‘अहो’ आणि ‘अरे’

0
204

‘अहो’ची जागा आता ‘अरे’नी घेतली आहे; पण ‘अरे’नी साद घातली की मुलांवर त्याचा परिणाम होतो आणि ते बोलायला लागले की, ‘अरे बाबा’ म्हणतात. त्यामुळे दोन पिढीमधील अंतरच नाहीसे होते आणि वडीलधार्‍यांबद्दलचा आदर कमी झाल्यासारखा वाटतो. घरात कोणताही निर्णय घ्यावयाचा असेल तर ‘अरे’मुळे वयातील अंतराची दरी मिटते आणि आपण दोघे बरोबरीचे आहोत, ही भावना अधिक दृढ होते. त्यामुळे पती- पत्नीपैकी एकही जण माघार घ्यायला तयार न होता मतमतांतरे होऊन उभयतांमधील दरी वाढत जाते. क्वचित प्रसंगी भांडणदेखील होते.
सावित्रीबाई फुलेंनी अथक परिश्रम, अनेक हालअपेष्टा, सामाजिक तणाव यांना सामोरे जाऊन पुण्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘चूल आणि मूल’ या उंबर्‍यापलीकडील जगाशी स्त्रियांचा परिचय करून दिला. पूर्वीच्या काळी मुलगी मॅट्रिक झाली की, तिच्यापेक्षा दोन इयत्ता का होईना जास्त शिकलेल्या मुलाशी तिची लगीनगाठ बांधली जाई आणि ती आपसूकच आपल्या संसारात रममान होईल. थोडा काळ पुढे सरकला आणि मुली पदवीधर होऊ लागल्या आणि त्यांच्या तोडीस तोड स्थळ शोधून त्यांचा विवाह करून दिला जाऊ लागला आणि गोड संसाराची सुरुवात ‘‘अहो ऐकलत का?’’ या परवलीच्या शब्दांनी होऊ लागली.
‘अहो’ या शब्दाला एक वजन आहे आणि त्यात जादू आहे. पती-पत्नीच्या संसाराचा रथ दोघांनी मिळून हाकायचा असतो. त्या संसारातील जबाबदारीची जाणीव या ‘अहो’ असेल तर संसार हा निश्‍चितच बहरणार आहे. पतीसाठी ‘अहो’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. आई मुलाला वात्सल्याने, प्रेमाने वाढवत असली तरी वडील त्याला भरभक्कम आधार देऊन जीवनात जबाबदार नागरिक बनवतात. बरेचसे आर्थिक आणि भावी जीवन सुखी करण्याचे निर्णय ‘अहो’च घेत असतात. मुलाच्या शिक्षणाचा निर्णय असो अथवा मुलीचे लग्न आईने कितीही जुळवून आणले असेल तरी आईलादेखील त्यात ‘अहो’चा फायनल टच मिळाला की कृतार्थ झाल्यागत वाटतं. दुखणी खुपणी असो एखादे छोटे मोठे संकट असो ‘अहो’मुळेच तिला हे सगळे सुखरूप पार पाडता येते.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पतीला ‘अहो’ अशी हाक मारताना पूर्वी पत्नीला खूप आनंद वाटत असे आणि मैत्रिणींना एखादी गोष्ट ‘अहो’ना विचारून सांगते हे सांगताना तिच्या अंगावर मूठभर मास चढत असे.
हल्ली आपण संगणक युगात प्रवेश केलाय. आपल्या आजूबाजूची परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दोन पावले पुढेच चालल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेचे वारे जोरात वाहायला लागले आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठरू पाहत आहे. जग झपाट्याने बदलते आहे. नवनवीन वैज्ञानिक शोधामुळे आणि सोशल मीडियामुळे एकमेकांमधील अंतर कमी होत आहे. त्याचप्रमाणे नात्यामधले अंतरदेखील कमी व्हायला लागले आहे. ‘अहो’ची जागा आता ‘अरे’नी घेतली आहे. याचे कारण बरोबरीचे शिक्षण, बरोबरीचा पगार हे असू शकते किंवा पती-पत्नीचे मैत्रीपूर्ण नाते हेदेखील असू शकते. पण ‘अरे’नी साद घातली की मुलांवर त्याचा परिणाम होतो आणि ते बोलायला लागले की, ‘अरे बाबा’ म्हणतात. त्यामुळे दोन पिढीमधील अंतरच नाहीसे होते आणि वडीलधार्‍यांबद्दलचा आदर कमी झाल्यासारखा वाटतो. घरात कोणताही निर्णय घ्यावयाचा असेल तर ‘अरे’मुळे वयातील अंतराची दरी मिटते आणि आपण दोघे बरोबरीचे आहोत ही भावना अधिक दृढ होते. त्यामुळे पती- पत्नीपैकी एकही जण माघार घ्यायला तयार न होता मतमतांतरे होऊन उभयतांमधील दरी वाढत जाते. क्वचित प्रसंगी भांडणदेखील होते. भांडणाशिवाय संसार नाही. भांडणाशिवाय जीवनात रंगत येत नाही, हे कितीही खरे असले तरी नेहमीचा कलह हा नात्यांमध्ये कटुता आणतो आणि सहज सहजीवन अवघड होऊन बसतं. सगळे हे एका ‘अरे’मुळे होतं असं मला वाटतं. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ प्रत्येकाची मतं ही वेगळी असतात. विचार करण्याची पद्धत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन भिन्न असतो. ‘अहो’ने जेवढी संसाराची, पत्नी आणि मुलांची जबाबदारी कळते तेवढे ‘अरे’नी समजत नसावी; परंतु आजच्या आधुनिक युगातील युवतींना ‘अरे’मध्ये जो गोडवा जाणवतो त्याला त्याच्या दृष्टीने तोड नाही आणि तडजोड तर अजिबात नाही. कारण हा सर्व काळाचा महिमा आहे. आपल्या पुढ्यातील काळ आपल्याला जसा वाकवेल तसं आपण वागतो. दुसरं काय.
कालाय तस्मै नम:| हे बाकी खरं होय!
– सीमा संजय पांडेे/९०९६७७६४१८