कलेचा कुठलाही देश नसतो काय?

0
179

कला आणि संस्कृतीला कुठलीही सीमा नसते आणि या क्षेत्राला कुठल्याही विशिष्ट अशा चौकटीत बंदिस्त करता येत नाही, असे सर्वसाधारणपणे म्हणण्यात येते. मात्र, ही बाब केवळ भारताविषयीच लागू करण्यात येते. पाकिस्तानसारख्या देशांना या व्याख्येतून वगळण्यात येते. तेथे भारतीय कलाकार आपली कलाही सादर करू शकत नाहीत आणि त्यांना तेथे कुठला आदर, सन्मानही मिळत नाही. कला, देशासारख्या क्षुद्र, संकुचित सीमांच्या पलीकडे असते, हे भारताच्या संदर्भात ‘कराची लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणार्‍या भारतीय लेखकांनी म्हटले होते. मग कलावंत व लेखकांनी एवढे संवेदनशून्य आणि कठोरहृदयी राहावे काय, की त्यांनी भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची साधी निंदाही करू नये? असा एकतरी पाकिस्तानी कलाकार तुम्हाला दिसला काय की, ज्याला भारतात पैसे कमवायला कुठलीही हरकत नव्हती, पण भारतावरील दहशतवादी हल्ल्याची त्याने निंदा केली? भारत अशा तथाकथित कलाकारांसाठी कलेचे एटीएम आहे काय?
भारतात पाकिस्तानचे जणू प्रवक्ते असलेले काही खास संपादक, नेते आणि टीव्ही वाहिन्यांवरील पत्रकार आहेत, जे नेहमीच शांतीचे तुणतुणे वाजवून पाकिस्तानच्या सुरात आपला सूर मिसळत असतात. भारतीय सैनिकांचे दु:ख, त्यांना आपले दु:ख वाटत नाही. भारतीय शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:ख, वेदनेपासून ते कमालीचे अलिप्त राहतात. आपल्या वर्तमानपत्रातून आणि टीव्ही चॅनेलमधून पाकिस्तानची बाजू मांडणे, पाकिस्तानी उच्चायुक्तांची मुलाखत तासन्‌तास दाखविणे, दहशतवाद्यांच्या मुलांच्या मुलाखती पहिल्या पानावर छापणे आणि पाकिस्तानने सीमेवर कितीही थैमान घातले आणि सैनिकांवर हल्ले केले, तरी असे दाखविणे की जणू हे लोक कुठल्या परग्रहावरून आले आहेत अथवा अशा देशाचे नागरिक आहेत ज्यांचा मातृभूमीच्या दु:खवेदनेशी काहीही संबंध नाही आणि हीच यांची खास ओळख आहे!
अगदी इतक्यातच पाकिस्तानी कलावंतांचा समावेश असलेले भारतातील कार्यक्रम येथील आयोजकांनी अशा आविर्भावात रद्द केले की, जणू ते खूप निरुपायाने ते करीत आहेत. कारण देशभक्त संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर या आयोजकांनी नाइलाजाने हे कार्यक्रम रद्द केले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. (पाकिस्तानी कलावंतांना आमंत्रित करता येत नसल्याची खंतही या आयोजकांनी बोलून दाखविली आहे.)
मी, आतापर्यंत पाकिस्तानातील एकाही कलावंताने दहशतवाद अथवा भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध वक्तव्य केल्याचे ऐकलेले नाही. ते येथे येतात, नाचगाणी करून, थोडाफार अभिनय सादर करून येथे पैसे कमवून परत कराची अथवा लाहोरला निघून जातात. जणू हिंदुस्थान त्यांच्यासाठी पैसे कमविण्याची बाजारपेठच आहे! आपल्या भारतातही तथाकथित पाकिस्तानी कला आणि शायरीचे असे वेडे चाहते आहेत की, जणू त्यांच्या दृष्टीने केवळ कव्वाली आणि मनोरंजनच जीवनाचे सार आहे! कारण या (उच्चभ्रू) वर्गातील मुले, मुली सीमेचे संरक्षण करण्यासाठी शहीद होत नाहीत, ते मातृभूमीच्या संरक्षणाचा विषय केवळ पैसे, वेतन आणि नोकरी यापुरताच मानतात. जोपर्यंत त्यांचा व्यापार आणि व्यवसाय सुरळीतपणे चालू असतो तोपर्यंत भारतात इंग्रजांची राजवट असू देत की भारतीयांची, या लोकांना काहीही फरक पडत नाही, त्यांना याच्याशी काहीही देणेघेणेच नसते. इंग्रजांच्या राजवटीत अशा लोकांनाच ‘रायबहादूर’ आणि ‘रावसाहेब’ अशा पदव्या देण्यात येत असत. आता तेच लोक आपले कौशल्य दाखवून एतद्देशीय राज्यकर्त्यांकडून पुरस्कार घेत असतात. सैनिक, देश, मातृभूमी, बलिदान, आपल्या शहीदांविषयी वाटणारी आत्मीयता, त्यांचे शौर्य, त्यांच्या धाडसी कारवाईविषयी आदर व अभिमान आणि त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांविषयी शत्रुत्व आणि संताप या भावना म्हणजे त्यांना इमोशनल मूर्खपणा वाटतो. त्यामुळेच पाकिस्तानी कलावंतांविषयीचे त्यांचे प्रेम जरा जास्तच ऊतू चाललेले असते. ते ज्या देशातून आलेले आहेत, त्या देशाचा हात आमच्या नागरिकांच्या व सैनिकांच्या रक्ताने माखला आहे, हे माहीत असूनही हे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसर्‍या कुठल्याही देशात असे घडू शकले असते काय?
अगदी इतक्यातच मी एका इंग्रजी वर्तमानपत्रात, काश्मिरी दहशतवादी बुरहान वाणीच्या वडिलांची तब्बल अर्धा पान मुलाखत वाचली. त्या मनुष्याने एकदाही आपल्या मुलाच्या देशद्रोही कृत्याविषयी एक अवाक्षरही काढले नाही, त्या विषयी कुठलीही खंत व्यक्त केली नाही. एवढेच नव्हे, तर त्याची तुलना भगतसिंगांशी केली! मी, त्या वर्तमानपत्राने कधी अशा सैनिकाची मुलाखत घेतल्याचे पाहिले नाही, जो आपल्या प्राणाची पर्वा न करता सीमेवर शत्रूशी दोन हात करतो. ज्या वेळी भारतावर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ले होत आहेत आणि भारतीय सैनिक शहीद होत आहेत, नेमक्या त्याच वेळी भारतीय वर्तमानपत्राने पाकिस्तानी दहशतवादाच्या समर्थनार्थ एका दहशतवाद्याच्या वडिलांची प्रदीर्घ मुलाखत छापण्याचा काय उद्देश असू शकेल? इतक्यातच कोलकाता येथील इंग्रजी वर्तमानपत्राने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त बासित यांची मुलाखत प्रकाशित केली. यात त्यांनी पुन्हा भारतावर टीका केली. ‘‘आपण कुणासोबत राहू इच्छिता हे जम्मू-काश्मीर येथील नागरिकांना विचारले पाहिजे,’’ असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र, कोलकात्यातील त्या निर्भीड आणि ‘स्वतंत्र’ पत्रकाराने बासितला हे विचारण्याची हिंमत नाही केली की, ते हीच अट पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरलाही लागू करीत आहेत काय? एवढेच नव्हे, तर जेव्हा भारताला पाकपुरस्कृत दहशतवादाच्या मुद्यावर जागतिक स्तरावर पाठिंबा मिळत होता तेव्हा चंदीगड येथील एक इंग्रजी दैनिकाने असा एक लेख प्रकाशित केला, ज्यात म्हटले होते की, ‘सध्या पाकिस्तानला जगातील देशांचा, ज्यात अमेरिका, चीन आणि रशियाचा समावेश आहे, प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि भारत जागतिक मुत्सद्देगिरीत एकटा पडला आहे.’
खोट्या संदर्भांचा आधार घेऊन, तर्काची ओढाताण करून कुटिल बुद्धीने लिहिलेला तो लेख वाचून आम्ही भारतातील नव्हे, तर पाकिस्तानचे ‘डॉन’ अथवा ‘पाकिस्तान टाईम्स’ हे वर्तमानपत्र वाचत आहोत, असेच जणू वाटत होते!
स्वतंत्र व निष्पक्ष पत्रकारितेचे आम्ही सर्वच समर्थन करतो. सत्ताधारी पक्षाच्या धोरणाला ठाम विरोध करणे, अथवा टीका करणारे लेख आणि संपादकीय लिखाण करणे पत्रकारितेच्या स्वीकारार्ह बाबी आहेत. याच्याशिवाय लोकशाही अपूर्ण आणि आधारहीन मानली जाते. मग आमच्यात आणि हुकूमशहांत काहीही अंतर राहत नाही. मात्र, राष्ट्र आणि समाजाप्रती संवेदनशून्य राहून शत्रूच्या आक्रमणाला वेळोवेळी पाठिंबा दर्शविणे, त्या संदर्भात लिखाण करणे आणि आपल्या देशाप्रती आक्रमक विधाने करणे आणि शत्रू देशाच्या कलाकारांचे आतिथ्य करणे राजकीय आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा भाग राहू शकतो काय? ज्या लोकांनी संसदेवर हल्ला करणार्‍या गिलानीची फाशी रद्द व्हावी म्हणून समिती गठित केली, त्यांनी शहिदांसाठी शोकसभा अथवा श्रद्धांजलिसभेचे एकदा तरी आयोजन केले आहे काय?

तरुण विजय