माजी खासदार विजय मुडे अपघातात गंभीर जखमी

0
188

महमंदपूर फाट्याजवळील घटना
•एकूण चारजण गंभीर जखमी
बाभुळगाव, ९ जून
वर्धा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार विजय मुडे हे अपघातात गंभीर जखमी झाले. यवतमाळ-धामणगाव राज्यमार्गावरील महंमदपूर फाट्याजवळील वळणावर त्यांच्या वाहनाची ४०७ मॅटाडोरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार, ९ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली.
विजय मुडे व त्यांची सून आर्वी येथून एमएच३१/ईए८२५२ या क्रमांकाच्या झायलोने पुसदला जात असताना यवतमाळवरून अमरावतीला जात असलेल्या एमएच३७ बी१५०१ या क्रमांकाच्या मेटॅडोरने बाभुळगाव तालुक्यातील अमरावती सीमेजवळील महंमदपूर फाट्याजवळ समोरासमोर धडक दिली.
या अपघातात विजय मुडे व त्यांची सून कीर्ती मुडे हे दोघेही गंभीर जखमी झाले. तर मेटॅडोर चालक संभाजी गेडाम आणि रवी जगताप रा. अमरावती यांनाही जबर मार लागला. घटनेची माहिती बाभुळगावातील भाजपा कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.
विजय मुडे व कीर्ती मुडे यांना बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले. तर मेटॅडोरचालक संभाजी गेडाम व रवी जगताप यांना नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळावर न पोचल्याने त्यांनाही खाजगी वाहनातून रुग्णालयात आणण्यात आले. संभाजी गेडाम याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यालाही यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. माजी खासदार मुडे यांना तत्काळ उपचार मिळावा म्हणून या क्षेत्राचे भाजपा आमदार प्रा. डॉ. अशोक उईके हे ग्रामीण रुग्णालयात तातडीने पोहोचले होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती हेमंत ठाकरे, मनोहर बुरेवार, अनिकेत पोहोकार, मिलिंद नवाडे, विक्की परडखे, राजेश देशमुख, महादेव मुरकुटे आणि अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. अपघातातील वाहन राज्य महामार्गावरच पडून असल्याने काहीकाळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
१०८ चा डॉक्टर हजर नसल्याने संताप
अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे सेवा पुरविली जाते. मात्र या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांना यवतमाळ येथे हलविण्यासाठी विलंब झाला. या प्रकाराने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाल्याने डॉक्टरांशिवायच रुग्णांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले.