जन्म देऊन तिला या जगात फुलाप्रमाणे उमलू द्यावे. मग तिच्या कर्तृत्वरूपाचा सुगंध जगभर दरवळायला वेळ लागणार नाही.
श्रद्धा रमाकांत अवताडे
चंद्रपूर

कंत्राटी वाहनचालकांना
स्थायी केव्हा करणार?
महाराष्ट्र शासन विविध विभागात चालकांच्या रिक्त पदांवर कंत्राटी वाहनचालकांची नेमणूक करून आपले काम काढून घेत आहे. एप्रिल २०११ पासून कंत्राटी वाहन परिवहन चालक मासिक ४००० रु. (केवळ) वेतनावर कार्यरत आहे. आजकालच्या महागाईच्या काळात खरोखरच महिन्याला ४००० रुपयांत एकट्या वाहनचालकाचा उदरनिर्वाह होऊ शकतो काय? त्याने इतर कुटुंबीयाचे पालनपोषण कसे काय करायचे? हे सर्व पाहिल्यावर याद्वारे उपरोक्त अधिकार्‍यांना असे सुचवावेसे वाटते की, चालकांच्या रिक्त पदांवर कंत्राटी वाहनचालकांची स्थायी स्वरूपी नियुक्ती करावी. सध्या यांना कुठल्याही प्रकारचे भत्ते लागू नाही. यांना सरकारी क्वॉर्टर नाही. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत लवकरात लवकर विचार करावा. अन्यथा त्यांच्या आयुष्यात काही महिन्यांत संकटे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोहन राव
रामनगर, नागपूर

अन्न वाचवा अभियान
‘अन्न वाचवा’ हे अभियान तरुण भारतने २/३ वर्षांपूर्वी हाती घेतले व जनजागृती करण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले. सर्वांनी त्याचे अभिनंदन, स्वागत केले व आचरणात आणले.
‘अन्नदान हे श्रेष्ठदान’ आहेच तरीही आज शहरात निरनिराळ्या निमित्ताने अन्नदान होत असते. त्याबद्दल काही नियम असावेत असे वाटते. आजही भारतात वाया जाणार्‍या अन्नाची मात्रा एवढी आहे की, त्यात जगाच्या लोकसंख्येच्या १/३ लोकसंख्या पोटभर जेवू शकेल. जगात भारताचा अन्न वाया घालविणार्‍या देशामध्ये ७ वा क्रमांक आहे. ही चिंतनीय बाब नक्कीच आहे.
स्वागत समारंभ जेवण व अन्नदान याबाबत काही ‘आचारपद्धती’ आखली गेली तर वाया जाणार्‍या अन्नावर काही प्रमाणात निश्‍चितच कपात करणे शक्य होईल.
प्रमोद देशपांडे
९४२२१०५७२७