कुणी घर देता का घर…!

0
127

• चिमुकल्या पिल्लांची जगण्यासाठी धडपड• पक्षी होत आहेत दुर्मिळ
संजय त्रिवेदी
शेगाव, ९ जून
तीन मजली इमारतीच्या उघड्या छतावर पक्ष्याची दोन चिमुकली पिल्ले घरट्यात जगण्यासाठी धडपड करीत असताना आढळली. त्यांच्या चिवचिवाटामधून व मोडके-तोडके घरटे पाहून कुणी घर देता का घर…! अशी हाक तर ते देत नाही ना! असे जाणवत होते.
सामान्यतः कुठलेही पक्षी हे जंगलात उंच झाडावर, शहरातील इमारतींच्या उंच ठिकाणीवास्तव्य करतात. शक्यतोवर इमारतीच्या उंच ठिकाणी फटीच्या पोकळ जागेत किंवा विहिरीच्या कपारीत अंडे देतात. चिमुकल्या पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत त्यांचे पालनपोषण व रक्षण करतात.
उपलब्ध साहित्य वापरून हे पक्षी घरटी तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेल्या घरट्यांचा वापर करतात. कारण चिमुकल्या पिल्लांच्या जिवाचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. निसर्गाने जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला दिलेला आहे.
शहरामध्ये सिमेंटची जंगले वाढलेली असून, गगनचुंबी इमारती व त्यावर सर्वत्र जागोजागी मोबाईल कंपन्यांचे टॉवर दिसून येत असल्यामुळे पक्ष्यांची मात्र गोची झालेली दिसत आहे. मोबाईल टॉवरमधून निघणार्‍या किरणांचे पक्ष्यांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्ष्यांचा र्‍हास होऊन त्यांची संख्या आता नगण्य झाल्याचे आढळून येत आहे.
मानवाने जंगलातील वृक्ष नष्ट करून त्या ठिकाणी नुसती सिमेंटची जंगलं तयार केली आहेत. शहरामध्ये इमारतीला खाचखळगे, पोकळीची जागा नसल्यामुळे पक्ष्यांना प्रजनन करण्यासाठी इमारतीच्या छताचा आसरा घेण्याचा घ्यावा लागला.
पूर्वी कौलारू इमारती होत्या. त्यामध्ये छत व भिंतीच्या पोकळीच्या जागेमध्ये हे पक्षी वास्तव्य करायचे. परंतु, आता परिस्थिती बदलल्यामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होऊन किलबिलाट कायमचा थांबणार तर नाही ना….! हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. ज्यांच्या इमारतीच्या छतावर ही पिल्लं आहेत त्यांचे रक्षणही महत्त्वाचे आहे. मांजरी, माकडे या प्राण्यांमुळे पिल्लांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून घरमालक घुसे यांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. (तभा वृत्तसेवा)