पाणी पुनर्भरणासाठी घ्या हमखास उपाय

वैद्यकीय जनजागृती मंचाचे ‘भूजल मॉईस्ट सॉईल’ • पुण्याच्या भूजल सर्वेक्षण संचालकांची शासनाकडे शिफारस

0
131

वर्धा, ९ जून
उन्हाळा आला की पाण्याचे महत्त्व कळायला लागते. पण, उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की, पाण्याचे पुनर्भरण, काटकसरीने पाण्याच्या वापराचा विसर पडतो. आपल्यासह पुढील पिढ्यांना पाणी पुरवायचे असेल, तर ‘भूजल मॉईस्ट सॉईल’ उपकरण प्रत्येक इमारतीच्या छतावर लावले पाहिजे, असे वैद्यकीय जनजागृती मंचाचे आग्रही आवाहन आहे. अलीकडे या उपकरणाचे पुणे येथील राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागात मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे प्रात्यक्षिक दाखवून आले असून, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक सुनील पाटील यांनी हे उपकरण अतिशय उपयुक्त असल्याची राज्य शासनाकडे शिफारसही केली आहे.
भूजल मॉईस्ट सॉईल हे उपकरण अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणारे आहे. हिंगणघाट नगरपालिका प्रशासनानेही शहरात या उपकरणाद्वारे पाण्याचे पुनर्भरण व्हावे, यासाठी डॉ. पावडे यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली तसेच हे सयंत्र काही घरांच्या छतावर प्रायोगिक तत्त्वावर लावण्याची तयारी दर्शविली आहे.
हे एक प्रकारचे फिल्टर आहे. त्या माध्यमातून आपण छतावरील पावसाचे पाणी थेट विहिरीत वा कूपनलिकेत सोडू शकतो. गुरुत्वाकर्षण शक्ती, गारगोट्या, ऍक्टिव्हेटेड चारकोल (सक्रिय कोळसा), फोम, जाळ्या आणि पाईप यापासून हे सयंत्र तयार झाले आहे. हे सयंत्र ना नफा ना तोटा तत्त्वावर वैद्यकीय जनजागृती मंचाद्वारे केवळ ३,५०० रुपयांत उपलब्ध होऊ शकते.
घराचे छत एक हजार फुटाचे असेल, तर एका पावसाळ्यात ९० हजार लिटर पाणी विहिरीत वा कूपनलिकेत सोडता येते. शहरी भागात दरदिवशी माणसी १५० लिटर पाण्याची गरज भासत असते. त्या हिशेबाने विचार केल्यास चार जणांच्या कुटुंबाला वर्षभर लागणार्‍या पाण्याची व्यवस्था या सयंत्राद्वारे जमिनीत सोडलेल्या पाण्याद्वारे होऊ शकते.
या दिशेने स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वाटचाल केली आणि कटाक्षाने पाणी अडवून जमिनीत जिरविण्याचा संकल्प सोडला तर शहर असो की, ग्रामीण भाग कधीच पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे डॉ. सचिन पावडे सांगतात.
गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने शहरीकरण होत असून, रस्ते, अंगण, घरासमोर सिमेंटीकरण होत आहे. परिणामी, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण मुळात कमी झाले आहे.
पावसाचे पाणी शहराबाहेर, गावाबाहेर वाहून जाते. परिणामी, पाणीटंचाईचे संकट ओढवते. दुसरीकडे, कूपनलिका (बोअर) खोदण्याचे प्रमाण वाढल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने खाली-खाली जात आहे. ही तूट भरून काढण्याकरिता पावसाचे पाणी भूगर्भात सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही डॉ. पावडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
या उपकरणाबद्दल कुठलीही तांत्रिक माहिती हवी असल्यास डॉ. प्रशांत वाडीभस्मे (९८५०६०२३६९), डॉ. आनंद गाढवकर (९८६७९२६६८६), डॉ. निखिल ताल्हान (७५८८१८७१७९), सागर राचर्लावार (९३२६८६७४७८) यांच्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन डॉ. पावडे यांनी केले आहे. (तभा वृत्तसेवा)