आत्मघाती कॉंग्रेस

0
124

कटाक्ष
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शेतकर्‍यांसाठीचे आंदोलन अर्धवट सोडून आजीला भेटायला इटलीला गेले म्हणतात. एकीकडे कॉंग्रेसपुढे अस्तित्वाचेच संकट उभे असताना दुसरीकडे युवराजजर आंदोलन अर्धवट सोडून इटलीला जाणार असतील तर आंदोलनाची वाट लागणारच, कॉंग्रेसचे काय होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आज कर्नाटक, पंजाब, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोरम या पाच राज्यांमध्येच फक्त कॉंग्रेसची सत्ता आहे. उरलेल्या २४ राज्यांपैकी १३ मध्ये भाजपाची आणि उरलेल्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. एकेकाळी घराघरात असलेली कॉंग्रेस आता संपत चालली की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. सत्तेबाहेर असलेली कॉंग्रेस नैराश्याच्या गर्तेत सापडली आहे. याच नैराश्यातून मग कॉंग्रेसचे नेते बेताल बडबड करीत आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र माजी खासदार संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुखांबाबत जी मुक्ताफळं उधळलीत, ती विचारात घेतली तर कॉंग्रेसची बुडती नौका आणखी खोलात जाताना दिसत आहे. समाजातल्या सगळ्या घटकांनी स्वातंत्र्य आंदोलनात कॉंग्रेसच्या नेतृत्वात सहभाग नोंदविला होता. आज लोक त्याच कॉंग्रेसला नाकारू लागले आहेत आणि कॉंग्रेसचे नेते बोध घ्यायला तयार नाहीत, ही विनाशाकडे सुरू झालेली वाटचालच म्हणावी लागेल. संदीप दीक्षित यांनी देशाच्या लष्करप्रुमखांबाबत जे वक्तव्य केले, ते निंदनीय आहे. विरोधी पक्षांनीच नव्हे, तर देशातल्या तमाम जनतेने या दीक्षितांचा निषेध केला पाहिजे अन कॉंग्रेसने बिनशर्त माफी मागून संदीप दीक्षित यांना पक्षातून हाकलले पाहिजे. लष्करप्रमुख बीपिन रावत हे रस्त्यावरचे गुंड आहेत, असे अनुदार उद्‌गार काढून लष्कराचा अपमान करणार्‍या आणि आमच्या शूर जवानांचे मनोधैर्य खच्ची करणार्‍या संदीप दीक्षित यांना थोडीशीही लाज वाटत असेल तर त्यांनी देशाची अन् लष्कराची माफी मागितली पाहिजे. पण, दीर्घकाळ सत्ता भोगल्यानंतर जी मस्ती त्यांच्या अंगी आली आहे, ती अशी सहजासहजी उतरेल याची शक्यता दिसत नाही. देशातल्या कोणत्याही नेत्याने लष्कराबाबत असे विधान करू नये एवढे तोकडे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. त्याऐवजी त्यांनी देशाची माफी मागितली असती आणि कॉंग्रेस पक्षानेही निवेदन प्रसिद्धीस देत खेद व्यक्त केला असता, तरी जनतेने मोठ्या मनाने माफ केले असते. पण, त्यासाठी मुळातच औदार्य लागते. ते कॉंग्रेसकडे नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. कॉंग्रेसच्या आमदार-खासदारांची रोडावत चाललेली संख्या पाहता या पक्षाला असलेला राष्ट्रीय दर्जा तरी भविष्यात कायम राहील का, याबाबतही शंकाच वाटते. कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणारी भारतीय जनता पार्टी आणि गैरकॉंग्रेसवाद या तत्त्वावर जन्माला आलेली समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, नितीशकुमार यांची जदयू, बीजू जनता दल, लालूंचा राष्ट्रीय जनता दल हे पक्ष भलेही कॉंग्रेसच्या रसातळाला जाण्याने संतुष्ट होत असतील, पण भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा नाही का? ज्या पक्षाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनतेची मान्यता होती, त्या सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसचे संपणे भारतीय लोकशाहीसाठी अशुभ नाही का? देशात लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर किमान दोन राजकीय पक्ष हे राष्ट्रीय पातळीवर मजबूत असले पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी अतिशय मजबूत आहे पण, त्याचवेळी कॉंग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे. यातून सावरण्याऐवजी कॉंग्रेस दिवसेंदिवस कमजोरच होत चालली आहे. ज्यादिवशी कॉंग्रेसची प्रासंगिकता संपेल, तो दिवस भारतीय लोकशाहीसाठी अपशकुनी ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, कॉंग्रेच्या तोडीचा आणि भाजपाचा मुकाबला करू शकेल असा एकही पक्ष आज राष्ट्रीय पातळीवर नाही. नाही म्हणायला शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेते. पण, त्या पक्षाची बाहेरच्या राज्यातील कामगिरी लक्षात घेता, त्या पक्षापुढेही राष्ट्रीय मान्यता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे भाजपाशी टक्कर द्यायला कॉंग्रेसने स्वत:ला सज्ज करणे आवश्यक आहे. गमावलेली विश्‍वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी कॉंग्रेसला देशभर अभियान राबवावे लागणार आहे. आत्मबळ गमावून बसलेल्या कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करावे, ज्या प्रादेशिक नेत्यांमध्ये क्षमता आहे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, नव्या रक्ताच्या नेत्यांना संधी द्यावी, ज्या राज्यात जे नेते दमदार आहेत, त्यांना नेतृत्व सोपवावे, बहुसंख्य हिंदूंकडे दुर्लक्ष करून अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा त्याग करावा. असे केले तरच कॉंग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकेल. आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तसेच भाजपाची वाढलेली ताकद लक्षात घेता २०२४ सालापर्यंत तरी केंद्रात कॉंग्रेसची सत्ता येईल, असे चित्र नाही. पण, २०१४ नंतर संख्येत येण्यासाठी कॉंग्रेसने आतापासूनच तयारी करायला हवी. अन्यथा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न खरोखरीच पूर्ण होईल. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी देशभर घेतलेल्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी जेव्हा कॉंग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता, तेव्हा विरोधकांनी आणि कथित बुद्धिवंतांनी मोदींची खिल्ली उडवली होती. पण आज मोदींचा तो नारा कॉंग्रेसवालेच खरा करून दाखवायला उतावीळ झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात शेतकर्‍यांनी सरकारविरुद्ध दंड थोपटले असताना आणि त्याचा लाभ घेण्याचा स्थानिक कॉंग्रेसी नेत्यांचा प्रयत्न असताना राहुल गांधी यांनी या नेत्यांना बळ द्यायचे सोडून इटलीला जाणे पसंत केले. ऐन शिकारीच्या वेळी कुत्रा हागायला जातो, असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. त्याची प्रचिती राहुल गांधींनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना घडविली आहे. आंदोलनकारी कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरून सत्ताधार्‍यांच्या तोंडाला फेस आणायचे सोडून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना इटलीतल्या आजीची भेट घ्यावीशी वाटत असेल तर त्यांना रोखणार तरी कोण? देशात आपणच एकमेव राजकीय पक्ष आहोत आणि इतरांना काही स्थान नाही, अशी कॉंग्रेसची भावना झाली होती. ती भावना अधिक प्रबळ होत गेल्यानेच आज कॉंग्रेसपुढे अस्तित्वाचे संकट उभे ठाकले आहे. उद्या भाजपाची स्थिती आधीच्या कॉंग्रेससारखी मजबूत झाली तर आज जे हाल कॉंग्रेसचे होत आहेत, तेच उद्या भाजपाचेही होतील. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. असे होऊ नये म्हणून सत्ताधारी भाजपासोबतच कॉंग्रेसही तितकीच मजबूत असणे हे लोकशाहीच्या आणि भाजपाच्याही हिताचे आहे. किमान एक मजबूत विरोधी पक्ष एवढी तरी स्वत:ची स्थिती निर्माण करण्यात कॉंग्रेस यशस्वी झाली तरी त्या पक्षाने भरपूर मिळविले असे म्हणता येईल. कॉंग्रेसला पुनरुज्जीवित करणे अशक्य नाही. पण, कॉंग्रेसवाल्यांना स्वत:ला तसे वाटते का, हे महत्त्वाचे आहे. एकेकाळी भाजपाच्याही लोकसभेत केवळ दोनच जागा होत्या. पण भाजपाने निराश न होता परिश्रमपूर्वक स्वत:ला मोठे केले अन् आज स्वबळावर त्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे. भाजपाचे हे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवत कॉंग्रेसनेही स्वत:ला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले पाहिजे. अन्यथा, विरोधक तर वाट लावायला बसलेच आहेत. कॉंग्रेसचा जो नेता राज्यस्तरावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला दिल्लीतली चौकडी पक्षातूनच हुसकावून लावते. अशीच स्थिती राहिली तर जनता कॉंग्रेसला भारतीय राजकारणातून हाकलून लावेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हेमवतीनंदन बहुगुणा, पी. ए. संगमा, शरद पवार, नंदिनी सत्पथी, ममता बॅनर्जी अशा कितीतरी कॉंग्रेसी नेत्यांची यादी पुढे करता येईल. हे नेते आपापल्या प्रदेशात ताकदवर होत असतानाच त्यांना कॉंग्रेसमधून बहिष्कृत व्हावे लागले. आज हे सगळे नेते कॉंग्रेसमध्ये असते आणि त्यांची एकत्रित ताकद निवडणुकीत लागली असती तर कदाचित चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. पण, नियतीला काही वेगळेच मान्य असेल तर कोणाचाच इलाज चालत नाही, हेही तेवढेच खरे!
– गजानन निमदेव