कहाणी ‘स्त्री जन्माची’

0
122

घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. माता या दृष्टीनेच भारतीय स्त्रियांचा अपार महिमा आहे. त्या सांभाळणार्‍या आहेत, मूल सांभाळणार्‍या, पतीला सांभाळणार्‍या, ध्येयांना सांभाळणार्‍या, त्या कोणाला मरू देणार नाहीत. त्या सर्वांना प्रेम देतील, आशीर्वाद देतील, सेवा देतील. ईश्‍वराचेच रूप. ईश्‍वराला भक्तांनी माता हा शब्द योजिला आहे. कारण ईश्‍वराचे जे हे सांभाळण्याचे मुख्य कर्म, सर्वांवर पांघरूण घालण्याचे कर्म ते या जगात माता करीत असते. ईश्‍वराला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही.
भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूकसेवा, भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप्रमाणे भारतीय स्त्रिया कुटुंबात सतत कष्ट करून, निमूटपणे श्रम करून आनंद निर्माण करीत असतात. प्रत्येक कुटुंबात पहा पहाटेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत राबणारी ती कष्टाळू मूर्ती तुम्हाला दिसेल. क्षणाची विश्रांती नाही. फारसा आराम नाही.
सीता-सावित्री, द्रौपदी-गांधारी हे त्यांचे आदर्श त्यागमूर्ती आणि प्रेममूर्ती अशी ही भारतीय स्त्रियांची दैवते आहेत. भारतीय संस्कृतीत स्त्रीचे जीवन म्हणजे पेटलेले होमकुंड आहे. लग्न म्हणजे यज्ञ. पतीच्या जीवनाशी संलग्न झाल्यापासून स्त्रीच्या जीवन यज्ञास आरंभ होतो आणि हा यज्ञ मरणानेच शांत होतो.
स्त्री म्हणजे मूर्त कर्मयोग. तिला स्वतंत्र अशी जणूकाही इच्छा नाही. पतीच्या, मुलांच्या इच्छा म्हणजेच तिची इच्छा. भारतीय स्त्रीने स्वत:ला पतीत मिळवून टाकले आहे. पती कसाही असो, त्याला पत्नी सांभाळून घेते. कुटुंबाची अब्रू ती संरक्षिते. कुटुंबाची लाज ती उघडी पडू देणार नाही. स्वत: उपाशी राहील, दळण कांडण करील, परंतु कुटुंब चालवील. तेवढ्यातल्या तेवढ्यात मुलाबाळांचे करील. स्वत:चे अश्रू, स्वत:चे दु:ख ती कोणास दाखविणार नाही. तिचे दु:ख केवळ तिलाच माहीत असते.
पतीची लहर सांभाळणे म्हणजे तिचा धर्म होऊन बसतो. पतिमुखावरचे हास्य म्हणजे पत्नीचे सुख, सर्वस्व. पापी, दुर्गुणी, दुराचारी पतीचीही सेवा भारतीय स्त्रिया करीत असतात. एकदा ज्याच्याशी गाठ पडली ती कशी सोडावयाची? स्त्रिया म्हणजे एकदेवा, त्यांचा महान आदर्श. त्यांचे दिव्य ध्येय. आपलेपणाचे नाते हा परीस आहे. घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, घर म्हणजे प्रेम, घर म्हणजे आत्मीयता. हे घर माझ्या पतीसाठी व माझ्या मुलांसाठी मी प्रेमाने भरून ठेवीन, ही स्त्रीची भावना असते. अशी ही भारतीय स्त्रियांची दृष्टी आहे.
घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. माता या दृष्टीनेच भारतीय स्त्रियांचा अपार महिमा आहे. त्या सांभाळणार्‍या आहेत, मूल सांभाळणार्‍या, पतीला सांभाळणार्‍या, ध्येयांना सांभाळणार्‍या, त्या कोणाला मरू देणार नाहीत. त्या सर्वांना प्रेम देतील, आशीर्वाद देतील, सेवा देतील. ईश्‍वराचेच रूप. ईश्‍वराला भक्तांनी माता हा शब्द योजिला आहे. कारण ईश्‍वराचे जे हे सांभाळण्याचे मुख्य कर्म, सर्वांवर पांघरूण घालण्याचे कर्म ते या जगात माता करीत असते. ईश्‍वराला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही. ईश्‍वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणती वस्तू असेल तर ती ही माता होय. समर्थ रामदास स्वामींनी मातेची व्याख्या सुंदर केली आहे. ‘‘आलस्य नाही कंटाळा नाही| विट नाही त्रास नाही| इतुकी माया कोठेची नाही| माते वेगळी॥ म्हणून भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. प्रत्यक्ष संसारातील देवतांची नावे सांगताना प्रथम ‘मातृदेवो भव’ असे सांगतो. आधी माता मग पिता, पती- पत्नीमध्ये आधी पती आहे, पण आईबापामध्ये आधी आई आहे. पतीला पिता व्हावयाचे आहे. पत्नीला माता व्हावयाचे आहे आणि या दोन स्वरूपात माता हे उदात्त श्रेष्ठतर स्वरूप आहे.
म्हणूनच शेवटी भारतीय संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे, असे म्हणावे लागते. मातेला तीन प्रदक्षिणा घालणे म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे होय. आईबापाची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. ‘न मातु परदैवतम्’ आईविना दैवत नाही. आईचे ऋण कधी फिटत नाही. विठ्ठल म्हणजे आई, भारत म्हणजे आई, गाय म्हणजे आई. भारतवर्षात सर्वत्र मातेचा महिमा आहे. आईला आधी वंदन. कोणताही मंगल विधी असो आधी आईचा आशीर्वाद, तिला नमस्कार.
पतीचे सहस्त्र अपराध पोटात घालून त्याला सांभाळणारी, आपल्या मुलाबाळांना सांभाळणारी आणि भारतीय ध्येये सांभाळणारी अशी जी ही भारतीय माता तिला अनंत प्रणाम.
पतीबरोबर चितेवर हसत चढणारी सती किंवा पती निधनानंतर त्याचे चिंतन करीत वैराग्याने व्रतमय जीवन कंठणारी विधवा. भारतीय स्त्रीची वृंदावने लग्न म्हणजे काय यावरची मूक प्रवचने आहेत. ही वृंदावने भारतास पावित्र्य देत आहे. ठिकठिकाणी हे यज्ञमय इतिहास लिहिलेले आहे. भारतीय बालविधवा म्हणजे करुण कथा आहे. आजूबाजूच्या विलासी जगात तिला विरक्त रहावयाचे असते. प्रत्येक क्षण म्हणजे कसोटी. सारी व्रतवैकल्ये तिच्यावर लादण्यात येतात. सारे विधिनिषेध तिच्यासाठी. सारे संयम तिच्यासाठी.
अशा आगीतून ती दिव्य तेजाने बाहेर पडते. सर्वांची सेवा हे तिचे काम. जगातील सारे अपमान सोसून जगाचे भले चिंतणे हे तिचे ध्येय असते. आदर्श विधवा जगाची गुरू आहे. ती संयम व सेवा यांची मूर्ती आहे. स्वत:चे दु:ख गिळून जगासाठी झटणारी ती देवता आहे.
भारतीय संस्कृतीचा हा महान आदर्श आहे. भारतीय स्त्रियांच्या पावित्र्याची, संयमाची, वैराग्याची धन्यता आहे. अशी ही भारतीय स्त्रीची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण.
– डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर/ ९४२३७३३६३०