अर्ध्यावरचा डाव

0
79

एका बाजूला आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. एक जरी चाक विसकटले की सर्व संसार विसकटतो; परंतु या सर्व बाबी बोलण्यापुरत्याच राहून जातात आणि मोठ्या थाटामाटात केलेला सोहळा सर्व दु:खावर पाणी फेरून जातो. याचे एकमेव उदाहरण म्हणजे हुंड्याच्या नावाखाली मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ होय.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन कित्येक वर्षे झाली. तरीसुद्धा या भारतीय समाजातील हुंडा पद्धती अजूनपर्यंत थांबलेली नाही. हुंडा ही या भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या भारत देशात अनेक हुंडाविरोधी कायदे झाले असले तरीसुद्धा हुंडा घेणारे आणि हुंडा देणारे या विषयावर बोलायला तयार नाही याला काय म्हणावे! ‘‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’’ या विधानाखाली मुलींच्या जीवनाची राखरांगोळी करायला तयार आहेत. उद्देश एकच की, माझ्या मुलीचे संपूर्ण आयुष्य सुखी आणि संपन्न जावो ही त्यामागची पार्श्‍वभूमी आहे; परंतु एखादे वेळेस थोडे जरी कमी जास्त झाले तर मग पोलिस स्टेशनच्या चकरा टाकत फिरतात व तेथूनच हुंडा पद्धतीचे खरे स्वरूप उलगडायला सुरुवात होते. एका बाजूला आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. एक जरी चाक विस्कटले की सर्व संसार विस्कटीत होतो; परंतु या सर्व बाबी बोलण्यापुरत्याच राहून जातात आणि मोठ्या थाटामाटात केलेला सोहळा सर्व दु:खावर पाणी फेरून जातो. याचे एकमेव उदाहरण म्हणजे हुंड्याच्या नावाखाली मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो. तेव्हा वधुपित्याची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते. याला कारणसुद्धा तेवढेच सबळ आहे. ते म्हणजे लपूनछपून देण्याघेण्याचा व्यवहार होय. आपल्या भारतीय समाजात सध्या लग्न सोहळ्याचा हंगाम खूप आनंदाने व मौजमजेने सुरू आहे. परंतु जेव्हापासून मुलीचे लग्न ठरते तेव्हापासून वधुपित्याची तारांबळ आपण पाहतो. मोठ्या आनंदाने व मौजमजेने आपल्या स्वत:जवळ जमवलेली रक्कम वधुपिता वरपित्याला दान म्हणून देतो व तेथूनच लग्नाची तयारी जोर धरायला लागते. लग्नामध्ये पत्रिका छापण्यापासून तर खानावळीपर्यंत संपूर्ण लग्नच वधूपित्याला विकत घेतल्यासारखे वाटते. घरचे सर्व पाहुणे रावळे आपापल्या घरी गेल्यावर वधूपिता सुटकेचा नि:श्‍वास टाकतो व बरं झाले एकदाच लग्न पार पडलं म्हणून आपल्या पुढील योजनेला सुरुवात करतो. परंतु आपण दिलेल्या हुंड्याचा स्वत:वर व समाजावर काय असर पडतो याचा विचार करायला थोडीसुद्धा उसंत मिळत नाही. आपल्या मुलीकडे काय चालू आहे हेसुद्धा कळत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे मुलीला दिल्याघरी सुखी रहा ही शिकवण दिलेली असते. त्यामुळे मुलीचा वरपक्षाकडून शारीरिक व मानसिक छळ चालू असला तरी मुलगी मी सुखीच आहे, हे आपल्या आईवडिलांना सांगते व जेव्हा नाकातोंडात पाणी जायला लागते तेव्हा हळूहळू सर्व गोष्टी समोर यायला लागतात व त्यातूनच एक मानसिक धक्का मुलीच्या आईवडिलांना बसतो. त्याचा मागोवा घेतला असता आपली मुलगी किती दु:खात व कष्टात जीवन जगत आहे हे कळत असूनसुद्धा वधुपिता या नात्याने बर्‍याचशा गोष्टी बोलता येत नाही. कारण संपूर्ण आर्थिक क्रयशक्ती पणाला लावून मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पाडलेला असतो. जेव्हा मुलगी एखाद्या वेळी आपल्या वडिलांच्या घरी येते तेव्हा आईबाबा मुलीची व्यथा ऐकून ढसाढसा रडू लागतात. याचे कारण म्हणजे मुलीकडचे सासू, सासरे, नातेवाईक व नवरा मुलगा वारंवार पैशासाठी मुलीकडे तगादा लावतात. तेव्हा आईबाबा मूग गिळून बसतात व आपल्याजवळ जे काही आहे ते मुलीला देतात आणि नवर्‍या मुलाकडे पाठवतात. या सर्व बाबींचा विचार केला असता त्याच्यामागे एकमेव कारण म्हणजे लपूनछपून केलेला व्यवहार होय. मग तो पैशाच्या स्वरूपात असो किंवा वस्तूच्या स्वरूपात असो आणि डोळे उघडून संपूर्ण समाज या घटनाक्रमाकडे पाहत असतो, परंतु बोलायला कोणीही तयार हात नाही. कारण प्रत्येकाला असे वाटते की, कोण कोर्टकचेरीच्या कचाट्यात जाईल आणि त्यातूनच हुंडा ही एक जीवघेणी सामाजिक समस्या तोंड उघडत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर भरलेले संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. या हुंड्यासाठी मुलीला नवरा मुलगा धगधगत्या ज्वालामध्ये ढकलून देतो, विष पाजून हत्या करतो, पाण्यात बुडवतो, कधी कधी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. या सर्व बाबी आज आपण वर्तमानपत्र, दूरदर्शन व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून पाहताना आपल्या अंगावर शहारे येतात. या सर्व घटना घडतात तेव्हा थोड्या वेळासाठी आपण या सर्व बाबींच्या विरोधात एकवटतो आणि काही दिवसानंतर विसरून जातो. याला काय म्हणावे हे नक्की कळतच नाही. सरकारने हुंडाविरोधी कायदा करूनसुद्धा कोणीही समोर यायला तयार होत नाही. याची मनाला खंत लागते. अनेक संघटना, युवक, हुंडाविरोधी अभियान राबवूनसुद्धा सर्वसामान्यांचे डोळे का उघडत नाही? मग याला प्रथा-परंपरा म्हटले तर काय वावगे आहे? परंतु प्रथा आणि परंपरा जर आपण समजलो तर ही जीवघेणी प्रथा अशीच चालू राहील आणि त्याचे स्वरूप व्यापक होऊन भारतीय समाज संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही. हुंडा या ज्वलंत सामाजिक समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी समाजातील सर्व संघटना एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. नाहीतर उच्च आणि या सुशिक्षित समाजाची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. शालेय स्तरापासून उच्च वर्गापर्यंत नाटिका, नक्कल, एकपात्री, अभिनय, पोवाडे, भारूड या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमातून हुंडाबंदीवर आसूड ओढले जातात. तरीसुद्धा भारतीय समाज आजपावेतो जागृत झाला नाही. हुंडा घेणे आणि हुंडा देणे याला केवळ प्रतिष्ठा समजत आहे; परंतु जेव्हा प्रतिष्ठा मलीन होते व त्याचे परिणाम दिसायला लागतात तेव्हा खरे स्वरूप समोर येते. म्हणून अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. स्त्री आणि पुरुष समानतेचे धोरण स्वीकारायचे असेल तर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, धर्म, प्रथा बाजूला सारून या जीवघेण्या प्रथेपासून संपूर्ण मुळासकट सुटका करून घ्यायची असेल तर स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून एका मानसिक तयारीने, नव्या उमेदीने उभे राहू या व हुंडा या सामाजिक समस्येचा नायनाट करू या.
दिलीप मा. केने
९४२३४१०४७९