शत्रूंचे हितचिंतक कॉंग्रेसी!

0
228

मुंबईचे वार्तापत्र
एलओसी पार करून इतिहासात पहिल्यांदा भारतीय सैनिकांनी जो सर्जिकल हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानच काय, तर संपूर्ण जग आणि महाबलाढ्य समजला जाणारा अमेरिका देखील भारताच्या या कृतीचे स्वागत करीत असताना, माजी मंत्री पी. चिदंबरम्‌सारख्या काही नेत्यांनी यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा उपद्व्याप केला. मात्र, कॉंग्रेसने लागलीच सारवासारव करून विषय शांततेत मिटवला होता. अशातच पुन्हा मुंबईतल्या एका कॉंग्रेसी नेत्याने आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या या बोलघेवड्या नेत्याचे नाव संजय निरुपम असे आहे. एकीकडे कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी आणि संपूर्ण कॉंग्रेस पक्षाने देखील याचे समर्थन केले असताना, निरुपम यांनी विष ओकणारे वक्तव्य केले आहे. गुलाम काश्मिरात घुसून भारतीय जवानांनी केलेली कारवाई ‘फेक’ असल्याचे सूचित करणार्‍या निरुपम यांच्या या बालिश वक्तव्याचा समाचार देशवासीयांनी घेण्याआधीच कॉंग्रेस पक्षाने घेतला आणि सदर विषयात कॉंग्रेस सरकार सोबत असून, आम्हाला कुठलेही पुरावे नकोत असे स्पष्ट केले. तर, जो नेता पक्षाच्या निर्णयाबाहेर जाऊन वक्तव्य करत असेल त्याची गंभीर देखल घेतली जाण्याचा सज्जड दम भरत निरुपमसारख्या नेत्याच्या इभ्रतीचे वाभाडेच काढले आहे.
गुलाम काश्मीरमध्ये जाऊन भारतीय सेनेने जो हल्ला चढवला, खरे तर तो पाकिस्तानवरचाच हल्ला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या कूटनीतीतून त्यांनी केलेला हा हल्ला शस्त्रसंधीच्या चाकोरीत राहून केल्याचे जगासमोर चित्र उभे केले आहे. हा सर्व प्रकार भाजपाने राजकीय श्रेय लाटण्यासाठी उभा केलेला ‘फार्स’ असल्याचे हे बोलघेवडे सांगताना दिसत आहेत. या घटनेचे राजकीय भांडवल कोण करत आहे हे आता संपूर्ण देशासमोर आले आहे. देशातील जनतेला कळून चुकले आहे. प्रत्यक्षात या हल्ल्याची घोषणा सेनेच्या प्रवक्त्यानेच केली. त्यात कुठेही राजकीय पक्ष अथवा सत्ताधारी पक्षाचा सहभाग नव्हता. अगदी संरक्षण मंत्रीसुद्धा यापासून दूर राहिले होते. शिवाय ही घोषणा कुण्या सेनेच्या सामान्य अधिकार्‍याने केलेली नाही. महासंचालक दर्जाच्या लेफ्टनंट जनरलने केली होती. त्यावर अविश्‍वास दाखवणे म्हणजे थेट भारतीय लष्करावर अविश्‍वास दाखविण्यासारखे आहे.
एकीकडे मनमोहनसिंग यांच्या काळात देखील असे कित्येक सर्जिकल स्ट्राईक झालेत पण याचा गवगवा केला जात नसतो, असे शहाणपण शिकवायचे. आणि दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देण्याची मागणी करायची. कॉंग्रेसी नेत्यांची ही दोन्ही वक्तव्ये ऐकमेकांमध्ये मेळ खात नाही. निरुपम यांनी मुंबई आणि त्यातल्या त्यात आपल्या मतदार क्षेत्रात चाललेले पक्षांतर्गत वॉर निपटले तरी त्यांच्या दृष्टीने फार मोठे कार्य होईल. उगाच ‘लहान तोंडी मोठा घास’ घेऊन, आपल्या अकलेचे प्रदर्शन करण्यापेक्षा ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवली तर, त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या पक्षाचे भले होईल!…
जिथे जर्मनी, श्रीलंका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या सर्जिकल स्ट्राईकचे सर्मथन केले आहे. तेथे कॉंग्रेसच्या दीडशहाण्यांनी पोपटपंची करून, हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलल्याचे दिसत आहे. यात अरुण शौरी, ओम पुरी, दिग्विजयसिंह आणि अरविंद केजरीवाल यांच्या सारख्यांचाही भर पडल्याचे आपल्याला दिसले. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करणारा आणि आपल्या जवानांवर अविश्‍वास दर्शविणारा आहे. प्रत्यक्षात आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे. ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही, अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवून, सेनेचे मनोबल उंचावणारी कृती केल्यास हीसुद्धा देशसेवाच ठरेल, हे जाणले पाहिजे.
नापाक पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य आधी मान्य केले. पण, नंतर नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच आहे. त्यांच्याकडून अजून दुसरी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्‍यांनी शंका व्यक्त कराव्यात याचे दु:ख आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने सूड घ्यावा, अशी मागणी देशभरातूनच उठू लागली व सूड किंवा बदला घेताच जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र, पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच जाहीर केले की, भारताकडून अशा प्रकारचा कोणताही सर्जिकल हल्ला झाला नाही, तर दुसरीकडे आमचे दोन सैनिक मारल्या गेले, आठ जखमी झाले अशी कबुलीही दिली. भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले म्हणून बोंब ठोकणे सुरू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वक्तव्याची री ओढण्याचे काम या निरुपम सारख्या गल्लीबोळात किंमत नसलेल्या नेत्याने करून, आपले महत्त्व वाढविण्याचा आणि स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला खरा, पण यातून त्यांनी आपल्या पक्षालाच तोंडघशी पाडले आहे, हे मात्र खरे.
संपूर्ण देश ‘गोली का जवाब गोली’ आणि ‘खून का बदला खून’ म्हणत या हल्ल्याने आनंद साजरा करत आहे. तर जिथे कट्टरवादी समजले जाणारे सपाचे नेते अबू आजमी यांनी देखील या हल्ल्याचे तोंडभरून कौतुक केले, तेथे कॉंग्रेसी नेत्यांनी ‘आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असा प्रकार करणे कितपत योग्य आहे. अशांना आता जनताच धडा शिकवेल, यात काही शंका नाही.
पाकिस्तानसारखा खोटारडा देश जगाच्या पाठीवर कुठेही नाही. दाऊद यांच्या देशात नाही, ओसामा यांच्या देशात नव्हता, दहशतवाद्यांना तर यांच्या देशात थारा नाही, दहशतवाद म्हणजे काय यांना माहीत नाही अशा पद्धतीच्या भंपक गोष्टी करण्यात ह्या देशाची भिस्त टिकली आहे. भारताने हल्ला केला तर, जशास तसे उत्तर देऊ म्हणणार्‍या पाकिस्तानी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांना हे अधिकार आहे काय? जिथे लष्करप्रमुखाच्या भिकेचे तुकडे तोडत आपली खुर्ची शाबूत ठेवणारी ही कायम लाचार जमात, भारताला काय प्रत्युत्तर देणार? मात्र, त्यांच्या या नौटंकी स्वभावास धरूनच केलेल्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवून, सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्‍यांनी शंका व्यक्त कराव्यात, हे खरोखर दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सर्जिकल कारवाईबाबत त्यांचे अभिनंदन, पण पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा करावा यासाठी सर्जिकल कारवाईचा एखादा व्हिडीओ अथवा छायाचित्रे लोकांसमोर आणावीत, अशी मागणी करणे याला दुटप्पीपणा म्हणावे लागेल. विशेष म्हणजे पाकिस्तानला एकप्रकारे बळकटी देणारेच हे कृत्य आहे. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक तर सोडा अनवधानाने देखील कुणी भारतीयाने कृत्य करणे टाळावे यातच आपले आणि आपल्या देशाचे भले आहे, हे कसे आणि कुणी समजवावे यांना?
अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तेव्हा त्या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीकरण जगासमोर आणावे, अशी मागणी एकाही अमेरिकन नागरिकाने केली नव्हती. तथापि, लादेनला खरेच मारले की नाही? जो मारला गेला तो खरोखरच लादेनच होता की त्याचा डुप्लिकेट? अशा शंका त्यावेळी उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे कारवाईचे चित्रीकरण करून, मारला गेलेला लादेनच होता हे सत्य अमेरिकेला जगासमोर आणले व ते सुद्धा काही अंशीच फिल्म दाखवून. आपल्या जवानांनी केलेली कारवाई तेवढीच तोलामोलाची आहे. मात्र, भारताला अन्य कुणी याबाबतचे पुरावे मागितले नसताना, देशातूनच असे पुरावे मागून अविश्‍वास दर्शविण्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.
– नागेश दाचेवार
९२७०३३३८८६