आनंदाने जगत जा…

0
82

रमाणूस जगतोच. जगण्यासाठीच सगळी धडपड! पण, मग हे भरणं काय आहे? आपण आपलं आयुष्य भरतोच की… मोठं घर काय,अद्ययावत फर्निचर, सजावटीच्या वस्तू, भारी कपडे, दागिने, हॉटेल्समध्ये आठवड्यातून दोन-तीनदा पार्ट्या, वर्षातून पूर्ण फॅमिलीला घेऊन भारत नाहीतर परदेशात एखादी ट्रिप! आयुष्य गच्च भरलं जातं की एवढ्यानंच! आणि हे सगळं पूर्ण करायला पूर्ण आयुष्य पणाला लागतं त्याचं काय? म्हणजे आयुष्यभर करतो त्यानं भरत नाही का आयुष्य?
कविश्रेष्ठ बोरकर म्हणतात,
‘जगत जा- भरत जा!’ प्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांना त्यांच्या विद्यार्थिदशेत मिळालेला हा बोरकरांचा आशीर्वादपर संदेश! त्यांना जसं या वाक्यानं गोंधळवून टाकलं तसं या वाक्याच्या स्पष्टीकरणानं मला भारावून टाकलं. ‘जगत जा- भरत जा’… खूप अर्थपूर्ण संदेश!
माणूस जगतोच. जगण्यासाठीच सगळी धडपड! पण, मग हे भरणं काय आहे? आपण आपलं आयुष्य भरतोच की… मोठं घर काय,अद्ययावत फर्निचर, सजावटीच्या वस्तू, भारी कपडे, दागिने, हॉटेल्समध्ये आठवड्यातून दोन-तीनदा पार्ट्या, वर्षातून पूर्ण फॅमिलीला घेऊन भारत नाहीतर परदेशात एखादी ट्रिप! आयुष्य गच्च भरलं जातं की एवढ्यानंच! आणि हे सगळं पूर्ण करायला पूर्ण आयुष्य पणाला लागतं त्याचं काय? म्हणजे आयुष्यभर करतो त्यानं भरत नाही का आयुष्य?
मला लहानपणाच्या दोन गोष्टींची अचानक आठवण आली. मला माझ्या आईनं सांगितलेलं केव्हातरी, ‘‘तू कुणाला त्रास दिलास तर देव वरून पाहतो. तो तुला बरोब्बर शिक्षा देईल…’’ आणि ‘‘तू खोटं बोललीस तर तुझ्या आईबाबांना देव शिक्षा करेल…’’ आपण आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करतो. आई आणि बाबा यांच्याभोवतीच तर आपलं आयुष्य फिरत असतं. पूर्ण व्याप्त झालेलं असतं. मग ते भरणं नाही का? लहान असताना काय भरायचं असतं आयुष्यात! आई-बाबा, आजी-आजोबा आणि घरातले मोठे जे सांगतात ते ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं… हे करता करताच लहानपण संपून जातं ना! त्यांना आणि मला देवाची शिक्षा नको व्हायला…
पण, त्या दिवशी खूप वेगळंच घडलं! मी आणि आई भाजी आणायला आणि माझ्यासाठी काही वस्तू घ्यायला बाहेर गेलो होतो. भाजी घेतल्यावर मी आणि आई गाडीजवळ आलो. समोरचे दृश्य पाहून थबकलो. फाटके कपडे घातलेली, मळक्या अंगाची आणि विसकटलेल्या केसांची साधारणत: ८-९ वर्षांची एक मुलगी आमच्या गाडीच्या मीररमध्ये स्वत:ला बघत होती आणि वेगवेगळ्या कोनातून स्वत:कडे आरशात पाहून खुश होत होती. आईने तो आरसा त्या मुलीला दिला, अन् म्हणाली ‘‘घे बेटा, रोज बघ हो स्वत:ला! मात्र आम्हा दोघींना विसरू नकोस! मी त्या पलीकडे राहते. कधी वाटलं तर घरी ये माझ्या!’’ आईने तिला केलेल्या या मदतीमुळे मला तर खूपच भारी वाटलं! त्या मुलीचा आनंदानं उजळलेला चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. आईने आपल्या या कृतीतून काही वेगळं सांगायचा प्रयत्न केला होता का? मात्र, यामुळे मला आईबद्दल अभिमान तर वाटलाच, पण मलाही नेहमीपेक्षा काहीतरी छान मिळालं होतं… यानंतर मला छंदच लागला. आजूबाजूच्या जगातून वेगळी माणसं टिपायला शिकले आणि त्यातून मला काय समजलं हे शोधले!
मुुंबईला लिंकिंग रोडला खरेदी करायला जायचं नाही म्हणजे स्त्रियांनी लिकिंग रोडचा केलेला खूप मोठा अपमान! जोक अपार्ट… खरेदी आटोपून चौकात उभी होते. तेवढ्यात एक सुंदर वळण घेऊन कार थांबली. ७०-८० वर्षांच्या एक म्हातार्‍या आजी उतरल्या आणि त्यांना पाहिल्याबरोबर अनेक पोलिस त्यांच्या दिशेने धावत आले. आजींनी त्या प्रत्येकाला कारच्या डिकीतून पाण्याच्या थंड बाटल्या काढून दिल्या. सगळ्यांना बाय करत त्या निघूनही गेल्या. उन्हाळ्यातल्या रणरणत्या उन्हात असं आपुलकीनं घरून मुद्दाम येऊन पाणी पाजणं, किती सुंदर सेवा! समाजातल्या कुणासाठी आपण काही नि:स्वार्थ सेवा/मदत करावी, हे मनात येणं आणि त्यासाठी मनापासून धडपड करणं केव्हढे भारी! आणि ही मदत त्या आजी दरवर्षी उन्हाळ्यात दररोज करतात. हा अनुभव खूप वेगळा होता. जगण्याचा नवा अर्थ कळणारा. उपयोगित्व सांगणारा! आणि नागपुरातले ते काका? गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून ते हा उद्योग करताहेत. मेडिकल रुग्णालय आशियातलं द्वितीय क्रमाकांचं रुग्णालय! हजारो रुग्ण उपचारासाठी इथे येतात आणि गरीब रुग्णांची संख्या तर कितीतरी जास्त. हे काका दररोज स्वत:च्या परिसरातील पन्नास-साठ घरांतून प्रत्येकी एका माणसाच्या जेवणाचा डबा घेतात व मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी थांबलेल्या रुग्णांच्या गरीब नातेवाईकांना नि:शुल्क वाटतात. रोज हे काम करायचं न थकता. कुठेतरी नाव यावं म्हणून दिखावा न करता अविरतपणे सेवा करणारे हे काका… मला सेवाभावनेची नवी जाणीव करून देणारे! वेगळी माणसं. स्वत:साठी नाही तर इतरांसाठी जगण्याचा संदेश देणारे. नागपुरातली एक शाळा अशीच मला आपल्या वेगळेपणामुळे भावली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरण, प्रत्येक वर्गातला मराठी संस्कृतीचा ठसा मनात उतरवणारा बोलका फळा, स्नेहसंंमेलनात दरवर्षी खूप कल्पकतेने साजरे होणारे प्रदर्शन व कार्यक्रम. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते शालान्त परीक्षेआधी होणारा गायत्री यज्ञ. गरीब किंवा साधारण मध्यमवर्गीय घरातले विद्यार्थी, परंतु प्रत्येकात सभाधीटपणा, नम्रता आणि नवीन शिकण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांना घडवणार्‍या सर्व अध्यापिका अत्यल्प मानधनावर अध्यापनकर्तव्य पार पाडताहेत. तेही निष्ठा, समर्पणभावना आणि सातत्यपूर्ण संस्कारमयी शिक्षण देऊन. ही शाळा, तेथील प्रत्येकाची आपुलकी प्रथमदर्शनीच खूप छान वाटली. असेही काम करणारे लोक या समाजात आहेत? किती वेगळ्या आहेत या शिक्षिका?
आजूबाजूला आपण पाहतो, प्रत्येक क्षेत्रात प्रोफेशनॅलिझम् आणि कमर्शियलायझेशन शिरलंय. पण, या शाळेतल्या अध्यापिका, प्रोफेशनॅलिझम् नक्कीच आहे, पण व्यावसायीकरणाचं नाव नाही! खरंच, या शाळेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात गेले तरी खूप यशस्वी होतील. ज्या विद्यार्थ्यांच्या मनात या शाळेने उत्तुंग ध्येय आणि स्वप्ने रुजवली ते विद्यार्थी पुढेच जातील. शिक्षकांच्या या निष्ठेला आणि कर्तव्यभावनेला अनुभवायला मलाही वेगळं मन लागलं ना.
फक्त मिळेल ते खाणं, हवं तेव्हा खाणं, ऐशोआरामात राहणं म्हणजे फक्त जगणं झालं. प्रवीण दवणे म्हणतात… ‘श्‍वासांना लोंबकळत राहणं!’ पण भरणं या जगण्याला एक आश्‍वस्त व शाश्‍वत सूर देतं. आपण कशासाठी जगायचंय्, माणूस म्हणून या समाजासाठी आपलं उपयोगित्व काय, हे सांगणार, महत्त्वाची दृष्टी देणारं आहे भरणं! हा अर्थ आपल्याला सापडायलाच हवा.
सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिकविण्यातच हे भरणं शोधावं, सर्व ऑफिसेसमधल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या अधिकारक्षेत्रातील सगळे काम योग्य वेळेत, वैयक्तिक स्वार्थ आणि फायदा न बघता पूर्ण करण्यामध्ये हे भरणं शोधावं… सरकारी बाबू अनेकदा कागदी घोडे नाचवून कामे सरळपणे होऊ देत नाहीत. ज्या सामान्य जनतेच्या विश्‍वासावर हे सगळे सरकारी कार्यालय, बँका, इन्शुरन्स ऑफिसेस, शिक्षणसंस्था, नाट्यगृहे चित्रपटगृहे, मॉल्स, दुकाने, दळणवळणाची साधने सुरू आहेत. त्यांना जास्तीत जास्त लाभ/सुविधा व समाधान देऊन त्यांच्या मनाला आनंद देणं म्हणजेच भरणं होय, हे लक्षात घ्यायला हवं!
फक्त स्वत:, स्वत:चे कुटुंब, स्वत:च्या पोराबाळांच्या भविष्याची चिंता व त्यासाठीचीच काळजी. यापेक्षाही समाजातील दुर्लक्षित घटकांचे आपणही काही देणे लागतो, याची जाणीव सतत मनात जागती ठेवणं व त्यानुसार काम प्रामाणिकपणे करून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणं म्हणजे जगणं! आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जगणंच त्याग आणि समर्पण भावनेद्वारे शिकविले गेले आहे. ही भावना समर्थ आणि समाधान नांदणार्‍या घरांमधून लहानग्यांमध्ये निर्माण केली जाते. कुटुंब हे समाजाचं लहान रूप आहे. समाजात राहण्याचं/वागण्याचं बाळकडू मिळतं ते कुटुंबातच!
शेतकरी मनापासून तुमच्या-आमच्यासाठी शेतात राबतो, मात्र, दलाल त्याचा माल स्वस्तदरात विकत घेऊन महाग दराने शहरांमध्ये विकतात. केळी/फळे लवकर पिकावी म्हणून घातक रसायने वापरून सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतात. त्यांनी मिळविलेला हा पैसा खरं तर पुढे आयुष्यात त्यांना खूप घातक ठरतो… म्हणूनच प्रत्येकाला जगण्याबरोबर भरणं कळणं खूप महत्त्वाचं! मनातल्या स्वत:च्या क्षणिक आर्थिक फायद्यासाठी इतरांच्या जिवाची पर्वा न करणार्‍या या विषाला जेव्हा मनातून काढून टाकणं जमेल तेव्हाच भरणं कळेल! चला तर जगत जाऊ या, भरतही जाऊ या!
– उज्ज्वला पाटील
७५८८७४३७२४