संघ संस्कारात राष्ट्रनिर्मितीची ताकद •

• संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्षाचा समारोप

0
191

डॉ. श्रीराम कोल्हे यांचे प्रतिपादन
अमरावती, ५ जून 
ध्येयासाठी सतत प्रयत्नशील असलेले स्वयंसेवक घडविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निरंतर करीत आहे. संघाच्या संस्कारात राष्ट्रनिर्मितीची ताकद असून हे संस्कार सर्वांनी आत्मसात करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. श्रीराम कोल्हे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्षाचा समारोपीय समारंभ सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी स्थानिक टायटन्स पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर झाला. त्यावेळी डॉ. कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत संघचालक दादाराव भडके, प्रमुख वक्ते विदर्भ प्रांत सहकार्यवाह अतुल मोघे, जिल्हा संघचालक चंद्रशेखर भोंदू, यवतमाळ जिल्हा सहसंघचालक व वर्गाधिकारी प्रदीप वडनेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर वर्गाचा समारोप होत आहे. वर्गासाठी आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाने पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून यंदाच्या वर्षापासून मातीच्याच मूर्ती स्थापन करण्याचा निर्धार करावा. सोबतच शारीरिक समृद्धीही आवश्यक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक वर्गाधिकारी प्रदीप वडनेरकर यांनी केले. त्यांनी २० दिवसांच्या वर्गातील उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी ध्वजारोहण, प्रार्थना, सांघिक गीत झाले. त्यानंतर संघशिक्षा वर्ग प्रथम वर्षात सहभागी झालेल्या ३१० स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. समारंभाला माता, भगिनी, बंधू व शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
वर्ग संचलन टोळी
संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्ष संचलन टोळीत वर्गाधिकारी प्रदीप वडनेरकर (यवतमाळ), वर्ग कार्यवाह कमलेश भट (दर्यापूर), पालक अधिकारी अनिल सांबरे (नागपूर), मुख्य शिक्षक अमित तुरणकर (पांढरकवडा), सह मुख्यशिक्षक मनोज भारसाकळे (अकोट), बौद्धिक प्रमुख सोमेश शर्मा (बोरगाव मंजू), सह बौद्धिक प्रमुख विजय पुंडे (शेगाव), सेवा प्रमुख विनोद श्रीरामे (उमरखेड), सह सेवाप्रमुख प्रकाश निकोडे (नवरगाव), व्यवस्था प्रमुख दत्तात्रय रत्नपारखी (अमरावती), सह व्यवस्था प्रमुख श्याम निळकरी (अमरावती), प्रांत सहप्रचारक गणेश शेटे (अकोला), प्रांत सह शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी (नागपूर), प्रांत सह बौद्धिक प्रमुख गुणाकार देशपांडे (आष्टी), चंद्रपूर विभाग प्रचारक सुनील मेहर, भंडारा विभाग प्रचारक राहुल चव्हाण, अमरावती विभाग प्रचारक भाईजी मेहर यांचा समावेश होता. (तभा वृत्तसेवा)
देशभक्ती जीवनाचा अविभाज्य घटक व्हावी : मोघे
प्रमुख वक्ते अतुल मोघे यांनी स्वावलंबी व स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी संघ सदैव प्रयत्नशील आहे. समरसतायुक्त वातावरण समाजात निर्माण होणे अत्यंत आवश्यक असून सर्वांच्या प्रयत्नाने ते शक्य आहे. प्रासंगिक देशभक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. त्यापेक्षा देशभक्तीच जीवनाचा अविभाज्य घटक कशी होईल, यासाठी सदैव जागृत असले पाहिजे. पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी संस्कारांसोबतच दृष्टिकोणही बदलविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. माता व पुत्राच्या भावनेतून पर्यावरणाचा र्‍हास थांबण्यास मदत होईल. गौमातेसंदर्भातला वाद चुकीचा असून ते एक प्रकारचे सामाजिक पाप आहे. गौमातेच्या आडून मर्दुमकी दाखविणार्‍यांनी तिचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.