चौफेर

0
136

एक नेटवर्क… शेतकर्‍यांच्या विधवांचं…

खरं तर त्यांच्या वाट्याला जे आलं ते शब्दातीतच! नवर्‍याच्या पश्‍चात, त्याच्याशिवाय संसाराचा गाडा हाकण्याचा एव्हाना सराव झाला असला तरी, तो हाकताना दमछाक अगदी होतच नाही असं नाही, पण आता परिस्थितीशी झगडण्याची, ठेच लागली तरी स्वत:ला सावरून उठून उभं राहण्याची हिंमत मिळाली आहे. ऐन उमेदीच्या काळात, कित्येकांच्या बाबतीत ऐन तारुण्यात नशिबाचे फासे उलटे पडले. त्या धगधगत्या वास्तवाशी लढणं इतकं का सोपं होतं? लढतो म्हटलं तरी पराभूत करायला का कमी घटक सरसावले होते सभोवताल? पण पायी असलेल्या शृंखला झुगारून गतीचे गीत गाण्याची ती उमेद महत्त्वाची. तीच जागवण्याचे काम किसान मित्र नेटवर्क करतेय्…

निसर्गानं दगा दिला, काळानं सूड उगवला, नियतीनं डाव साधला, घरचा कर्ता गमावला अन् माणसं पोरकी झाली. संसार उघड्यावर पडले. ऐन पंचविशीत वैधव्य वाट्याला आलं. कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं नि मग संकटांची रांगच दारापुढे लागली. कालपर्यंत राबवल्या गेलेल्या धोरणांचं आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या विपरीत परिस्थितीपेक्षाही दारू पिऊन झाल्याचे सांगण्याची आणि ते सिद्ध करण्याची जणू अहमहमिका सुरू झाली. नोकरशाहीपासून तर राजेशाहीपर्यंतच्या यंत्रणेतील एकजात सारे उठून उभे राहिले अन् परिस्थितीने गांजलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या सरकारी मदतीच्या यादीतून बाद ठरविण्यासाठी धडपडू लागले. परिस्थितीचे धगधगते वास्तव झुगारून, बळीराजाच्या आत्महत्या बिनबुडाच्या ठरविण्याच्या त्यांच्या नादात गावाकडील कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त होऊ लागली. नवरा गमावून बसलेल्या महिलांच्या नशिबी वेगळ्याच समस्या उभ्या ठाकल्या. सासरी राहिलं तरी आणि माहेरी परत आलं तरी समस्यांचा ससेमिरा काही पिच्छा सोडत नाही. आत्महत्या दारू पिऊन केली असल्याचे स्पष्ट झाले की, मग शासकीय मदतीचा प्रश्‍न आपसूकच ‘निकाली’ निघतो. अंगा-खांद्यावरच्या मुलांचा विचार, रोजगाराचा प्रश्‍न, जमीन नावे असली तरी त्यावर आपला हक्क सांगताना उद्भवणार्‍या समस्या, आड येणारे नातेवाईक, एवढ्या एका मुद्यावरून, कालपर्यंत जीवापाड जपलेल्या नात्यांच्या नाजूक धाग्यांची अचानक सैल होऊ लागलेली वीण, वैधव्याचे निमित्त साधून डोकावणार्‍या वखवखलेल्या पुरुषी नजरा… यातून बाहेर पडत स्वत:ला सावरायचं, कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवायची म्हणजे, नाही म्हटलं तरी जिकिरीचंच काम…
अचानक समोर उभ्या ठाकलेल्या या वास्तवाचा सामना करताना काही भगिनी खचल्या. काहींनी याही परिस्थितीतून स्वत:ला सावरलं. आयुष्याच्या वळणावर आलेले खाचखळगे, टक्केटोणपे अनुभवाच्या गाठोड्यात बांधून धैर्यानं पुढे निघालेल्यांच्या मदतीला काही सामाजिक संस्थाही एव्हाना सरसावल्या होत्या. त्या सर्वांना एकत्र आणून मदतकार्याची व्याप्ती विस्तारण्याचा प्रयत्न सुरू झालाय्. राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज मोझरीतून डॉ. मधुकर गुमळे यांच्या नेतृत्वात कर्तबगारीची झालर लेवून काही संकल्पना आकारास येताहेत. गेल्या काही दिवसांत त्याला नाना पाटेकरांच्या ‘नाम’चीही साथ मिळाली आणि मग आधीच विस्तारलेल्या कार्यकक्षेचा परीघ आणखीच मोठा झाला. सर्वात पहिला प्रयत्न झाला तो, या महिलांना एकत्रित करण्याचा. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांसोबतच अन्य विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता अशी जोड देत ‘एकट्या’ पडलेल्या महिलांना एकत्र आणण्याचा. कुणाच्याही मदतीविना जगण्याची उमेद त्यांच्या मनात जागवण्याचा. त्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगाराची साधनं, अगदी शिलाई मशीनपासून तर बकर्‍यांपर्यंत, जे हवं ते उपलब्ध करून देण्यासाठीची पावलं उचलली जाताहेत. ज्यांना हवी त्यांना वकिली मदत, ज्यांना उभारायचाय् त्यांना अधिकाराच्या लढ्यासाठी सहकार्य… पैशापासून तर प्रशिक्षणापर्यंत ज्याची ज्याची म्हणून गरज आहे, त्या सार्‍या गोष्टी या निराधार ठरलेल्या महिलांसाठी उभारण्याची एक मोहीम. समाजाच्या सहकार्यातून, लोकसहभागातून साकारतेय्. सुमारे तीन वर्षांपूर्वी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांना मदतीचा हात देण्याच्या, सारख्याच उद्देशाने कार्यप्रवण झालेल्या समविचारी संस्थांची मोट बांधून मदतीचा ओघ सकारात्मक दिशेनं प्रवाहित करण्यासाठी झालेले प्रयत्न एव्हाना फलद्रूप होताना दिसताहेत. एरवी ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:च्या पायांवर उभे राहण्याचा विचारही करायचा म्हणजे धाडसाचंच काम. अशा महिलांना त्या वळणावर विचार करायला, कार्यप्रवृत्त व्हायला लावण्याची किमया ‘किसान मित्र नेटवर्क’च्या माध्यमातून साधली गेली आहे.
सगळे मिळून सुमारे चाळीस कार्यकर्ते आहेत. आजवर निदान आठ हजार महिलांना या ‘नेटवर्क’मध्ये आणण्यात या कार्यकर्त्यांना यश लाभलं आहे. घरचा कर्ता माणूस गमावल्याचं दु:ख मोठंच. ती उणीव कधीच भरून न निघणारी. सांत्वनाचे चार शब्द आणि मायेची फुंकर घालण्याच्या छोट्याशा प्रयत्नातून वेदनेचा आवेग कमी होणार तो कितीसा? पण या महिलांना एकत्र आणून ‘अभिव्यक्त’ होण्याची जी संधी अनायसे गवसली, त्यातून मनातल्या भावभावनांना आकाश मोकळे करून देता आलं. एकमेकांची सुख-दु:खं वेचता आली. सांगण्यासारखं काय कमी असतं मनात? कधी आर्थिक परिस्थितीमुळे होणारी परवड, कधी पोरांची एखादी मागणी पूर्ण न करता आल्याची खंत, तर कधी ती पूर्ण करता करता होणारी आढाताण, कधी काहीतरी गवसल्याचं समाधान, कधी आपल्याच लोकांनी केलेला घात, तर कधी अजाणतेचा देखावा निर्माण करत जाणतेपणाने होणारे पुरुषी स्पर्श… कधी इच्छा असूनही नकार देताना होणारा मनाचा झालेला कोंडमारा तर कधी निकरानं नकार देण्याचे ‘परिणाम’ भोगावे लागल्याचे प्रसंग. उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेले लोक तर सर्वदूर असतात. परके अन् आपलेही… बायका बायका एकत्र आल्या की मग भावनांचा बांध फुटतो. मनं मोकळी होतात. वेदनेची तीव्रता जराशी कमी होते. दु:ख मागे पडून चेहर्‍यावर जरासे हसू फुलते…
या महिलांना एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि शिकवली जाते. स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहायचं नाही. कारण त्यातून शोषणाला वाव मिळतो. त्यामुळे स्वावलंबी बनायचं. शासन-प्रशासन सारं आपलं आहे. त्याला शिव्या हासडत बसायचं नाही. उलट त्याची कार्यपद्धती समजून घ्यायची. त्याचा करता येईल तेवढा उपयोग करून घ्यायचा. सोबतीणींना जमेल तेवढं सहकार्य करायचं. एकत्र येण्यातून जे बळ मिळालं, जो आत्मविश्‍वास दुणावला, त्यातून आपल्या समस्या शासनदरबारी मांडण्याची हिंमत झाली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर दिल्लीत मनेका गांधींपर्यंत पोहोचून या महिलांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.
‘नेटवर्क’च्या संपर्कात आल्यानंतर वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर जगण्याची नवी उमेद जागली आहे. खरं तर त्यांच्या वाट्याला जे आलं ते शब्दातीतच! नवर्‍याच्या पश्‍चात, त्याच्याशिवाय संसाराचा गाडा हाकण्याचा एव्हाना सराव झाला असला तरी, तो हाकताना दमछाक अगदी होतच नाही असं नाही, पण आता परिस्थितीशी झगडण्याची, ठेच लागली तरी स्वत:ला सावरून उठून उभं राहण्याची हिंमत मिळाली आहे. ऐन उमेदीच्या काळात, कित्येकांच्या बाबतीत ऐन तारुण्यात नशिबाचे फासे उलटे पडले. त्या धगधगत्या वास्तवाशी लढणं इतकं का सोपं होतं? लढतो म्हटलं तरी पराभूत करायला का कमी घटक सरसावले होते सभोवताल? पण पायी असलेल्या शृंखला झुगारून गतीचे गीत गाण्याची ती उमेद महत्त्वाची. तीच जागवण्याचे काम किसान मित्र नेटवर्क करतेय्… आणि त्या विधवा? काय वर्णन करावं त्यांच्या संघर्षाचं?
लोग मुन्तजिर ही रहे
कि हमे टुटता हुवा देखे
और हम थे कि सहते सहते
पत्थर के हो गये…
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३