कोण होणार देशाचा नवा राष्ट्रपती?

0
125

दिल्लीचे वार्तापत्र
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा औपचारिक कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यानुसार देशाचा नवा घटनात्मक प्रमुख आणि तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेनापती निवडण्यासाठी १७ जुलैला मतदान होणार आहे. २० जुलैला देशाच्या नव्या राष्ट्रपतीचे नाव जाहीर होणार आहे, आणि २५ जुलैला नवा राष्ट्रपती आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. अद्याप सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीने राष्ट्रपतिपदाच्या आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. २८ जूनपर्यंत दोन्ही बाजूंच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली असतील. कारण उमेदवारी अर्ज भरण्याची ही अंतिम तिथी आहे. या वेळी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होईल की सर्वसहमतीने नवा राष्ट्रपती निवडला जाईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्वसहमती साधण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. विरोधी पक्षांनीही राष्ट्रपतिपदासाठी आपला उमेदवार निश्‍चित करण्यासाठी दहा नेत्यांची एक समिती गठित केली आहे. संख्याबळाचा विचार करता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणणे भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी आता फक्त औपचारिकता उरली आहे. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशिवाय अन्य काही राजकीय पक्षांनीही भाजपाला आपला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतिपदासाठी अनेकांच्या नावाची चर्चा असली तरी भारताचा नवा राष्ट्रपती कोण होणार हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच माहीत आहे. विरोधी पक्षाच्या आग्रहामुळे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दुसर्‍यांदा राष्ट्रपती होण्याची तयारी दर्शवली होती, मात्र यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून आला पाहिजे, अशी प्रणव मुखर्जी यांची भूमिका होती. सत्ताधारी भाजपाकडून असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता नसल्यामुळे दुसर्‍यांदा राष्ट्रपती होण्याची प्रणव मुखर्जी यांची शक्यताही मावळली आहे.
देशाच्या आतापर्यंतच्या राष्ट्रपतींचा आढावा घेतला तर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद वगळता दुसर्‍या कोणालाही दुसर्‍यांदा राष्ट्रपती होता आले नाही. सर्वाधिक म्हणजे जवळपास १२ वर्षे राष्ट्रपतिपदावर राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. सर्वांत कमी काळ राष्ट्रपतिपद झाकीर हुसेन यांनी भूषवले. २६ जानेवारी १९५० ते १२ मे १९६२ पर्यंत डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपतिपद भूषवले. त्यानंतर मात्र कोणाच्याच नशिबी असे भाग्य आले नाही.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, वराहगिरी व्यंकटगिरी, नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग, आर. व्यंकटरमण, डॉ. शंकरदयाल शर्मा, के. आर. नारायणन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. योगायोग म्हणजे झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांना राष्ट्रपतिपदाचा पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती असलेले झाकीर हुसेन यांचे राष्ट्रपतिपदावर असतानाच निधन झाले. त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ सर्वात कमी म्हणजे दोन वर्षांपेक्षाही कमी राहिला. १३ मे १९६७ ला झाकीर हुसेन राष्ट्रपती झाले आणि ३ मे १९६९ ला त्यांचे पदावर असतानाच निधन झाले. फक्रुद्दीन अली अहमद यांचेही राष्ट्रपतिपदावर असताना निधन झाले. २४ ऑगस्ट १९७४ ला फक्रुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले आणि ११ फेब्रुवारी १९७७ ला त्यांचे पदावर असतानाच निधन झाले. अडीच वर्षांपेक्षाही कमी काळ ते राष्ट्रपती होते.
उपराष्ट्रपती असलेले पण नंतर राष्ट्रपती झालेले वराहगिरी व्यंकटगिरी पहिले होते. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या आकस्मिक निधनामुळे त्या वेळी उपराष्ट्रपती असलेले वराहगिरी व्यंकटगिरी यांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. ३ मे १९६९ ते २० जुलै १९६९ पर्यंत गिरी कार्यवाहक राष्ट्रपती होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी कार्यवाहक राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. २० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९ या काळात हिदायतुल्ला यांनी कार्यवाहक राष्ट्रपतिपदाची जबाबदारी सांभाळली.
फक्रुद्दीन अली अहमद यांचे राष्ट्रपतिपदावर असताना निधन झाल्यामुळे त्या वेळी उपराष्ट्रपती असलेले बसप्पा दानप्पा जत्ती यांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली होती. ११ फेब्रुवारी १९७७ ते २५ जुलै १९७७ या काळात जत्ती देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती होते. मात्र व्ही.व्ही. गिरी यांच्याप्रमाणे भारताचे पूर्णकालीन राष्ट्रपती होण्याचे भाग्य जत्ती यांना लाभले नाही. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचीही राष्ट्रपती होण्याची इच्छा लपून राहिली नाही. मात्र हमीद अन्सारी राष्ट्रपती होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. अन्सारी यांचा उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाळही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर लगेच संपत आहे. विशेष म्हणजे हमीद अन्सारी यांनी सलग दहा वर्षे उपराष्ट्रपतिपद भूषवले आहे. पण, राष्ट्रपतिपदाने त्यांना वारंवार हुलकावणी दिली. उपराष्ट्रपती राहिलेल्या पण नंतर राष्ट्रपती झाल्याचा बहुमान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी व्यंकटगिरी, आर. व्यंकटरमण, डॉ. शंकरदयाल शर्मा, के. आर. नारायणन यांनाच लाभला. राष्ट्रपतिपदाच्या पाठोपाठ उपराष्ट्रपतिपदासाठीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या वेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कोण होणार याबाबत स्वाभाविकच उत्सुकता आहे.
प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यामुळे या वेळी पुन्हा दुसर्‍या कोणा महिलेला राष्ट्रपतिपदाची संधी मिळते का याबाबत उत्सुकता आहे. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचे नाव सत्ताधारी पक्षातर्फे चर्चेत आहे. देशात आजपर्यंत शीख राष्ट्रपती झाला, मुस्लिम आणि दलित समाजातील व्यक्तींनाही राष्ट्रपतिपद भूषवण्याची संधी मिळाली. पण, आतापर्यंत देशातील मूळ रहिवासी असलेल्या आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू यांचे नाव सध्यातरी आघाडीवर दिसत आहे.
मुर्मू यांच्यासोबत राष्ट्रपतिपदासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र अनेक वेळा चर्चेत असलेली नावे मागे पडून ऐनवेळी नवीनच नाव समोर येते, तसे या वेळी झाले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात अनेक वेळा धक्कातंत्राचा अवलंब करत असतात, त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड करताना त्यांनी ‘जोर का धक्का धिरेसे दिला’ तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.
येत्या काही दिवसांत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले असेल आणि देशाचा नवा राष्ट्रपती कोण होणार याबाबतची जनमानसातील उत्सुकताही सत्ताधारी पक्षाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर संपलेली असेल.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७