कौतुकाची थाप !

0
117

कौतुक तीनच अक्षरांचा शब्द, पण विलक्षण ताकदीचा! कोणी कितीही नाही म्हणत असले, तरी हवाहवासा वाटणारा. शब्दांतच सामर्थ्य. कौतुकाची थाप पाठीवर पडली की, केलेले सगळे श्रम, आलेल्या अडचणी विसरून आणि नवीन हुरुपाने उद्याची स्वप्ने बघण्यात माणूस गुंग होतो.
कौतुकातून स्वप्न, स्वप्नातून सत्य, सत्यातून सचोटी, त्यातून आयुष्य, नागरिक, जबाबदारी, हित नाही संपणार. व्याप्ती मोठी. अगदी बालपणापासून तर मरणाच्या शय्येपर्यंत याला बंधनच नाही. त्याआधी टेन्शन, कौतुक. आधीचा तीनच अक्षरी सतावणारा शब्द, परस्परसमन्वय. विद्यार्थिदशेत विद्यार्थी व पालक दोघांनाही टेन्शन व फळ मिळाल्यावर तसूभर जास्तच आनंद विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच. कारण, एका विशिष्ट वळणावर ज्यांना पाऊल ठेवायचं, कर्तृत्वाची उंची गाठायची व त्यासाठी आपल्या हाताचा अभ्यास आपणच करावा.
हात म्हणजे माणसाच्या मनाचा आरसा आहे. जशी बुद्धी तसेच करीअर, नीतिमत्ता, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्य… सगळेसगळे हातावर लिहिलेले असते, फक्त ते वाचणाराच पाहिजे. आपल्या हातात अन् मनगटात जोर असेल, तर उंच यशोशिखर गाठायला वेळ लागत नाही. काम करा, कष्ट करा. आजकाल एक समस्या सतत सतावते- डिप्रेशन, औदासीन्य बघता ना तुम्ही. ऍडमिशन कार्ड आले नाही, आत्महत्या. नापास झाले, आत्महत्या. काय जिवाचा खेळ… आपण खेळभांड्यातले का आहोत, एवढं जीवन स्वस्त आहे? आज संयमच संपलेला आहे. ही वृत्ती म्हणजे पळवाट होय. असे औदासीन्य काय कामाचे? हा एकच मार्ग आहे का? अनेक मार्ग आहेत.
‘ज्यांच्या हाती शून्य होते’ हे पुस्तक वाचा, मार्ग गवसेल, समजेल तुम्हाला. अशी अनेकविध पुस्तके ‘थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा.’ आत्महत्येचे कुणी कौतुक करणार नाही. हळहळ वाटणं हे कमीपणाचं लक्षण नाही का? अशी आपल्या आयुष्याची हळहळ का वाटू द्या? तुमच्यात किती दडलेलं आहे, बाहेर काढा, शोध घ्या, लिहा. तुमच्यातले चांगले-वाईट गुण बघा. तेव्हा चांगले गुण लिहायला बसता ना, तेव्हा चांगल्या गुणांचा आलेख भरत जातो. वाईट त्यामानाने कमी. मग अंदाज येतो. वाईट गुणांना चांगल्यात बदलण्याचा प्रयत्न करा की पाहा, दिशाच गवसेल!
देशाच्या भावी पिढीचे नागरिक, पळवाट शोधताना वाईटापासून पळा. पण चांगले घ्या, चांगलेच करा, चांगलेच होईल. अपयशाने आत्महत्या हा मार्ग नाही. परीक्षा, नोकरी हे नंतरही मिळविता येईल. पण, गेलेले आयुष्य पुन्हा मिळणार नाही व याचे कौतुकही चांगले. कौतुक नेहमी चांगल्या गोष्टीचे ना, मग व्हा तयार. अब्राहम लिंकनचे उदाहरण घ्या. नऊदा अपयशी झाले, परंतु दहाव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेच!
शोधा शोधा, पकडा पकडा, घडवा घडवा. करा. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.’ हीच नीती आत्मसात करा. तर खरे कौतुकास पात्र. ते कौतुक लाखमोलाचं. तुमच्यातच सर्व, तुम्हीच दाखवा करून. ‘महाजनो येन गत: स पंथ:’ कौतुकाची थाप हवी असेल, तर घडवा करीअर अमाप…
– डॉ. कल्पना पांडे
यवतमाळ