मालिकांमध्ये सौजन्य नाहीच

0
183

मालिकांच्या अवास्तव आणि पोकळ कथा मनाला भिडत नाही. संस्कार आणि लोकजागृती फार दूरचा पल्ला झाला, पण सवंग करमणूक म्हणूनसुद्धा वेळ कसा तरी घालविण्यापलीकडे यातून काहीच निष्पन्न होत नाही. यापैकी बर्‍याच मालिकांचा नायक किंवा नायिका कीव येण्याइतके बावळट दाखविले जाताते. किंबहुना जितका माणूस सज्जन तितका तो बावळट, असे सौजन्याचे नवे समीकरण या मालिका रूढ करीत आहेत, असे वाटू लागले आहे.
हल्ली अनेक दूरचित्रवाहिन्यांवर बर्‍याच मालिका चालू आहेत आणि जोपर्यंत त्यांना जाहिराती मिळत आहेत, तोपर्यंत त्या चालूच राहणार आहेत. या मालिकांच्या बाबतीत असे म्हणता येईल की, नटांना विशेष करून आणि गीतकार, गायक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक वगैरे इतर लोकांना अनुषंगाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन या मालिकांनी त्यांना फायदेशीर व्यवसाय मिळवून दिला आहे. प्रभावी दिग्दर्शन, तंत्रविज्ञानाचा कुशल वापर आणि नटवर्गाचा उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर या मालिकांचे प्रगटीकरण चांगलेच उठावदार होत आहे. पण असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते की, या मालिका ज्यावर आधारित असतात, त्या कथावस्तूला मात्र म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. म्हणजे संवाद वगैरे ठीक असतात. पण मुळात कथाच पोकळ असल्याने ते अर्थशून्य, अवास्तव आणि अवाजवी पिळलेले वाटतात.
एवढेच नव्हे तर संवादसुद्धा कधी कधी पुरेसा अभ्यास न करताच लिहिल्यासारखे वाटतात.
थोडक्यात असे म्हणावेसे वाटते की, मालिकांच्या अवास्तव आणि पोकळ कथा मनाला भिडत नाही. संस्कार आणि लोकजागृती फार दूरचा पल्ला झाला, पण सवंग करमणूक म्हणूनसुद्धा वेळ कसा तरी घालविण्यापलीकडे यातून काहीच निष्पन्न होत नाही.
यापैकी बर्‍याच मालिकांचा नायक किंवा नायिका कीव येण्याइतके बावळट दाखविले जाताते. किंबहुना जितका माणूस सज्जन तितका तो बावळट, असे सौजन्याचे नवे समीकरण या मालिका रूढ करीत आहेत, असे वाटू लागले आहे. बहुधा मालिका चालविणार्‍यांना सौजन्यातील गलथान बावळटपणाचेच कौतुक करावयाचे असावे आणि ते बरोबरसुद्धा आहे म्हणा. आमचे लोक नाही का बनेल राजकारणी लोकांवर आंधळा विश्‍वास ठेवून, त्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून निमूटपणे जगत असतात.
आणखी एक मजा म्हणजे अशा भोळ्या नायक-नायिकांभोवती असणारे त्यांचे हितचिंतक नायक किंवा नायिका फसते आहे, असे कळत असूनसुद्धा उगाच त्यांच्या मनाला दु:ख होऊ नये म्हणून गप्प बसतात. अर्थात अशी बघ्याची भूमिका घेण्याचे सौजन्य आमच्या समाजात फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. पण, निदान मालिकांच्या कथांमधून तरी हा प्रकार सुधारावयाचा प्रयत्न व्हायला हवा.
कर्तव्य हा तर विषयच आपल्या मालिकांनी बाजूला टाकला आहे. या कालबाह्य आणि हास्यास्पद मालिकांविषयी न लिहिणेच बरे. हीच स्थिती थोड्या फार फरकाने इतर वाहिन्यांचीसुद्धा आहे. म्हणून वाहिनी बदलून काही फरक होत नाही. असे किती तरी लिहिता येईल. पण कोळसा उगाळावा तेवढा काळाच असतो. पण मुख्य मुद्दा हा की, या मालिकांच्या कथा पोकळ आणि तत्त्वहीन असतात. यांना सांगावयाचे काहीच नसते. पण चांगली करमणूकसुद्धा करावयाची नसते. त्याचे लक्ष फक्त जाहिरातींकडे असते. पण जाहिरात देणार्‍यांना अजून पत्ता लागलेला दिसत नाही की, बरेच लोक जाहिरातींच्या वेळी म्यूट वापरतात. असाच म्यूट किंवा बंद तुम्ही न आवडलेल्या मालिकांच्या बाबतीत वापरत जा, असे मालिकावालेसुद्धा बजावतात. पण लोक अगतिक होऊन बघतच राहतात. कारण दुसरे ते काय करू शकतात? राजकीय पुढारीसुद्धा असेच म्हणतात की, तुम्ही आम्हाला निवडून का देता? अशीच अगतिकता दूरचित्रमालिकांच्या बाबतीतसुद्धा आहे. या निष्कर्षावर आपण समाधान मानून घ्यायचे याहून दुसरे आपल्या हातात सध्यातरी काही दिसत नाही.
तसे पाहिले असता मीडियाला दूरचित्रासारखे प्रचाराचे प्रबळ साधन सध्या उपलब्ध आहे. प्रबोधन, जागरण अशा गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी मालिकांमधून आपण काय दाखवितो आणि त्यातून काय सांगतो हे तरी बघण्याचे सौजन्य मालिकाकारांनी दाखवायला हरकत नसावी असे वाटते. यात नट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचा दोष दिसत नाही. मालिकांच्या मागील अर्थकारण सदोष आणि आस्थ नसलेले आहे. यामुळे काही तरी कसे तरी दाखवले जाते. पण, लिहून काही परिणाम होईल अशी मुळीच शक्यता दिसत नाही. पण काही तरी चांगले सांगण्याचा प्रयत्न मालिकांवर व्हावा असे वाटते म्हणून हे लिहिले इतकेच!
– कृ. भा. परांजपे
९८७०६०६९००