फक्त कर्जमाफीवर बोलू!

0
70

रविवारची पत्रे
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आंदोलनाला चालना आणि सक्रिय पाठिंबा देणार्‍या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकमुखी मागणी आहे की, सर्व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा! काही वकील, डॉक्टर, इंजिनीअर, कॉन्ट्रॅक्टर, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, नोकरदार, लोकप्रतिनिधी हे शेतकरी पण आहेत. यांनी शेतकरी म्हणून कर्ज काढली असतील आणि ती फेडली नसतील तर सरकारने यांचाही सातबारा कोरा करायचा का? ऐपतदार शेतकर्‍यांचा सातबारा सरकारने कोरा करावा का? आमचे कर्ज आम्ही फेडू, आम्हाला कर्जमाफी नको, असे किती ऐपतदार शेतकर्‍यांनी जाहीर केले आहे? महाराष्ट्रात एकही ऐपतदार शेतकरी नाही का? आपल्या गरीब शेतकरी बांधवांसाठी आपणही त्याग केला पाहिजे असे यांना वाटत नाही का?
मुख्यमंत्री फडणवीस तथाकथित शेतकरी हितचिंतकांच्या वरील मागणीतले इंगित पुरेपूर जाणून आहेत. कर्जमाफी देणार परंतु ती फक्त गरजवंत आणि निरुपाय थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाच मिळेल, यावर ते सुरुवातीपासून ठाम आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यांचा एक मंत्रिगट स्थापन केला आहे. ज्या थकबाकीदार शेतकरी कुटुंबाची उपजीविका फक्त शेतीवरच अवलंबून आहे असे आणि ज्यांचे शेतीसह सर्व मार्गांनी एकत्रित वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. शेतकर्‍याकडे जमीन किती आहे याचा विचार केला जाणार नाही. प. महाराष्ट्रात काही भागात कमी क्षेत्रात अधिक उत्पादन निघते तर काही भागात क्षेत्र अधिक असूनही उत्पादन कमी निघते. मागच्या कर्जमाफीच्या वेळी या आणि इतर बाबी विचारात न घेता सरसकट कर्जमाफी दिल्यामुळे अनेक धनदांडग्या कर्जबुडव्यांना कर्जमाफी मिळाली आणि अनेक गरजवंत शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले. त्या चुका टाळून कर्जमाफी देण्याचा फडणवीस सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्व प्रकारचे वैयक्तिक मतभेद, स्वार्थ बाजूला ठेवून सरकारच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. कुठलेही सरकार कररूपाने सरकारी तिजोरीत होणारी धनराशी कशी खर्च करते यावरून त्या सरकारचे मूल्यमापन केले पाहिजे. सरकारकडून मला काय मिळाले, काय मिळाले नाही याचा विचार करताना मी त्यासाठी खरोखरच पात्र आहे का, याचाही विचार करावा आणि मग सरकारचे मूल्यमापन करावे. विरोधक तर विरोधकच, परंतु सत्तेतला भागीदारही विरोधात! अशाही परिस्थितीत आर्थिक हेराफेरीबाबत फडणवीस सरकारकडे बोट दाखवायला जागा नाही. विरोधकांनी रचनात्मक विरोध जरूर करावा, परंतु राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये.
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

केरळमधील नृशंस गोहत्याकांड
परवा बसने प्रवास करीत असताना एका लहानशा खेड्यात बस थांबली. खिडकीतून बाहेर बघताना समोरच्या झाडाखाली काही मुले कुत्र्याच्या लहानशा पिल्लाला त्रास देताना दिसले. एका मुलाने कुत्र्याचे समोरचे पाय पकडून त्याला गोल गोल फिरवत होता, तर एक जण पिल्लाच्या कानाला पकडून अख्ख शरीरच गोल फिरवत होता. प्राणांतिक वेदनेने ते पिलू केकाटत होते. त्याच्या चेहर्‍यावरील भाव फारच केविलवाणे व दु:खी होते व मूकपणे तो विचारत होता या नासमझांचा खेळ होतोय् परंतु माझा तर जीव जातोय्.
असेच काहीतरी कन्नूर (केरळ)मध्ये सध्या घडतेय्. ‘दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ’ ही म्हण जरा वेगळी चाल चालतेय. दोघांचे भांडण पण तिसर्‍याचा हकनाक जीव जातोय् हे निंदनीय आहे. गोहत्या बंदीवरच्या भांडणाने एवढा कळस गाठला की, निषेध म्हणून रस्त्यावर, जनतेसमोर ‘गाय’ कापली गेली!! अंगावर शहारे येतील व मन आक्रोशाने भरेल असे दुष्कृत्य केरळमधील युथ कॉंग्रेसच्या नराधमांनी केले आहे. केंद्र सरकारच्या गोहत्या बंदीच्या कायद्याविरोधात उभे राहून जरा वेगळ्या प्रकाराने निषेधात्मक आंदोलन घेता आले असते, परंतु कॉंग्रेस पार्टीच्या अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन सार्‍या देशभरात झाले. पशुक्रूरता अधिनियमाची धज्जीयॉं उडवीत या हरामखोरांनी भरचौकात लहान बछड्याची क्रूरपणे हत्या केली!! अत्यंत संतापजनक घटना घडून गेली आहे. या घटनेच्या मागील खरे सूत्रधार समोर येतीलच. पण, त्यांनी आपल्या स्वत:च्या स्वार्थापायी गुप्तपणे पक्षातून त्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी सुरू केली आहे. बछड्याला कापणारा युवक रजिल मुकुट्टी राहुल गांधीच्या नेहमी बरोबर असतो हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पडद्याच्या आडचे खुनी चेहरे समोर यायला वेळ लागणार नाही. ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’ या म्हणीप्रमाणे वरवर केवळ देखावा म्हणून राहुलने आपले भ्याड वक्तव्य दिले आहे की, केरळ में हुई घटना बेवकुफी के हद की है|
देशभरात सुरू झालेल्या ‘छी, थू’ने राहुलबाबा घाबरलाय्. नीतिमत्ता व सत्‌विचार सोडलेल्या कॉंग्रेसकडून अजून काय अपेक्षा असणार? थिरुअनंतपुरम येथे वामपंथी छात्र संगठन एसएफआय यांनी गोहत्याबंदी कायद्याच्या निषेधार्थ कॉलेजसमोर गोमांस शिजवून त्याची बीफ पार्टी केली हे अत्यंत संतापजनक आहे व निषेधात्मक आहे. भारतात समजा सर्वधर्मसमभाव पाळला जात असेेल तर एका विशिष्ट समुदायाच्या धर्मभावना फारच उच्च कोटीच्या असल्याप्रमाणे क्षुल्लक कारणांनी दुखावल्या जातात. त्यावर सुसंघटितपणे दंगे-फसाद घडविले जातात व त्या उच्च भावनांची कदर करीत असताना रक्त सांडले जाते. परंतु, आमच्या धार्मिक भावना इतक्या मिळमिळीत आहेत की, ‘कुणी यावे व थप्पड मारून जावे’ अशी परिस्थिती आमची झाली आहे. एकीकडे आम्ही गोमातेची ईश्‍वर समजून पूजा करतो व दुसरीकडे तिची निर्ममतेने हत्या बघतो!! हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? बरे, अशा वेळेस मानवाधिकाराचा गळा काढून रडणारे प्रतिष्ठित चूपचाप हा सर्व तमाशा निर्लज्जपणे बघत असतात. त्या बछड्यावरच्या मानेवरील फिरवलेली सुरी खरे म्हणजे आमच्या गळ्यावर फिरवली गेली आहे, तरी आम्ही शांत!! काय म्हणावे या सहिष्णूतेला? गायीला पशू किंवा अजूनच उच्च दर्जा देण्याच्या आविर्भावात राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले जात असले तरी गोमतेला आम्ही ईश्‍वरासमान मानतो ही भावना का पायदळी तुडविली जाते?
केरळमधील गोहत्याकांड हा बर्बरतेचा कळस आहे. कॉंग्रेसला लागलेला कलंक आहे. कॉंग्रेसी नेेते या घटनेत आमचा काही हात नाही असे सांगतात व लगेच राहुल गांधी या प्रकरणावर भाष्य करून या दुर्भाग्यपूर्ण घटनेची माफी मागतात याचे कारण कळत नाही!!!
सरकारचे एखादे धोरण, अधिनियम मान्य नसतील तर त्याचा विरोध करणे हे स्वाभाविक आहे; परंतु कोणत्या थराला जाऊन याचे काही नीतिनियम, काही मर्यादा असतात. केरळच्या युथ कॉंग्रेसने सर्व लाजलज्जा सोडून एका निष्पाप जीवाची क्रूरपणे हत्या केली. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, हे निश्‍चित! माणुसकीला काळिमा फासणार्‍या कम्युनिस्टांच्या खुनी पंजाला जमिनीत खोल गाडले तरच अनेक अजाण, अतृप्त दुर्दैवी आत्म्यांना शांती प्राप्त होईल.
प्रा. ममता चिंचवडकर
९०११३९३३२४

शेतकर्‍यांचा संप : आस्था की नाटक?
सध्या शेतकर्‍यांचा संप स्थगित झाल्याचे सर्व वर्तमानपत्रातून झळकत आहे आणि पुढे हिंसक आंदोलन करण्याची घोषणा सुकाणू समितीने केली आहे. त्यांचे आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे हे पाहून खंत वाटते. हे वाचून कधी कधी मनात संशय येतो की, या आंदोलनकर्त्यांना खरोखरच शेतकर्‍यांबद्दल आस्था, सहानुभूती आहे की, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी केलेले नाटक आहे. खरंच सहानुभूती असती तर या ६० वर्षांच्या काळात शेतकरी सधन आणि विकसित का झाला नाही याचा विचार त्या वेळच्या सरकारने/राज्यकर्त्यांनी आता आंदोलन करण्यापूर्वी विचार करावयास पाहिजे.
या वेळेस आंदोलन हे विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रात जोर धरत आहे. विदर्भातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्या ६० वर्षांत आत्महत्या केल्या त्या वेळेस या लोकांनी जाळपोळ, आंदोलने का केली नाहीत? कारण मागे केलेल्या कर्जमाफीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी सधन झाला म्हणून. शेतकर्‍यांचे प्रश्‍न चर्चेने सोडवून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सधन, विकसित होईल याचा विचार आंदोलन करणार्‍यांनी करावा असे मला वाटते. बळीराजा आमच्या देशात सन्माननीय व आदरणीय वर्ग आहे आणि त्यांच्या समस्येचे पूर्णत: निपटारा कसा होईल याचा विचार सरकार, विरोधी पक्ष आणि आंदोलनकर्त्यांनी करावा अशी माझी प्रबळ इच्छा आहे!
सुनील पांडे
९९२२४१३०५९

रागिणी तू चुकलीस
१२ वीचे पेपर खराब गेले असे समजून वणीच्या रागिणी गोडे हिने निकालापूर्वीच आत्महत्या केली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला मार्क्स मिळणार नाहीत म्हणून तिचे मानसिक संतुलन ढळले. या निराशेतून तिला परावृत्त करण्यासाठी कुटुंबीयांनी सर्वतोपरी प्रयत्नही केले, परंतु त्याला यश आले नाही. आज प्रत्येक विद्यार्थ्याला डॉक्टर अथवा इंजिनीअरच व्हायचे असते. त्यासाठी मग ते आपली बुद्धिमत्ता, घरची आर्थिक स्थिती याचा विचार करीत नाहीत. पैसा, पद, प्रतिष्ठा जणू काही डॉक्टर, इंजिनीअर झाल्यानेच मिळते असा त्यांचा समज आहे. आज आपण वरील पदांवर गेलो की, आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असा सर्वांचा गोड गैरसमज आहे.
रागिणीलाही डॉक्टर व्हायचे होते. ती खूप हुशारही होती. तिने असा टोकाचा निर्णय घेतला नसता तर ती कदाचित डॉक्टरही झाली असती. ती उत्तम नृत्यांगनासुद्धा होती. तिने नृत्याच्या अनेक मैफिली गाजवून कितीतरी पुरस्कार मिळविले होते. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसते, तरी नृत्यात पारंगत होऊन महाराष्ट्रातच काय पण देशभरातही प्रसिद्धी आणि पैसा मिळवू शकली असती. दुर्दैवाने आज लोकसेवेसाठी किंवा देशसेवेसाठी शिक्षणाचा उपयोग कुणीही करीत नाही. सर्वांनीच डॉक्टर, इंजिनीअर होतो म्हटले तर इतर कामे कोण करणार? इतरही कामासाठी बुद्धिमान लोक हवेतच. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, फक्त ते प्रामाणिकपणे केले पाहिजे. कमकुवत मनाच्या माणसाला धीर देण्याचे डॉक्टरचे काम असते; परंतु डॉक्टर होऊ पाहणार्‍या रागिणीने स्वत:लाच सावरले नाही हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. रागिणी तू चुकलीस. तुझ्याबद्दल खूप हळहळ वाटते. तुझ्या कुटुंबावर कोसळलेल्या पहाडाएवढ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अति महत्त्वाकांक्षा सर्वांसाठीच कशी वेदनादायक व घातक ठरू शकते याचा हा पुरावा आहे. विद्यार्थिमित्रांनी यातून काहीतरी बोध घ्यावा, शिकावे हीच अपेक्षा.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६

स्मार्ट स्त्री
‘स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व’ या विषयावर विविध माध्यमांतून चर्चा होत आहे. त्यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शनसुद्धा घेतले जात आहे. स्त्री आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व ही संकल्पना मुळातच गुंतागुंतीची आहे.
आजही समाज स्त्रियांकडे विशिष्ट नात्यांच्या चौकटीतून बघतो आहे. त्या प्रत्येक नातेसंबंधाचे विशिष्ट माहात्म्यसुद्धा आहे. नातेसंबंध आणि प्रत्येक नात्याचे माहात्म्य यामध्ये स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे सँडविच होत आहे. कौटुंबिक पातळीवर एखादी स्त्री आई म्हणून चांगली असेल, परंतु सासू म्हणून खाष्ट असेल किंवा बहीण म्हणून चांगली असेल, परंतु नणंद म्हणून ज्वालाग्रही असू शकते. परंतु स्वभावानुसार त्या प्रत्येकीचे स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहेच. हे आपण सर्व पाहतोच. पण, विवाहीत स्त्रीप्रमाणे अविवाहीत स्त्रीचेसुद्धा स्वतंत्र अस्तित्व आहे. कौटुंबिक पातळीवरील संबंधाच्या मूल्यमापनात एखादी स्त्री आपली भूमिका वठविण्यास कमी पडत जरी असली तरी तिचे स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व अमान्य करता येत नाही. त्यासाठी स्त्रीचे मूल्यमापन तिच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या संदर्भात करण्यासाठी तिच्या नातेसंबंधाच्या आणि त्या प्रत्येक नात्याच्या माहात्म्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. स्त्रीच्या एकूण व्यक्तिमत्त्वातून नातेसंबंध आणि त्या नात्याचे माहात्म्य वजा केल्यानंतर उर्वरित व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणजे स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व होय. तिचे हेच स्वतंत्र अस्तित्व बळकट करण्यासाठी सामाजिक, राजकीय, शासकीय पातळीवर प्रयत्न केल्या जात आहेत. स्त्रीमुक्ती, महिला सबलीकरण यासाठी प्रयत्न होत आहेत. शासकीय व अशासकीय पातळीवर स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात सरकार विशेष तरतुदी करीत आहे. सभेमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. स्त्रियांसाठी विशेष आरक्षण दिल्या जात आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती होण्यासाठी स्त्रियांना संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उच्च पदावर महिला कार्य करीत आहेत. आपली क्षमता दर्शवीत आहेत. स्त्री म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व प्रगट करीत आहेत. त्यांना योग्य सन्मान त्यांच्या कर्तृत्वामुळे प्राप्त होत आहे.
परंतु ज्या स्त्रिया नोकरी करीत नाही, सभेत सहभागी नाही, गृहिणी म्हणून कार्य करीत आहे, त्यांच्याकडे समाज विशिष्ट नात्याच्या चौकटीतून पहात आहे. स्त्री म्हणून त्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेले नाही. त्यांच्याकडून विशिष्ट आदर्शाची समाज अपेक्षा करीत आहे. बहुसंख्य गृहिणींनी स्वत:ला या नात्याच्या चौकटीत बंदिस्त केलेले आहे आणि नको त्या प्रथेचे, परंपरेचे पालन करण्यासाठी त्या जिवापाड मेहनत करीत आहे. त्यातूनच हुंडाबळी, सासूरवास, आत्महत्या, आत्मक्लेश इत्यादी वाईट प्रकार समोर येत आहे. यासाठी केवळ पुरुष वर्गाचा मर्यादेबाहेर प्रभाव हे महत्त्वाचे कारण तर आहेच त्याचबरोबर या गृहिणी स्वत:मध्ये कालानुरूप बदल करण्यास तयार नाही, हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. बदलत्या कालानुरूप आज स्त्रियांची स्मार्टनेसची संकल्पना बदलत जाणे गरजेचे आहे. जी स्त्री स्वत:चे (स्वतंत्र) स्त्री म्हणून अस्तित्व कायम ठेवून सर्व पातळीवरील आपले संबंध योग्य पद्धतीने सुदृढ ठेवत असेल, ती खर्‍या अर्थाने स्मार्ट स्त्री होय. जी स्त्री स्वत:चे स्त्री म्हणून अस्तित्व आणि जीवनाच्या प्रत्येक पातळीवरील संबंध यामध्ये योग्य समन्वय साधण्यास अयशस्वी ठरलेली असेल तिने योग्य दिशेने प्रयत्न करून यामध्ये समन्वय साधणे स्मार्ट स्त्री होण्यासाठी गरजेचे आहे. स्त्रियांना पुरुष वर्गाने यासंदर्भात सहकार्य करणेही तेवढेच आवश्यक आहे.
प्रा. शशिकांत अ. पांडे
७५८८७४१५९६

जिनांचे वंशज होते काठेवाडी हिंदू!
योगी आदित्यनाथांनी काही धर्मांतरितांना आपल्या मूळ हिंदू धर्मात विधियुक्त प्रवेश दिला तेव्हा केवढा गहजब झाला? अनेकांनी विशेषत: स्वत:ला सेक्युलर म्हणविणार्‍यांनी तर टीकेची झोड उठविली होती. जणू काही प्रचंड अत्याचार होत आहे, परंतु त्याच सेक्युलरवाद्यांनी हिंदूंचे धर्मांतर होत असताना एक शब्दही उच्चारला नाही. जणू काही जनतेचे कल्याण केले जात होते.
ज्या पाकिस्तानचे जनक म्हणून बॅ. जिनांचा उल्लेख केला जातो, त्यांचे आजोबा पुंजाभाई हिंदू होते. ते काठेवाडी होते. त्यांच्यासोबत अनेकांनी धर्मांतर केले. वि. स. वाळिंबे यांच्या १९४७ या ग्रंथात सविस्तर वर्णन आहे. (पृष्ठ क्र. ५७). परंतु लवकरच पुंजाभाईशिवाय इतर धर्मांतरितांना पश्‍चात्ताप झाला. त्यांनी परत हिंदू धर्मात येण्याचा प्रयत्न केला; परंतु आपल्या धर्ममार्तंडांनी त्याला विरोध केला. काय मिळविले या शहाण्यांनी? त्या वेळच्या शेकडो काठेवाडी हिंदूंचे आज लाखो मुस्लिम वंशज तयार झाले असतील. त्या वेळी त्यांचे शुद्धीकरण करून घेतले असते तर? त्यात कुठले धार्मिक कारण आड येणार होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका सरदाराला (मुस्लिमानी धर्मांतरण केलेल्या) शुद्धीकरण करून हिंदू धर्मात त्याचे स्वागत केले. त्या काळात महाराजांना काय कमी विरोध झाला असेल? पण खर्‍या आणि सच्च्या नेत्याला दूरदृष्टी असते हेच खरे! आपल्या हिंदूंनी काय केले? अस्पृश्यता पाळून कोट्यवधी लोकांना दुखविले. आपण गाईची पूजा करतो, बैलांची पूजा करतो एवढेच नव्हे तर नागाचीही पूजा करतो. परंतु हाडामांसाच्या आपल्याचसारख्या माणसाला मात्र अस्पृश्य म्हणून तिरस्कृत करतो. त्याचा परिणाम काय झाला? डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या सतरा कोटी अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग केला. आपल्याला काय लाभ झाला? आपण आपल्या धर्माचा प्रसार किंवा प्रचार तर करू शकत नाही, उलट आपल्याच कोट्यवधी लोकांना एका क्षणात गमावून बसलो. त्यांना दूर लोटण्याचे पाप केले. तथापि भाग्य समजा की, डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला. हे त्यांचे आपल्या देशावर फार मोठे उपकारच म्हणावे लागेल. नाही तर आजच अखंड पाकिस्तानची निर्मिती झाली असती.
डॉ. किशोर पाटील
९८२२३६३६६५