गजल गायक सुरेश दंडे ऑस्ट्रेलियात सन्मानित

0
152

स्वा. सावरकर विश्‍व संमेलनाला निमंत्रित
‘गे मायभू तुझे मी’ गीतातून रसिकांना जिंकले
अमरावती, ७ जून 
येथील प्रख्यात संगीतकार व गजल गायक सुरेश दंडे यांच्या मुखातून ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे’ या सुरेश भटांच्या मातृभूमी गीतातील ओळी कानावर पडल्या अन् ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आयोजित विश्‍व संमेलनाला उपस्थित प्रत्येक मराठी माणूस भारावून गेला.
२८ मे रोजी सिडनी येथे चौथ्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्‍व संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातून काही खास मान्यवरांना या संमेलनाला निमंत्रित करण्यात आले होते. यात अमरावतीतील गजल गायक सुरेश दंडे यांचा समावेश होता.
सिडनी येथील मराठी असोसिएशन व जागतिक सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय सुरेश दंडे यांनी ‘आम्ही पुत्र अमृताचे’ हे देशभक्तिपरगीत सादर केले. कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांनी खास मराठमोळे पसायदान सादर करून रसिकांची मने जिंकली.
ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड येथील मराठी लोकांचा हा संयुक्त सोहळा दिमाखात पार पडला.
या संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे व डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनीही विचार मांडले.  ऑस्ट्रेलियातील कलाकारांनी सादर केलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गीते हे या संमेलनाचे आणखी एक आकर्षण होते. समारोपीय सोहळ्यात सुरेश दंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. घ(तभा वृत्तसेवा)