वास्तव

0
95

मेट्रोतल्या बायका
आपल्या गाण्याची पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर श्रद्धानं आपलं गाणं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आणि लगोलग आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपल्या अकाऊंटवर टाकलं. लगोलग आपल्या सेल्फीज घेऊन त्याही तिनं आपल्या अकाऊंटवर टाकल्या. सध्या सुट्या सुरू होत्या. दहावी-बारावीचे निकाल लागायला सुरुवात झाली होती. आता काही दिवसांतच आपल्या बी.ए.च्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर होईल, मग पुन्हा कॉलेज सुरू होईल, तोवर धमाल करावी झालं! श्रद्धानं विचार केला होता. गेल्या वर्षी यांच दिवसांत आपल्याहीकडे निकालाची धामधूम होती. मंतरलेले दिवस होते ते. निकाल लागेतो नुसती हुरहूर वाटत होती, जिवाची किती घालमेल चालली होती. बारावीचा आपल्या मनासारखा निकाल लागला, सगळ्या विषयांत भरघोस गुण मिळवले म्हणून आपल्यावर नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आई-बाबांनी खुश होऊन एक महागडा स्मार्टफोन घेऊन दिला होता, ज्याचा आपण त्या दिवसापासून आजतागायत पुरेपूर उपयोग करीत आलोय्. कित्ती कित्ती चांगले आहेत आपले आई बाबा… बाबांचा मोबाईल फोन तर पाच-सहा वर्ष जुना आहे आणि आईचा तर विचारायला नको… बाबांचाच आधीचा हँडसेट आई वापरतेय. तिचं म्हणणं मला काय करायचाय नवा मोबाईल हँडसेट… विचार करता करता श्रद्धानं आपल्या दोन्ही पोस्ट्सना किती ‘लाईक’ मिळाले आहेत हे तपासलं. एकाही मित्रमैत्रिणीनं तिच्या गाण्याची अथवा सेल्फीची दखल घेतली नव्हती. कुणीच तिच्या पोस्ट्स लाईक केल्या नव्हत्या, मग त्यावर कॉमेंट्स दूरच राहिल्या. ती थोडीशी हिरमुसली झाली. कदाचित कुणीच अजून उठले नसतील, उशिरापर्यंत आपण सगळे चॅटिंग करत असतो सोशल नेटवर्किंग साईटवर. आपल्या घरी नियम आहे लवकर उठण्याचा, मग गाण्याचा रियाझ, थोडा व्यायाम… इतरांकडे तसं नाही. त्यामुळे असेल कदाचित! तिनं स्वत:ची समजूत घातली.
‘‘अगं श्रद्धा, तुझ्या आवडीचा उपमा केलाय नाश्त्यात, तरी आज खाण्याकडे लक्ष नाहीये तुझं. काय बिनसलंय?’’ आईनं तिला अखेरीस हटकलं. सकाळपासून तिचं कशातंच मन रमत नाहीये, हे तिच्या चाणाक्ष नजरेनं हेरलं होतं. पूजा संपवून बाबांनीही उपम्याची बशी हातात घेतली आणि उपम्याला दाद देत त्यांनीही प्रश्‍नार्थक नजरेनं श्रद्धाकडे पाहिलं. ‘‘मित्रमैत्रिणींपैकी कुणी काही बोललं का तुला? मलूल दिसते आहेस. झोप नाही का झाली नीट?’’ बाबांनी काळजीनं विचारलं. आपल्या बाबांसारखे बाबा खूप कमी लोकांना मिळतात. आईची माया आणि वडिलांची प्रेमळ शिस्त असा दुहेरी संगम आहे त्यांच्यात, कधी कुणावर रागवत नाहीत, कुणाला वाईट वाटेल असं बोलत नाहीत, आपलं म्हणणं अगदी शांतपणे दुसर्‍याला समजावून सांगतात, दुसर्‍याची चूक असेल तरी सावरून घेतात. मुंबईतल्या ऑफिसात, महत्त्वाच्या पोस्टवर आहेत… एका पैशाचाही गैरव्यवहार त्यांनी केला नाही… करणारही नाहीत. श्रद्धाच्या मनात आलं. माझा बाबा! आय लाईक यू सो मच… श्रद्धानं एकदम हळवं होत म्हटलं. ‘‘बाबा, मी माझ्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या अकाऊंटवर गाणं रेकॉर्ड करून पोस्ट केलं, माझा छानसा फोटो पोस्ट केलाय, पण कुणीच त्याला लाईक केलं नाही, काहीच कॉमेन्ट केली नाही. बाबा, तुझा आणि आईचा अकाऊंट बनवून मीच तुम्हा दोघांच्या नावे माझा फोटो आणि माझं गाणं आवडलं असं लिहू का?’’
‘‘अगं पण आम्हाला आवडतं ना तुझं गाणं! कॉलेजमध्ये सगळे कौतुक करतात ना? झालं तर मग! बाबांनी म्हटलं, मघा किती छान गात होतीस, तुझी तंद्री भंगू नये, म्हणून मी बोललो नाही काही!’’
‘‘त्याचं काय एवढं मनाला लावून घेते आहेस. त्या आभासी जगातलं वास्तव हेच खरं असं मानून चाललीस, तर कसं होईल?’’ बाबांचा जेवणाचा डबा, त्यांची ऑफिसची बॅग वगैरे सगळी तयारी करून आईही त्यांच्या संभाषणात सहभागी झाली. सध्या वर्तमानपत्रांमध्ये या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आभासी जगात वावरणार्‍या आणि ते आभासी जग हेच वास्तव आणि हे वास्तव जग हे जणू आभासी असल्यागत वागणार्‍या तरुणाईबद्दल खूप वाचायला मिळतंय. आई म्हणाली, ‘‘कुणी त्यावर आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहितो आणि गळफास लावून घेतल्याचे फोटो टाकतो. कहर म्हणजे त्यालाही नं बघता -वाचता लाईक करणारे निघतात. एवढ्या-एवढ्याशा गोष्टींनी निराश होण्यासाठी जीवन असतं का आणि क्षुद्र प्रॉब्लेम्समुळे आपला जीव देण्याइतका जीव क्षुद्र असतो का कुणाचा? पण या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आभासी जगाच्या आहारी गेलेल्या मुलांना कोण सांगणार?’’
‘‘बघतो ना ऑफिसमधल्या अनेकांना, त्या सोशल नेटवर्किंग साईटवर तासन्‌तास लोक पडलेले असतात, कुणी निरर्थक काहीबाही लिहिलं, तरी त्याला प्रतिसाद देणं आपलं कर्तव्य असल्यासारखे ते लोक त्यावर प्रतिक्रिया देत असतात, शिवराळ, अर्वाच्य, न शोभणारी भाषा, न शोभणारा आविर्भाव, सामाजिक संकेतांनुसार असभ्य, त्याज्य असलेले विषय… सगळं ऐकूनच कसंतरी वाटतं. मग त्या आभासी जगातल्या आभासी भांडणाचं पर्यवसान कधी कधी खर्‍याखुर्‍या भांडणात होतं, त्या क्षुद्र, निरर्थक आणि आभासी गोष्टींमुळे त्यांना झालेला मनस्ताप इतका मोठा असतो, की त्यांचं कामातही लक्ष लागत नाही,’’ बाबा म्हणाले.
मी जरी सोशल नेटवर्किंग साईटवर नसले तरी वर्तमानपत्रांत त्यावर बरंच वाचते. मध्ये एक कार्टून होतं. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंतिम दर्शनासाठी केवळ दोनच व्यक्ती आलेल्या आहेत, त्या आपसात बोलताहेत, की याला तर दोन हजार फ्रेण्ड्स होते! आई म्हणाली, कधीकधी मला प्रश्‍न पडतो. इतक्या हिरिरीनं आणि तावातावानं सोशल नेटवर्किंग साईटवर सतत व्यक्त होत असलेली ही माणसं घरी बायकोला मदत करीत असतील का? भाजी वगैरे आणून देत असतील का? भाजी चिरून देत असतील का? मुलांचे अभ्यास घेत असतील का? की आपला बहुमूल्य वेळ प्रत्यक्ष कुटुंबीयांसमवेत, मित्र, आप्तेष्टांसमवेत घालवण्याऐवजी त्या आभासी वास्तवात व्यतीत करण्यात त्यांचं आयुष्य चाललंय? आई म्हणाली, कोणीही यावे, टिकली मारोनी जावे खेळायचो आम्ही लहानपणी, तसं!
‘‘तू आणि आई मिळून बाहेर भटकून या, काही हवं असेल तर घेऊन या, म्हणजे मग कुणी आपलं गाणं लाईक केलं नाही, फोटोवर काहीच कॉमेन्ट केली नाही वगैरे विसरशील! जा दोघी एन्जॉय करून या आज मग तुझं कॉलेज सुरू होईल.’’ बोलता बोलता दार उघडून बाबा ऑफिसला निघाले. लिफ्टची वाट पाहू लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या फ्लॅटमधल्या काकू बाहेर आल्या.
‘‘श्रद्धा, सकाळी काय सुरेख गाणं म्हटलंस गं! बाल्कनीत होते मी. लक्ष देऊन गाणं ऐकलं तुझं. खूपच आवडलं मला. म्हणजे मी राजा, राणी वगैरे असते ना, तर गळ्यातला मोत्यांचा कंठा काढून बक्षीस म्हणून दिला असता तुला… तूर्तास मी इडली-सांबार करून आणलाय तुझ्यासाठी. इडली आवडते ना तुला खूप, म्हणून!’’ काकू म्हणाल्या तशी लिफ्टमध्ये शिरणारे बाबा कौतुकानं हसले आणि त्यांना टाटा करायला दाराबाहेर आलेली श्रद्धाही.
‘‘हे खरं लाईक, बरं का श्रद्धा!’’ आई म्हणाली आणि तिनं शेजारच्या काकूंचं स्वागत केलं. त्यांच्या गप्पा रंगल्या, तोवर श्रद्धाच्या पोस्ट्सवर अनेक ‘लाईक’ आले होते आणि मित्रमैत्रिणींपैकी अनेकांच्या भावंडांचे निकाल चांगले नं लागल्यामुळे दु:खी असल्यामुळे श्रद्धाच्या पोस्ट बघितल्या नसल्याबद्दलची दिलगिरी तिच्या मित्रमैत्रिणींनी व्यक्त केली होती.
त्यांच्या पोस्ट्सना नंतर उत्तर देऊ या म्हणत श्रद्धानं मोबाईल ठेवून दिला आणि काकूंच्या आग्रहाखातर,तयार केलेलं आणखी एक चांगलंसं गाणं ती गाऊ लागली.
आभासी आणि वास्तव अशा दोन्ही समांतर जगात महानगर वावरू लागलं.
०००
सुनंदाचा आज बारावीचा निकाल लागणार होता. शिक्षण घेत असलेली सुनंदाच्या कुटुंबीयांपैकीची ती पहिलीच मुलगी होती. दस्तुरखुद्द तिच्या मोठ्या भावाने शाळेत जाणं आवडत नाही म्हणून अनेक वर्षांपासून शाळा सोडून दिली होती आणि मुंबईतल्या त्या झोपडपट्टीतल्या इतर उनाड मुलांसमवेत तो वेळ वाया घालवत होता. सुनंदानं त्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा अनेकवार प्रयत्न केला होता, पण तो विफल ठरला होता. सुनंदाची मात्र खूप शिकण्याची इच्छा होती आणि आईवडिलांच्या विरोधाला नं जुमानता, त्यांना गोडीगुलाबीनं राजी करून तिनं शिक्षणाची आपली आवड अनेक अडथळे येऊनही जोपासली होती. मुळात रोजंदारीवर हमाली करणारे वडील आणि चार घरी केरवारे-भांडी घासण्याचं काम करणारी आई यांची मिळकत फार नव्हती, त्यामुळे शिक्षणावर पैसे खर्च करण्याचा प्रश्‍नच येत नव्हता. पण आपल्या अंगभूत हुशारीनं सुनंदानं फी माफी आणि विज्ञानाची, गणिताची पुस्तकं कॉलेजकडून मिळवली होती. घरकाम सांभाळून गणिताचे कठीण प्रश्‍न ती लीलया सोडवते, याचं तिच्या गणिताच्या प्राध्यापकांनाच खूप कौतुक होतं.
‘‘सुनंदा, तुजा बारावीचा निकाल हाये म्हनं!’’ तिच्या भावानं उनाडक्या करायला निघण्यापूर्वी तिला विचारलं. ‘‘हाये, पन आपल्याकडं कुटं निकाल बगायची सोय हाये!’’ परस्पर तिच्या आईनं उत्तर दिलं. ‘‘आरं गावगप्पा करीत हिंडतु त्यापरीस कामधाम करून मोबाईल घेतला आसता…’’ तिच्या आईनं केव्हाच नजरेआड झालेल्या पोराबद्दल स्पष्ट नाराजी दर्शवली.
‘‘आई, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले असते माझा निकाल बघायला, पण तिचाच निकाल चांगला नसेल, तिला कमी गुण मिळाले असतील तर आपल्यालाच बरं वाटणार नाही ना! कॉलेजमधून कळेल की आज उशिरापर्यंत किंवा उद्या…’’ तिनं म्हटलं .तेवढ्यात झोपडपट्टीच्या त्या बोळीत तिला ओळखीचा चेहरा दिसला. गणिताच्या प्राध्यापकांना तिथे बघून तिला कमालीचं आश्‍चर्य वाटलं.
‘‘सर तुम्ही, इथे?’’ तिनं विनम्रपणे त्यांना विचारलं.
आपल्या अभ्यासू विद्यार्थिनीनं बारावीत गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याचं कळलं, म्हणून तडक पत्ता शोधत आलो कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी. उत्तम गुण मिळवले आहेस इतर विषयांतही. पेढे घ्या. भांबावलेल्या सुनंदाच्या आईला सरांनी पेढ्यांचा छोटासा बॉक्स दिला, तेव्हा तिच्या तोंडून शब्द फुटेना. ‘‘सर याना घरात…’’ भानावर येऊन सुनंदानं त्यांना म्हटलं. ‘‘सुनंदा, आईबाबांना घेऊन कॉलेजमध्ये ये. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम करायचंय कॉलेजमध्ये. त्याचं हे आमंत्रण.’’ सरांनी आमंत्रणपत्र सुनंदाच्या आईला दिलं आणि ते त्यांचा निरोप घेऊन निघाले.
‘‘सुनंदे, लय गुनाची पोर…’’ सुनंदाच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले.
‘‘ह्यो मोबाईल माह्याकडून सुनंदेले इनाम… मारला न्हाई कोनाचा… येका मोबाईल इकनार्‍या दुकानात काम करून र्‍हायलो आट दिसाधरनं… त्याईले सांगितलं व्हतं त्याईनंच उधारीवर देल्ला. पगारातून कापून घेतीन पयशे थोडेथोडे. सिम भी हाये आन इंटरनेट भी हाये त्येच्यात. आता निकाल सोताच्या मोबाईलवर पाह्यजो!’’ अनपेक्षित रीत्या धावत आलेल्या सुनंदाच्या भावानं तिच्या हातात मोबाईल ठेवला, तेव्हा तिला गलबलून आलं. त्यानंच पुढाकार घेऊन तिचा निकाल सगळ्यांना दाखवला, तेव्हा त्या झोपडीत उत्सवाचं वातावरण होतं आणि प्रत्येकाच्या डोळ्यातलं सुनंदाबद्दलचं कौतुक आनंदाश्रूंच्या रूपात पाझरत होतं. महानगरातलं वास्तव आणि आभासी जग आपापल्या जागी स्थित होतं.
– रश्मी घटवाई
९८७१२४९०४७